संपादने
Marathi

रंगरूपापेक्षा प्रतिभेवर विश्वास : ईरा दुबे

Chandrakant Yadav
9th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

देशातील सर्वाधिक प्रतिभाशाली कलावंतांपैकी आज ईरा दुबे या एक आहेत. ‘येल स्कूल ऑफ ड्राम’मधून आपले प्रशिक्षण आटोपल्यानंतर त्यांनी कितीतरी चित्रपट केलेत. ‘द प्रेसिडेंट इज कमिंग’ आणि ‘आयेशा’ यापैकी एक. ईरा रंगभूमीवरील एक प्रस्थापित कलावंत आहेत. ‘नाइन पार्टस्‌ ऑफ डिझायर’मधील अविस्मरणीय अभिनयासाठी त्या ओळखल्या जातात. संघर्षरत इराकमधील ९ वेगवेगळ्या महिलांची भूमिका त्यांनी वठवली होती. एकटीने ९ भूमिका साकारणे एक आव्हान होते. आपल्या सकस अभिनयाच्या जोरावर त्यांनी ते पार पाडले. त्यांना याबद्दल समिक्षकांकडूनही गौरवण्यात आले होते.

थियेटर उद्योग आणि एक महिला रंगकर्मी असण्याचा नेमका अर्थ काय यासंदर्भात ईरा म्हणतात, ‘‘लहान असताना मी नेहमीच आईच्या मागे-मागे असायचे. मला सगळे आईचे शेपूट म्हणून चिडवायचे. मी सहा-सात वर्षांचे होते तेव्हापासूनच रंगभूमीच्या सेवेला लागले. अर्थात तेव्हा विंगेच्या मागून मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असे. उदाहरणार्थ स्टेजवरील कलाकाराला तो विंगेत आला म्हणजे पुढच्या सिनसाठी आवश्यक ती वस्तू देणे अशा स्वरूपाची कामे. मी आज जे काही आहे, ते केवळ रंगभूमीमुळेच आहे. माझी आई, माझ्या दोन्ही काकू रंगभूमीशी जुळलेल्या होत्या. लोक आमची टिंगल उडवत असत. नौटंकी कुटुंब म्हणून आम्हाला हिणवत असत, तेही मला आठवते. पण मला कधी फरक पडला नाही. कारण थियेटर आणि अभिनय माझ्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहेत. दोन्ही माझ्यात ठासून भरलेले आहे.’’

image


‘‘मला वाटते, की ही एक प्रक्रिया आहे. पुष्कळ युवक रंगभूमीत स्वारस्य दाखवतात. आणि कलेबद्दलचा त्यांची समर्पण भावना वाखाणण्याजोगी आहे.’’

‘‘सामान्यत: प्रेक्षकही रंगभूमीला सहकार्य करू लागलेले आहेत. एक प्रेक्षक नाटकाच्या सुरवातीपासून ते अखेरपर्यंत जेव्हा तुमच्या समोर असतो, तेव्हा तो या सगळ्या प्रक्रियेचा एक घटक असतो, किंबहुना सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. त्याच्या या पूर्णवेळ बसण्याहून अधिक महत्त्वाचे नाटकाच्या दृष्टीने दुसरे काहीही नाही. रंगभूमीचा अर्थच मुळी शब्द, कलावंत आणि प्रेक्षक असा आहे. प्रेक्षक नसेल तर नाटक आणि कलावंत दोघांना काहीही अर्थ उरणार नाही. थियेटरमध्ये आता बरेच मौलिक बदल होत आहेत, हे बघून मला आनंद वाटतो. आजच्या थियेटरमध्ये कमालीचा ताजेपणा आहे. आजचे थियेटर हे चैतन्याने मुसमुसलेले आहे. अतुलकुमार आणि आकाश खुरानासारख्या कलावंतांचे समर्पण रंगभूमीला जणू नव्या शिखरावर नेत आहेत.’’

‘‘जर काही उणीव यात असेल तर अध्यापनाचीच म्हणजे मार्गदर्शनाचीच. पुरेशी विद्यालये त्यासाठी नाहीत. जेहन माणेकशॉ यांचे मला अप्रुप वाटते, कौतुक वाटते, की त्यांनी ‘थियेटर प्रोफेशनल्स’ नावाचे एक अभिनय विद्यालय सुरू केले. बरं त्यासाठी चांगली जागा मिळणे ही देखील एक समस्याच आहे. मुंबईसारख्या शहरांतून तर चांगली जागा उपलब्ध न होणे ही एक गंभीर समस्या आहे.’’

image


‘‘आज अभिनेत्यांसाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. फक्त बाहेर पडून या संधी पटकावण्याचे कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे.’’

‘‘अभिनयाचे एक अर्थशास्त्रही आहे. रंगभूमी कलावंत म्हणून केवळ थियेटरवर अवलंबून भागत नाही. एक कलावंत म्हणून आपल्या आवडीची आणि व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकतील, अशा नाटकांदरम्यान तुम्हाला ताळमेळ साधावाच लागतो. तुम्हाला हे जाणून घ्यावे लागते, की तुम्ही अमुक एक नाटक कशासाठी आणि कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकांसाठी करता आहात. माझ्या एकपात्री अभिनयातील नाटक ‘९ पार्टस् ऑफ डिझायर’चे प्रयोग मी दक्षिण आफ्रिकेत नियोजित केले होते. हे नाटक ९ मुस्लिम महिलांच्या विषयावर आधारित आहे. आपला प्रभाव सोडणारे तर ते आहेच, पण त्यात एक वेगही आहे. माझ्या अभिनय क्षमतेच्या दृष्टीने तर हे नाटक फारच महत्त्वाचे आहे. पटकथेत कमालीचे नाट्य आहे आणि लेखनही सशक्त आहे. समीक्षकांनी या भूमिकांबद्दल माझ्या कामाचे कौतुक केलेच, पण प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले. प्रत्येक प्रयोगानंतर उभे राहून प्रेक्षकांनीही मानवंदना दिलेली आहे, याहून मोठे हाशील काय असू शकते? इराकबद्दल, इराकमधील महिलांबद्दल जाणून घेण्याची संधी मला या नाटकातून मिळाली. नाटकासाठी मी प्रत्यक्ष इराकला गेले होते. तिथली संस्कृती आपल्याहून भिन्न आहे. ती अभिनयातपुरती आत्मसात करण्यासह तिथल्या महिलांचे जगणे मी समजून घेतले. इराक माझ्यासाठी पूर्णपणे नवा होता. इथले राजकारण, समाजकारण आणि इतिहासही मला जाणून घ्यायचा होता. मी फार मेहनत केली. म्हणूनच या नाटकातील पात्रे मला रंगभूमीवर जगता आली आणि जागवता आली.’’

‘‘लेखिका हिथर यांचे मला मोलाचे सहकार्य मिळाले. मी पत्राद्वारे त्यांना कितीतरी प्रश्न विचारले. मी जेव्हा या नाटकाची पटकथा वाचत होते, तेव्हा माझ्या आवाजात काहीतरी झाले. माझ्या आवाजातून आणि अंगप्रत्यंगातून पटकथेतील पात्रे जणू जिवंत होऊ लागली. सतत अध्ययनाचीही मला मदत झाली. उदाहरणार्थ अमल एक जाडजुड बाई आहे. ती साधीसरळ आहे. बाळबोध आहे. हिचा हा बालिशपणा हास्यास्पदही आहे. सांगायचे म्हणजे या पात्रांचे सूर मला असे सापडत गेले. मग त्यांचा अभिनय माझ्या दृष्टीने सहज सोपा होत गेला. कारण या पात्रांचा नेमका संदर्भ टिपण्यासाठी आता माझ्याजवळ पुरेसे साहित्य उपलब्ध आहे.’’

image


‘‘…आणि शेवटी भारतीय प्रेक्षकालाही या पात्रांशी संवाद साधता यायला हवाच. कारण प्रेक्षक तर आहेतच. ते हसतात, श्वास घेतात, त्यांचेही मन कळवळते… तेही या पात्रांच्या वेदनांशी समरस होतात. सहवेदना प्रदर्शित करतात. आणि मुख्य बाब मला वाटते ती ही की कला ही सार्वत्रिक असली पाहिजे. सार्वभौम असली पाहिजे. प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात सक्षम असली पाहिजे. म्हणजे मग कुठल्याही अन्य सीमा आडव्या येत नाहीत.’’

मग गडबड कुठे आहे?

‘‘मला वाटते ज्या काही चुका घडतात त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही लपवून घेण्यात यशस्वी ठरता. वेळ मारून नेता. कुठे प्रवेशात गडबड होते. कुठे संवादात. समजा एखादी ओळ तुम्हाला आठवत नाहीये, मग तुम्ही काय करता हे आठवण्याचा प्रयत्न करणेही आपल्या अभिनयात मिसळून टाकता. उदाहरण म्हणून समजा तुम्हाला पडसे झालेले आहे आणि तुम्ही नर्व्हस आहात, अशावेळी तुम्ही तुमच्या अनुभवांचा वापर अभिनयात करू शकता. अर्थात माझ्याबाबतीत असे आजवर कधीही घडलेले नाही. पण मला आठवते, की एक कलावंत काही ओळी विसरला आणि रंगभूमीवर काही क्षण मौनाचे राज्य पसरले. जर असे घडले तर ते प्रेक्षकांनाही स्वाभाविकपणे कळतेच, पण बरेचदा असा अनुभव येतो, की अशा प्रसंगांमध्येही प्रेक्षक तुम्हाला माणुस म्हणून समजून घेतात.’’

‘‘एक कलावंत म्हणून माझे लक्ष नेहमी सत्यावर असते. सत्याच्या शोधात असते. खरेपणावर असते. वाटायला हे सोपे, पण प्रत्यक्षात फार कठीण असेच. जसजसा तुमचा अनुभव व्यापक होत जातो, तसतसे तुम्ही अधिक यांत्रिक होत जाता. आणि मी अशा प्रकारात मोडू इच्छित नाही. संवादफेक चांगली आहे, अभिनयाचा अनुभवही दांडगा आहे, पण जर तुम्ही यांत्रिक झाले असाल तर ही काही कलावंत म्हणून चांगली गोष्ट नाही.’’

‘‘माझ्यापुरते बोलायचे तर मी अभिनय शिकता येतो, या बाजूची नाही. मी रंगभूमीवर अभिनय करत करतच मोठी झालेली आहे. अभिनयाच्या अभ्यासक्रमाचा माझ्या आईवर बराच प्रभाव होता. तिला नेहमी वाटायचे की मी कुठल्यातरी नामांकित संस्थेतून अभिनयाचे रितसर प्रशिक्षण घ्यावे म्हणून. मला मात्र तसे फारसे वाटत नव्हते. मी तेव्हा परदेशात होते. मला जर भारतातच राहायचे असेल तर विद्यालयात प्रवेश वगैरे घेण्याचा काही उपयोग नाही. परदेशात राहायचे असेल तर मात्र ते उपयोगाला येऊ शकते. पण मी कशावरच ठाम नव्हते. काही दिवसांसाठी इथे होते. पुन्हा परदेशात गेले आणि मुद्दामच पदवीस्तरापर्यंत अभिनय हा विषय निवडला. तिथे अनेक प्रवाह शिकण्यात आले. चेकोव्हपासून ते स्टॅला ॲअॅडलर, ली स्टार्सबर्गपर्यंतचे विचारप्रवाह मी अभ्यासले. मला जाणवले, की हे सगळेच लोक आपापल्या पद्धतींमध्ये मातब्बर होते आणि आपापल्या परीने त्यांनी उत्तरोत्तर सुधारणा घडवून आणल्या. हीच गोष्ट तर एखाद्या कलावंताला अद्वितीय बनवते. मी नेहमीच मेरिल स्ट्रिपची चाहती होते. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत ती अखेरपर्यंत जीव ओतून अभिनय करत राहिली, हे त्यागाचे कारण.’’

image


‘‘चित्रपट हे एक कमालीचे पुरुषकेंद्रित क्षेत्र आहे, पण आता त्यात काही बदल घडताहेत. विद्या बालनसारख्या कसदार अभिनेत्रींनी यात परिवर्तन आणण्याचे आपापल्या परीने प्रयत्न केलेले आहेत. या बाबतीत यशस्वी अभिनेत्री म्हणून माझ्या आईचेही उदाहरण देता येईल. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आमच्यात पुरुषांच्या बरोबरीने प्रतिभा आहे, कला आहे. चित्रपट सृष्टीनेही रंगरूपाऐवजी प्रतिभेला अधिक महत्त्व द्यायला हवे. आता बरेच कलावंत असे आहेत, जे दिसायला इतके सुंदर नाहीत, पण अभिनय मात्र कमालीचा सुंदर करतात. त्यांना प्रोत्साहन मिळायलाच हवे.’’

‘‘मला वाटते तरुणींनी आपल्या कलेकडे गंभीरपणे पाहावे. कुठलीही तडजोड करू नये. सुपरस्टार बनण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्वत:शी प्रामाणिक राहावे आणि तेच काम करावे, जे करण्याची खरोखर मनापासून इच्छा आहे. माझ्यापुरते बोलायचे तर माझ्यासाठी हेच महत्त्वाचे आहे.’’

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags