संपादने
Marathi

जंगल, वाघ आणि अभय जोशी

8th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जंगल सफारी ही पर्यटनामध्ये मोडत असली तरीही जंगलातली सफर हा एक शिस्तबद्ध आणि निरिक्षणप्रधान अनुभव देणारा पर्यटनाचा प्रकार आहे. या पर्यटनात तुम्ही जंगलात, प्राण्यांच्या जगात प्रवेश करता तेव्हा नियम हे जंगलाचे असतात आणि तुम्ही तिथले दुय्यम नागरिक. जंगलातल्या या आगळ्यावेगळ्या जगाची ओळख लोकांना व्हावी, त्यांच्यात जंगल आणि वन्यजीव संवर्धनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वन्यजीव अभ्यासक अभय जोशी गेली तेरा वर्षे महाराष्ट्र आणि इतर राज्यातील अनेक जंगलं पालथी घालताहेत. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर नोव्हेंबर ते जून हा जंगलसफारीचा उत्तम सिझन असल्यानं अभय यांचा मुक्काम जंगलातच असतो.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील जंगलं जेव्हा वाघांसाठी राखीव नव्हती तेव्हापासून अभय ताडोबाला जायचे. तेव्हा पायी जंगलात फिरता यायचं, जनावराचा माग काढणं, मचाणावर बसणं...या गोष्टी तेव्हा खूप केल्या. पण नंतर जंगलात माणसांचा वावर वाढला, त्यांची नासधूस वाढली आणि मग जंगलं राखीव झाली. नियम आले, परमीट आलं, अर्थात प्राण्यांच्या संवर्धनासाठी ते आवश्यकच होतं. जंगलात जाणं, फोटो काढणं लहानपणापासूनचं चालू होतं. तेव्हाच ठरवलं की आपल्याला दिसलेलं, समजलेलं, आवडलेलं जंगल इतरांनाही दाखवायचं. २००२ साला पासून दरवर्षी अनेक ग्रुप घेऊन माझ्या महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधल्या जंगलात फेऱ्या सुरु असतात. ‘निसर्ग सोबती’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून अनेक हौशी आणि अभ्यासक पर्यटक अभय यांच्या संपर्कात असतात. जंगल सफारी ही थोडी खर्चिक असते, त्यामुळे या सहलींचं प्लॅनिंग खूप आधीपासून सुरु होतं. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत मी जंगल सफारी करतो. कारण लोकांना जंगल दाखवणं हा माझा मूळ हेतू आहे.

image


‘जंगल म्हणजे फक्त वाघ’ असा सर्वसामान्यांचा समज असतो. तीच अपेक्षा घेऊन लोकं जंगल सफारीला येतात. कधीकधी चार-सहा-आठ सफारी केल्या तरीही वाघाचं दर्शन होत नाही, अशा वेळी पर्य़टक नाराज होतात. पण इथे आपण एक लक्षात घेतलं पाहीजे की वाघाहूनही अनेक सुंदर आणि आकर्षक गोष्टी जंगलात असतात. झाडं, पक्षी, किटक, माती या सगळ्यांचा अभ्यास करण्याची संधी तुम्हाला सफारीत मिळते. मला इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आत्ता कुठे २५०-३०० पक्षी ओळखता येतात. जंगल हे आपल्याला रोजच्या प्रवासात किंवा मॉलमध्ये भेटत नाही. त्यासाठी वाट वाकडी करुन शहराच्या बाहेरचं पडावं लागतं. जंगलातले कायदे कानून वेगळे असतात. माणसांना त्यांच्या रोजच्या जीवनात वाट्टेल तसं वागायची सवय झालीय.. त्यामुळे मी पर्यटक आमच्याकडे आले की सूचनांचा माराचं त्यांच्यावर करतो. तुमचे कपडे कसे असावेत इथपासून ते तुमचं वागणं-बोलणं या सगळ्यांवर ताबा असणं फारच महत्वाचं आहे. अनेक पर्यटक डिओ-सेंट लाऊन येतात. प्राण्यांचं नाक खूप तिखट असतं. सगळे वास ते माणसांपेक्षा जास्त गतीनं आणि बारकाव्यानिशी ओळखतात. भडक रंगाचे कपडे घालतात. अनेक जण जीप सफारीला निघाली की वाटेत झोपून जातात, कॅमेराचे फ्लॅश मारतात. एकदा तर काही पर्य़टकांचा घोळका वाघाच्या बछड्यांना यू यू करत बिस्कीटं खाऊ घालत होता. असे पर्य़टक पाहिले की संताप अनावर होतो.

image


भारतात १७ ते १८ जंगलं आहेत. प्रत्येक जंगलाचं स्वतःचं असं वैशिष्टय आहेच. प्रत्येक प्राण्याचा, पक्षांचा आवाज वेगळा, त्यांची पावलट वेगळी. ‘तिथे वाघ आहे’ हे कळल्यावर प्रत्येक प्राणी किंवा पक्षी वेगवेगळे आवाज काढून आपापल्या कळपाला किंवा थव्याला सावध करतात. हे सगळं पहाणं, त्याचा अभ्यास करणं हे सगळं इतकं अदभुत आहे की एक आयुष्य कमी पडेल सगळं शिकण्यात.

अभय जोशी वर्षभर अनेक ग्रुप्सना घेऊन जंगल भ्रमंती करत असतात. मात्र मार्चमधली एक जंगल सफारी मात्र खूप स्पेशल असते. कारण ही असते महिला स्पेशल सफारी. दरवर्षी ८ मार्चला महिलांचा ग्रुप घेऊन ते ताडोबाला जातात. या जंगल सफारीत तरुणींपासून ८० वर्षांच्या आजी अशा सगळ्या महिलांचा उत्साह दांडगा असतो. तरुण मुलींनी करिअर म्हणून या क्षेत्राचा जरुर विचार केला पाहिजे असं अभय यांना वाटतं, वन विभागात अनेक पदं महिलांसाठी राखीव आहेत. त्याचा लाभ महिलांना मिळावा म्हणून अनेक पातळीवर अभय यांचे प्रय़त्न चालू आहेत.

अरण्यवाचन ही एक कला आहे. ती ज्याला जमली तो या जंगलातलाच एक होऊन जातो. तुम्हाला अनेक नवे अनुभव जंगल देईल.त्याचं सौंदर्य पहा. उन्हाळ्यात दिसणारं जंगल आणि हिवाळ्यात त्याचं बदललेलं स्वरुप एखाद्या जाणकारालाही चकीत करु शकतं. डोळे, कान उघडे ठेऊन निरपेक्ष भावनेनं जंगलाला शरण जा. मग हेच जंगल त्याच्या उदरातील गुपितांचा खजिना तुमच्यासमोर रिता करेल.

image


Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags