संपादने
Marathi

कचरा वेचणाऱ्या सरूताईंनी कवितांच्या माधमातून मांडल्या कष्टकऱ्यांच्या व्यथा

23rd Feb 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

कचरा वेचणाऱ्या सरूताईंच्या कवितेतून प्रकट होतात कष्टकऱ्यांच्या व्यथा

आम्ही तुम्हाला हो निवडून दिलं, सांगा तुम्ही हो काय काय केलं,

भलतीच वेगळी सुधारणा सगळी, सगळाच कारभार काळा,

अंगात खादी, सत्तेची धुंदी, अंधार गावात सारा,

राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी ही कविता एखाद्या उत्तम कवीने केली असावी असं तुम्हाला वाटेल, कविता सरू वाघमारे या पुणे शहरातील कचरा उचलणाऱ्या एका महिलेने केली आहे. यावर पटकन कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. एकही इयत्ता न शिकलेल्या सरू ताई उत्तम कविता करतात.

सरू वाघमारे पुण्यातील कागद, काच, पत्रा वेचणारी एक महिला पण तरीही दारूबंदी, हुंडाबळी, महागाई, भ्रष्टाचार अशा विषयांवर अतिशय मार्मिक कविता करतात. सरू ताई पुण्यातील राजीव गांधी वसाहतीत राहतात. त्यांचं लहानपण याच वस्तीत गेलं. त्यांची आई आणि आजी कचरा वेचायच्या. घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने त्यांना शिक्षण घेता आलं नाही. वयाच्या १३ व्या वर्षापासून सरुताई कचरा वेचायला लागल्या. कचरा वेचणे म्हणजे कचरा कुंडीतील कचऱ्यातील कागद, काच, प्लास्टिक आणि लोखंडाच्या वस्तू या वेगळ्या करायच्या आणि त्या भंगारवाल्याला विकायच्या. त्याच्या विक्रीतून जे पैसे मिळतील त्यातून उदरनिर्वाह करायचा.

image


सरू ताईंचं शिक्षण झालं नसल्याने कचरा वेचण्याचं काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. १९९३ मध्ये बाबा आढावांच्या कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत या संघटनेमध्ये त्या सहभागी झाल्या. संघटनेमध्ये त्यांना विविध स्पुर्ती गीतं ऐकायला मिळाली आणि मग त्यांनाही आपणही अशा गीतांची रचना करावी असं वाटायला लागलं.

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीमध्ये जायला सुरवात झाल्यावर त्यांना दारूबंदी, हुंडाबळी या गोष्टी समजायला लागल्या. सरू ताईंनी पहिली कविता केली ती दारूबंदी वर केली.

" कवा माझ्या नवऱ्याची दारू सुटेल, दारू साठी नवरा मेलेला उठेल."

ही त्यांची पहिली कविता. दारूसाठी नवरे कसे बायकांना मारहाण करतात. पैसे हिसकावून घेतात याचं वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलं आहे.

image


पण दारू बंदी वर कविता करून त्या थांबल्या नाहीत. तर पंचायती मधील इतर महिला सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी पुण्यातील दांडेकर पूल, जनवादी, वडार वाडी आणि त्या राहतात त्या राजीव गांधी वसाहत या भागात पण त्यांनी दारू बंदी केली. त्यांच्या वसाहती मधील दारूच्या गुत्त्यावरील मोठे मोठे दारूचे पिंप पकडून ते पोलिस चौकीत घेऊन गेल्या. पण पोलिस त्यांची दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे सरुताई आणि इतर महिलांनी पोलिस चौकी बाहेर धरणं आंदोलन सुरु केलं. तेव्हा पोलिसांनी उलट या महिलांच्या विरोधात तक्रार करून त्यांना अटक केली. ज्यावेळी त्यांना न्यायालयात हजार केलं तेव्हा सरूताईंनी न्यायाधीशांसमोर वस्तीतील महिलांच्या समस्या धैर्याने मांडल्या.

दारूबंदी नंतर सरू ताईंनी हुंडा बळी या प्रथेवर कविता केली, " हा गं हुंड्याचा जावई लागला पोरीला बडवायला" कर्ज काढून मुलीचं लग्न करून दिलं पण लग्नाला एक महिना झाला नाही तर जावई मुलीला मारायला लागला अशा आशयाची ही कविता आहे.

सरूताई अशिक्षित असल्याने त्यांना तेव्हा कविता लिहून ठेवणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांचे पती आणि मुलगा यांच्या मदतीने सुचेल तशी कविता लिहून ठेवायच्या. कविता लिहून पूर्ण झाली की, त्या ती कविता चालीत बसवायचा प्रयत्न करायच्या. अशा एक एक कविता करत त्यांनी कवितांचं शतक पूर्ण केलं. त्या सगळ्या कविता त्यांनी त्यांच्या मुलाच्या मदतीने एका वहीत लिहून ठेवल्या होत्या. पण पुण्यात २००७ साली मुठा नदीला आलेल्या पुरात सरू ताईंच्या कवितांची वही वाहून गेली. पण त्यांनी केलेल्या सगळ्या कविता त्यांना पाठ आहेत. त्यामुळे आजही त्या सगळ्या कविता तोंडपाठ म्हणून दाखवतात. १९९७ ला सरूताई राहतात त्या वसाहतीमध्ये प्रौढ शिक्षण वर्ग सुरु झाला. सरू ताई आणि त्यांच्या इतर सहकारी या दिवसभर काम करायच्या आणि रात्री प्रौढ शिक्षण वर्गात जाऊन शिकायच्या. या वर्गामुळे त्या वाचायला शिकल्या आणि त्यांची सही करायला शिकल्या. पण त्यांना फारसं लिहिता येत नाही. त्यामुळे कविता लेखनासाठी त्यांना त्यांच्या मुलाची मदत घ्यावी लागते.

बचतगटाचं महत्त्व कळल्यावर त्यांनी बचत गटही सुरु केला. बचत गटाचं महत्त्व महिलांना समजावं यासाठी त्यांनी बचत गटावर कविता केली.

"आया बायांनो बचत आपली करा ग पुस्तक काढून बँकेत पैसे भरा ग."

नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या त्या आता स्वच्छता सेवक झाल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांमध्ये जाऊन त्या ओला आणि सुका कचरा गोळा करतात. या कामासाठी सरकारने त्यांना कचरा उचलायला गाडी दिली आहे याचा त्यांना समाधान आहे. पण नागरिक अजूनही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देत नाहीत याची मात्र त्यांना खंत वाटते.

सरू वाघमारे यांच्या कवितांची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. सामाजिक पुरस्कार, उर्जा पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार, उत्कृष्ट माता असे सुमारे १५ पुरस्काराने सरू ताईंचा सन्मान करण्यात आला आहे.  अमीर खान च्या सत्यमेव जयते ह्या कार्यक्रमात देखील सरुताईंच्या कार्याची दखल घेण्यात आली.

सरू वाघमारे यांनी भारताच्या स्वच्छता दूत म्हणून विविध देशांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांना थायलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, अमेरिका इत्यादी देशांत जाण्याची संधी त्यांना मिळाली. या देशांमधील कचरा उचलण्याची आणि तो वेगळा करण्याची तसंच कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते याची माहिती त्यांनी घेतली. तसंच परदेशातील मशिनच्या माध्यमातून कचरा वेगळा करण्याची पद्धत भारतात यावी असं त्यांना वाटतं.

सरू वाघमारे यांनी अशिक्षित असूनही कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या अनेक कविता केल्या. त्यांच्या या कवितांचा ठेवा पुस्तक रूपाने जपला जावा अशी त्यांची इच्छा आहे. 

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा :

दुष्काळी भागात हरितक्रांती घडवणारा महापुरुष : सिमोन उराव

‘कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला’? मुंबईच्या रस्त्यावरच्या कलादालनात कलावंताची ‘चित्तरकथा’!

मॅथ्यूसरांच्या ‘मॅजिक बस’मधून झोपडपट्टीतील मुले ‘कॉर्पोरेट’ला

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags