संपादने
Marathi

‘शोमॅन’ सुभाष घई चित्रपट निर्माते, कन्या मेघना घई निर्मात्यांची निर्माती

Chandrakant Yadav
22nd Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘हिरो’, ‘कर्ज’, ‘राम-लखन’, ‘खलनायक’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीवर दशकाभराहून जास्त काळ अधिराज्य गाजवणारे निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई… राज कपूर नंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव सुभाष घई… एका उभ्या पिढीवर घई यांनी आपले गारूड गाजवले. मेघना घई या त्यांच्याच सुकन्या. मेघना यांनी आपली कारकीर्द सुरू केली खरी, पण अभिनय हा प्रांत काही त्यांना मानवला नाही.

प्रसारण, जाहिरात, वितरण या क्षेत्रांचे मेघना यांनी रितसर प्रशिक्षण घेतलेले आहे आणि या क्षेत्रांतील त्या यशस्वी व्यावसायिकही आहेत. सुभाष घई यांच्या ‘परदेस’, ‘ताल’ आणि ‘यादे’ या चित्रपटांच्या वितरणात त्यांनी सहायक म्हणून मोलाची भूमिका बजावलेली आहे.

अभिनयात रस नसला तरी बॉलिवुड तर रक्तातच भिनलेले. चित्रपटाशी निगडित सगळी तंत्रे शिकवणारा अभ्यासक्रम ल्यायलेली एक प्रशिक्षण संस्था आपण सुरू करावी, हे सुभाष घई यांचे स्वप्न होते. घई यांनी ते प्रत्यक्षात आणायचे ठरवले तेव्हा मेघना यांचेच नाव त्यांच्या डोळ्यासमोर होते. सगळी जबाबदारी त्यांनी मेघनांवर सोपवली. मेघना तेव्हा इंग्लंडला होत्या. घई यांनी त्यांना इथे बोलावून घेतले.

आज मेघना घई हे तिच्या क्षेत्रातील एक मोठे नाव आहे.

मेघना सांगतात, ‘‘अभिनय वगैरे प्रांत आपले नाहीत, हे मला जसे जाणवले होते; तसेच वडिलांनी चित्रपट प्रशिक्षण विद्यालयाचा विषय काढला तेव्हा हे मला जमू शकेल, हेही जाणवले होते.’’

मेघना यांना वडिलांनी एकच गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे, ‘‘तुला बाकी काही येत नसले तरी काही हरकत नाही, पण कुठल्याही संस्थेची किमान सुरवातीच्या काळात अगदी लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते आणि तू ती घेशील याची मला खात्री आहे.’’

image


वरील प्रसंग २००० सालचा. आणि वर्षभरानंतर ठरल्याप्रमाणे मेघना भारतात परतल्या. २००१ मध्ये संस्थेचे कोनशिला अनावरण झाले. तेव्हापासून ते आजअखेर मेघना 'Whistling Woods International (WWI)’ (व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल) या संस्थेच्या अविभाज्य घटक आहेत. नंतर पुढल्या पाच वर्षांत मेघना यांनी संस्थेच्या कोअर टीमसह अत्यंत चांगले काम केले. जगभरातील कितीतरी विद्यापीठे, महाविद्यालये आणि चित्रपट विद्यालयांचा दौरा केला. अभ्यासक्रम निर्मिती आणि अभ्यासक्रम विकास यांसह कॉलेज प्रशासन ही कामे कशी चालतात, ते समजून घेण्यासाठी चित्रपट विद्यालयांच्या विविध संमेलनातून आपला सहभाग नोंदवला.

संस्थेचा कँपस् तयार व्हायलाच तीन वर्षे जावी लागली. चित्रपट तंत्रात दिवसागणिक नवे बदल होतात. या हिशेबाने अभ्यासक्रमही अद्ययावत ठेवावा लागतो. दरवर्षी कुठलातरी नवा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट होतो म्हणून जागा मोठीच हवी. कारण नव्या अभ्यासक्रमासाठी आणखी कुठे नव्याने बांधकाम करावे लागले तर जागेची अडचण यायला नको.

भारतीय तज्ज्ञांसह परदेशी तज्ज्ञांची मदतही अभ्यासक्रम निर्धारित करण्यासाठी घेण्यात आली. शेखर कपूर, मनमोहन शेट्टी, आनंद महिंद्रा, श्याम बेनेगल यांनी त्यात मोलाचे मार्गदर्शन केले.

सीबीएसई बोर्ड अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माध्यमे’ या विषयाचे अध्ययन सुरू करू इच्छित होते… आणि या विषयावर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी म्हणून बोर्डाने ‘व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल’चे सहकार्य मागितले होते. मेघना ही बाब अभिमानाने नमूद करतात.

मेघना सांगतात, ‘‘आम्ही अभ्यासक्रम अशा पद्धतीने विकसित केलेला आहे, की त्यात उणीव म्हणून नाहीच. कला, रंगमंच, नाटक कुठलाही विषय यातून निसटलेला नाही. आमचा प्रत्येक विद्यार्थी चित्रपटांतून मोठा नावाजलेला बनावा, अशी अपेक्षा अर्थात नाहीच, पण त्याला ‘फिल्म ॲप्रिसिएशन’ तरी जमायलाच हवे, ही किमान अपेक्षा आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याकडून असेल. ३६० अंश कोनात चित्रपट म्हणजे नेमके काय? त्याचे ज्ञान देणे हा या अभ्यासक्रमाचा मूळ हेतू आहे.’’

७० विद्यार्थ्यांची एक बॅच अशी विद्यालयाची सुरवात होती. आज ४०० विद्यार्थी आहेत. एक हजाराहून जास्त विद्यार्थ्यांनी आजपावेतो पदवी प्राप्त केलेली आहे. चित्रपट उद्योगात बहुतांश कार्यरतही आहेत. विद्यालयाची आर्थिक बाजू आधीपेक्षा मजबूत बनलेली आहे. २०१३ मध्ये विद्यालयाने १८.८६ लाख रुपयांचा व्यवसाय केला होता.

२०१३ मधीलच एका अंकात ‘दी हॉलिवुड रिपोर्टर’ या मासिकाने विद्यालयाची गणना जगातील दहा सर्वश्रेष्ठ चित्रपट विद्यालयांमध्ये केलेली आहे.

विद्यालयातील एक विद्यार्थी मोहित छाबडा याच्या ‘रबर बँड बॉल’ या लघुपटाने ‘कान कॉर्पोरेट मिडिया’ आणि ‘टीव्ही पुरस्कार २०१३’सह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावलेले आहेत. ‘सिल्व्हर डॉल्फिन’, ‘ड्यूविल ग्रिन पुरस्कार २०१३’, ‘सिटी स्टोरीज् प्रोजेक्ट २०१२’ हे पुरस्कारही मिळवले. लंडन, पॅरिसमध्येही त्याच्या लघुपटाने अशाप्रकारे मान्यता मिळवणे म्हणजे मोठे यश आहे.

धर्मा प्रॉडक्शन, डिज्ने, यशराज फिल्म, फँटम अशा नामांकित बॅनर्समध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळालेल्या आहेत.

प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ चित्रपटाच्या निर्मितीतही ‘व्हिसलिंग वुड्स’च्या विद्यार्थ्यांचे सहकार्य होते. हाँगकाँगमधील पर्यटन विकासासाठी हाँगकाँग पर्यटन मंडळाने बनवलेल्या लघुपटातील योगदानासाठी ‘व्हिसलिंग वुड्स’च्या विद्यार्थ्यांचा तिथल्या सरकारतर्फे नुकताच सत्कार करण्यात आलेला आहे.

आज या विद्यालयाला जगभर मान्यता मिळालेली असली, प्रतिष्ठा मिळालेली असली तरी सुरवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला होता. चांगली जागा मिळवणे ही अडचण होती. अध्यापनासाठी त्या-त्या विषयांतील तज्ज्ञ माणसे मिळवणे ही अडचण होती. हे सगळे जमून आले तरच संस्थेची विद्यार्थ्यांमधली विश्वासार्हता वाढीस लागणार होती. अन्यथा सगळे कष्ट पाण्यात गेले असते.

पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या असाव्यात म्हणून विद्यालयाने ‘सोनी’सह करार केला. ‘सोनी’ने विद्यालय परिसरात सोनी मिडिया सेंटर सुरू केले आणि त्यासाठी भली मोठी गुंतवणूकही केली. लंडन, लॉस एन्जिल्सनंतर फक्त मुंबईत ‘सोनी’चे केंद्र आहे.

विद्यार्थी आणि पालकांमध्येही सुरवातीच्या काळात अभ्यासक्रमाविषयी गोंधळ होता. इथे शिकले तर भविष्यात काय उपयोग होईल वगैरे वगैरे प्रश्नांचे गाठोडे घेऊनच विद्यार्थी आणि पालक येत. विद्यार्थी तयार असले तर पालक तयार होईनात आणि पालक तयार असले तर विद्यार्थी तयार होईनात, अशी स्थिती होती. मेघना सांगतात, ‘‘मग आम्ही संस्थेत आमच्या विशेष अभ्यासक्रमासह बीएससी आणि एमबीए या पदव्यांसाठीही अभ्यासक्रम सुरू केले. अर्थात आता आमच्या अभ्यासक्रमाचे दृश्य परिणाम दिसू लागलेले आहेत आणि आता ही अडचण राहिलेली नाही.’’

‘व्हिसलिंग वुड्स’मध्ये प्रवेश म्हणजे उत्तम भविष्यावर शिक्कामोर्तब अशी संस्थेची प्रतिमा आता बनलेली आहे. पालक आणि विद्यार्थी असे सारेच आता संस्थेबाबत आश्वस्त आहेत. मणिपाल विद्यापीठ आणि भारतीदासन विद्यापीठाशी (तमिळनाडू) संस्था संलग्न आहे.

‘व्हिसलिंग वुड्स’मध्ये चित्रपट निर्मितीसह मिडिया, पत्रकारिता, फॅशन आणि ॲअॅनिमेशनचे धडेही दिले जातात.

‘व्हिसलिंग वुड्स’च्या कार्यविस्तारासंबंधीच्या अनेक योजना आहेत. देशातील अन्य शहरांतून काम सुरू करायचे आहे. पुण्यात डी. वाय. पाटील कॉलेजच्या सहकार्याने अभ्यासक्रम सुरू करण्याचे चाललेले आहे. इंग्लंडमध्येही शाखा सुरू होते आहे. तिथल्या ब्रॅडफोर्ड महाविद्यालयाशी करार झालेला आहे. महाविद्यालयाच्या परिसरातच ‘व्हिसलिंग वुड्स’च्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र जागाही उपलब्ध झालेली आहे. नायजेरियामध्ये आफ्रिकन फिल्म आणि टीव्ही ॲअॅकॅडमी स्थापन करण्यासाठी ट्रेंड मिडियाशी हातमिळवणी केलेली आहे. नायजेरियात चित्रपट उद्योग मोठा आहे, पण व्हिडिओपट म्हणून निर्मिती चालते म्हणजे तिथले हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत नाहीत. तिथे प्रतिभेची कमतरता नाही, पण प्रशिक्षणासाठी संस्थेचा मात्र अभाव आहे. म्हणून तिथेही ‘व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल’ची स्थापना केली जात आहे. ‘व्हिसलिंग वुड्स’च्या मुंबई कॅम्पसमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जगभरातील इतर चित्रपट प्रशिक्षण संस्थांशी केलेल्या विद्यार्थी विनिमय करारानुसार हे विद्यार्थी इथे शिक्षण घेताहेत.

मेघना खरोखर नम्र आहेत. प्रांजळ आहेत. अगदी त्याथेट सांगतात , ‘‘मी बाहेरून कुठून येऊन हा सगळा डोलारा उभा केला असता तर दुसऱ्या दिवशी तो कोसळला असता. माझे वडील हेच या डोलाऱ्याचा आधार आहेत. चित्रपट उद्योगातील माझ्या वडिलांची लोकप्रियता आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांची विश्वासार्हताच या संस्थेच्या उभारणीत उपयोगात आली.’’

image


संवेदनशिल स्वभाव, आपल्या वागण्यातील ठराविक तऱ्हा तसेच निर्णयक्षमता या बळावर मेघना यांनी ‘व्हिसलिंग वुड्स’ला जागतिक स्पर्धेच्या व दर्जाच्या पातळीवर आणून ठेवलेले आहे. अनेक संस्थांच्या बाबतीत ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती आपण पाहतो. पण मेघना यांनी ‘व्हिसलिंग वुड्स’ला ‘काम करण्यासाठी उत्कृष्ट संस्था’ अशी प्रतिमाही प्राप्त करून दिलीय. इथले विद्यार्थी तर संस्थेचे प्रचारक आहेतच, पण कर्मचारीही संस्थेचे भक्त आहेत. पाईक आहेत. सुट्या, वेतन अशा सर्वच बाबतीत मेघना यांनी खुले धोरण अंगिकारलेले आहे.

कर्मचारी, नोकरी असे विषय आल्यानंतर सहज म्हणून ‘तुम्हाला एखादी नोकरी करायला आवडेल काय’, असे विचारले असता, त्या उसळून आणि खळखळून हसतच म्हणाल्या, ‘‘मला नाही वाटत मला कुणी नोकरी देईल म्हणून. आम्ही काम सुरू केले तेव्हा माझे एकच बॉस होते…म्हणजे मी वडिलांना रिपोर्ट करत होते. गेली कितीतरी वर्षे इथे कुणीही बॉस नाहीये. मी नोकरी करू म्हटले तर माझ्या बॉसला जरूर ते अडचणीचे जाईल.’’

भारतात महिलांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे मेघना यांना वाटते. त्या सांगतात, ‘‘कायद्याचा आणि माध्यमांचा मोठा पाठिंबा इथे महिलांना आहे. आता महिलाच पुढे येत नाही म्हटल्यावर कोण काय करणार? महिलांनी स्वत:च्या मर्यादा ठरवून घेतलेल्या आहेत. स्वत:साठी एक वर्तुळ आखून घेतलेले आहे आणि त्या वर्तुळाबाहेर पडण्याची महिलांचीच तयारी नाही. मातृत्वासाठी एक ब्रेक महिलांनी अवश्य घ्यावा. नंतर पुन्हा कामाला सुरवात करावी. काम कुठलेही असो. अगदी मग ते केक बनवण्याचे का असेना. मन लावून केले पाहिजे. महिलांचे कार्यप्रवण होणे म्हणजेच महिलांचे सशक्त होणे आहे, ही साधी गोष्ट महिलांना कळायला हवी. कार्यप्रवण महिलांना कुटुंबात, समाजात सगळीकडेच मान मिळतो. आणि मुख्य मुद्दा आत्मसन्मानाचा आहे, तो तर मिळतोच मिळतो!’’

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags