चाय पे चर्चा.... एक ‘वेगळा’ अनुभव....

चाय पे चर्चा.... एक ‘वेगळा’ अनुभव....

Sunday February 28, 2016,

6 min Read

मुंबईतला लोअर परेल भाग झपाट्यानं बदलतोय. तुलसी पाईप रोडवर एकेकाळी चाळीचं साम्राज्य होतं. आता इथं टोलेजंग इमारती उभ्या आहेत. बीकेसी नंतर सर्वाधिक जास्त उंच इमारती ज्या भागात असतील तर ते असेल लोअर परेल. एकेकाळी कामगार वस्तीसाठी प्रसिध्द असलेल्या लोअर परेलचा उभा विकास होत आहे. उंचच उंच वाढत जाणाऱ्या इमारतींमध्ये असंख्य कॉर्पोरेट आपापली ऑफिसेस थाटून आहेत. मग सकाळी आणि संध्याकाळी या आधुनिक चाकरमानींची प्रचंड गर्दी या भागात रस्त्यावर उतरते आणि काही वेळातच ट्रेनमध्ये किंवा इमारतींमध्ये गायप होते. दुपारी जेवणाच्या वेळी तुलसी पाईप रोडवर जत्राच असते. कुठे काय मिळतंय याची टेहाळणी करताना अचानक एका दुकानाकडे लक्ष जातं. ‘चाय पे चर्चा'. कमला मिल्सच्या समोरच्या फुटपाथवर हे अगदी छोटेखानी दुकान. बाहेरुन पाहिलं तर आजबाजूला असलेल्या अनेक इटरीच्या गर्दीतलं एक वाटतं. थोडासा वेगळा साईन बोर्ड असल्यानं आत जाऊन नक्की काय आहे हे बघण्याची उत्सुकता वाढते. एखादा जेव्हा आत जातो तेव्हा एक वेगळं जग त्याच्या स्वागतासाठी तयार असतं. ते जग आहे चहाचं... थेट देसी... 

image


लोकसभा निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ चांगलीच गाजवली. त्यानंतर चाय पे चर्चा  अतिशय परवलीचा शब्द झाला. चलो चाय पे चर्चा करते है असं सहज म्हटलं जाऊ लागलं. अगोदरही चहावर चर्चा व्हायच्या पण नव्यानं अनेक सदर्भ मिळाल्यानं चाय पर चर्चा याची व्याख्या बदलली. आधीपासूनच असलेली सामाजिक व्याख्या राजकीय झाली आणि त्यानंतर पुन्हा सामाजिक, अशी ही व्याख्या बदलत गेली. चाय पे चर्चा हे आऊटलेट सुरु करणारे अनिल कोहली यांचं यासंदर्भातलं मत थोडसं वेगळं आहे. अनिल सांगतात,” होय चाय पे चर्चा नरेंद्र मोंदींमुळे चांगली गाजली. पण चहा आपल्या सामाजिक जीवनाचा भाग आहे. चार मित्र असू देत किंवा मग कुणी अनोळखी असे ना. टपरीवर चहाचा गरमा गरम घोट घेताना होणारी चर्चा सर्वांना परिचयाची आहे. गावाकडे दोन कुटुंबातले संबंधही चहाने जोडले जातात. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना चहाला प्राधान्य असतं. मुली बघायचा कार्यक्रम असो किंवा मग मुंज असो सर्व ठिकाणी चहा असतोच. त्यामुळे प्रत्येक भारतीयांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या चहाला आम्ही एक कॉर्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न करतोय. चाय पे चर्चा या माध्यमातून.” 

image


अनिल कोहली यांचं फोर्ट भागात हॉटेल आहे. हॉटेल रेसिडेन्स. त्याची पुनर्बांधणी होणार होती. ज्यासाठी तीन वर्ष जाणार होती. त्याकाळात काय करायचं तर अनिल यांनी मुंबईतल्या विविध भागांचा अभ्यास केला. संशोधन केलं. लोकांना नक्की काय आवडतं. वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय होताच पण पुढे जाऊनही आपल्याला स्वत:चं असं काही करता येईल का यासाठी हा शोध होता. त्यातूनच चहा पे चर्चा ची संकल्पना आकाराला आली. लोअर परेल हे नव्यानं कॉर्पोरेट हब बनलेल्या मुंबईतल्या गजबजलेल्या भागात हे छोटेखानी आऊटलेट सुरु झालं. अगदी साधं आणि तेव्हढंच वायब्रंट.. 

image


चाय पे चर्चा मध्ये आल्यावर आपल्याला जास्त भावतं ते त्याचं पूर्णपणे असलेलं देसी लुक. वेगवेगळ्या ठळक रंगांनी रंगवलेल्या भिंती. त्यावर असलेली देसी चित्रं. चाय पे चर्चाच्या वेगवगेळ्या रुपातली चित्रकथा आणि बरंच काही. चहा किटलीचे बल्ब बोल्डर, पाण्याने भरलेल्या रंगीत बाटल्या आणि ग्लास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टेबलावरचे गेम्स... लिडो, चेस आणि बरंच काही. बुध्दीबळाच्या सोंगट्या असलेला बॉक्स, “आम्ही चहा पे चर्चाची मांडणी करतानाच ते वायब्रंट असेल याची काळजी घेतली. इथल्या भिंती जेजे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी रंगवल्यात. त्यामुळे कलात्मकता ही चाय पे चर्चाची जमेची बाब आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथले टेबल्स. तिथं आम्ही अगदी लहानपणाचे गेम्स ठेवलेत. सापसिडीपासून ते बुध्दीबळापर्यंत. सुट बुट घातलेले अनेकजण इथं येतात. गेम खेळतात. या गेम्सवर चहाची बेट लागते. जो हरेल किंवा मग जिंकेल तो चहा पाजणार. टाय घातलेले अनेकजण एक एक करत आपले बुध्दीबळाचे प्यादे मागे पुढे करत असतात. हे चित्र मस्त आहे. आम्हाला ही त्याचा खूप आनंद वाटतो.” अनिल सांगत होते. 

image


चहापर चर्चा हा अनोखा कसा तर तो तुम्हाला एकत्र आणतो. चर्चा घडवतो. बोलतो करतो आणि इथल्या देसी वातावरणात आपण आपल्या गावाकडच्या चावडीवरच गप्पा मारतोय की काय असं वाटतं. “ आम्ही मांडणी करतानाच याची काळजी घेतली होती. आम्ही पंजाब प्रांतातून येतो. आम्हाला चहाची सवय ही सर्वांसोबत चहा पिण्याची आहे. लहानपणापासून मी ते पाहीलं होतं. घराबाहेर किंवा नुक्कडवर खाटेवर बसून कुल्लडमधल्या गरमागरम चहाची लज्जत आणखी वाढते. आणि जसजशी चर्चा वाढते तसतसं वातावरण गरम होतं. त्याला पुन्हा न्युट्रलाईज करण्यासाठी चहा हवाच” अनिल आठवणीत रमतात. 

image


चाय पे चर्चा या आऊटलेटला आता फक्त तीन महिने झालेत. नोव्हेंबर २०१५ ला ते सुरु करण्यात आलं. आणि फक्त तीन महिन्यात या दुकानासाठी गुंतवलेली रक्कम जमा झाली. इतका प्रचंड प्रतिसाद ग्राहकांकडून मिळाला. “ इथे सीसीडी आहेत, सब वे आहेत पण आमच्या चाय पे चर्चाची बात न्यारी आहे. सीसीडीची टॅगलाईन आहे ‘ए लॉट कॅन हॅपन ऑन अ कॉफी’ आम्ही म्हणतो आमच्यासाठी अशा टॅगलाईनची गरज नाही. कारण आमच्या नावातच चर्चा आहे. आणि ती आमच्या देशाची सांस्कृतिक आणि सामाजिकतेचा भाग आहे. अशी ही चर्चा होत राहणार. जोवर चहा आहे तोवर चर्चा आहे आणि जोवर चर्चा होत राहणार तोवर चहा असेलच. त्यामुळे आमच्या नावानंच आम्हाला टॅगलाईन मिळवून दिलीय.” 

image


‘चाय पे चर्चा’ च्या विस्ताराचे वेध लागलेत. अनिल यांनी त्यादृष्टीनं प्रयत्न करायला सुरुवात केलीय. अनेकांनी तशी तयारी दाखवली आहे. आता ब्रँड तयार झाल्याने त्याचा विस्तार ही काळाची गरज आहे. त्यामुळे आता मुंबईत इतर ठिकाणी विस्ताराची योजना आखण्यात आलीय. मुंबईशिवाय नवी मुंबई आणि ठाण्यात हा विस्तार होईल अशी अनिल यांना आशा आहे. पण त्यांना घाई नाही. “ विस्तार कसा व्हावा आणि किती व्हावा याचा अंदाज आम्ही घेत आहोत. आमचा ब्रँड तयार होतोय. तो तसाच कायम राहिला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे” 

image


चाय पे चर्चा चा मेनू पाहिला की यातलं आधुनिक असतानाही असलेलं देसीपण लक्षात येतं. चहा बरोबर इथं बटर मिळतो. मोफत. शिवाय इतर मेनू म्हणजे पराठा. चहा बरोबर पराठा खाण्याची आपली परंपरा आहे. ती इथं जपण्यात आलीय. हे विशेष. लोकांनी इथं येऊन आपल्या घरासारखं वागावं, घरापासून दूर असलेलं घर जिथं एकत्र यायचं, गप्पा मारायच्या आणि मनमुराद खेळायचं आणि नंतर पुन्हा आपल्या घरी किंवा कामावर निघून जायचं असं हे चाय पर चर्चाचं स्वरुप आहे. 

image


image


अनिल स्वत: लहानपणापासून स्पेशल चाईल्ड म्हणून वाढले. त्यांना कोपरापासून एक हात नाही. पण त्यांना कधीच आपल्या या अपंगत्वाबद्दल कमीपणा वाटला नाही तर आपण नव्यानं काय देऊ शकतो हेच त्याचं ध्येय होतं. हेच ध्येय त्यांनी आपल्या चाय पे चर्चामध्ये कायम ठेवलंय. इथले त्याचे दोन सहकारी मुकबधीर आहेत. फक्त सांकेतिक भाषा समजतात. “ मी त्यांच्यासाठी रोजगार निर्माण केला असं म्हणत नाही पण इतर सामान्य सहकाऱ्यांपेक्षा या दोघांची कार्यक्षमता जास्त आहे. इतकी की अनेकदा वेळेअगोदर काम करुन ते पुन्हा दुकानात परतात. आता विस्तार करताना आणि फ्रान्चाईज मॉडेल तयार करताना माझ्या सहकाऱ्यांसारख्या विशेष लोकांना तिथं रोजगार देणार आहे.” अनिल अभिमानानं सांगतात. 

image


आपण जगाकडे कश्या दृष्टीनं पाहतो त्यावरुन आपल्या आसपासचं जग घडतं. चाय पे चर्चा हा अश्याच सकारात्मक दृष्टीकोनातून तयार झालेला ब्रँड आहे. यामुळे अनादी काळापर्यंत चाय पे चर्चा अशीच घडत राहील असा विश्वास अनिल यांना आहे. 

image


आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कथा :

मुंबईतील उपहारगृह, जेथे सांकेतिक भाषेत घेतली जाते जेवणाची ऑर्डर, सहाच महिन्यात मिळाला जोमॅटो ‘हाइयेस्ट रेटेड रेस्तरां इन मुंबई’ चा खिताब !

चाय पर शादी - एक अनोखा सामाजिक उपक्रम