संपादने
Marathi

संतोषच्या यंत्रातून शेतकऱ्यांची कमाई, स्वस्तात होते मस्त आता गाजर-धुलाई

Chandrakant Yadav
8th Oct 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

इच्छा नुसतीच असून चालत नाही. इच्छा ही उत्कट आणि प्रामाणिक असावी लागते. ‘इच्छा तिथे मार्ग’ या म्हणीचा अर्थही खरं तर हाच आहे. इच्छा उत्कट आणि प्रामाणिक असली तर सर्व अडचणी मार्गातून अलगद कडेला पडत जातात आणि ध्येय स्वत:हून तुमच्या दिशेने चालत तुमच्यापर्यंत पोहोचलेले असते. कर्नाटकातील बेळगावच्या संतोष कावेरीची कथा काहीसे हेच सांगणारी आहे. कावेरीने परंपरा वाकवल्या. काडी तोडावी तशा रुढी तोडल्या. महत्त्वाचे म्हणजे यशासंदर्भातली लोकांची मानसिकताच त्याने बदलवून टाकली.

कुणी पैशाची काही मदत केली तरच मी काही करू शकेन. पैशांशिवाय काहीही करता येणे केवळ अशक्य, अशी मनाची पक्की खुणगाठ असलेले कोट्यवधी लोक आपल्या देशात सापडतील. ही आहे, ‘माल है तो ताल है मेंटालिटी!’ कावेरीने ती थेट, ‘ताल है तो माल है’ अशी उलटली आहे!

जीवनात येणाऱ्या अडचणींचे रूपांतर संधीत कसे करता येऊ शकते, त्याचे उदाहरण कावेरीने घालून दिले आहे. कसे ते जाणून घ्यायचे तर कावेरीच्या आयुष्यात थोडे मागे जावे लागेल. शालेय शिक्षणाच्या अगदी पहिल्या टप्प्यातच ‘अडचणींचे रूपांतर संधीत’ हे तत्व त्याने आत्मसात केलेले होते. शाळेत त्याला दररोज दहा किलोमीटर पायी जावे लागे. त्यात त्याच्या पाठीवर केवळ दप्तर नव्हते… कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझेही होतेच.

बालपणापासूनच ते युवावस्थेपर्यंत संतोषचे जीवन म्हणजे रोज नव्या अडचणी. रोज नवा सामना. अडचणी आणि त्याचे नाते इतके पक्के झालेले होते की त्याने यातूनच तेव्हा ठरवून टाकलेले होते, की इतरांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून मी काहीतरी करणार… आणि देशपांडे फाउंडेशनच्या ‘लिडर्स एक्सिलरेटिंग डेव्हलपमेंट’ कार्यक्रमाची जोड त्याला मिळाली.

संतोषचे गाजर-धुलाईयंत्र

संतोषचे गाजर-धुलाईयंत्र


संतोषचे सगळे आयुष्य ग्रामिण भागात गेलेले होते. शेती हाच इथला मुख्य व्यवसाय. शेतकऱ्यांना कृषी्-कामकाजासंदर्भात येणाऱ्या दैनंदिन अडचणींबद्दल संतोषला इत्थंभूत माहिती होती.

संतोषच्या गावात गाजराची लागवड मोठ्या प्रमाणात होत असे. स्थानिक बाजारपेठेत माल नेण्यापूर्वी तो स्वच्छ करणे ही शेतकऱ्यांची डोकेदुखीच होती. एकतर गाजर जमिनीखाली वाढते. काढणीनंतर नुसतीच गाजरे जमिनीबाहेर येत नाहीत. गाजराला मात लगडलेली असते. मातीचा कण राहू नये, अशा पद्धतीने नेमकेपणाने गाजर धुवून स्वच्छ करणे हे सोपे काम नाही. शेतकऱ्यांचा त्यात वेळही जाई आणि मजुरीपोटी पैसाही जाई. टनभर गाजरं धुवायची तर डझनभर माणसे लागत. संतोषला हे माहित होते आणि अडचणींतून मार्ग काढण्याचे तर बाळकडूच संतोष कोळून प्यायलेला होता. इतरांची अडचण दूर करण्याचा आपला संकल्प त्याला आठवला. गाजरसफाईची ही संधी म्हणजे संकल्पपूर्तीची वेळ अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली आणि कामाला लागला. वॉशिंग मशिन एकदा पाहण्यात आली आणि मार्गही सापडला. गाजर धुण्याचे यंत्र तयार करण्याच्या त्याच्या संकल्पनेने आता कर्मयोग धारण केला. तब्बल बारावेळा संतोषने अपयशाचा सामना केला. तेराव्या प्रयत्नात यश मिळाले. गाजरसफाई यंत्रासह संतोष गावकऱ्यांसमोर आला. प्रात्यक्षिक दाखवले. गावकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले. पूर्वी शंभर किलो गाजर धुवायचा तर बारा लोक लागत असत. तासनतास मेहनत करावी लागे. आता या यंत्राच्या साहाय्याने दोन जण मिळून पंधरा मिनिटांत हे काम फत्ते करतात. संतोषचे हे गाजर-धुलाईयंत्र लगतच्या गावांतही लोकप्रिय झाले. हा हा म्हणता संतोष कावेरीची कीर्ती पंचक्रोशीत पसरली.

संतोषच्या या संशोधनातील आगळेपण तसेच वाणिज्यमूल्य देशपांडे फाउंडेशनच्या गुणसंग्राहक नजरेत भरले. फाउंडेशनने २०१३ मध्ये आपल्या युवक संमेलनात दस्तुरखुद्द रतन टाटा यांच्या हस्ते संतोषचा गौरव केला.

पुरस्काराने संतोषचा नाविन्याचा ध्यास संपला नाही. उलट या ध्यासाला पंख फुटले. अलीकडच्या काळात त्याने एक नवे यंत्र बनवले आहे. सेवनासाठी गरम करावयाच्या पाण्यासह या यंत्राद्वारे आंघोळीसाठीही गरम पाणी तयार मिळते. ‘इको वॉटर कॉइल’ असे या यंत्राचे नामकरण संतोषने केलेले आहे.

देशात एकीकडे शहरी भागाचा विकास झपाट्याने होतो आहे तर दुसरीकडे ग्रामिण भागाकडे दुर्लक्ष होते आहे. ग्रामिण प्रतिभाशाली युवकांकडेही कुणाचे लक्ष नाही. संतोषही असाच एक उपेक्षित होता. स्वत:कडे तर पैसा नव्हताच, पण कुणाकडून दान अगर अनुदानही त्याला मिळाले नाही. शासनाकडूनही नाही. त्याउपरही स्वबळावर हा गाजर-धुलाई यंत्राचा गोवर्धन त्याने पेलून दाखवला. स्वत: अनेक प्रश्नांमध्ये गुरफटलेला असूनही लोकांचा प्रश्न सोडवला. ‘माल नही तो ताल नही’ मानसिकतेला निरुत्तर केले!

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags