संपादने
Marathi

मध्यमवर्गीय कुटूंबाच्या संघर्षातून उभारलेल्या, उद्यमी राजू जोशी यांच्या 'पाणी शुध्दीकरण' अभियानाची कहाणी!

भारतात मध्यमवर्गीय कुटूंबाचे जीवनच वेगळे आहे, या जीवनात संघर्ष आहे गरीबीपासून शक्य तितक्या दूर जाण्याचा आणि श्रीमंतीच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा! संघर्ष याच गोष्टींचा की, समस्या, अडचणी, दूर व्हाव्यात आणि सुख समाधान ऐश्वर्य आराम मिळावा. या कुटूंबाचे प्रमुख भारतात एकतर नोकरी करताना दिसतात किंवा मग छोटासा व्यापार. साधारणत: पहायला मिळते की यांची स्वप्ने खूप मोठीही नसतात आणि लहानही नसतात. बहुतांश आई-वडील आपल्या जीवनाची स्वप्ने मुलांच्या मार्फत पूर्ण करून घेण्याचे स्वप्न बघतात. त्यांना वाटते की जे आपल्या वाट्याला आले ते मुलांच्या जीवनात येवू नये त्यांनी सुखात जगावे. त्यामुळेच बहुतांश आई-बाप आपले सर्वस्व पणाला लावून मुलांना शिकवतात. मुलांनी सरळ धोपट मार्ग पकडावा, आव्हानाच्या नादी लागू नये असेही त्यांचे मत असते. ज्यात जोखीम असेल असे काम ते टाळायला सांगतात. परंतू हळुहळू या मध्यमवर्गीयांची विचारसरणी बदलत आहे. या कुटूंबातील नव्या दमाची पिढी चाकोरीच्या बाहेर काही करण्यासाठी आव्हाने घेण्यास तयार आणि सक्षम झाली आहे. समाजात अशी अनेक उदाहरणे दिसू लागली आहेत. या तरुणांमध्ये नवा जोश नवीन आशा आहेत. ते परंपरेच्या पासून वेगळे जावू इच्छितात. राजू जोशी हे त्यांच्याच पैकी एक आहेत ज्यानी चाकोरीच्या बाहेर जात यश मिळवले आणि नवा इतिहास लिहिला. या कहाणीत मध्यमवर्गीय समाजातील ती सारी लक्षणे आणि विशेषणे आहेत, त्या सा-या उठाठेवी आणि धावपळी आहेत ज्या मध्यमवर्गीय लोक करतात. पाणी टंचाईच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मोठी कामगिरी करणा-या तरुणांची ही कहाणी आहे. 

ARVIND YADAV
27th Jan 2017
2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on


१६ऑक्टोबर १९७१ मध्ये या कहाणीचा नायक राजू जोशी यांचा गुजराती कुटूंबात जन्म झाला. मुंबईत जन्मलेले त्यांचे वडील ज्ञानेश्वर जोशी सहकारी भांडारात काम करत होते. आई कोकीळा गृहिणी होत्या. त्यांना दोनच अपत्ये होती, राजू आणि त्यांची बहिण. त्यांचे पूर्वज पाकिस्तानातून आले होते. त्यांच्या आजोबांना भगवान जोशी यांना फाळणीच्या काळात भारतात यावे लागले. ते कराचीत राहात होते त्यावेळी त्यांना घर- दार, जमिन,संपत्ती सारे सोडून यावे लागले. इतर शरणार्थी प्रमाणे तेही मुंबईत आले आणि मरिनलाईन्स येथील छावणीत राहू लागले. येथे आल्यानंतरही त्यांनी भिक्षुकी सोडली नाही आणि पुजा पाठ व्रत संकल्प यात काम सुरु केले. घरातच त्यानी मंदीर तयार केले त्यामुळे लोकांचे येणे जाणे तेथे सुरू असे. त्यावेळी राजू चार वर्षाचे होते त्यांच्या आजोबांचे निधन झाले. त्यांचे वडील ठाण्यात फ्लॅटमध्ये राहू लागले आणि सहकारी भांडारात नोकरी करत होते. एका खास मुलाखती दरम्यान राजू जोशी यांनी सांगितले की, वडिलांचा पगार खूप नव्हता. भाड्याचा फ्लॅट नोकरीमुळे मिळाला होता मात्र त्याचे नियमित भाडे भरावेच लागत होते. दुसरीकडे मुलाचे शिक्षण, रोजच्या संसारिक गरजा पूर्ण करण्याचा खर्च यात भागत नव्हते. त्यामुळे वडिलांनी दोन बेडरूमच्या या घराला पोटभाडेकरु देवून खर्च भागविण्याचा प्रयत्न केला मात्र हेच भाडेकरू डोक्याचा ताप बनले. 


image


राजू यांना अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा त्यांच्या आईला घर चालविण्यात अडचणी येत असत. अनेक तडजोडी करत त्या घर चालवित होत्या. आणि मुलांना आणि पतीला याची झळ बसू नये याची खबरदारी घेत होत्या. दक्ष गृहिणी प्रमाणे त्या बचतीच्या माध्यमातून आणि विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घेत असत. मात्र मुलांच्यासाठी काही कमी पडणार नाही याची देखील काळजी घेत असत. दहावीपर्यंत राजू यांनी मुंबईच्या भारत इंग्लिश हायस्कूल मध्येच शिक्षण घेतले. त्यांच्या बहिणीलाही इंग्रजी माध्यमातुन शिक्षण दिले गेले. मध्यमवर्गिय कुटूंबाच्या सा-या अडचणी त्यांनी अनुभवल्या होत्या. ते म्हणतात, “ माझे जीवन इतर मुलांसारखे नव्हते. त्यांच्या सारखे आम्ही सिनेमा पाहू शकत नव्हतो. सुटीत फिरायला जावू शकत नव्हतो. कारण स्पष्ट होते घरात रोजच्या खर्चातून भागत नव्हते, त्यामुळे भोग विलास यांना थाराच नव्हता. गरीबी नसली तरी आर्थिक ओढग्रस्तीचे वातावरण नेहमीच असायचे. त्यामुळेच राजू यांना लहानवयातच पैश्याचे महत्व माहित झाले होते. त्यातच मदत व्हावी म्हणून ठेवलेल्या भाडेकरूनी अजुन समस्या निर्माण झाल्या. त्यांच्या वडिलांनी ज्या सिंधी माणसाच्या कुटूंबाला एक खोली भाड्याने दिली होती त्याने ती खाली करण्यासाठी ३५ हजारांची मागणी केली. त्यावेळी ही रक्कम मोठी होती. राजू यांच्या वडिलांकडे तेवढे पैसे देणे शक्यच नव्हते मग रोज भांडणे सुरु झाली. गोष्ट पोलिस ठाण्यात गेली. न्यायालयात गेली तेथेही राजूच्या वडिलांना दिलासा मिळालाच नाही. यातून सुटण्यासाठी त्यांना घर विकावे लागले. या घटनेचा राजू यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांना वाटले की सत्याचा पराभव झाला आहे. ज्या सिंधी माणसाला मदत म्हणून त्यांच्या वडिलांनी खोली दिली होती त्यांनीच त्यांच्याशी फसवेगिरी केली होती. आणि आता उलट त्यांनाच दंड भरावा लागत होता. यातूनच राजू यांनी मनात ठरविले की मोठे होवून इतका पैसा मिळवू की घरात असा कोणताच प्रसंग येवू शकणार नाही. शिकून मोठे होण्याचे स्वप्न ते पाहू लागले. श्रीमंत व्हायचे इतकेच मनात ठेवून ते शिक्षणात लक्ष देवू लागले.

नव्या घरात ते रहायला गेले ते एकाच खोलीचे घर होते. दहावी नंतर त्यांनी घाटकोपरच्या गुरुकूल टेक्निकल स्कूल मध्ये प्रवेश घेतला. त्यामागेही खास कारण होते. तेथे शिक्षण घेतले तर पाच गुण जास्तीचे मिळत असत. राजू यांना इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विशेष रुची होती त्यांनी हाच मुख्य विषय बनविला. त्यांनी सांगितले की त्यावेळी ‘इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू’ या नावाचे साप्ताहिक निघत असे. त्यात बाजारात येणा-या नवनविन गोष्टीची माहिती येत असे, त्याची किंमत २५ रुपये होती. त्यावेळी त्यांच्यासाठी ही रक्कम मोठी होती. त्यामुळे ते पाच रुपयांत ते मॅगेझीन सेकंडहॅण्डमध्ये विकत घेत असत. म्हणजे ते रद्दीत गेल्यावर त्यांना घेता येत असे. मात्र त्यातील माहितीने त्याच्या मनातील आवडीची इलेक्ट्रॉनिकच्या विश्वाची मोहीनी वाढत होती. त्यांनतर त्यांनी बॉम्बे इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेवून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातच डिप्लोमा मिळवला. दुस-याच दिवशी त्याना जीवनातील पहिली नोकरी मिळाली.


image


राजू यांची पहिली नोकरी ‘एस्सेल’ मध्ये होती, ज्याचे प्रमुख सध्याचे प्रसिध्द उद्योगपती सुभाषचंद्रा आहेत. एस्सेल मध्ये राजु यांना १२५० रुपये मासिक पगार होता. मात्र पहिलाच अनुभव असल्याने त्यांना खूप काही शिकायला मिळाले. सर्वात प्रथम राजू यांन समजले की त्याचे थेट वरिष्ठ जे होते त्यांनी संगीत शाखेतून पदवी घेतली आहे आणि त्यांनी तांत्रिक शिक्षण घेतलेल नाही. प्रदिप नावाच्या या वरिष्ठाना इतर सारे अभियंता रिपोर्ट करत तसेच राजू यांना करण्यास सांगण्यात आले. प्रदिप यांची कार्यशैली पाहुन राजू हेच शिकले की मोठे काम करण्यासाठी महाविद्यालयाच्या पदव्या नाही तर अनूभव आणि व्यवहारज्ञान असावे लागते, काॅमन सेंस ही सर्वात मोठी गोष्ट असते हे त्यांनी पाहिले, प्रदिप सुभाषचंद्रा यांचे निकटवर्ती होते. त्यांच्यामुळेच त्याना चंद्रा यांना भेटता आले. राजू सांगतात की ते तीनवेळा सुभाषचंद्रा यांना भेटले आणि त्यांचा साधेपणा आणि बारकाईने प्रत्येक गोष्टीवर असलेले लक्ष याने प्रभावित झाले. राजू यांना अजूनही आत्रवते की चंद्रा त्या काळी आपले स्वत:चे सॅटेलाईट चॅनेल सुरु करण्याच्या तयारीत होते. प्रदिप आणि राजू यांनीच त्यांच्या भावाकडे अशोक यांच्याकडे प्रसारीत होणारे सारे चॅनेल एका ठिकाणी बघण्याची व्यवस्था केली होती. प्रयत्न तर सुभाषचंद्रा यांच्या घरीच सारे चॅनेल पहाण्याची व्यवस्था करण्याचा होता, मात्र काही कारणाने तसे होवू शकले नाही मग त्याचे भाऊ अशोक यांच्या घरी ती व्यवस्था करण्यात आली. राजू यांच्या मते सुभाषचंद्रा यांनी बराच काळ संशोधन करून टिव्ही चँनेल सुरु केला होता. राजू यांना माहिती होते की चंद्रा यांच्या कंपनीला चांगले दिवस येतील मात्र ज्यावेळी दुस-या कंपनीने जास्त पगाराची नोकरी दिली त्यावेळी त्यांनी एस्सेल सोढली. राजू यांना कंपनीच्या बड्या अधिका-यांनी सोडून जाण्यास मनाई केली होती. मात्र दुसरीकडे चार हजार पगार होता, एस्सेल मध्ये तो वाढला असता तरी दोन हजारावर जावू शकला नसता. त्यामुळे त्यांनी मोदी झेरॉक्स मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि एस्सेल सोडली. राजू सांगतात की, “एस्सेल सोडली तरी सुभाषचंद्रा यांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी कायम होती. ते म्हणतात की त्यांनी तांदुळ विकण्याचा व्यवसाय करत सुरुवात केली होती हे मी ऐकले होते, त्यानंतर ते मोठे उद्योजक बनत गेले होते. त्यातून मला खूप प्रेरणा मिळाली.”


image


एस्सेल सोडण्याचे आणखी एक कारण होते, राजु यांचे वडील शेअरचा व्यवहार करत होते, त्यातून काही उत्पन्न होत होते. मात्र त्यावेळी झालेल्या हर्षद मेहता प्रकरणाने त्यांना नुकसान झाले होते. त्याचे प्रमाण खूप जास्त होते त्यामुळे सा-या कुटूंबावर त्याचा परिणाम झाला होता. सारे काही सुरळीत होत आहे असे वाटले असतानाच सारे काही पुन्हा एकदा संकटात होते. घरासाठी राजू यांना जास्त पैसे लागणार होते त्यामुळे त्यांना जास्त पगाराची नोकरी करणे भाग होते. १९९१ ते १९९३ दरम्यान एस्सेलचे काम केल्यावर राजू मोदी झेरॉक्स मध्ये सामिल झाले, त्यावेळी देखील त्यांना खूपकाही शिकायला मिळाले. ही विदेशी कंपनी होती आणि भारतीय कंपनीच्या मदतीने झेरॉक्स मशीन विकत होती. ही इतकी लोकप्रिय होती की लोक छायाप्रतीलाच झेरॉक्स कॉपी म्हणत होते, या कंपनीत काम करताना राजू यांचा संपर्क विदेशी तंत्रज्ञांशी आला. विदेशी तज्ञ वरचेवर देशात येवून प्रशिक्षण देत असत, शिवाय हे सारे प्रशिक्षण पंचतारांकीत हॉटेलात दिले जाई, त्यामुळे राजू यांना सा-या मुंबईतील पंचतारांकीत हॉटेल पहाण्याची आणि तेथे जेवणाची संधी मिळाली. मध्यमवर्गीय समाजातील तरुणांचे हे स्वप्न असते. मोदी झेरॉक्सची नोकरी चांगली होती. पगारही चांगला होता मात्र राजू यांना मेहनत करावी लागली. ते सेवा अभियंता होते आणि मशिन खराब झाल्याची माहिती मिळाली की त्यांना जावून ते दुरुस्त करावे लागे. त्यासाठी चाळीस किलो वजनाचे साहित्य सोबत न्यावे लागे, त्याकाळी त्यांच्या जवळ स्वत:चे वाहनही नव्हते त्यामुळे बस किंवा लोकलमधून ते जात असत. ह काम सोपे नव्हते, मात्र घरच्या गरजेसाठी त्यांना ते करावे लागत होते.

चार वर्ष ही नोकरी केल्यावर त्यांना ‘हेचसीएल’ मध्ये नोकरी मिळाली. तेथे त्यांना सात हजार पगार होता, त्यामुळे १९९७मध्ये त्यांनी तेथे जाण्याचे ठरविले. हा तो काळ होता ज्यावेळी देशात संगणक क्रांतीने जोर पकडण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक घर आणि कार्यालयात संगणक येवू लागला होता. त्यांची मागणी वाढत होती, हेचसीएल संगणक विकणारी कंपनी होती. मात्र राजू यांना खराब छायाप्रतीचे यंत्र दुरुस्त करण्याचे जुनेच काम देण्यात आले होते. त्यांच्यासारखेच अनेक अभियंता तेथे काम करत होते, त्याचवेळी कंपनीने मोठा निर्णय घेतला तोटा कमी करण्यासाठी त्यांनी विक्री विभागातील सा-या विक्री प्रतीनिधींना काढून टाकले आणि ती जबाबदारी सर्विस अभियंता यांना देण्यात आली. त्यामुळे राजू यांना सेल्स आणि मार्केटिंगच्या बाबी चांगल्या समजू लागल्या.


image


ते सांगतात की, “ हेचसीएलने मला विक्री शिकवली, एक उत्पादन कसे विकावे, हे मी शिकलो”. ही नोकरी त्यांच्यासाठी यश घेवून आली कारण ती लागल्यावर त्यांना लहान बहिणीचे लग्न करता आले. जे काही कमाविले ते तिच्या लग्नात त्यांनी खर्च केले. त्यांच्या नोकरीचा उद्देशही तसाच होता की चांगल्या घरात बहीणीला लग्न करुन द्यावे. आणि १९९८मध्ये तो योग जुळून आला.

त्यानंतर दोन वर्षात त्यांच्या जीवनात नवे वळण आले, त्यांना विदेशात जाण्याची संधी मिळाली. त्यांच्या मित्राने त्यांना ओमान येथे सुरु होणा-या एमएचडी कंपनीबाबत सांगितले, त्यांना फोटोकॉपी मशीनच्या अभियंताची गरज होती, राजू यांना तेथे तीस हजार रुपये महिना पगाराची नोकरी मिळाली. सुरुवातीला त्यांच्या आईने त्यांना दूर जाण्यास मनाई केली, मात्र त्यांनी जिद्दीने जाण्याचे ठरविले. ओमान येथे जावुन राजू यांनी विक्रीचेही काम केले, मात्र सुरुवातीला त्यांना भाषेचा प्रश्न होता. तेथील लोक अरबी भाषा बोलत होते त्यामुळे त्यांना सुरुवातीला समजून घेण्यास खूप त्रास झाला. मात्र त्यांनी मेहनत केली, अभ्यास केला आणि अरबी शिकले. ओमान मध्ये आल्यावर राजू यांना जीवन आता सुरळित झाल्याची जाणिव झाली बहिनीचे लग्न झाले होते चांगला पगार होता आई वडील खूश होते बचतही चांगली होती. अशावेळी त्यांनी नवे घर घेवून लग्न करण्याचे ठरविले. त्यांना वाटले की जेथे त्यांचे आई-वडील सुखाने राहतील असे मोठे घर हवे. राजू यांना या स्वप्नाच्या पूर्तीची प्रतिक्षा होती की त्यांना एक भयानक बातमी मिळाली. ती अशी की त्यांची आई पल्मोनरी फाइब्रोसीस नावाच्या रोगाची शिकार झाली आहे. यावर उपाय काहीच नव्हता. फुफ्फूसांच्या या विकाराला जर प्रतिकार केला नाही तर त्यांच्या आईचा जीव धोक्यात जाणार होता. आईवर त्यांचे प्रेम होते, त्यांना ही बातमी ऐकून दु:ख झाले ते उदास झाले, त्यामुळे नोकरी सोडून भारतात परत येण्याचा त्यांनी विचार केला. मुंबईत हिंदूजा रुग्णालयात त्यांनी आईला दाखल केले. पल्मेनोलॉजिस्ट डॉ महासूर यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू झाले आणि थोडा आराम पडण्यास सुरुवात ही झाली. काहीच दिवसांत त्यांच्या आईची तब्येत सुधारली. मात्र आईच्या उपचारात त्यांचा बराच पैसा खर्च झाला होता. त्यांची बचतही संपली होती. घर चालविणे आणि आईच्या उपचारांवर पुढचा खर्च करणे यासाठी त्यांना पैश्याची गरज होती. पुन्हा नोकरी करणे गरजेचे होते. यावेळी त्यांना सिंगापूरला रिको कंपनीत नोकरी मिळाली. राजू यांनी वर्षभर ती केली मात्र त्यांना पुन्हा भारतात परत यावे लागले. आईची तब्येत पुन्हा बिघडली होती वडील म्हातारे झाले होते त्यांना बघायला कुणी नव्हते, त्यामुळे चांगली नोकरी सोडून ते स्वदेशात परत आले होते. परत येवून ते शांत बसू शकत नव्हते, त्यांना नोकरी हवी होती. त्यामुळे त्यांना घर खर्च चालविता येणार होता लग्नाचे वय निघून जात होते त्यामुळे ती चिंता होती. चांगली पत्नी मिळण्यासाठी चांगली नोकरी मिळणे गरजेचे होते, त्यामुळे त्यांनी पुन्हा नोकरी शोधण्यास सुरुवात केली.


image


वृत्तपत्रात त्यानी वाचले केनस्टार कंपनीत मुलाखती होत्या, तेथे ते गेले कंपनीचे भारत प्रमुख मार्तंड पंडित यांनी त्यांची मुलाखत घेतली. राजू यांनी यापूर्वी ग्राहकपयोगी वस्तूच्या विक्रीचे काम केले नव्हते, मात्र केनस्टार याच क्षेत्रात काम करत होती. मार्तंड यांना वाटले नाही की राजू या नोकरीसाठी योग्य आहेत, मात्र नशिबाने त्यांना साथ दिली त्या दिवशी आणखी कुणी मुलाखतीला आलेच नाही, कुणाला तरी निवडावे लागत होते आणि राजू शिवाय कोणताच पर्याय नव्हता. अशा प्रकारे त्यांना नोकरी मिळाली. मात्र पूर्वीपेक्षा निम्म्या पगारात त्यांना काम करावे लागत होते, या नोकरीतून त्यांनी घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बाबत शिकून घेतले. वस्तू पाचशेची असो की पाच हजारची त्यानी तिच्या उत्पादनापासून विक्री पर्यंतची सारी बारीक माहिती घेतली. याच दरम्यान त्यांचे लग्नही झाले. आता घर पहायला एक व्यक्ती मिळाली होती. त्यांच्या पत्नीनेही घरच्या जबाबदा-या वखुबी निभावऩ्यात कसूर केली नाही. पतीला त्यांची साथ मिळाली.

याच दरम्यान अशी घटना घडली ज्याने राजू यांना कर्मचारी ते उद्यमी असे बदलून टाकले. घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेता कंपनी एलजी ला फ्रेंचाइजी हवी होती. राजू यांनी आपल्या स्वप्नांना साकारण्याचा नवा प्रयत्न केला. आपले केनस्टार मधील सहकारी महेंद्र भावसार यांच्या सोबत त्यानी फ्रेंचाईजी घेण्याची योजना बनविली. ती यशस्वी झाली. त्यांनी सिग्मा या नावाने कंपनी सुरु केली. २००४ मध्ये एलजी वातानुकूलीत यंत्राच्या फ्रेंचाइजीचे काम सुरु केले. त्यानंतर त्यांच्या जीवनाला गती मिळाली. त्यांनी वेगाने प्रगतीच्या रस्त्यावर पावले टाकली. एलजी नंतर त्यांना टाटा स्कायची फ्रेंचाइजी मिळाली. ती अशावेळी मिळाली होती की, डिटीएच म्हणजे डायरेक्ट टू होमची मागणी जोरात होती. टाटा स्कायमध्ये त्यांना खूप फायदा झाला. पुढे जावून त्यांनी एअरटेल डिटीएचची फ्रेंचाइजी घेतली. याच दरम्यान कंपनीने मोठ्या कामाची जबाबदारी त्यांना दिली. ती होती परिवहन आणि पारवाहन (ने- आण करताना)खराब झालेल्या वस्तूंना दुरुस्त करण्याची. या कामात राजू यांच्या कंपनीला खूप फायदा झाला.


image


देशात ज्यावेळी मोबाईल क्रांतीला सुरुवात झाली त्यावेळी राजू यांनी यावरही चांगली योजना तयार केली. त्यानी नोकिया फोनचे सर्विस सेंटर सुरु केले. त्यांना वाटू लागले होते की ते मोठे व्यावसायिक होत होते. कारण त्यांनी हाती घेतलेल्या सा-या कामात यश मिळवण्यास सुरुवात केली होती. सोबत विश्वासू भागीदार होता. त्यांनी पुन्हा छान स्वप्न रंगविली होती मात्र यावेळी पुन्हा त्यांच्या स्वप्नाला धक्का लागला होता. नोकिया सर्विस सेंटरचे उद्घाटन होणार होते त्याच दिवशी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. सकाळी उठून ते तयारीला लागले पाहतात तो वडील निपचीत पडले होते. त्यांना रुग्णालयात नेले, पण उशीर झाला होता. ह्रदयविकाराने त्यांना मृत्यू आला होता.

या घटनेने त्यांना हलवून टाकले. त्यांच्या सा-या स्वप्नांचे केंद्रबिंदू वडीलच होते. त्यांनी घरच्या साठी रात्रंदिवस मेहनत केली होती हे त्यांनी पाहिले होते. त्यांना आता काही काळ सुखात घालविता यावा यासाठी राजू त्यांना काही देवू शकत नव्हते. गुढीपाडव्याला वडिलांना ते नव्या मोठ्या घरात रहायला घेवून जाणार होते. मात्र ते तर कायमचे सोडून गेले होते. या घटनेचे त्यांना अतिव दु:ख झालेच मात्र त्यांच्या आईनेही खूप हाय खाल्ली. त्यांची प्रकृती खालावली. त्यातून त्या कधीच सावरू शकल्या नाहीत. आणि वर्षभरात त्यांचाही मृत्य़ू झाला. त्यामुळे राजू यांच्या मनावर मोठा आघात झाला. जीवनात निराशा आली, राजू यांच्या आईला निराशा येई त्यावेळी तिला ते गाणे गावून दाखवत होते, “ दु:खो की हार होगी अपने घर भी कार होगी” मात्र जेव्हा कार येण्याची वेळ आली त्याच वेळी ज्यांच्यासाठी ती येणार ते निघून गेले होते. या सा-या शोकात राजू इतके बुडाले की त्यांना काही काळ शुध्द राहिली नाही. ते डिप्रेशन मध्ये गेले. त्यांनी कार्यालयात जाणे बंद केले. काही काम करत नव्हते, सतत दु:खमग्न होते. त्यांची ही स्थिती पाहून त्याचे सहकारी घाबरले. त्यांना वाटले की सा-या कंपन्या अशाने बंद होतील. ते घरी जावून त्यांना विनवू लागले की कामाला सुरुवात करा. मात्र राजू आपल्यातच हरविले होते त्यांना आजूबाजूच्या गोष्टीचे भान राहिले नाही. दु:ख आणि परिक्षेच्या या समयी त्याचे भागीदार महेंद्र यानीच कंपनीला पुढे नेले, चालविले होते. आणखी एक मित्र रंजीत शेट्टी यांना राजू यांची ही स्थिती पाहवली नाही. त्यांनी कर्नाटकातील एका ज्योतिष आचार्यांची मदत घेतली. विशेष पुजा पाठ केले, राजू यांना उडपीला नेले, त्या नंतर हळुहळू त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली. संपूर्ण १८ महिने ते या शोकाकुल वातावरणात राहिले. स्वत:ला सांभाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा व्यवहारात लक्ष घातले. मात्र त्यावेळी नोकीयाची लोकप्रियता ढळू लागली होती. त्यामुळे स्थिती ओळखून राजू यांनी सँमसंगला आपल्या सोबत घेतले. त्यांच्या सेवा केंद्राचे परवाने मिळवले आणि कामकाज पुढे नेले.

त्याचवेळी त्यांना पाण्याचे शुध्दीकरण करण्याच्या प्रक्रिया उद्योगाची माहिती नागपूरच्या मित्राने दिली. त्यांनी त्याच्या अभि-अंश कंपनीला स्वत:ला जोडले, आणि या क्षेत्रात काम सुरु झाले. त्यांनतर त्यांनी या क्षेत्रातील बारकावे माहिती शिकून घेण्यास सुरुवात केली. त्याच्या वेगवेगळ्या पध्दती शिकताना त्यांना जाणवले की जगभरात पाणी टंचाई हा मोठा विषय आहे. जगभर लोक त्यामुळे त्रस्त आहेत. इतकेच नाही तर वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही समस्या वाढत जाणार आहे. जर पाण्याची बचत, योग्य वापर आणि फेरवापर केला नाहीतर या समस्येने मोठे प्रश्न निर्माण होणार आहेत. मग त्यांनी पाण्याच्या फेरवापर प्रक्रियांवर माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना माहिती मिळाली की जर्मनीच्या वाच नावाच्या कंपनीने या प्रकारच्या क्षेत्रात चांगले काम केले आहे. पर्यावरणाला नुकसान न करता ते पाणी फेरवापर योग्य करू शकतात. त्यांनी कंपनीला संपर्क केला. भारतात त्यांचे तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी मिळवली. राजू दावा करतात की ते जगातील सर्वात उत्तम शुध्दीकरण करणारे यंत्र त्यांच्याच कडे लावू शकतात. पाण्याशी संबधीत कोणताही प्रश्न त्यांच्या कंपनीच्या मार्फत सुटू शकतो. पाण्यात आयर्न, आर्सेनिक किंवा फ्लोरीन असेल तरी ते शुध्द करू शकतात. नाल्याचे घाण पाणी सुध्दा ते शुध्द पिण्याचे पाणी म्हणून देवू शकतात. त्यांची कंपनी ‘निक्सी इंजीनिअर्स’ने सिंगापूरच्या एसयूआय टेक्नॉलॉजी सोबत करार केला आहे. ज्यातून ते भारतात सिवरेज ट्रीटमेंट प्लांट सुरू करू शकतात. राजू यांनी सध्या भारतात पाणी शुध्दीकरणाच्या कामाला आपले मिशन बनविले आहे. त्यांना वाटते की या देशात सर्वात श्रेष्ठ तंत्राचा वापर केला जावा. त्यांना वाटते की प्रत्येक भारतीयाला शुध्द पिण्याचे पाणी देता यावे, त्यातून लोकांना स्वस्थ जीवन जगता यावे आणि आजारांना दूर ठेवता यावे.

राजू यांनी यापुढच्या काळात विमा क्षेत्रातही पावूल टाकले आहे, लवकरच ते उपभोक्ता वस्तूंच्या विमा क्षेत्रात काम सुरु करत आहेत. मात्र त्यांचे काम आणि व्यवहारांचा केंद्रबिंदू पाणी शुध्दीकरण हाच आहे. त्यांच्या जीवनाचे ध्येय हेच आहे की असे काहीतरी काम करावे ज्यामुळे लाखो लोकांचे भले व्हावे आणि नाव कमवावे. त्यांना जाणीव आहे की शुध्द पाण्याची टंचाई ही मोठीच समस्या आहे. आणि उद्योजक म्हणून त्यावर सोपा उपाय शोधून त्यांना त्यात मोठी सुविधा देवून नाव कमविता येवू शकते.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags

  Latest Stories

  आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा