संपादने
Marathi

शिक्षणाचा फतवा, ज्ञानाचे फरमान, अलवरचे अली… ‘बजरंग बली!’

14th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एखाद्या गरिबाला तुम्ही पैसे दिले तर त्याची थोडीफार चणचण तुम्ही दूर करू शकता, त्याची त्यावेळपुरती घडी बसवू शकता पण जर एखाद्या निरक्षराला अक्षरांचे धडे दिले आणि अशिक्षिताला शिक्षणाचे धडे दिले तर त्याच्यासह त्याच्या येणाऱ्या पिढ्याही तुम्ही घडवलेल्या असतात, असे म्हटले जाते.

हीच गोष्ट लक्षात घेऊन समाजाचे ऋण फेडताहेत अलवरचे भूषण डॉक्टर फरमान अली. शिक्षण हा असा सुगंध आहे जो समाजात सतत दरवळत राहतो आणि सकारात्मक बदल घडवून आणतो, यावर अली यांचा विश्वास आहे. अली हे राजस्थानातल्या अलवरमधील ‘राजस्थान इन्स्टिट्यूट’चे संस्थापक आहेत. सुसंस्कृत, कार्यक्षम नागरिक घडवणे हे या इन्स्टिट्यूटचे ध्येय आहे.

image


दिल्लीतील ‘जामिया मिलिया इस्लामिया’तून फरमान यांनी हिंदी साहित्यात एमए पूर्ण केले. नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएचडी संपादन केली. दिल्ली विद्यापीठांतर्गत मोतीलाल नेहरू महाविद्यालयात काही दिवस अध्यापन केले. पुढे काही काळ राजस्थान विद्यापीठातही शिकवले. फरमान आपल्या कामाने समाधानी होते, पण कुठेतरी तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी काही करण्याची इच्छा होतीच. जिथे आपली पाळेमुळे खोलवर अन् घट्ट रोवलेली आहेत, अशा मातीसाठी काही करायची इच्छा होतीच. मूळ गाव अलवर त्यांना सारखे खुणावत होते… बोलावत होते…

फरमान ‘सरजमीन-ए-अलवर’ का

अलवर हा राजस्थानातला एक मागासलेला भाग आहे. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन इथे मिळत नव्हते. कितीतरी हुशार विद्यार्थी पडेल ती कामे करत होती. आला दिवस ढकलत होती. फरमान यांच्या मनात आले, की अलवरमध्येच आपण एक इन्स्टिट्यूट सुरू करायची आणि गावातील मुला-मुलींना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करायचे. भविष्ये घडवायची. नोकरीला ‘खुदा हाफिज़’ केला. ‘सरजमीन-ए-अलवर’कडे फरमान निघाले… २००९ मध्ये ‘राजस्थान इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. वडिलांचे त्यांना संपूर्ण सहकार्य मिळाले. प्रत्येक पावलावर आपल्या सेवाकांक्षी मुलाचे बोट त्यांनी धरून ठेवलेले होते.

‘बिस्मिल्ला…’ असा केला…

फरमान स्वत: सांगतात, की अलवरमध्ये उच्चशिक्षित लोकांची वाणवाच आहे. जे कुणी मोजके उच्चशिक्षित आहेत, ते मोठ्या शहरांमध्येच राहाणे आणि करिअर करणे पसंत करतात. म्हणून अलवरची स्थिती वर्षानुवर्षे जैसे थे आहे. फरमान यांनी मात्र निश्चयच केलेला होता, की इथल्या युवकांसाठी ते असे काही करतील, की नाव निघेल! मोहीम सुरू झाली. दोन विद्यार्थी मिळाले. फरमान यांनी शिकवणे सुरू केले. दोनाचे चार, चाराचे आठ होत गेले. परिसरात नाव पसरत गेले आणि लांबलांबवरून त्यांच्याकडे शिकायला येणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

विद्यार्थीसंख्या २ वरून ३५०० वर

आज फरमान यांच्या ‘राजस्थान इन्स्टिट्यूट’मध्ये ३५०० वर विद्यार्थी आहेत. विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण चाललेले आहे. दिमतीला २० शिक्षक आणि ३२ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. इथं प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने यशस्वी होताहेत. कुटुंबाचे, गावाचे नाव वाढवताहेत आणि फरमान अलींची छाती इंच-इंच फुलवताहेत. शिक्षण श्रेणीच्या विविध परीक्षा, शालेय शिक्षक पदासाठीच्या परीक्षा, राजस्थान प्रशासन सेवेच्या परीक्षा, पोलिस भरतीच्या परीक्षा अशा सर्वच परीक्षांसाठी फरमान प्रशिक्षण देतात.

शहिदांची मुले, विधवांना विनामूल्य शिक्षण

राजस्थानातील अनेक लोक सैन्यात आहेत. देशाची सेवा करताहेत. सीमेची सुरक्षा करताहेत. कर्तव्यावर हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांच्या मुलांसाठी आणि विधवांसाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. फरमान हे कर्तव्य पार पाडण्यात आघाडीवर असतात. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ते हुतात्म्यांच्या मुलांना व विधवांना ते विनामूल्य प्रशिक्षण देतात. अपंगांना ४० टक्के फी इथे माफ केली जाते.

रामलल्लाच्या आरतीत दंग बंदा अल्लाहचा…

फरमान अली हे अलवरच्या सद्भावनेचे प्रतीक बनलेले आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून त्यांचे योगदान असतेच. विविध संस्थांना ते मदतही करतात. अलवरच्या रामलिला समितीचे ते सदस्य आहेत. विशेष म्हणजे यावेळी प्रभू रामचंद्राच्या पहिल्या आरतीचा मानही फरमान अली यांना असतो. दरवर्षी ते रामरायाची आरती तल्लीनतेने करतात. कितीतरी अशासकीय सेवाभावी संस्थांशी ते संलग्न आहेत. विद्यार्थ्यांसाठी शालेय पातळीवर विविध उपक्रम या माध्यमातून ते राबवत असतात.

फरमान हे मिळालेली सवड कधीही दवडत नाहीत. थोडा जरी मोकळा वेळ मिळाला तरी ते एखाद्या खेड्याकडे रवाना होतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांना भविष्यातल्या संधींबाबत मार्गदर्शन करतात. शिक्षणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करतात. ग्रामिण लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतात. गेल्या अनेक वर्षांपासून या कामातील सातत्यामुळे त्यांना इथला बच्चा-बच्चा फरमानसर म्हणून ओळखतो. फरमान म्हणतात, ‘लोकांना शिक्षणाबद्दल जागरूक करणे, हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे.’

पत्नीची साथ…

फरमान यांच्या सौभाग्यवतीही एमए बीएड आहेत. गरिब महिलांना मदत करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. निरक्षर महिलांची संख्या इथं भलीमोठी आहे. या सगळ्या बायका आरोग्याबाबत जरी समस्या उद्भवली तरी सौ. फरमान यांच्या घरी धडकतात. जशा त्या कुणी डॉक्टरच आहेत. सौ. फरमान स्वत: मग या बायकांना दवाखान्यात नेतात. सगळा खर्चही करतात.

गावातल्या वयोवृद्धांसाठी लवकरच वैद्यकीय उपक्रम सुरू करण्यासाठी फरमान यांच्या हालचाली सध्या सुरू आहेत. ही सगळी कामे डॉ. फरमान हे स्वत:च्या बळावर करतात, हे विशेष. त्यांना शासनाकडून वा अन्य कुणाकडून दान वा अनुदान असे काही मिळत नाही. ते कुणाला काही मागतही नाहीत. इन्स्टिट्यूटमधून जो काही पैसा मिळतो, त्यातूनच हा खर्च चालतो.

image


सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत ते मुलांना शिकवतात. नंतर लोकांच्या मदतीसाठी निघतात. बऱ्याचदा मध्यरात्रीनंतर घरी परतणे होते. सुटीच्या दिवशी खेड्यापाड्यात सेवेसाठी निघून जातात. तिथे लोकांची मदत करतात. फरमान यांना परिसरात मोठा सन्मान आहे. लोक त्यांचा आदर करतात.

‘‘प्रत्येक समस्येवर उपाय म्हणजे शिक्षण. भारताला महाशक्ती बनवायचे तर गावा-गावांतून आम्हाला शिक्षणाची ज्योत न्यावी लागणार आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हे केवळ सरकारचे काम आहे, असे आम्ही समजणार असू तर ते जमणार नाही. व्यक्ती म्हणूनही प्रत्येकाने शिक्षणाच्या प्रसारासाठी पुढे आले पाहिजे. खारीचा का होईना वाटा उचलला पाहिजे. अगदी तळागाळापर्यंत ज्ञानगंगेचा प्रवाह जेव्हा पोहोचलेला असेल, तेव्हा महाशक्ती होण्यापासून जगातील कुठलीही शक्ती आम्हाला रोखू शकणार नाही.’’

डॉ. अली यांचा हा विचारच नाही तर तो त्यांचा आचारही आहे. ते नुसते असे बोलत नाहीत. तसे जगतही आहेत!

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags