संपादने
Marathi

दहावी नापास ते यशस्वी उद्योजक, 'मिट्टीकूल'च्या मनसुखभाई यांच्या यशोगाथेवर सीबीएसई बोर्डात धडा

Ranjita Parab
19th Mar 2016
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

दहावीत नापास झाल्यानंतर चहाचे दुकान चालवणाऱ्या एका विद्यार्थ्याने केलेल्या संशोधनाचे कौतुक भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम करतात. तसेच 'ग्रामीण भारताचा तूच सच्चा संशोधक आहेस', असे उद्गार  त्याला उद्देशून काढतात, ही गोष्ट कदाचित कोणाला पटणार नाही. मात्र ही प्रेरणादायी कथा आहे गुजरात राज्यातील मनसुखभाई प्रजापती आणि त्यांच्या 'मिट्टीकूल' या व्यवसायाची. 'मिट्टीकूल' या नावातचं व्यवसायाची रुपरेषा आपल्याला समजते. 'मिट्टीकूल' अर्थात मातीची उत्पादने. याच उत्पादनांमुळे मनसुखभाई यांना एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली असून, यशस्वी उद्योजकांमध्ये त्यांची गणना केली जाते. सध्या मनसुखभाई यांच्याकडे जवळपास ५० कर्मचारी कार्यरत आहेत.

image


गुजरातमधील मोरवी या एका लहानशा गावात मनसुखभाई यांचे बालपण हालाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांचे आई-वडिल दोघेही मडकी बनवण्याचा व्यवसाय करत असत आणि मनसुखभाई शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना या व्यवसायात मदत करत असत. अहोरात्र मेहनत केल्यानंतरही प्रजापती कुटुंबाला या व्यवसायात मिळणारे उत्पन्न अल्प होते. जेव्हा मनसुखलाल दहाव्या इयत्तेत नापास झाले, तेव्हा त्यांनी शाळेला कायमचा रामराम ठोकत वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना त्यात रस नव्हता त्यामुळे त्यांनी चहाची एक टपरी सुरू केली. त्यानंतर त्यांना रुफ टाईल्स बनवणाऱ्या एका कंपनीत ३०० रुपये पगाराची नोकरी मिळाली. तेथे पाच वर्षे काम केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मात्र त्यासाठी त्यांना भांडवल लागणार होते. कंपनीच्या मालकाच्या मुलासोबत मनसुखभाई यांनी कर्जाबाबत बोलणी केली आणि ती यशस्वी झाली. कंपनीचे मालक मनसुखभाई यांना ५० हजार रुपयांचे कर्ज देण्यास तयार झाले. मात्र मनसुखभाई यांचे आई-वडिल या गोष्टीसाठी तयार नव्हते. ३०० रुपये पगार घेणारा मुलगा ५० हजारांचे कर्ज कसे फेडेल, असा यक्षप्रश्न त्यांना पडला होता. अखेरीस मनसुखभाई यांनी आपल्या आई-वडिलांना कर्जासाठी राजी केले आणि कंपनीच्या मालकाकडून ३० हजार रुपये कर्ज घेतले. त्यानंतर मनसुखभाई यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तो ही मातीची भांडी बनवण्याचा. सुरुवातीच्या काळात त्यांनी तवा बनवण्याचा प्रयत्न केला. भारतात प्रथमच मनसुखभाई यांनी मातीचा तवा बनवण्याचे यंत्र तयार केले होते, ते प्रतिदिन ७०० तवे बनवत असे. मात्र त्यांचे नशीब पालटले ते एका मोठ्या ऑर्डरमुळे. दक्षिण आफ्रिकेतून एक व्यापारी फिल्टर बनवण्याच्या उद्देश्याने वाकानेर येथे आला होता. त्याने मनसुखभाई यांना एक लाख रुपयांची ऑर्डर दिली.

image


मातीचा फ्रिज बनवण्याची कल्पना मनसुखभाई यांना कशी सूचली, याबाबत बोलताना ते सांगतात की, '२००१ साली जेव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला, तेव्हा माझे अतोनात नुकसान झाले. माझी सर्व उत्पादने या भूकंपात तुटली होती. तेव्हा गुजरातमधील संदेश वृत्तपत्रातील पत्रकाराने 'गरिबांचे फ्रिज तुटले', या मथळ्याखाली बातमी केली होती. तेव्हा माझ्या मनात मातीचा फ्रिज तयार करण्याचा विचार आला. यासाठी मी एका ठिकाणाहून साडेतीन लाखांचे कर्ज घेतले. पाच वर्षे अहोरात्र मी या फ्रिजच्या कल्पनेवर काम केले आणि अखेरीस फ्रिज तयार झाला. मात्र आता त्याची विक्री कशी करायची, हा माझ्यासमोर प्रश्न होता. तेव्हा आयआयएम अहमदाबादचे अनिल गुप्ता मला भेटायला आले. त्यांनी माझ्या या फ्रिजची सर्व माहिती गोळा केली आणि मला दोन लाखांची मदतदेखील केली. अशा प्रकारे मी तयार केलेला फ्रिज प्रकाशझोतात आला. मी तयार केलेली सर्व उत्पादने ही मातीची असल्याने मी त्यांना 'मिट्टीकूल' असे नाव द्यायचे निश्चित केले.' मनसुखभाई यांचा 'मिट्टीकूल' फ्रिज हा साध्यासोप्या विज्ञानावर अवलंबून असून, त्याकरिता २००६ साली दिल्ली येथे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचे कौतुक करण्यात आले. तेव्हा कलाम यांनी मनसुखभाई यांना उद्देशून 'ग्रामीण भारत के सच्चे सायंटिस्ट तो आप ही हो', असे उद्गार काढल्याचे मनसुखभाई अभिमानाने सांगतात. आज मनसुखभाई यांच्या कारखान्यात दैनंदिन वापरातील सर्व भांडी तयार केली जातात तीही मातीची. मग ते रोजच्या वापरातील चमचे असो वा फ्रिजमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बाटल्या. मनसुखभाई यांनी तयार केलेल्या फ्रिजचे तापमान हे बाहेरील वातावरणाच्या तापमानापेक्षा १० अंश कमी असते. या फ्रिजमध्ये फळे तसेच भाज्या ३ ते ४ दिवस ताज्या राहतात. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेली सर्व उत्पादने ही गरिबांच्या खिशाला परवडणारी असतात.

image


'मिट्टीकूल'च्या निर्मितीमागील प्रेरणेबद्दल बोलताना मनसुखभाई सांगतात की, 'आपले पूर्वज हे पारंपारीक पद्धतीने आणि मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवत असत. त्या पदार्थांची चवदेखील चांगली लागते आणि ते शरीरासाठी कोणत्याही प्रकारे अपायकारक ठरत नाही. त्यामुळे आम्ही चमच्यापासून ते प्रेशर कुकर, कुलर, फ्रिज यांसारखी सर्व उत्पादने मातीची बनवण्याचे ठरविले.' पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यावर मनसुखभाई भर देत असतात. सध्या त्यांनी शेणापासून लाकडे बनवण्याचे यंत्र तयार केले असून, त्यामुळे झाडांची होणारी कत्तल थांबली आहे. आपल्या भविष्यातील प्रकल्पाबद्दल बोलताना ते सांगतात की, 'अन्न, वस्त्र आणि निवारा, या जरी मानवाच्या मूलभूत गरजा असल्या तरी आजच्या काळात मानव कायम सुखसोयींनी युक्त असलेल्या जीवनशैलीची निवड करत असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतिरेकाचा निसर्गावरदेखील विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे आम्ही आता 'मिट्टीकूल हाऊस'ची निर्मिती करण्यासाठी संशोधन करत आहोत. सौरउर्जा तसेच पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर हे घर तयार करताना आम्ही करणार आहोत.' गुजरात राज्य सरकारचे या उपक्रमांना सहकार्य मिळत असल्याचे मनसुखभाई सांगतात.


मनसुखभाई यांच्या या उपक्रमाचे आजवर अनेक ठिकाणी कौतुक करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डात उद्योजकतेबाबत मनसुखभाई यांच्या यशोगाथेवर आधारित एक धडा आहे. तसेच गुजरात टेक्नॉलॉजी विद्यापीठ आणि सायन्स एण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्युट, दिल्ली यांच्यावतीने मनसुखभाई यांना प्रोफेसरची पदवी देण्यात आली आहे. याशिवाय मनसुखभाई आयआयएम गुजरात येथेदेखील उद्योजकतेबाबत धडे देतात. 'मिट्टीकूल'ची उत्पादने आफ्रिका तसेच दुबई येथे पाठवण्यात येतात. याशिवाय २००९ साली सेंटर फॉर इंडिया एण्ड ग्लोबल बिझनेस, युनिव्हर्सिटी ऑफ कॅंब्रिज तसेच जज ऑफ बिझनेस स्कूल आयोजित परिषदेत 'मिट्टीकूल'ची उत्पादने सादर करण्यात आली होती. घरगुती वापराच्या वस्तूंची निर्मिती करणारी जर्मनीतील अव्वल कंपनी बिएसएचने 'मिट्टीकूल'च्या उत्पादनात रस दाखवला होता. आजच्या युवा पिढीला सल्ला देताना मनसुखभाई सांगतात की, 'या जगात काहीही अशक्य नाही. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. मात्र आपण त्यावर मात करत पुढे जायचे असते. आपण कायम आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. अनेकदा आपल्याला अपयशदेखील येते. मात्र त्यामुळे खचून जायचे नसते.' मनसुखभाई यांच्याकडे काम केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःचा व्यवसायदेखील सुरू केला आहे आणि विशेष म्हणजे मनसुखभाई यांना या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो. उद्योजकतेच्या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला आपण संपूर्णपणे मार्गदर्शन करू शकतो, असे मनसुखभाई सांगतात. दहावी नापास ते यशस्वी उद्योजक, असा प्रवास करणाऱ्या मनसुखभाई प्रजापती यांचा जीवनप्रवास उद्योजकतेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

माती घडवणारे हात: शालन डेरे

ʻवुडगीकस्टोअरʼ, दैनंदिन जीवनात गरजेच्या असलेल्या लाकडी कल्पक वस्तूंचे भांडार

तळागाळातील वीणकाम कारागिरांना रोजगाराची संधी देणारे ʻबायलूʼ

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags