राजस्थानातील लिंगभेदाविरुद्धचा बुलंद आवाज “विकल्प संस्थान”

तरुणांना सक्रिय करणारी एक अनोखी चळवळ

राजस्थानातील लिंगभेदाविरुद्धचा बुलंद आवाज “विकल्प संस्थान”

Friday August 21, 2015,

5 min Read

समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता तरुणाईमध्ये आहे, या वाक्यातील प्रत्येक शब्दावर विश्वास ठेऊन राजस्थानच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था म्हणजे विकल्प संस्थान. या संस्थेतील तरुण राजस्थानातील लिंगभेदाविरुद्ध कणखरपणे, क्रांतीकारी असा लढा देत आहेत. तरुणांना हा अत्यंत गंभीर स्वरुपाच्या विषय समजावून सांगून त्यांना याविषयी लढा देण्याचे काम विकल्प संस्थानकडून केले जाते.

२००४ मध्ये समाजसेवेत कार्यरत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी विकल्प संस्थानची स्थापना केली. स्थापनेपासून ही संस्था लिंग समभाव, मुली शिकवा अभियान, बालविवाह आणि महिला अत्याचार या विषयांमध्ये कार्यरत आहे. विकल्प म्हणजे सक्षम पर्याय. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना चांगले जीवन जगण्याचा पर्यायी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्वग्रहदूषित मनोवृत्ती, भेदाभेद आणि हिंसा या गोष्टींना दूर सारुन विकल्प संस्थानने विविध पातळ्यांवर उपरोक्त विषयांमध्ये स्वतःला झोकून दिले आहे. “सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आम्ही महिलांविषयीच्या जागृतीसाठी विविध अभियानांद्वारे आणि बैठकांच्या माध्यमातून जागरुकता आणण्याचा प्रयत्न करत असतो”, विकल्पचे कार्यक्रम अधिकारी योगेश वैष्णव सांगत होते. विकल्प संस्थान तळागाळात कशा पद्धतीने कार्यरत आहे, हे स्पष्ट करताना योगेश वैष्णव म्हणतात, “आम्ही छोट्या छोट्या गावांना तसेच काही समुदायांना भेटी देवून त्यांच्याशी सतत संवाद साधत असतो. सुरुवातीला त्यांना काय म्हणायचे आहे, ते आम्ही समजावून घेतो. त्यानंतर महिलांच्या अधिकारासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावर ज्यांना हा विषय समजला असेल, आणि समजवून घेण्याची इच्छा असेल, त्यांची आम्ही निवड करतो. निवड केलेल्यांना प्रशिक्षण आणि प्रेरणा देऊन पुन्हा त्यांच्या समुदायांमध्ये परत पाठवले जाते, जेणे करुन ते त्या-त्या ठिकाणी सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. शिवाय यामुळे आमच्या संस्थेशी अधिकाधिक तरुण जोडले जातात.”

लिंगभेदाविरुद्धचा बुलंद आवाज

लिंगभेदाविरुद्धचा बुलंद आवाज


राजस्थानातील लिंग भेदाविरूद्ध आवाज

राजस्थानातील लिंग भेदाभेद या प्रखर समस्येविषयी अत्यंत तळमळीने योगेश वैष्णव बोलतात. “राजस्थानात फार पूर्वीपासून पुरुषसत्ताक समाजजीवन राहिले आहे. सध्याच्या काळात या चालीरितींचे काहीही महत्त्व नसताना डोळे झाकून चाली-रिती येथील समाजात पाळल्या जातात. त्यामुळेच कदाचित महिलांवरचे अन्याय, अत्याचार जगण्याचा एक भाग म्हणून येथील समाजाने स्वीकारलेले आहे. विशेष म्हणजे हे अत्याचार करण्यात महिलाही सामील असतात.”

राजस्थानातील अनेक अहवालांमध्ये लिंगभेदांमधील पुष्कळ अनिष्ट गोष्टी अनेकदा समोर आल्या आहेत. त्यात लिंग निवड, बालविवाह, हुंडाबळी, बुरखापद्धत, घरगुती हिंसाचार, विधवांबद्दलचा भेदाभेद या अनिष्ट प्रकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे विकल्प संस्थान असा समाज घडवण्यासाठी कटिबद्ध आहे, जेथे मुलगा असो वा मुलगी त्यांना समान हक्क, दर्जा प्राप्त होईल. या प्रश्नावर युवकांना चेतवण्यासाठी विकल्प संस्थानने एक चांगली पद्धत विकसित केली आहे. “आम्ही आमच्या सर्व कार्यक्रम आणि उपक्रमांमध्ये तरुणांना मोठ्या संख्येने सामील करुन घेतो. ज्याद्वारे महिलांचे प्रश्न समजावून घेऊन त्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोण तयार होतो. विकल्प संस्थानची ही ठाम धारणा आहे, की जोवर प्रत्येक घरांमध्ये असा बदल होणार नाही, तोवर तो समाजामध्येही प्रसृत होऊ शकत नाही.” योगेश विकल्प संस्थानची भूमिका अधिक स्पष्ट करुन सांगत होते.

विकल्प संस्थान त्यांच्या विभागामध्ये लिंगभेदाविरुद्ध अत्यंत प्रभावी अशी चळवळ राबवत आहे. “आमच्या मुलींचे अधिकार”, “आपल्या मुलींना शाळेत पाठवा”, “हसऱ्या मुली”, “आपण महिलांविरुद्धचा सर्व हिंसाचार संपवू शकतो” अशा अभियानांचा या चळवळीत समावेश आहे. विकल्पचा महिला हिंसाचारविरोधी लढा देखील वेगवेगळ्या स्वरुपात लढला जात आहे. सध्या आपल्या समाजात बलात्कार, स्त्रीभ्रूणहत्या, लिंग निवड, हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचार हे प्रकार प्रचंड वाढले आहेत. हे सगळे महिला अत्याचार थांबवणे आमच्या विकल्पचे ध्येय असल्याचे योगेश म्हणतात.

ते पुढे म्हणतात, “आमच्या सगळ्या सेंटर्समध्ये महिलांसाठी समुपदेशन आणि संरक्षण दिले जाते. महिलांना त्यांच्या संवैधानिक अधिकारांबद्दल जागरुक करण्याचेही काम आम्ही करतो. तसेच गरज पडल्यास त्यांना कायदेशीर मदत केली जाते, जेणे करुन ते अन्यायाविरुद्ध ठोस पावले उचलू शकतील. आमच्या सेंटरमध्ये स्वतःविषयी प्रेम आणि आदर निर्माण करण्याची शिकवणूक आम्ही त्यांना देतो.” योगेश मंदस्मित करत सांगत होते. “कोणत्याही प्रकारच्या छळाविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही त्यांना पाठबळ देतो. आणि एका फोन कॉलवर आम्ही त्यांच्यासाठी हजर असतो.”

युथ टास्क फोर्स

युथ टास्क फोर्स


आपल्या मुलींना शाळेत पाठवा

मुलींच्या शिक्षणाविषयी अत्यंत कळकळीने योगेश भूमिका मांडतात. “कुटुंबियांना मुलींनी शिकूच नये, असे वाटते. शिक्षणासाठी विनाकारण पैसे खर्च होतात, अशी त्यांची भावना असते. मुलींनी घरीच राहावे, असे त्यांना वाटत असते. तिने कुटुंबाची काळजी घ्यावी, एवढाच मुलीसाठी कुटुंबांचा विचार असतो. मुलींच्या शिक्षणासाठी हा अडथळा दूर करणे मोठे आव्हान आहे.”

विकल्प संस्थानकडून कुटुंबांना समजावून सांगताना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. शिकलेली मुलगी घराला स्थैर्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचबरोबरीने कुटुंबाचे आरोग्य जपण्यात आणि जागरुकता निर्माण करण्यातही शिकलेल्या मुलींचा मोलाचा सहभाग मिळतो. यासाठी विकल्पने खास उपक्रम देखील राबवले आहेत. त्यात “मुलींचे अधिकार”, “आपल्या मुलींना शाळेत पाठवा”, “हसऱ्या मुली” यांचा समावेश आहे. या उपक्रमांमध्ये स्थानिक शाळा, समुदाय आणि कुटुंबांनाही सहभागी करुन घेतले जाते. विकल्प संस्थानकडून शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या मुलींसाठी देखील विशेष नोंदणी कार्यक्रम राबवला जातो. ज्यातून मुलींना उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. या माध्यमातून आत्तापर्यंत विकल्प संस्थानने ५ हजार २०० मुलींचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली आहे. बालविवाहांची अत्यंत क्रूर अनिष्ट प्रथा विकल्प संस्थानला मोडून काढायची आहे. बालविवाह म्हणजे मुलींसह मुलांसाठीही धोकादायक आहेत. पण मुलींसाठी बालविवाहांचे दुष्परिणाम अधिकच संभवतात. बालविवाहांमुळे लहान मुली शिक्षणापासून दुरावतात, मानसिक वाढ खुंटते, अपत्यप्राप्ती लवकर झाल्याने मुलींच्या आरोग्यविषयक अनेक अन्य समस्या निर्माण होतात. बालविवाहांमुळे मुलींवर आर्थिकदृष्ट्या परावलंबित्व लादले जाते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसलेल्या या मुली नंतर घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरतात. विकल्प संस्थानने केलेल्या सामाजिक सर्व्हेक्षणानुसार मुलींना शिकवल्यानंतर बालविवाहासारख्या कुप्रथांना बळी पडण्याच्या मुलींच्या प्रमाणात कमालीची घट होते. “त्यामुळेच आम्ही आमची सगळी शक्ती, ऊर्जा मुलींना शिक्षणाचा अधिकार देण्याचा संदेश पसरवणाऱ्यावर खर्च करत आहोत”, विकल्पचे योगेश सांगत होते.

मुलींना शिक्षणाचा अधिकार

मुलींना शिक्षणाचा अधिकार


विकल्पच्या माध्यमातून आम्ही मुलींची, त्यांच्या पालकांची आणि शाळेच्या प्रशासनाचीही भेट घेत असतो. या माध्यमातून मुली शाळेत नियमित कशा जातील आणि माध्यमिक शिक्षणापर्यंत कशा पोहोचतील, याविषयी समुपदेशन करण्यावर संस्थेचा भर असतो. विकल्प संस्थानने आत्तापर्यंत बालविवाह होणाऱ्या ८७५ मुलींची सुटका केली आहे. या परिस्थितीत बदल घडवण्याचाच ध्यास विकल्पने घेतला आहे. कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी संस्थेचे तरुण कार्यकर्ते समाजाच्या सर्व स्तरांमध्ये कार्यरत आहेत. आमचे लक्ष्य तरुण वर्गाकडेच अधिक आहे. कारण ते बदल घडवून आणू शकतात. यासोबतच विविध धर्मांचे धर्मगुरु, विविध समाजांमधील ज्येष्ठ सदस्य, कुटुंबांमधील ज्येष्ठ सदस्य यांचीही मदत आम्ही या कार्यासाठी घेत आहोत. तसेच समाजात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि अन्य शासकीय अधिकाऱ्यांचीही आम्हाला मोलाची मदत मिळत आहे. या विषयाला अधिकाधिक वाचा फोडण्याचे काम या घटकांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. “विकल्प संस्थानकडून जनजागृतीसाठी पथनाट्य, विविध पोस्टर, जनजागृती शिबिरे, वार्तालाप कार्यक्रम, वर्कशॉप यांचे आयोजन मोठ्या स्तरावर केले जाते. आम्ही पूर्णपणे स्वतःला मन आणि आत्मा या विषयासाठी वाहून घेतले आहे”, असे विकल्प संस्थानचे योगेश वैष्णव यांनी शेवटी सांगितले. “उद्या नक्कीच बदल होईल या आशेने...”