संपादने
Marathi

महानगरांतर्गत प्रवासासाठी बाइक-टॅक्सीचा पर्याय?

Team YS Marathi
22nd Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कौशिक नाथ. गुडगावचे रहिवासी. वाहतुकीशी झगडत कामावर पोहोचतात. तसेच कामावरून घरी परततात. इतर भारतीय शहरातील नोकरदार माणसासारखीच त्यांची ही समस्या. कौशिक सांगतात, ‘‘कार्यालयात पोहोचण्याची वेळ जवळ आलेली असताना गच्च ट्रॅफिकशी दोन हात करून जर वेळेवर कार्यालयात पोहोचलो तर ते ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याच्या आनंदासारखेच असते.’’ कौशिक २८ च्या घरात आहेत. गुडगावातील सोहना रोडवरील एका बहुराष्ट्रीय कंपनीत ते नोकरीला आहेत. डीएलएफ फेस २ मध्ये ते रहातात. कार्यालयापासून हे अंतर दहा किलोमीटर आहे. कॅब, ऑटो, शटल सर्व्हिस असे सगळे कौशिक यांनी हे अंतर कापण्यासाठी वापरून पाहिले, पण वेळ साधणे अवघडच जायचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी यासाठी बाइक-टॅक्सी सेवा वापरली आणि नवल घडले. कौशिक सांगतात, ‘‘रोजपेक्षा ऑफिसला पोहोचायला निम्मा वेळ कमी लागला.’’

वर्दळ आणि ट्रॅफिक जाम या भारतातल्या शहरांच्या दैनंदिन समस्या आहेत. बसची शटल सर्व्हिस शहरांतर्गत वाहतुकीच्या वर्दळीतून मोक्यावर पोहोचण्यास जो वेळ घेते तो म्हणजे कासवगतीच. अर्थात अनेक कारणे त्यामागे आहेत. दुसरीकडे बाइक वर्दळीतूनही आपल्यासाठी वाट शोधूनच घेते आणि गंतव्यस्थळावर मोठ्या गाड्यांपेक्षा लवकर पोहोचते. बाइकद्वारे टॅक्सीसारखी सर्व्हिस देणारे काही स्टार्टअप्स गुडगावात दोन-तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झालेले आहेत.

image


मुंबईसारख्या शहरांतून अशा प्रकारच्या सेवेवर नियमनाच्या कारणाने बंदी घालण्यात आलेली आहे. हरियाना सरकारने मात्र वाहतूक परवान्याची अट तेवढी घालून या सेवेला परवानगी दिलेली आहे.

एम-टॅक्सीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणभ मधुर सांगतात, ‘‘दुसरे टोक गाठणे ही गुडगावातली सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. जवळपास २ लाख लोक कार्यालय आणि व्यावसायिक बैठकांनिमित्त गुडगावातून अंतर्गत प्रवास करीत असतात.’’ … आणि म्हणूनच या सेवेला हमखास चांगले दिवस येतील, यावरही अरुणभ ठाम आहेत. एम-टॅक्सी आणि अन्य बाइक-टॅक्सी सेवा पुरवठादार ‘बॅक्सी’नेही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपली ही नवी सेवा सुरू केली आहे.

बॅक्सी सहसंस्थापक आशुतोष जोहरी म्हणतात, ‘‘गुडगाव, नोएडा आणि फरिदाबादेतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. लोक त्यामुळे त्रस्त आहेत आणि लोकांना आम्हाला या सेवेच्या माध्यमातून दिलासा द्यायचा आहे.’’

एम-टॅक्सीने आपण दररोज ४० फेऱ्या मारत असल्याचा तर बॅक्सीने १४० फेऱ्या मारत असल्याचा दावा केलेला आहे. बॅक्सीकडे २३ बाइक्स आहेत तर एम-टॅक्सीकडे १० बाइक्स आहेत. येत्या काही आठवड्यांत एम-बाइक्स आणखी शंभर बाइक आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या कंपन्यांना एका विशिष्ट थांब्यावरून सेवा सुरू करायची आहे, पण सध्या सेवा सुरळीत देणे अधिक महत्वाचे आहे. टॅक्सीच्या तुलनेत बाइक टॅक्सी परवडणाऱ्या आहेत. पहिल्या तीन किलोमीटरला २५ रुपये आकारले जातात. आणि पुढल्या प्रत्येक किलोमीटरला ५ रुपये आकारले जातात. ओला मिनी ही टॅक्सी सर्व्हिस पहिल्या चार किलोमीटरसाठी शंभर रुपये तर पुढल्या प्रत्येक किलोमीटरसाठी ८ रुपये आकारते. रिवन मिनिटाच्या हिशेबाने पैसे घेते. एम-टॅक्सीने दहा किलोमिटर अशी फेरीची मर्यादा आखलेली आहे, तर दुसरीकडे बॅक्सीने असे कुठलेही बंधन ठेवलेले नाही.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की महानगरांमध्ये दुसरे टोक गाठणे ही एक मोठी समस्या बनलेली आहे आणि त्यामुळे ही सेवा देणारे मार्केट ५ अब्ज डॉलरपर्यंत असू शकते. व्हीसीचे प्रतिष्ठान असलेल्या एसएआयएफचे भागीदार अलोक गोयल म्हणतात, ‘‘मागणीबरहुकूम दुचाकी टॅक्सीसेवा हे व्यवसायाचे एक उत्कृष्ट मॉडेल आहे. रंजक आहे. उपयुक्त आहे. अत्यंत मोठ्या अशा पाच महानगरांमध्ये तर यामुळे एका मोठ्या लोकसंख्येची समस्या दूर होणार आहे. महत्वाचे म्हणजे ही सेवा वेळेच्या दृष्टीने तत्पर व आर्थिक दृष्टीने परवडणारी अशी आहे.’’

image


तथापि, राज्यनिहाय यासंदर्भातले वेगवेगळे नियम या सेवेच्या व्यापकतेला अडथळा ठरू शकतात. गुडगावातील एम-टॅक्सी आणि बॅक्सीपूर्वी मुंबईत ‘हे टॅक्सी’ने बाइक-टॅक्सी सेवा शहरातील काही भागांमध्ये सुरू केली होती, पण मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ती रद्दबातल ठरवली. महाराष्ट्र मोटर वाहनकायद्यांतर्गत दुचाकी टॅक्सी सेवा कुठेही मोडत नसल्याने, बसत नसल्याने ती अनियमित आहे आणि बेकायदा आहे, असे कारण त्यामागे परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले होते. शासकीय कार्यकारिणीनेही सध्या अशा सेवेची शहराला गरज नसल्याचा निर्वाळा देऊन परिवहन कार्यालयाची वाट सुलभ केली होती.

सध्या ‘हे टॅक्सी’ने त्याला पर्याय म्हणून राइडशेअरिंग आणि पार्सल सर्व्हिस दुचाकीवरून सुरू केलेली आहे. दक्षिण मुंबईतील माहिम, दादर आणि कुलाबा या भागांमध्ये पार्सल, पॅकेज आणि टपाल अशा पाच किलोपर्यंत वजनाच्या डिलिव्हरीसाठी तसेच दहा किलोमीटर अंतराच्या मर्यादेत या सेवेचे संचालन कंपनीकडून होते.

‘हे टॅक्सी’चे सहसंस्थापक मनोज माहेश्वरी सांगतात, ‘‘आम्ही प्रशासनातील संबंधितांशी बाइक टॅक्सीच्या मार्गातील मुंबईतले अडथळे दूर व्हावेत म्हणून बोलत आहोत. आमची चर्चा सुरू आहे. बघू काय होते ते.’’ पुढल्या वर्षी माहेश्वरींचीही गुडगावात सेवा सुरू करण्याची योजना आहे.

बॅक्सी आणि एम-टॅक्सीने फंडिंगसाठीची बीज फेरी आपला नवा व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यापूर्वीच सुरक्षितरित्या पार केलेली होती, हे आणखी रंजक. सूत्रांच्या माहितीनुसार एका अँजेल फेरीत बॅक्सीने दहा कोटी रुपये प्राप्त केले होते, तर यात एम-टॅक्सीनेही चांगलीच मजल मारली होती. दोन्ही कंपन्यांनी फंडिंगसंदर्भात निश्चित माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.

जकार्ता आणि इंडोनेशियामध्ये मोटारसायकल टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. चिन आणि व्हिएतनाममध्येही हा प्रकार लोकप्रिय झालेला आहे. ‘गो-जेक’, ‘ब्ल्यू-जेक’ आणि ‘ग्रॅबबाइक’ (Didi Kuaid-backed GrabTaxi) ही इंडोनेशियन मार्केटमधील या क्षेत्रातील आघाडीची प्रतिष्ठाने आहेत. गो-जेक तर मोटारसायकलवरून जवळपास सर्वच प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देते. भारतातील संबंधित खातीही या सेवेची आवश्यकता आता समजून घेऊ लागलेली आहेत. गुडगावचे सह पोलिस आयुक्त सौरभ सिंग म्हणतात, ‘‘शहरांतर्गत वाहतुकीसाठी मोटारसायकल टॅक्सी हा एक चांगला पर्याय आहे. सुरक्षितता आणि पारदर्शकता या कसोट्यांवर तर तो इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक सरस आहे.’’

हरियानातील फरिदाबाद, पंचकुला आणि बहादुरगड या शहरांमध्ये सेवा सुरू करायला बॅक्सीने परवानगीही मिळवलेली आहे!

संधी मोठ्या आहेत, हे खरे असले तरी वाढत चाललेल्या स्पर्धेशी या नव्या स्टार्टअप्सना दोन हात करावे लागणार आहेत. दक्षिण-पूर्व आशियात ग्रॅब टॅक्सी जे काही करते आहे, ते या नव्या दमाच्या व्यावसायिकांनी अभ्यासायला हवे. ओला कंपनीचे आता मागणीबरहुकूम बाइक टॅक्सी पुरवण्याचे चाललेले आहे. सॉफ्टबँककडून फंडिंग झालेल्या ‘अबररश’कडून शॉपिंग ऑर्डरची डिलिव्हरी बाइक टॅक्सीच्या माध्यमातून सुरू करण्याचे चाललेले असल्याच्या प्रसारमाध्यमांतल्या बातम्या आहेत.

image


‘युअर स्टोरी’चे मत

दुसरे टोक गाठणे ही खरोखर भारतातील अनेक मोठ्या शहरांतून चाकरमान्यांची एक मोठी समस्या आहे. ऑन डिमांड कॅबही ही समस्या दूर करण्याला पुरेशा सिद्ध झालेल्या नाहीत. वेळेचा विषय जिथे येतो तिथे बाइक टॅक्सीला खरोखर पर्याय नाही. ऑटोरिक्षा हा जरा परवडणारा पर्याय असला तरी अनेक शहरांतून मिटरपद्धत अवलंबली जात नाही. अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते.

ऑन डिमांड बाइक टॅक्सी अशात वर्दळीवर मात करणारे आणि वेळेची बचत करणारे समर्थ साधन म्हणून समोर आलेले आहे. बॅक्सी आणि एम-टॅक्सीकडे सुरवातीच्याच काळात आपली मागणी नोंदवणाऱ्या ग्राहकांची लक्षणीय संख्या पहाता या नव्या व्यवसाय क्षेत्राला लवकरच सुगीचे दिवस येतील, यावर शंका घ्यायला वाव उरत नाही. सरकारी नियमांमुळे या स्टार्टअप्सची व्याप्ती वाढवण्याची योजना थंड बस्त्यात पडण्याची भीती आहेच. अबर आणि ओलासारख्या कंपन्या अशा नियमांशी अजुनही झुंजत आहेत. तथापि जयराज यांच्यासारखे संबंधित आशावादी आहेत. हरियाना सरकारचा आदर्श इतर राज्यातील सरकार घेतील आणि मार्ग निघेल, असा त्यांना विश्वास वाटतो. जर इतर राज्य सरकारांनीही असेच केले तर दक्षिण पूर्व आशियातील इतर देशांप्रमाणे तसेच इंडोनेशियाप्रमाणे भारतही बाइक टॅक्सीचा मोठा उद्योग असलेला देश म्हणून समोर येईल. इथल्या वर्दळीवरही मात करता येईल. वेळेत पोहोचता येईल.

लेखक : जयवर्धन

अनुवाद : चंद्रकांत यादव

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags