संपादने
Marathi

ग्रामीण भागात मानसिक आरोग्यासाठी सेवा पुरवणारी ‘द माइंड्स फाऊन्डेशन’

sachin joshi
7th Nov 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

जगाचा विकास खूप वेगानं होत असताना काही समस्याही वाढत आहेत. यात मानसिक आजार आणि विक्षिप्तपणा या सगळ्यात मोठ्या समस्या म्हणून गणल्या जाऊ लागल्या आहेत. पण हे असे आजार आहेत ज्यांच्याकडे अजूनही गांभिर्यानं पाहिलं जात नाही. मानसिक आजार ओळखणं आणि त्याच्यावरील उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध नसल्यानं ग्रामीण भागात अशा आजारांकडे दुर्लक्ष केलं जातं. काहींना उपचार मिळाले तरी त्यांच्याकडे बघण्याच्या समाजाचा दृष्टीकोनामुळे त्यांना नोकरी मिळत नाही आणि त्यांचं लग्नही होत नाही. त्यांना मुख्य प्रवाहापासून दूरच रहावं लागतं.


image


समाजातील या भयंकर समस्येवर रघु किरण अप्पासनी यांनी गांभिर्यानं विचार केला आणि आपण यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे या निर्धाराने २०१० मध्ये त्यांनी ‘द माइंड्स फाऊन्डेशन’ची स्थापना केली. मानसिक आरोग्यासारख्या आजारांबाबत बोलणं खूप कठीण असतं तर काहींच्या दृष्टीनं ते गैरसोयीचंही असतं, असं रघु किरण सांगतात. मानसिक आजारांबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यातही ग्रामीण भागात माहितीचा आणि जागरुकतेचा अभाव असल्यानं गैरसमज जास्त असतात. म्हणून सामान्य माणसांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवण्याची गरज आहे असंही रघु सांगतात.

द माइंड्स फाउंडेशनचं काम तीन टप्प्यांमध्ये चालतं. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात मानसिक आजारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. गेल्यावर्षभरात १९ गावांमध्ये अशा कार्यशाळांचं आयोजन केल्याचं रघु सांगतात. संस्थेतर्फे ७० रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जात असल्याची माहितीही ते देतात. सध्या संस्थेतर्फे महिला, मुलांवर उपचार करणाऱ्या या भागातील डॉक्टरांना जागरुक करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन केलं जातंय.

या प्रक्रियेतील दुसरा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा असतो कारण यात रुग्णांची व्यावसायिक तपासणी केली जाते. ग्रामीण भागात मानसिक आजारांबाबत अनेक गैरसमज असतात. हा आजार बरा होणारा आहे हे लोकांना मान्यच नसतं, याउलट मानसिक आजार म्हणजे ती व्यक्तीच तशी आहे असा त्यांचा समज असतो. संपूर्ण भारतात साडे तीन हजार मानसोपरतज्ज्ञ आहेत. एवढ्या मोठ्या देशात मानसोपचार तज्ज्ञांची संख्या पुरेशी नसल्याचं मला वाटलं, असं रघु सांगतात. पण या मानसोपरचारतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ही संख्या कमी नसल्याचं लक्षात आलं. पण यातील महत्त्वाचं कारण आहे की जवळपास सर्वच मानसोपचार तज्ज्ञ हे शहरांवर आपलं लक्ष केंद्रीत करीत आहेत. म्हणजे उपचार उपलब्ध आहेत पण ग्रामीण नागरिकांकडे त्यासाठी पैसा उपलब्ध नाहीये तर ज्यांच्याकडे आहे ते शहरांमध्ये डॉक्टरांकडे जायला तयार नाहीत.

हे गैरसमज दूर व्हावेत यासाठी दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील लोकांना तपासणी केंद्रापर्यंत जाता यावं याकरीता मोफत बससेवाही दिली जाते. या केंद्रांमध्ये तज्ज्ञांमार्फत त्यांची तपासणी होते आणि त्यांना मोफत औषधंही दिली जातात.


image


प्रशिक्षण, निदान आणि उपचारांचे टप्पे पार केल्यानंतर तिसरा आणि अखेरचा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. यात इलाज केल्यानंतर सुधारलेल्या रुग्णांना काम सोपवलं जातं. त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन समाजातील इतर मानसिक रुग्णांना संपर्क साधण्याचं काम सोपवलं जातं. विविध मानसोपचार रुग्णालयांमार्फत सुरू असलेल्या व्यावसायिक पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत द माइंड्स फाऊन्डेशनने सहकार्य केलं आहे. यामुळे असे मानसिक रुग्ण बरे झाल्यानंतर समाजात स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. “ या उपक्रमांतर्गत रुग्णांना कपडे किंवा घरच्या घरी तयार करता येतील अशा वस्तु बनवण्य़ाचं प्रशिक्षण दिलं जातं,” असं रघु किरण सांगतात. त्याचबरोबर कामगार संघटना आणि स्थानिक व्यावसायिकांना भेटून यातील नोकरी इच्छुक असणाऱ्या रुग्णांना रोजगार देण्याचाही प्रयत्न करत असल्याचं रघु सांगतात.

याशिवाय अशा रुग्णांना दिलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी करावा यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. मानसिक रुग्णांना स्थैर्य मिळवून देण्याच्या कार्यामुळे द माइंड्स फाउंडेशनला अमेरिकेतील ग्रे मॅटर्स कॅपिटल (जीएमसी)तर्फे निधी मिळवता आला. या निधीमधूनच ग्रामीण भागात मानसिक आजारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं रघू सांगतात.


image


जीएमसीतर्फे निधी मिळणं हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. पण या प्रयत्नांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हे सगळ्यात मोठं यश असल्याचं रघु सांगतात. ग्रामीण भागातील लोकांना या मानसिक आजारांविषयी जागरुक करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम द माइंड्स फाउंडेशन करीत आहे. त्यांच्या या कार्याला समाजाच्या प्रत्येक वर्गातून प्रतिसाद मिळण्याची गरज आहे.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags