संपादने
Marathi

सर्व अडचणींवर मात करत अंध सिद्धूची कमाल, ९९ कोटीपर्यंत पाढे तोंडपाठ, आता तयारी आयएएसची...

Team YS Marathi
24th Apr 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

ही व्यक्ती त्याची जीवनकथा सांगत होती आणि मी अक्षरशः भारावून जात होते. त्याची कथा ऐकल्यावर अपंगत्वाकडे पाहायचा माझा दृष्टीकोन बदलला. म्हणजे बघा तुम्ही ईशान्य भारतातल्या एका जंगलात आहात आणि तुम्हाला स्थानिक भाषेचं ज्ञान नाही. भाषांतर करणारही कोणी सोबत नाही, अशावेळी तुमची अवस्था बोलता येत असूनही मुक्यासारखीच होईल ना... किंवा एखाद्या मनुष्याला ती भाषा येते, मात्र तो मुका आहे.

अपंगत्व हे व्यक्तीगणिक बदलतं. पंचेंद्रियांच्या कार्यक्षमतेवरच अपंगत्वाची व्याख्या अवलंबून असता कामा नये, तर त्यांचा उपयोग किती प्रमाणात होत आहे हेही तितकचं महत्त्वाचं आहे. ही व्याख्या आणखीन विस्तारित केली तर सिद्धू लोउटे हा आपल्यापेक्षा कितीतरी सक्षम असल्याचं लक्षात येईल. जन्मतः त्याच्यात काही गोष्टींची कमतरता होती. त्याने त्याला अवगत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत एवढं प्राविण्य मिळवलं की, सुपरह्युमन बनण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू आहे असं म्हटल्यास त्यात काही वावगं ठरणार नाही. जन्मतः पूर्णतः अंध, त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षी कुटुंबाने त्याला घराबाहेर काढलं. नातेवाईकांचा ठावठिकाणा नसल्याने बेघर, अन्नासाठी कायम करावी लागणारी वणवण... अंगावर शहारे आणणारी ही कहाणी आहे, ३१ वर्षांच्या सिद्धूची. या सर्व परिस्थितीशी लढा देत सिद्धूने स्वतःला 'ह्यूमन कॅलक्यूलेटर' मध्ये परावर्तित केलं आहे. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सिद्धूला आता आयएएस बनण्याची इच्छा आहे. त्याकरता त्याने प्रयत्न सुरू केले आहेत. याकरता त्याला आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.

सिद्धूची ही सर्व कथा, वाटचाल आणि त्याच ध्येय आपण आता त्याच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊयात...

image


मी जन्मापासून अंध आहे. कुटुंबावर आणि समाजावर ओझं समजून माझ्या कुटुंबानेच मला झिडकारलं. माझा त्यांना काही उपयोग नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी मला हुबळीतल्या एका सरकारी वसतीगृहात आणून सोडलं.

मला कोणाचाही पाठींबा नव्हता. शाळेत मला कोणी मित्रमैत्रिणी नव्हते. कोणी मला त्यांच्यासोबत खेळायला घ्यायचं नाही. त्यामुळे खेळ शिकवण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण शाळेत मला एका मुलाबाबत कळलं. सातवीत शिकणाऱ्या या मुलाला शंभरापर्यंतचे पाढे तोंडपाठ होते. शाळेत त्याचं खूप कौतुक केलं जायचं. तो सर्वांचाच लाडका होता. मला त्याच्यासारखं बनावं असं वाटू लागलं. कारण मी सर्वांचा नावडता होतो. माझ्याकडे कोणाचचं लक्ष नसायचं. कोणी माझ्याशी बोलायचं नाही. मी पूर्ण वर्षभर पाढेच पाठत करत बसलो. सर्वांना वाटायचं की, मी वर्गात तास सुरू असताना झोपा काढतोयं. त्यामुळे मला शिक्षक शिक्षा करत राहायचे. पण मला माझीच खात्री नसल्यामुळे, मी काय करत आहे हे शिक्षकांना मला सांगता येत नव्हतं. अखेर तो क्षण आला. मी आता तयार होतो... मी फक्त दुसरीत होतो आणि ५६ लाखापर्यंत पाढे शिकलो.

वर्गात आम्हांला दहा पर्यंतचे पाढे म्हणून दाखवायचे होते. मला काहीही म्हणता येणार नाही अशी शिक्षकांची खात्रीच होती. मी त्यांच्या टेबलाजवळ पोहचल्यावर ते मला म्हणाले, "तुला जर पाढे नीट म्हणता नाही आले, तर तुला शाळेबाहेर जावं लागलं". कारण त्यांच्याकरता मी शाळेवर एक ओझं होतो.

मी हसून त्यांना म्हटलं, तुम्ही फक्त १० पर्यंतचेच काय ५६ लाखापर्यंत कोणताही पाढा विचारा. शिक्षकांचा त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्यांनी मला ३९,९७६ चा पाढा विचारला आणि मी तो अचूक सांगितला. इतर विषयांमध्येही मी चांगली प्रगती केली. त्यामुळे माझ्यात काहीतरी वेगळी बुद्धीमत्ता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

पण मग केवळ शाळेला पारितोषिकं मिळवण्याकरता शाळेनं माझा वापर करुन घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी बौद्धिक चाचण्यांकरता मला शाळा पाठवायची. बक्षिस समारंभात प्रमुख पाहुण्यांदेखत मला मिरवायचे. पण पाहुणे गेल्यावर माझ्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. मी मिळवलेल्या पारितोषिकांची रक्कमही शिक्षकच खायचे. माझ्या हातात काही पडायचं नाही. माझ्यामुळे शाळेला १५-२० लाखांचा फायदा झाला असेल. पण माझ्या तोंडाला मात्र शाळेने पानं पुसली.

ही शाळा फक्त सातवीपर्यंत होती. त्यामुळे सातवीनंतर मला तिथून बाहेर पडावं लागलं. माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. कोणाचा आधार नाही. राहायला आसरा नाही. अशा परिस्थितीत पोट भरण्याकरता भीक मागण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. बेळगावला हायस्कूलमध्ये दाखल होईपर्यंत दोन महिने असे काढले. 

या शाळेतही काही फारसं वेगळं वातावरण नव्हतं. माझ्या बुद्धीमत्तेने मी इथल्या सर्व हुशार विद्यार्थ्यांना मागे टाकलं. परिणामी ते माझा तिरस्कार करू लागले. या सर्व वर्षात मी खूप प्रमाणपत्र मिळवली. पण माझा तिरस्कार करणाऱ्यांनी ती प्रमाणपत्रच नष्ट केली. एवढं सगळं सोसूनही मी दहावीत ८५ टक्के गुण मिळवले.

पुढे काय?

दहावीनंतर परत अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला. मी पुन्हा भीक मागायला सुरूवात केली. पण माझ्यातली शिक्षणाची आस शाबूत होती. माझ्याकडे कर्नाटक सरकारचा बस पास असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी एका शुक्रवारी बँगलोरमध्ये येऊन पोहचलो. पण मला ज्या कॉम्प्युटर इंस्टिट्यूटमध्ये जायचं होतं ते संपामुळे बंद होतं. काही वृत्तपत्र घेऊन मी बसस्टँडवरच माझी पथारी पसरली. भूक लागल्यावर परत भीक मागू लागलो. अखेर सोमवारी मी त्या इंस्टिट्यूटमध्ये गेलो. तिथं असणाऱ्या ट्रेनरला व्यवस्थित कन्नड येत होतं तरीही ती माझी इंग्रजीत माहिती विचारत होती. मला तिला व्यवस्थित उत्तर देता आली नाहीत, त्यामुळे ती माझ्यावर जाम वैतागली. या अपमानानंतर मी तिला १५ दिवसांनी परत येऊन तिला येणाऱ्या भाषेत तिच्याशी संवाद साधेन असं आव्हानच दिलं. 

मी एक इंग्लिश स्पिकिंग क्लासमध्ये जाऊ लागलो. शब्दसंग्रह वाढवण्याकरता भेटणाऱ्या प्रत्येकाशी मी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करायचो. एकदा मला क्लासमध्ये पोहचायला उशीर झाला. मी आत येऊ का? त्या महिलेला इंग्रजीत विचारलं. तिनं आश्चर्यानं मला विचारलं, अरे वा सिद्धू तू तर इंग्रजी बोलायला लागला. मी म्हटलं, थँक यू. तुमच्यामुळे हे झालं.

image


आज मी इंग्रजीचे क्रॅश कोर्स शिकवतो

बेंगळुरूत विश्व चेतना महाविद्यालयात जाण्यापूर्वी मी दोन महिने भीक मागून कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलं. मला वसतीगृहात राहायला मिळालं नाही. नशिबानं माझ्याकडे बस पास होता. मी लेक्चर झाल्यावर हुबळीला जाणारी बस पकडायचो. रात्रभर दहा तास मस्त झोप काढायचो. हुबळीला काहीतरी खायचो मग परत बस पकडून बेंगळुरूला परत यायचो. पण यामुळे कॉलेजमध्ये माझी हजेरी कमी भरु लागली. मी पास व्हायची शक्यता कमी असल्याचं सांगितलं.

मी म्हटलं, माझ्या डिक्शनरीत अशक्य हा शब्द नाहीये. मी परिक्षेच्या सहा दिवस आधी अभ्यासाला सुरूवात केली आणि ६५ टक्के गुण मिळवले. आयएएस बनण्याची माझी इच्छा आहे. आयएएस बनून मला समाजातल्या दुर्लक्षित घटकांकरता काम करायचं आहे. हे सर्व करत असताना मी ९९ कोटीपर्यंतचे पाढे पाठ केले. मी ही सर्व माहिती कुठे साचवतो याचं सगळ्यांना आश्चर्य वाटतं. पण माझी एक वेगळी पद्धत आहे. मी गुणाकार करून चटकन उत्तर सांगतो.

शंकुतलादेवी आणि माझ्यात एक फरक आहे. अंकांची मोजदाद करण्याकरता त्यांना फळ्यावर आकडेमोड लिहावी लागते. तर मी हे सर्व तोंडी करतो. मला ४५ हजार दूरध्वनी क्रमांक पाठ आहेत. तुम्ही पुढील पाच वर्षातली कोणतीही तारीख सांगा, मी वार सांगतो...

मी काही स्थानिक चॅनेलवर अँकरिंगही करतो. बहुदा एखादी अंध व्यक्ती टिव्हीवर कार्यक्रम सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे, सिद्धू स्विच.

मी सध्या कायद्याचा अभ्यास करतोय आणि ग्रहताऱ्यांविषयीही माहिती देतो. विश्वास गमावलेल्या लोकांचं मी समुपदेशन करतो. कायद्याचा अभ्यास पूर्ण झाल्यावर मला दिल्लीला जायचयं. तिथं जाऊन आयएएसच्या अभ्यासाकरता तयारी करायची. क्लासला जायचयं. पण याकरता मला आर्थिक मदतीची गरज आहे.

माझं ध्येय आणि विचारांचा आवाका खूप मोठा आहे. मला या सगळ्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करून यश मिळावायचयं. सामान्य व्यक्ती लवकर वाचून लिखाण करून अभ्यास करू शकतात. पण मला याकरता थोडा अधिक वेळ लागतो. सध्या मी इतरांच्या मदतीने लिहितो आणि वाचतो. मला कोणावरही अवलंबून न राहता अभ्यास करता येईल अशा उपकरणाची गरज आहे. मी त्याकरता पैसे जमा करत आहे. मला ब्रेल प्रिंटर किंवा टाईपराईटरचीही गरज आहे. मला कोणाची सहानुभूती नाही तर संधी हवी आहे. जेणेकरून मी माझ्या देशाकरता काहीतरी करू शकेन.

आपण सगळेजण मिळून देशातल्या दुर्लक्षित घटकांकरता काम करूयात.

लोकांच्या सहकार्याने सध्या सिद्धू त्याला अभ्यासाकरता आवश्यक असणारे दीड लाख रुपयांचे विशेष उपकरण घेण्याकरता निधी जमवतोय. आपणही सढळ हस्ताने त्याला मदत करावी. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे

बेघर झालेला मुलगा झाला उद्योजक, लेखक त्याव्यतिरिक्त रस्त्यावर राहणा-या मुलांना करत आहे मदत...!

समाजाच्या कटू वाक्यांनी बदलले आयुष्य, आज दोनशे मुलांसाठी ‘आई’ आहेत सविता... 

लेखिका - बिंजल शाह

अनुवाद - साधना तिप्पनाकजे

 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags