संपादने
Marathi

विमान अपघातात गमावलेल्या संघाला विजयाचा पूर्ववत बहर आणणारा फुटबॉलचा विश्वकर्मा सर मॅट बस्बी

Chandrakant Yadav
7th Oct 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

तीन तपांहून अधिक म्हणजेच तीस वर्षांहून जास्त काळापर्यंत अवघे फुटबॉल विश्व ज्यांना ‘बॉस’ म्हणून ओळखायचे असे सर मॅट बस्बी आज हयात असते तर त्यांनी नक्कीच शंभरी गाठलेली राहिली असती. लब्धप्रतिष्ठित मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबची धुरा यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या मॅट बस्बी यांची बरोबरी अनेक बाबतीत आजतागायत कुणीही करू शकलेले नाही. मॅट बस्बी यांचे नाव निघताच आजही हॅट डोक्यावरून निघतेच! बस्बी यांना अवघे फुटबॉल जगत आजही सलाम ठोकतेच!


प्रवाहाविरुद्ध निर्णय घेणारा धुरंधर म्हणून एकूणच क्रीडा जगतात बस्बी यांची ओळख आहे. प्रस्थापित आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंवर मोठी रक्कम खर्च करून असेच खेळाडू आपल्या संघात असावेत म्हणून इतर क्लब जेव्हा जिवाचे रान करीत असत, तेव्हा बस्बी यांनी आपल्या क्लबच्या माध्यमातून नव्या दमाच्या खेळाडूंवर डाव खेळले आणि अशा खेळाडूंच्या जिवावर मातब्बर खेळाडूंच्या संघांना धूळ चारली. सामने जिंकले. बिल फोल्क्स, लियाम व्हेलन, डंकन एडवर्डस्, बॉबी कार्लटनसारख्या पुढे जाऊन फुटबॉल जगतात दरारा निर्माण करणाऱ्या कितीतरी खेळाडूंना बस्बी यांनीच पहिली संधी बहाल केली होती.

सर अलेक्स यांच्यासह सर मॅट बस्बी (उजवीकडले).

सर अलेक्स यांच्यासह सर मॅट बस्बी (उजवीकडले).क्रीडा इतिहासात आजही या सगळ्या खेळाडूंना ‘द बस्बी बेब्स’ (बस्बीचे बगलबच्चे) म्हणून ओळखले जाते. बस्बी यांच्या याच बेब्स टीमने १९५६ आणि १९५७ अशी सलग दोन वेळा लीग चँपियनशिप स्पर्धा जिंकली होती. बस्बी यांचे प्रोत्साहन आणि प्रेरणा हाच या दोन्ही विजयांचा आधार होता. १९५७ मध्येच प्रतिष्ठेच्या एफए कप स्पर्धेत हा संघ उपविजेता ठरला होता.

१९५६ मध्ये जेव्हा ‘बस्बी बेब्स’ संघाने म्हणजेच मँचेस्टर युनायटेडने लीग चँपियनशिप जिंकली होती, तेव्हाच त्या काळात सर्वाधिक नाव असलेल्या रिअल माद्रिद संघाने बस्बी यांना व्यवस्थापकपदाची ऑफर दिली होती. बक्कळ पैसाही देऊ केलेला होता, पण बस्बी यांनी ही ऑफर नाकारली. ‘मँचेस्टर माझ्यासाठी स्वर्ग आहे’, असे बाणेदार उत्तर बस्बी यांनी रिअल माद्रिदला दिले होते. ‘निष्ठा’ हा शब्द त्यांच्यासाठी परवलीचा होता.

१९५७-५८ मध्ये फुटबॉलच्या मोसमात बस्बी यांच्या संघाच्या उत्साहाला आकाश ठेंगणे होते. बस्बी संघ हाच युरोपियन कपच्या खिताबाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण नियतीला हे मंजूर नव्हते… आणि सगळे क्रीडा जगत हादरले, अशी दुर्घटना तेव्हा घडली.

बेलग्रेडमध्ये एक सामना खेळून विमानाने परतत असलेल्या संघाला म्युनिच विमानतळावर अपघात झाला. संघातील आठ खेळाडू मरण पावले. दुर्घटनेत दस्तुरखुद्द बस्बीही गंभीररित्या जखमी झालेले होते. जिवावर बेतूनही बस्बी यांनी कच खाल्ली नाही. पुन्हा ते मैदानात उतरले.

बस्बी इस्पितळात दाखल असताना मँचेस्टर क्लबची कमान जिम मर्फी यांनी सांभाळली होती. दरम्यानच्याच काळात प्रतिष्ठेच्या एफए कप स्पर्धेत शेफिल्ड संघाविरुद्धच्या सामना सुरू होण्याच्या काही सेकंदांपूर्वी जिम मर्फी यांना उद्देशून बस्सी पुटपुटले होते

‘‘जिम, झेंडा फडकत राहायला हवा.’’ बस्सी यांचे हे शब्द क्रीडा इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहेत.

संघाचे खंदे मोहरे विमान अपघातात बळी गेल्याने बस्बी आतून विखुरलेले होते. खचले होते. नैराश्याच्या या काळात पत्नी जिन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. संघव्यवस्थापक म्हणून बस्बी यांनी पूर्ववत मैदान गाठण्यामागे पत्नीचे पाठीशी असणेच कारणीभूत ठरले. विमान अपघातातून बचावलेल्या बॉबी कार्लटन, हॅरी ग्रेग, बिल फोल्क्स या खेळाडूंसह एक उर्वरित अवघ्या नवख्यांचा संघ बस्बी यांनी उभा केला.

नवख्यांमधून जॉर्ज बेस्ट आणि डेनिस लॉसारख्या खेळाडूंनी पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर क्रीडा जगतात आपल्या नावांची अमिट छाप सोडली. बस्बी यांचा हा नवा संघही लवकरच विजयाच्या वाटेवर सुसाट सुटला. अपघातातून बचावलेल्या बॉबी, ग्रेग आणि बिल या त्रिकुटाला तर आजही ‘होली ट्रिनिटी’ (ब्रह्मा, विष्णू, महेश) म्हणून ओळखले जाते. धक्का देणारा खेळ आणि संयुक्त प्रयत्नांच्या बळावर या संघाने यशाची शिखरे काबिज केली. जवळपास प्रत्येक प्रतिष्ठित स्पर्धा आपल्या खिशात घेतली.

म्युनिच विमान अपघातानंतर जवळपास दहा वर्षांनी २९ मे १९६८ रोजी ‘मँचेस्टर युनायटेड’ हा युरोपियन कपावर विजयाचे शिक्कामोर्तब करणारा पहिला इंग्लिश क्लब ठरला. अंतिम सामन्यात या संघाने पोर्तुगालच्या आक्रमक बेनफिका संघाला तब्बल तीन गोलने मात दिली. बेनफिकाला या सामन्यात कसाबसा एक गोल नोंदवता आला होता. विमान अपघातातून बचावलेल्या जॉर्ज बेस्टने तर कमाल केली. बेस्ट या स्पर्धेसह त्या वर्षाचा जगातील ' सर्वोत्तम ' खेळाडू म्हणून गौरवला गेला.

‘‘संघाच्या खेळाडूंनी जिवाचा फुटबॉल करून सामने खेळलेले आहेत. मँचेस्टरचे खेळाडू कुठल्या मातीचे आहेत, हे त्यांनी जगाला दाखवून दिलेले आहे. हा विजय माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायी प्रसंगांपैकी एक आहे. अवघ्या इंग्लंडमध्ये आज माझ्याहून अधिक आनंदी व्यक्ती कुणीही नसेल. माझी साधना सफल झालेली आहे.’’ युरोपियन ट्रॉफी जिंकल्यानंतर सर मॅट बस्बी यांचे हे उद्गार म्हणजे त्यांचे खेळ, संघ आणि देशाबद्दलच्या समर्पणाचे द्योतकच!

ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजयानंतर सर बस्बी मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले. निर्देशक म्हणून मात्र ते तहहयात क्लबशी संलग्न राहिले. ब्रिटिश सरकारने त्यांच्या या समर्पणाला सलामी म्हणून त्यांना ‘नाइटहुड’ ही पदवी बहाल केली.

अखेर २० जानेवारी १९९४ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी फुटबॉल विश्वातील हा तळपता सूर्य लयाला गेला. कर्करोगाने त्यांचे निधन झाले. मँचेस्टरमध्ये पत्नी जिन हिच्या कबरीला लागून त्यांचा दफनविधी झाला.

बस्बी यांच्या संघातील स्टार खेळाडू बॉबी कॉर्लटन आपल्या ‘माय मँचेस्टर युनायटेड इयर्स’ या आत्मचरित्रात म्हणतो, ‘‘मॅट बस्बी आम्हाला नेहमी समजावत, की फुटबॉल हा फक्त खेळाडूंचा खेळ नाही. सामान्य खेळ नाही. तो सर्वांचा आहे. फुटबॉलमध्ये सामान्य माणसाला असामान्य आनंद देण्याची अद्भूत ताकद आहे. ते तहहयात मँचेस्टर युनायटेड म्हणून जगले. मला वाटते मीही असाच असेल.’’

बस्बी यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी त्यांची एक कास्यप्रतिमा समारंभपूर्वक प्रतिष्ठापित केली गेली. पुढे काही काळ लोटल्यानंतर या प्रतिमेशेजारीच त्यांचे महान त्रिकुट ‘होली ट्रिनिटी’, बॉबी कार्लटन, हॅरी ग्रेग, बिल फोल्क्ससह जॉर्ज बेस्ट, डेनिस लॉ यांच्या प्रतिमाही विराजमान झाल्या.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags