संपादने
Marathi

दुर्गसंवर्धनासाठी झटणारी ʻसह्याद्री प्रतिष्ठानʼ आधुनिक मावळ्यांचा स्तुत्य उपक्रम

Ranjita Parab
1st Dec 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार म्हणजे गडकिल्ले. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि सहवासाने पावन झालेले हे गडकोट महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. कधीकाळी दिमाखात आणि ऐटीत उभी असलेली ही दुर्गसंपदा आजघडीला दुर्लक्षित अवस्थेत आहेत. अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर भविष्यकाळात हे ऐतिहासिक वैभव नाहीसे होईल आणि त्यासाठी आपल्याला इतिहास कधीच माफ करणार नाही. शिवरायांच्या काळात वैभवाच्या शिखरावर विराजमान असलेल्या आणि सद्यस्थितीला भग्नावस्थेत असलेल्या या गडदुर्गांना गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आधुनिक काळातील मावळ्यांनी कंबर कसली आहे. ʻसह्याद्री प्रतिष्ठान, घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचाʼ, ही संघटना या गडकोटांच्या संवर्धनासाठी स्थापन केली असून, आजवर त्यांनी २५० पेक्षा जास्त दुर्गसंवर्धनाच्या, श्रमदानाच्या मोहिमा राबविल्या आहेत. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे हे या संस्थेचे संस्थापक असून, अनेक तरुण-तरुणींनी त्यांच्या या कार्यात हातभार लावला आहे. वर्षभर शिवकार्यासाठी वाहून घेतलेली ही संघटना आहे. ʻशिवाजी महाराज हे त्यांच्या जन्माने नाही, तर कार्याने मोठे झालेʼ, या विचारप्रवाहाला धरुन चालणारी ही संघटना आज शिवाजी महाराजांचे अमुल्य कार्य घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्य़ंत पोहोचवण्यासाठी झटणाऱ्या आधुनिक मावळ्यांचा हा उपक्रम निश्चितच अभिमानास्पद आहे.

image


ʻसह्याद्री प्रतिष्ठानʼ संघटनेच्या स्थापनेबद्दल बोलताना श्रमिक गोजमगुंडे सांगतात की, ʻ२००४-०५ साली मला किल्ले फिरण्याची आवड होती. तेव्हा किल्ले फिरत असताना मला किल्ल्यांच्या भग्नावस्थेची जाणीव झाली. त्यामुळे मी माझ्यापरीने त्यांच्या संवर्धनाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक-एक करुन बरेच लोक माझ्याशी जोडले गेले आणि दुर्गसंवर्धनासाठी झटणारी ही संस्था उदयास आली.ʼ महाराष्ट्रातील २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ʻसह्याद्री प्रतिष्ठानʼच्या शाखा असून, स्थानिक किल्ल्यांवरील मोहिमा संबंधित शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येतात. या संघटनेत काम करणारे अनेक तरुण-तरुणी चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत, अनेकांचे स्वतःच व्यवसाय आहेत. मात्र तरीही आपल्या व्यस्त दिनचर्येतून ते या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेळ काढतात, जे निश्चितच कौतुकास्पद आहे.

image


ʻसह्याद्री प्रतिष्ठानʼ संघटनेने महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर आजपर्य़ंत २५० पेक्षा अधिक दुर्गसंवर्धनाच्या मोहिमा राबविल्या आहेत. त्यात त्यांनी प्रामुख्याने किल्ल्यांची साफसफाई, किल्ल्यावरील ऐतिहासिक वस्तूंचे (उदा - तोफगोळे, तोफा) संवर्धन, ढासळलेल्या बुरुजांची, तटांची दुरुस्ती असे उपक्रम राबवितात. याशिवाय पर्य़टकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या साफ करणे, पर्यटकांसाठी दिशादर्शक फलक लावणे, ही कार्येदेखील ते करतात. तसेच छत्रपती संभाजी महाराजांची किर्ती घरोघरी पोहोचावी याकरिता दरवर्षी १४ मे या त्यांच्या जयंतीच्या दिवशी पिंपरी-चिंचवड ते किल्ले पुरंदर अशी ʻस्वाभिमानʼ यात्रा काढली जाते. महाराष्ट्रातील गडकोटांच्या संवर्धनासाठी सदर संस्था कायम पत्र, निवेदनांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करत असते. सर्वसामान्यांमध्ये गडकोटांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील ४०० गडकिल्ल्यांच्या ४५ हजार छायाचित्रांचे प्रदर्शन, ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन सर्वांना मोफत दाखविण्यात येते. याशिवाय शिवकार्य़ाची महती पटवून देण्यासाठी प्रसिद्ध इतिहासकारांची मार्गदर्शनपर व्याख्याने, पोवाडे, माजी सैनिकांचा सत्कार इत्यादी कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येतात. तसेच दुर्गसंवर्धनासंबंधातील अनेक पुस्तके सह्याद्री प्रतिष्ठानकडून प्रकाशित करण्यात येतात आणि ती दुर्गप्रेमींमध्ये मोफत वितरित केली जातात. सदर संघटना अनेक सामाजिक कार्येदेखील करते. आरोग्य तपासणी, नेत्रदान शिबीर, रक्तदान शिबीर असे अनेक आरोग्य विषयक उपक्रम तसेच शैक्षणिक आणि पर्यावरण विषयक उपक्रमदेखील या संघटनेमार्फत राबविण्यात येतात.

image


शिवरथ यात्रा, हा या संघटनेचा अजुन एक स्तुत्य उपक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार घरोघरी व्हावा, याकरिता दरवर्षी ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड, अशा भव्य पालखीसोहळ्याचे आयोजन या संस्थेमार्फत करण्यात येते. तसेच या पालखीसोहळ्याचे चित्रिकरण करुन महाराष्ट्रभर त्याचे मोफत वितऱण करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण विश्वातील हा पहिला मानाचा पालखी सोहळा असल्याचे ते सांगतात. या सोहळ्यादरम्यान शिवरायांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी ते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, अशी यात्रा काढली जाते. या यात्रेदरम्यान येणाऱ्या प्रत्येक गावात शिवकार्याचा प्रचार आणि प्रसार केला जातो. तसेच या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. शिवाय यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीची ५ दिवस राहण्या-जेवण्याची सोय संस्थेमार्फत मोफत करण्यात येते.

image


शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रतीक असलेले गडकिल्ले आज निसर्गाच्या ऊन-पावसाच्या खेळाला तोंड देत अखेरच्या घटका मोजत आहेत. या गडकिल्ल्यांच्या रक्षणाची, संवर्धनाची जबाबदारी असलेल्या मंडळींना त्याबाबत अनास्था असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. ʻहा पूर्वीचा काळ नाही, ज्या काळी मावळ्यांनी घरादारावर तुळशीपत्र वाहून स्वतःला स्वराज्याच्या कार्यासाठी वाहून घेतले होते. हा तो जमाना नक्कीच नाही. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतरचा वेळ वाया घालवण्यापेक्षा अशा कोणत्याही समाजकार्यासाठी वाहून घेणे, नक्कीच चांगले आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक तरुणाने या गोष्टीचा विचार करायला हवा की, गडकिल्ले हा महाराष्ट्राचा वैभवशाली वारसा आहे आणि त्याचे रक्षण करणे, ही आपलीच जबाबदारी आहेʼ, असा सल्ला आजच्या तरुण पिढीला ʻसह्याद्री प्रतिष्ठानʼचे मुंबई शाखा अध्यक्ष रोहित देशमुख देतात. पर्यटन व्यवसायात कार्यरत असलेले हर्षद चिंचवळकर ʻसह्याद्री प्रतिष्ठानʼचे मुंबई उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग शाखा संपर्कप्रमुख आहेत. संस्थेतील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ते सांगतात की, ʻमहाराष्ट्राचा इतिहास हा ज्वलंत आहे आणि या इतिहासाचे मूक साक्षीदार हे गडकोट आहेत. ʻसह्याद्री प्रतिष्ठानʼने जेव्हा मुंबई प्रांत उपाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवली, तेव्हा मी या संघटनेसाठी अनेक कार्य हाती घेण्याची ठरविले. मुंबईतील तरुण पिढी आजही या गडकिल्ल्यांबाबत तितकीशी जागरुक नसल्याचा मला अनुभव आला. तेव्हा प्रथम तरुणांना याबाबत जागरुक करणे महत्वाचे आहे. तरुणांनी आज या गडकिल्ल्यांवर जाऊन तेथील इतिहासाचा अभ्यास करावा, त्याचे महत्व इतरांना पटवून द्यावे, जेव्हा आपण किल्ल्यांवर भेट द्यायला जाऊ तेव्हा आपल्या परीने होतील तेवढी किल्ल्याच्या स्वच्छतेची आणि संवर्धनाची कामे करावीत, आपल्या कोणत्याही कृतीने गडाचे पावित्र्य धोक्यात येणार, याची काळजी घ्यावी, तसेच लहान मुलांना या गडकोटांबद्दल अभिमान वाटावा, यासाठी अधिक प्रयत्न करावेतʼ, असे हर्षद तरुण पिढीला सांगतात. संस्थेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास किंवा आमच्या शिवकार्य़ात सहभागी व्हायचे असल्यास http://sahyadripratishthan.com या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता, असे हर्षद सांगतात.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags