संपादने
Marathi

गरीबांना स्वस्तात औषधं पुरवण्याचा ध्यास

Pravin M.
31st Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

इंग्रजीत एक म्हण आहे..'चॅरिटी बिगीन्स अॅट होम’..म्हणजेच समाजकार्याची सुरुवात आधी आपल्या घरापासूनच होते..आणि दिल्लीच्या विष्णुकुमार सुरेका यांना पाहिलं की याची पुरेपूर साक्ष पटते. ६५ वर्षांचे सुरेका दिल्लीतल्या ‘हेल्पलाईन फार्मसी’चे संस्थापक आहेत. त्यांचं एकच लक्ष्य आहे. कोणताही पेशंट, आजारी व्यक्तीला फक्त महागडी औषधं घेण्याची ऐपत नाही म्हणून जीव गमवावा लागू नये. ‘हेल्पलाईन फार्मसी’च्या माध्यमातून सुरेका गरीब आणि गरजूंना बाजारभावापेक्षा स्वस्त दरात औषधं देतात. २००३ मध्ये त्यांनी ‘हेल्पलाईन फार्मसी’ची सुरुवात केली. सुरुवात छोटीच होती, पण मानवतेच्या दृष्टीने ते एक मोठं पाऊल होतं. कालांतराने त्याची साक्ष पटत गेली. आज पहायला गेलं तर सुरेकांसारखी खूप कमी लोकं असतात, जी नफ्याच्या मागे न धावता मानवतेच्या सेवेचं अखंड व्रत घेऊन जगतायत.

विष्णुकुमार सुरेका एक मोठे उद्योगपती आहेत. ‘हेल्पलाईन फार्मसी’ अविरतपणे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या इतर व्यवसायांमधला पैसा ते ‘हेल्पलाईन फार्मसी’मध्ये गुंतवतात. आणि तेही कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता. त्यांचा हेतू अगदी स्पष्ट असतो. त्यांना जेवढं शक्य होईल तेवढी गरीब आणि गरजूंना मदत करावी. ‘हेल्पलाईन फार्मसी’ अशा लोकांची मदत करते, जे समाजाच्या अगदी शेवटच्या वर्गातून येतात आणि त्यांना महागडी जीवनावश्यक औषधं, सर्जिकल औषध सामग्री आणि इतर वस्तू खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या अशक्य असतं. अशा वस्तू ‘हेल्पलाईन फार्मसी’मध्ये अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिल्या जातात. दिल्लीच्या ग्रीन पार्क मेट्रो स्टेशनजवळ युसुफ सराय परिसरात ‘हेल्पलाईन फार्मसी’ आहे. तीन हजार स्क्वेअर फूट (चौरस फूट) एवढ्या भागात हे दुकान असून सुरेका यांनी हे दुकान भाड्यानं घेतलंय. ‘एम्स’ (AIIMS) आणि ‘सफदरजंग’ या देशातल्या दोन प्रसिद्ध आणि मोठ्या रूग्णालयांपासून ‘हेल्पलाईन फार्मसी’ अगदी हाकेच्या अंतरावर आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळेच ‘हेल्पलाईन फार्मसी’मध्ये नेहमीच गर्दी दिसून येते.

मानवता जगवण्याची अविरत धडपड...विष्णुकुमार सुरेका

मानवता जगवण्याची अविरत धडपड...विष्णुकुमार सुरेका


विष्णुकुमार सुरेका म्हणतात, “प्रत्येक व्यक्ती आयुष्यात नाव आणि पैसा कमावण्यासाठी एक तर नोकरी किंवा व्यवसाय करतो. त्यातून पुढे भरभराटीची त्याला अपेक्षा असते. नोकरी किंवा व्यवसायातून पैसा आणि नाव एकवेळ कमावता येऊ शकतं, पण तुमच्या आयुष्याचं ध्येय मात्र त्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचं ध्येय असतं, गरजू आणि पीडितांची मदत करणं. जगण्यासाठी पैसा तर लागतोच. कारण त्यातून तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तू खरेदी करू शकता. पण त्यातून तुमचं आयुष्याचं ध्येय पूर्ण होऊ शकत नाही. मलाही आयुष्याचं हेच उत्कट ध्येय पूर्ण करायचंय आणि त्यासाठीच मी इतरांची शक्य तेवढी मदत करतोय.”

दर महिन्याला दोन कोटींची विक्री

कोणतीही गरजू व्यक्ती डॉक्टरांची चिठ्ठी दाखवून ‘हेल्पलाईन फार्मसी’मधून स्वस्त दरात औषधं खरेदी करू शकते. सुरेका म्हणतात, “असं नाही की इथे फक्त गरिबांनाच औषधं विकली जातात. बरेच मोठ्या कुटुंबातले लोकही स्वस्त दरात औषधं खरेदी करतात. माझ्यामते जर आम्ही औषधविक्रीमधून एक रूपयाचाही नफा कमावला, तर मानवतेची सेवा करण्याची एक चांगली संधी आम्ही हातची गमावून बसू.” सुरेका ‘मौर्य उद्योग लिमिटेड’ कंपनीचे संचालक आहेत. त्यांचा टॉवेल उत्पादनाचाही व्यवसाय आहे. तसंच रिअल इस्टेट अर्थात जागा व्यवहाराचाही व्यवसाय ते करतात. या शिवाय घरगुती गॅसच्या उत्पादनाचं कामही त्यांची एक कंपनी करते. आणि ‘हेल्पलाईन फार्मसी’ चालवण्याचा सर्व खर्च ते या सर्व व्यवसायांमधून होणा-या नफ्यातून भागवतात. दर महिन्याला सुरेका ‘हेल्पलाईन फार्मसी’च्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रूपयांची औषधं आणि इतर औषध सामग्री विकतात. फार्मसी चालवण्यासाठी म्हणजेच वीज, भाडं. मेंटनन्स असा सर्व खर्च महिन्याला जातो ६ ते ७ लाखांच्या घरात. ही दोन कोटींची औषधं सुरेका ना नफा ना तोटा तत्वावर विकतात. म्हणजेच दुस-या शब्दांत सांगायचं झालं, तर फार्मसी चालवण्यासाठी येणारा ६ ते ७ लाखांचा खर्च सुरेका स्वत:च्या खिशातून खर्च करतात. मोठमोठ्या औषध कंपन्यांकडून ठोक किंमतीत औषध खरेदी करून शक्य तितक्या स्वस्त दरात औषधं विकली जातात. त्यांच्या याच कामातून उभी राहिलेली सुरेका पब्लिक ट्रस्ट औषधांसोबतच गरीब आणि गरजूंसाठी अर्थसहाय्यही करते.

'हेल्पलाईन फार्मसी'..गरीब रूग्णांसाठी जीवनदान !

'हेल्पलाईन फार्मसी'..गरीब रूग्णांसाठी जीवनदान !


‘सुरेका पब्लिक ट्रस्ट’चं काम इतक्यावरच थांबत नाही. स्वस्त औषधांसोबतच मोफत निवासाची सोयही ट्रस्टकडून केली जाते. ‘एम्स’ आणि ‘सफदरजंग’ या दोन हॉस्पिटलपासून जवळच २०० खोल्यांची रहायची व्यवस्था करण्यात आली आहे. गरीब रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रहाण्याची सोय इथे होऊ शकते. याच ठिकाणी एक मोफत कँटीनही संस्थेकडून चालवण्यात येतं. या कँटिनमध्येही मोफत/स्वस्त दरात रोज जवळपास पाचशे लोकांना दोन वेळचं जेवण दिलं जातं. एवढंच नाही तर तब्बल तीनशे स्वयंसेवी संस्था(एनजीओ) आणि सरकारी रूग्णालयांनाही संस्थेकडून मदत केली जाते. या एनजीओंना मोफत किंवा स्वस्त दरात औषध सामग्री पुरवली जाते. यामागचा हेतू एकच असतो, की समाजातल्या गरीब वर्गापर्यंत ही मदत योग्य पद्धतीने पोहोचवली जावी. सुरेका सांगतात, “हेल्पलाईन फार्मसी चालवण्याचा सगळा खर्च आम्ही स्वत: करतो. आमच्या इतर व्यवसायांमधून मिळणारा नफा आम्ही यात लावतो. इतर कोणत्याही संस्था, परदेशी नागरिक किंवा सरकारी संस्थांकडून आम्ही आर्थिक मदत घेत नाही.”

दिल्लीतल्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेका यांनी घरच्या व्यवसायाचीच निवड केली. सुरेका यांच्या घरची पार्श्वभूमी व्यावसायिक स्वरूपाची असल्यामुळे त्यांच्या घरची प्रत्येक व्यक्ती ही व्यवसायाशी निगडित आहे. त्यांच्या कुटुंबातली एकही व्यक्ती घरी बसून रहात नाही. ते सुरेका यांना त्यांच्या व्यवसायात मदत करतात आणि त्याचबरोबर ‘सुरेका पब्लिक ट्रस्ट’चं कामही पहातात.

कशी झाली ‘सुरेका पब्लिक ट्रस्ट’ची सुरुवात?

‘सुरेका पब्लिक ट्रस्ट’ची सुरुवात नक्की कशी झाली याविषयीही सुरेका सांगतात. एकदा सुरेका त्यांच्या वडिलांसोबत औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेले. त्यांनी बघितलं की प्रत्येक कंपनीच्या औषधाची किंमत वेगवेगळी आहे. अनेक जीवनावश्यक औषधांच्या किंमतींवर दुकानदार खूप जास्त नफा कमावत आहेत. त्यांच्या मनात विचार आला की जर नफा न कमावता औषधं विकली तर कित्येक गरजू आणि गरिबांना मदत होईल. आणि याच विचाराचं रूपांतर पुढे ‘हेल्पलाईन फार्मसी’मध्ये झालं. खरंतर ‘सुरेका पब्लिक ट्रस्ट’चं काम १९६५मध्येच सुरु झालं होतं. तेव्हापासूनच ट्रस्ट गरीबांसाठी काम करत होतं. मात्र व्यापक स्वरूपात कामाला सुरुवात झाली ती २००३ मध्ये. आज ‘हेल्पलाईन फार्मसी’ रोज जवळपास १४ लाख रूपयांची औषधं फक्त ७ लाख रूपयांना विकते. याचाच अर्थ असा की दररोज समाजातले गरीब तब्बल ७ लाख रूपयांची बचत करतायत !

प्रत्येक शहरात स्वस्त औषधांची व्यवस्था

सुरेका सांगतात की समाजाची मनोभावे सेवा करण्याचं एक मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकतात. ‘एम्स’च्या आतमध्येही ‘हेल्पलाईन फार्मसी’ सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. जेणेकरून ‘एम्स’मध्ये देशाच्या कानाकोप-यातून उपचारांसाठी दाखल होणा-या रूग्णांना कमीत कमी किंमतींमध्ये औषधं उपलब्ध होऊ शकतील. सुरेका म्हणतात की फक्त दिल्लीच नाही तर देशातल्या प्रत्येक शहरात अशा प्रकारची स्वस्त औषधं देणारी दुकानं असावीत, ज्याचा थेट लाभ समाजातल्या गरीब आणि गरजूंना होईल. याची सुरुवात सुरेकांनी आधीच केली आहे. दिल्लीप्रमाणेच त्यांनी मथुरा आणि बनारसमध्येही अशाच प्रकारची दोन दुकानं सुरु केली आहेत. त्यांच्यामते यामुळे मथुरा आणि बनारसमधल्या हजारो गरजू रूग्णांना स्वस्त दरात आणि वेळेवर औषधोपचार मिळणं शक्य होऊ शकलं आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags