संपादने
Marathi

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑटिस्टिक मुलांची मदत करणारे अजित नारायणन

Team YS Marathi
15th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

संशोधन प्रयोगशाळेचे संस्थापक अजित नारायणन यांनी आपल्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाच्या जोरावर ʻआवाजʼ नावाची एक प्रयोगशाळा स्थापन केली. ऑटिस्टिक अर्थात स्वमग्न मुलांकरिता ही भारतातील पहिली पर्यायी संवाद यंत्रणा होती. अजित यांना यापूर्वी ʻएमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूʼ, टीआर३५ पुरस्काराने २०११ साली गौरविण्यात आले आहे. युअरस्टोरीने टेडएक्स बिट्स गोवा येथे अजित यांच्याशी याबाबत संवाद साधून, ʻआवाजʼसोबतच्या त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाबद्दल अधिक जाणून घेतले.

ʻआवाजʼच्या संस्थापनेमागील प्रेरणेबद्दल बोलताना अजित सांगतात की, ʻमला कायमच सामाजिक समस्या सोडवायच्या होत्या. अमेरिकेत काही वर्षे काम केल्यानंतर २००७ साली मी भारतात परतलो. त्यावेळेस माझे काही मित्र चेन्नई येथे विशेष मुलांकरिताच्या शाळेचे काम पाहत होते. त्यांच्या त्या कार्यात मीदेखील सहभागी झालो आणि विशेष काळजीची आवश्यकता असलेल्या मुलांबरोबर काही काळ घालवला, त्यांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या. तेव्हा मी त्यांच्याकरिता पर्यायी संवाद यंत्रणा तयार करण्याचे ठरविले. मुलांना येणाऱ्या समस्या आधी जाणून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यावरील समाधान शोधायचे, या दोन गोष्टींचे हे मिश्रण आहे.ʼ ʻआवाजʼला जनमाणसातून आणि सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अजित सांगतात की, ʻआम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला. भारतातील अनेक लोकांचे आयुष्य आम्ही पालटले आहे. भारताबाहेर ʻआवाजʼचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. डेन्मार्क, इटली आणि ऑस्ट्रेलियापेक्षा अमेरिकेत ʻआवाजʼकरिता मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. ʻआवाजʼला आपल्यात सामावून घेण्यासाठी अनेक परदेशी बाजारपेठा अनुकूल आहेत. मात्र प्रत्येक देशात परिस्थिती वेगवेगळी आहे. अमेरिका, इटली आणि ऑस्ट्रेलियामध्ये या गोष्टींकरिता सरकार निधी उपलब्ध करुन देते. विशेष मुलांची काळजी घेण्याकरिता इतर देशांमध्ये सरकार पुढाकार घेते.ʼ यापैकी अनेक मुले हुशार असतात. आपण भाग्यवान आहोत कारण अशा मुलांमधून हुशार मुले शोधून काढण्याची आपल्याकडे संधी आहे, असे अजित सांगतात.

image


एक अभियंता म्हणून ʻआवाजʼ विकसित करत असताना इतर कोणत्या विषयावर सखोल संशोधन करावे लागले का, असे विचारले असता अजित सांगतात की, ʻनिश्चितच. भाषांची संयंत्रणा यावरच मला अधिक संशोधन करावे लागले. भाषेचे अन्वेषण मी कोणता वैज्ञानिक प्रबंध लिहिण्याकरिता करत नव्हतो. तर मला एक समस्या सोडवायची होती, त्याकरिता करत होतो. इलेक्ट्रीकल इंजिनियरींगचे शिक्षण घेताना मी जे शिकलो होतो, त्याचा उपयोग ʻआवाजʼचा आराखडा तयार करताना मला झाला. त्यामुळे मी जलदगतीने काम करू शकलो.ʼ बालवयात ऑटिझमचे निदान होणे, अवघड असते. पालकांना आपले मूल ऑटिस्टिक असल्याचे निदान होईपर्यंतच बराच काळ लोटलेला असतो. ऑटिस्टिक मुलांच्या पालकांना अजित सल्ला देतात की, ʻतसे पाहता वयाच्या दुसऱ्या वर्षी ऑटिस्टिकचे निदान होणे, तसे काही अवघड नाही. जर मुल वयाच्या दुसऱ्या वर्षीदेखील बोलत नसेल किंवा बोलण्यात काही रस दाखवत नसेल, तर अशा मुलाची वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी. अशा प्रकारच्या काही वर्तणूकीची वेळीच दखल घेण्यात यायला हवी. अनेक पालकांना आपल्या पाल्यांना काही अडचणी येत असल्याचे जाणवत असते. मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करतात. सुरुवातीच्या काळातच याबाबत माहिती पडल्यास योग्य ती पावले उचलता येऊ शकतात. ऑटिस्टिक मुलांच्या बाबतीत आपल्याकडे पुरेशी जागरुकता नाही.ʼ सध्या ऑटिझमचे निदान कमी वयातच करता यावे, यादिशेने संशोधन सुरू आहे. भविष्यकाळात मूल काही महिन्यांचे असतानाच या रोगाचे निदान होऊ शकते, असे संशोधन होण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे ऑटिस्टिक मुलांना या रोगाच्या सुरुवातीला योग्य ती उपचारपद्धती देता येऊ शकते.

तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून तुम्हाला ʻआवाजʼचा विकास करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला. तसेच तुम्ही तर अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या संशोधनासाठी तुम्हाला जीवशास्त्राचा अभ्यास करावा लागला का, या प्रश्नावर उत्तर देताना अजित सांगतात की, ʻनाही. अजिबात नाही. मी काही ऑटिस्टिक मुलांकरिता कोणते औषध निर्माण करत नव्हतो. त्या मुलांच्या समस्येवर मी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाधान मिळवत होतो. जेणेकरुन ऑटिस्टिक मुले बोलू शकतात.ʼ हा प्रश्न म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वैद्यासाठी गाडी बनवायची असेल, तर तुम्हाला औषधशास्त्राचा अभ्यास करावा लागला का, असा असल्याचे अजित मिश्किलपणे सांगतात. तांत्रिक अडचणी या ठिकाणी आल्या नव्हत्या. मुद्दा हा होता की, ही मुले संवादासाठी चित्रांचा वापर करणार होती आणि चित्रांद्वारे संवादाला बऱ्याच मर्य़ादा आहेत. यासारखी अनेक उदाहरणे आणि मर्यादा घालणारे घटक आहेत. त्यामुळे ऑटिस्टिक मुले अशाप्रकारच्या संवादाचा पुरेपुर फायदा घेऊ शकत नव्हती. आमचे आव्हान हे मुख्यत्वे करुन कल्पक विचारांमध्ये होते. ही मुले कशाप्रकारे सर्वोत्तम संवाद करू शकतात, हे आम्ही समजून घेत होतो. शिक्षणाच्या आणि संवादाच्या या नव्या यंत्रणेसोबत येणे, यातच मोठे आव्हान होते. जर मला तुमच्यासाठी एक सायकल तयार करायची असेल. तर मी तुम्हाला विचारू शकतो की, तुम्हाला कशाप्रकारची सायकल हवी आहे. तशी सायकल मी बनवेन आणि तुमचा अभिप्राय विचारेन. इथेदेखील मी संवादाची एक यंत्रणा तयार करत होतो आणि त्यासाठी मला त्यांचा अभिप्रायदेखील हवा होता. तेच मोठे आव्हान होते, असे अजित सांगतात. ही अडचण कशाप्रकारे सोडवली, याबाबत बोलताना अजित सांगतात, ʻअनेकदा मुले त्यांचा अभिप्राय देण्यासाठी ʻआवाजʼचा वापर करतील. अनेकदा पालक, उपचार करणारे आणि शिक्षक एका दुव्याप्रमाणे काम करतात. ऑटिस्टिक मुलांना ज्या पद्धतीने ते ओळखतात, त्यापद्धतीने त्यांच्या भावनांचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करतात.ʼ ʻआवाजʼचे यश हे त्याच्या किंमतीवर अवलंबून आहे का, असे विचारले असता अजित सांगतात की, ʻनाही. ʻआवाजʼला भारताबाहेर भरपूर यश मिळत आहे, जेथे ʻआवाजʼची किंमत हा मुद्दाच नाही. ʻआवाजʼचे यश हे मुळात ते मुलांना इतर कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा चांगल्या पद्धतीने संवाद साधण्यास मदत करते, यावर अवलंबून आहे.ʼ

इतर सामाजिक समस्यांबद्दल बोलताना अजित सांगतात, ʻमला अपंगत्वाबद्दल सहानुभूती वाटते. भारतात अपंगत्वाबद्दल समाजाचा दृष्टीकोनही अपंग नागरिकांप्रती सहानुभूतीचा असतो. दुर्दैवाने या अपंगत्वामुळे अनेक लोकांच्या वाट्याला दुःखी जीवन येते. मला वाटते या दृष्टीकोनामुळेच लोकांना मदत होण्याऐवजी त्यांचे अधिक नुकसान होते. परदेशात अपंग व्यक्तिंना कोणत्याप्रकारे मदत करायची, हा प्रश्न नसतो. तर अपंग व्यक्तिंना काय मदत करायची, जेणेकरुन त्यांना पुन्हा मदतीची गरज भासणार नाही, हा प्रश्न असतो. अपंग मुले अनेक गोष्टी करू शकतात, ज्या तुमच्या आमच्यासारखे धडधाकट लोक करू शकत नाहीत. फक्त त्यांना गरज असते ती योग्य आणि उचित साधनांची. मी सध्या चश्मा घातला आहे आणि तुमच्याशी बोलत आहे. भूतकाळात मलादेखील काही प्रमाणात डोळ्यांच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागला. मात्र तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे मी त्या अडचणीवर मात केली आहे.ʼ ʻअशा मुलांना वेगळ्या पद्धतीने वागणूक देण्यात येतेʼ, हा प्रकार बदलण्याची गरज आहे. त्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याची गरज असते. तसेच सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांना वागणूक देण्याची गरज असते. भारतात अभियांत्रिकीचा वापर चांगल्या पद्धतीने व्हायला हवा, असे मला मनापासून वाटत होते. या एकमेव कारणामुळे मी संशोधन प्रयोगशाळा सुरू केली. जर तुम्ही अमेरिका, जपान आणि जर्मनीसारखे देश पाहिले, तर अशा देशांना अभियांत्रिकीचा एक वेगळा इतिहास आहे. संशोधनाची परंपरा या देशांना लाभली आहे. जेव्हा समाजाला काही अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा अभियांत्रिकीद्वारे या अडचणींवर पहिले समाधान शोधले जाते. अमेरिकेत जर खराब रस्ता आढळला तर एखादी व्यक्ती तो साफ करण्यासाठी यंत्रणेचा शोध लावेल. भारतात मात्र चित्र पूर्णपणे वेगळे आहे. जर भारतात खराब रस्ते आढळले तर आपण एकतर कोण्या राजकारण्याने त्यात हस्तक्षेप करायची वाट पाहू किंवा रस्त्याची साफसफाई करण्यासाठी अधिक लोकांची नियुक्ती करू. तसेच रस्ता सफाईकरता जागृती मोहिमांचे आयोजन करू. तंत्रज्ञानाकडे आपण शेवटचा पर्याय म्हणून पाहतो. आपल्याकडे समस्यांकडे पाहणाऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यावर उपाय शोधणाऱ्या संशोधकांची कमतरता आहे.

भविष्यकाळातील योजनांबद्दल बोलताना अजित सांगतात की, ʻमी काही जास्त लांबचा विचार केलेला नाही. मात्र मला एक यशस्वी कंपनी उभारायला आवडेल. माझ्यासाठी हिच सध्याच्या स्थितीला महत्वाची गोष्ट असेल. मी स्वतःला एक अभियंता आणि संशोधक म्हणून यापूर्वीच सिद्ध केले आहे. मात्र स्वतःला एक उद्योजक म्हणून सिद्ध करणे अधिक आव्हानात्मक होते. एक यशस्वी उत्पादन तयार करण्याशिवाय मला माझ्या कर्मचाऱ्यांना, गुंतवणूकदारांना आणि भाग भांडवलधारकांना समाधानी ठेवायचे आहे. सध्या हे माझे प्राधान्यक्रमावरील काम आहे. आम्ही सध्या त्याच्या पुर्ततेच्या दिशेने काम करत आहोत. मात्र त्यापर्यंत पोहोचायला काही वेळ लागेलʼ, असे ते सांगतात.

लेखक - आदित्य भूषण द्विवेदी

अनुवाद - रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags