संपादने
Marathi

सामान्य न्हावी बनला रोल्स रॉईस गाडीचा मालक

ही कथा आहे धाडसाची, आत्मविश्वासाची, आकाशाला गवसणी घालणाऱ्या प्रचंड इच्छाशक्तीची, सामान्य माणसाच्या कर्तृत्वाची, याच बळावर एका सामान्य न्हाव्याचे पोर 'मिलिनेयर बार्बर ' बनण्याची ...

13th Aug 2015
Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share

ज्या साध्या सलूनमध्ये आपण केस कापण्यासाठी जातो, तिथे काम करणारा एखादा न्हावी भविष्यात २०० गाड्यांचा मालक बनेल आणि रोल्स रॉईस गाडीतून फिरेल असा विचार आपल्या मनात तरी येईल का ? पण ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात उतरवून दाखवण्याची किमया करून दाखवली आहे एका सामान्य न्हाव्याने. बंगळुरूमध्ये राहणा-या या न्हाव्याचे नाव आहे रमेशबाबू. आपल्या खडतर आय़ुष्याशी झगडा देत आत्मविश्वास, धाडस आणि मेहनतीच्या जोरावर रमेशबाबूंनी जे यश संपादन केले आहे ते आश्चर्याने थक्क व्हावे असेच आहे.

मॅन ऑफ द कार्स

मॅन ऑफ द कार्सखडतर प्रवासाची सुरूवात

रमेशबाबूंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने एक सामान्य न्हावी. ते जेमतेम सात वर्षांचे असताना त्यांचे वडील त्यांना सोडून गेले. ते १९७९ साल होतं. वडलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या पालनपोषणाची मोठी जबाबदारी रमेशबाबूंच्या आईवर येऊऩ पडली. नाईलाजास्तव त्यांच्या आईला मग चार घरची धुणीभाडी करण्याचे काम सुरू करावे लागले. ब्रिगेड रोडवर त्यांच्या वडलांचे सलून होते. पण रमेशबाबूंचे वडील वारल्यानंतर त्यांच्या काकांनी ते चालवायला घेतले. त्याबदल्यात ते रमेशबाबूंच्या आईला रोजचे दयायचे फक्त पाच रूपये. त्या काळात देखील पाच रूपये म्हणजे काहीच नसल्यासारखे होते. पाच रूपयांनी रमेशबाबूंच्या कुटुंबाचे काय होणार होते ? माझे, माझी भावंडे आणि बहीणीचे शिक्षण आणि औषधपाण्याची गरज भागवण्यासाठी ते पुरेसे नव्हतेच मुळी. शिक्षण आणि आजारपण या मोठ्या गोष्टी झाल्या. त्यांना दररोजचे जेवण जेवण्याचीही मोताद झाली होती. त्यावेळी त्यांना जेमतेम एकवेळचेच जेवण मिळायचे. रमेशबाबू थोडेसे मोठे झोले, म्हणजे माध्यमिक शाळेत जाऊ लागले तेव्हा त्यांनी चार पैसे कमावण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी त्यांना नको नको अशीही कामे करावी लागली. त्यांनी पेपर टाकायला सुरू केले. त्यासोबतच घरोघरी दुध टाकण्याचे काम सुद्धा केले. त्यांच्या राबणाऱ्या आईला थोडीबहुत पैशांची मदत मिळावी म्हणून ते जे जे मिळेल ते ते काम करत गेले. काम करत करत त्यांनी कसेबसे आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि संध्याकाळच्या कॉलेजला प्रवेश घेतला.

ब्रेकिंग पॉईंट

रमेशबाबू जेमतेम १९ वर्षांचे असतील. म्हणजे तेव्हा ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते. झाले असे की त्यांच्या आईचे सलून चालवणाऱ्या त्यांच्या काकांशी थोडेसे वाजले. भांडणाचे कारण म्हणजे त्यांच्या काकांनी त्यांना पाच रूपये देणे बंद करून टाकले होते. रमेशबाबू त्यांच्या आईला म्हणाले, " मी बाबांचे सलून माझ्या ताब्यात घेतो आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. म्हणजे मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि आपली आर्थिक चणचणही मिटू शकेल!" त्यांनी सलूनमध्ये काम करायला सुरूवात केली. रमेशबाबू व्यवसायातल्या बारकाव्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करू लागले. दररोज न चूकता ते सकाळी सलूनमध्ये असायचे, तर संध्याकाळी कॉलेजमध्ये. कॉलेज संपले की ते रात्री पुन्हा सलूनमध्ये काम करण्यासाठी जायचे. सलून पहाटे एक वाजेपर्यंत सुरू असायेचे. तेव्हापासून रमेशबाबू न्हावी म्हणून ओळखले जाऊ लागले.

ब्रेकथ्रू कल्पना

रमेशबाबूंचे सलूनचे काम सुरूच होते. ते १९९३ साल होते. रमेशबाबूंच्या काकांनी एक छोटी कार विकत घेतली होती. आपल्या काकांकडे कार आहे हे पाहून आपल्य़ाकडेही कार असावी असे त्यांना वाटू लागले. काटकसर करून बँकेत त्यांनी जी काही रक्कम जमा केली होती त्यावर त्यांनी बँकेचे कर्ज काढले आणि एक मारूती व्हॅन विकत घेऊनच टाकली. त्यावेळी रमेशबाबू खुप खूश होते. त्यांंची छाती फुगली होती. कारण त्यांची कार काकांच्या कारपेक्षा मोठी होती. रमेशबाबूंनी धाडस करून कार घेतली खरी पण त्यांच्यासाठी ते वाटले तितके सोपे नव्हतेच. याचे कारण म्हणजे त्यांनी काढलेल्या कर्जाच्या व्याजाची रक्कम ६२०० रुपये इतकी होती. ही रक्कम भरण्यासाठी त्यांचे नाकी नऊ येऊ लागले. त्यामुळे पुढे गाडीचे कर्ज फेडण्यासाठी त्यांना त्यांच्या आजोबांची मालमत्ता गहाण टाकावी लागली.

रमेशबाबूंची आई ज्या घरचे काम करायची त्या घरमालकीणीचे नाव नंदिनी. रमेशबाबू त्यांना नंदिनी अक्का म्हणायचे. तसे म्हणायला त्यांना खूप आवडायचे. त्या नंदिनी अक्कांनी रमेशबाबूंना एक कल्पना सुचवली. त्या म्हणाल्या, " अरे रमेश, तू तुझी कार इथे तिथे पार्क करून ठेवण्यापेक्षा ती भाड्याने का देत नाहीस? कल्पना अजिबात वाईट नव्हती. रमेशबाबूंना ती फार आवडली. मग कार भाड्याने देण्याचा व्यवसाय कसा करतात याबाबत नंदीनी अक्कांनी त्यांना महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पुढे या अक्काचे आणि रमेशबाबूंचे संबंध बहीणभावासारखे झाले आणि आजही ते संबंध चांगले टिकून आहेत. त्यांच्या या बहिणीने त्यांना आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले आणि अभिमानाने पाहुण्यांशी ओळखही करून दिली हे रमेशबाबू आजही विसरू शकत नाहीत.

यशस्वीतेची मुहुर्तमेढ रोवली

सुरूवातीच्या काळात रमेशबाबूंचा हा व्यवसाय जेमतेम चालत होता. पण १९९४ सालानंतर ते या कार भाड्याने देण्याच्या व्यवसायाकडे गांभिर्याने पाहू लागले. नंदीनी अक्का 'इंटेल' या नावाजलेल्या कंपनीत काम करत होत्या. त्यांच्या प्रयत्नाने रमेशबाबूंना इंटेल कंपनीसाठी गाड्या भाड्याने देण्याची संधी मिळाली. हीच त्यांच्या जीवनातली पहिली कंपनी. पुढे हळूहळू त्यांनी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात एक एक गाडी वाढवायला सुरू केले. सन 2004 पर्यंत रमेशबाबूंकडे केवळ पाच ते सहाच गाड्या होत्या. या उद्योगाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून हळूहळू पुढे सलूनचा व्यवसाय बंद करावा असा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. पण रमेशबाबूंचा हा उद्योग जसा चालायला हवा होता तसा मात्र मुळीच चालत नव्हता. याचे कारण म्हणजे पुष्कळ लोकांकडे छोट्या गाड्या होत्या. त्यामुळे या व्यवसायात मोठी स्पर्धा होती. म्हणून आता आपण महागड्या लक्झरी गाड्या घेतल्या पाहिजेत. कारण या व्यवसायात मोठ्या गाड्या असणारे नव्हते. त्यामुळे त्यांचा उद्योग तेजीत चालेल असे त्यांना वाटले.

धोका पत्करला

२००४ मध्ये रमेशबाबूंनी जेव्हा त्यांची पहिली मोठी लक्झरी गाडी विकत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रत्येक जण म्हणत होते की रमेशबाबू मोठी चूक करत आहेत. विचार करा, २००४ मध्ये मोठ्या गाडीसाठी ४० लाख रूपये खर्च करणे ही साधी गोष्ट नव्हती. त्यांच्या मनात भीती नव्हती असे नाही. पण त्यांना संधी सोडायची नव्हती. त्यांनी विचार केला की हा धोका का पत्करू नये ? आणि समजा यात आपण यशस्वी झालो नाही तर आपण ही कार विकू शकतो. त्यात एवढे घाबरण्यासारखे काय आहे. पण सुदैवाने त्यांनी पत्करलेला धोका चांगला फळाला आला. रमेशबाबूं शिवाय गाड्या भाड्याने देणाऱ्या इतर कोणत्याही कंपनीकडे दर्जेदार लक्झरी गाड्या त्यावेळी नव्हत्या. इतर कंपन्याकडे सेकंड हँड गाड्या होत्या. शिवाय त्या चांगल्या अवस्थेतही नव्हत्या. बंगळुरूमध्ये ते पहिले असे उद्योजक होते ज्याने महागड्या लक्झरी गाड्यांमध्ये गुंतवणूक केली होती. आणि ती यशस्वीही ठरली होती.

" जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर मग धोकाही पत्करण्याची तयारी असावी लागते. २०११ मध्ये जेव्हा मी माझी पहिली रोल्स रॉयस ही महागडी लक्झरी गाडी विकत घेतली तेव्हा अनेकांनी मला सांगितले की मी हे अत्यंत धोकादायक पाऊल उचलले आहे. पण मी विचार केला की आपण २००४ मध्ये असाच धोका पत्करला होता, मग आता काही वर्षांनी दुसरा धोका पत्करण्यात काय हरकत असावी? आणि या गाडीसाठी मी चार कोटी रुपये मोजले. पण पुन्हा एकदा मी पत्करलेल्या धोक्याने मला मुळीच निराश केले नाही, चांगला परतावा दिला. आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे. माझी गाडी चांगली प्रसिद्धही झालेली आहे. या वर्षीच्या डिसेंबरमध्ये कर्जाचे हफ्ते पूर्णपणे फिटणार आहेत."


हिमालयाहून उंच आव्हाने

स्वप्न उतरले सत्यात

स्वप्न उतरले सत्यात


" व्यवसाय कोणताही असो, आव्हाने आणि संकटे असायचीच. गेल्या एप्रिल महिन्यात मला रोड टॅक्सच्या रूपात तब्बल तीन कोटी रूपये भरावे लागले आहेत. मला अद्यापही कळत नाही की इतकी मोठी रक्कम मी कुठून गोळा करू. काही रक्कम मी अनेकांकडून उधार घेतली आहे, तर काही रक्कम माझ्या मालमत्तेची कागदपत्रे गहाण ठेऊन गोळा केली आहेत. प्रत्येक व्यवसायाला पुन्हा पुन्हा येणाऱ्या मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागतेच. ही संकटे आणि आव्हाने मनापासून स्वीकारावी लागतात आणि काळजीपूर्वक हाताळावी लागतात. रोड टॅक्सच्या बाबत मी आज जरी संकटात दिसत असलो तरी पुढल्या वर्षी मी त्यातून नक्कीच सहीसलामतपणे बाहेर आलेलो असेन याची मला खात्री आहे. "

वेध भविष्याचा ---

"आतापर्यंत आम्ही दर तीन महिन्यांनी रोड टॅक्स भरत आलो आहोत. पण आता इथून पुढे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नव्या योजना आखताना विचार करावा लागणार आहे. कारण टॅक्सची रक्कम गगनाला भिडली आहे. २०१५ मध्ये आम्ही काही लिमोझिन आणि तशा दर्जाच्या गाड्या खरेदी करण्याची योजना आखली आहे. "

भावी उद्योजकांसाठी संदेश --

टीईडी व्याख्यानात विद्यार्थ्यांसमोर बोलताना रमेशबाबूंनी उद्योजकांसाठी एका साध्या संदेशाचा पुनरूच्चार केला आहे जो खरेच अभ्यासण्य़ाजोगा आहे. रमेशबाबू म्हणतात, " कठोर परिश्रम करा, विनयशील रहा, मग बाकीचे सर्वकाही फक्त नशीबच असते "

ज्याच्या हाती रोल्स रॉईसचे स्टेअरींग

रमेशबाबूंचा यशस्वीतेचा प्रवास म्हणजे रोमहर्षक कथाच. म्हणजे बघा ना, रमेशबाबू आपल्या सेविंगमधून एक मारूती वॅन काय विकत घेतात, पुढील दहा वर्षात ते साध्या कार भाड्याने देण्याचा व्यवसाय काय सुरू करतात. पुढच्या दहा वर्षात म्हणजे२०१४ या वर्षी त्यांच्याकडे दोन पाच नव्हे तर तब्बल २०० गाड्यांचा ताफा काय तयार होतो. सारे काही स्वप्नवत. विशेष सांगायचं म्हणजे या गाड्यांच्या ताफ्यात आरामदायी लक्झरी कार म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी अशा एकाहून एक सरस गाड्यांच्या रेंजमधील ७५ गाड्यांचा समावेश होता. शिवाय यात ५ ते १० सीटर लक्झरी वॅन, आणि त्यांची सर्वात आवडती रोल्स रॉईस या गाडीचा देखील समावेश होता. 

सुरूवातीला अत्यंत हालाखीच्या स्थितीत आयुष्याचे ओझे वाहणारे रमेशबाबू आता यशाच्या झुल्यावर झोके घेत आकाशाला गवसणी घालत आहेत. इतक्या मोठ्या यशाचा मानकरी असलेला हा विजेता आपले पाय मात्र आजही जमीनीवर घट्ट रोवून उभा आहे. ज्या व्यवसामुळे त्यांनी आपल्या कमाईची सुरूवात केली होती त्या न्हाव्याच्या व्यवसायाला मात्र ते आजही विसरलेले नाहीत. आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी रमेशबाबूंच्या चिमुकल्या खांद्यावर येऊन पडली. त्यासाठी त्यांना आपल्या शाळेला कायमचा रामराम ठोकावा लागला हे ते आजही विसरू शकत नाहीत. आपल्या हालाखीच्या परिस्थितीला हातभार लावणाऱ्या या व्यवसायाची आठवण ठेवत कृतज्ञता आणि मोठ्या आत्मियतेने ते आजही न्हाव्याचे काम करतात. या कामाचे ते केवळ १०० रूपये घेतात. त्यांच्या या असामान्य कर्तृत्वाचं आकर्षण प्रसारमाध्यमांना जर झाले नसते तर नवलच ठरले असते. पण चोखंदळ प्रसारमाध्यमांना त्यांच्यापर्यंत जाण्यापासून स्वत:ला मुळीच रोखता आले नाही. रमेशबाबू टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रातून देशभर पोचले. रमेशबाबूंचे वाखाणण्याजोगे यश पाहून ते 'मिलिनेअर बार्बर' म्हणून प्रसिद्ध पावले. या वर्षी झालेल्या टेड ( टेक्नॉलॉजी, एंटरटेनमेंट, डिझाईन) वार्तालापात देखील रमेशबाबूंनी स्वत:ची ओळख अभिमानाने 'मिलिनेअर बार्बर' अशीच सांगतली होती हे विशेष. यामुळे रमेशबाबूंची कथा ही एक शहरी आख्यायिकाच बनली आहे.

रमेशबाबूंची ही यशाची असामान्य कथा वाचताना प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक लिओनार्ड विलोगीचे वचन आठवल्यावाचून रहात नाही. लिओनार्ड विलोगी म्हणतो, जसे तुम्ही स्वत:चे ऐकायला लागता आणि त्यानुसार स्वत:च्या हिम्मतीवर आपले जीवन जगता तेव्हा सर्वकाही पूर्णपणे बदलून जाते. विलोगीचा हा विचार रमेशबाबूंना अगदी तंतोतंत लागू पडतो, नाही का ? लहानवयात पित्याचे छत्र हरवलेला हा न्हाव्याचा पोर आपल्या सूड उगवणाऱ्या आयुष्य़ासोबत सतत संघर्ष करून लक्षाधीश बनून दाखवतो तो आत्मविश्वास, धाडस आणि झोकून देण्याच्या वृत्तीमुळेच. रमेशबाबूंसारखी अशी असामान्य क्षमता असलेली माणसे आपल्या यशाच्या मार्गात येणारे अनेक अडथळे दूर करतात आणि यशाची उत्तुंग शिखरे गाठतात. डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन जगणारी रमेशबाबूंसारखी माणसे आपल्याला आजही इतिहासात सापडतात जी कधीही कालबाह्य होत नाहीत. ती आपल्याला सतत प्रेरणा देतात आणि धेय्यासाठी सतत चेतवत असतात, जागे ठेवत असतात. आपणही अनेक अडथळे पार करू शकतो, आपल्याला हवे ते यश मिळवू शकतो असा आत्मविश्वास देत असतात. म्हणतात ना, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' रमेशबाबूंनी हे अक्षरश: खरे करून दाखवले आहे, नाही का ?Add to
Shares
5
Comments
Share This
Add to
Shares
5
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा