संपादने
Marathi

‘ओयो रुम’चे सर्वोत्कृष्ट कर्मचारी श्रेय गुप्ता

20th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

भारतातल्या बहुतेक महानगरांमध्ये लालभडक रंगाच्या फलकावर पांढऱ्या ठळक अक्षरात लिहलेली ‘ओयो’ (OYO) ही अक्षर खूप ओळखीची होऊ लागली आहेत. ओयो हे भारतातील सर्वात मोठे ब्रँडेड हॉटेल्स नेटवर्क आहे. ‘ओयो’च्या वेगवान प्रगतीमध्ये केवळ पंचविशीच्या एका तरुणाचा सिंहाचा वाटा आहे.

ओयो रुम्सचे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल त्यांच्या उत्कृष्ट स्टार्ट अप कर्मचारी श्रेय गुप्ताबद्दल (एव्हीपी, विस्तार) भरभरुन बोलतात, “वर्षभरापूर्वी आमच्याकडे केवळ २० प्रॉपर्टीज हातात असताना श्रेयने आमच्यासोबत कामाला सुरूवात केली. आमचे सर्वात अनोखे आणि कठीण प्रकल्प त्यांच्यामुळेच पूर्ण झाले. नवीन प्रॉपर्टीजना ‘ओयो’च्या दर्जानुसार बदलण्याचा आलेख त्यांनी आधी सरळ रेषेत आणला आणि मग ते विस्तारित टीम (Expansion team) सोबत काम करु लागले. आम्ही केवळ सहा महिन्यात १०० पेक्षा जास्त शहरांमध्ये ‘ओयो’ सुरू केले”.


image


देशभरात कुठेही तुम्ही घरापासून लांब असताना घरातच असल्याचा एक छान अनुभव देण्याचा ‘ओयो रुम्स’चा हेतू आहे. श्रेय हे ओयोमध्ये जून २०१४ मध्ये रुजू झाले. ओयोच्या सर्व शाखांमध्ये दर्जेदार साधनांची निर्मिती आणि सेवा पुरवून ग्राहकांना संतोष देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ‘ओयो’चा विस्तार, यंत्रणांची निर्मिती आणि अंमलबजावणी प्रमुख या नात्याने ते खूप महत्वाची भूमिका बजावतात. सुरूवातीपासूनच श्रेयचा धाडसीपणा ‘ओयो’चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या लक्षात आला. गेल्या वर्षी ‘ओयो’ सुरू झाल्यावर ट्वीटरच्या माध्यमातून श्रेयने रितेश यांचं अभिनंदन केलं. अवघ्या महिन्याभरात ‘ओयो’च्या १५ जणांच्या टीममध्ये तेही सामील झाले.

रितेश सांगतात, “आम्ही ‘ओयो’ रुम्समध्ये काय साकारतोय याबाबत खूप लोकांना काहीच कळत नसताना श्रेय मात्र या कल्पनांना उचलून धरत यशस्वी करत होते. अडचणी काय आहेत ते समजून त्यांच्या मूळाशी जाऊन ते सोडवतात. कंपनी उभारणाऱ्या आमच्या प्रत्येक टीम सदस्यांकडे ही क्षमता आहे”.

श्रेय अगदी अभिमानाने सांगतात, की १८ महिन्यात ‘ओयो’ रुम्स एकाच शहरात १२ हॉटेल्स, २०० रुम्स या संख्येवरुन १५० शहरांत ३ हजार ५०० हॉटेल्स, आणि ४० हजार रुम्सवर पोहोचलीय. त्यांनी महिलांकरता खास ‘ओयो वुई (OYO WE)’ ही योजना आणलीय. श्रेय म्हणतात, “अवघ्या १८ महिन्याच्या कालावधीतली ही झेप नक्कीच प्रेरणादायी आहे”.

आयुष्यातला मैलाचा दगड

श्रेयने आपलं बालपण वाराणसीत तर दहा वर्ष गुडगावमध्ये घालवली. दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम. झाल्यावर २०११ मध्ये त्यांनी बेन अण्ड कंपनीतून कामाला सुरूवात केली. पण दोन वर्षातच तिथून बाहेर पडून त्यांनी भाजपच्या ‘वॉर रुम’ या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमात काम करायला सुरू केलं. श्रेय सांगतात, “आरामदायी नोकरीतला ‘सुरक्षितपणा’ सोडून निवडणूक प्रचार कार्यात भाग घेण्याचा क्षण माझ्या आयुष्यात निर्णायक ठरला. यामुळे मी आव्हांनांना तोंड द्यायला शिकलो. अगदी ‘पाळण्यात’ असलेल्या ‘ओयो’ रुम्समध्ये काम करायची प्रेरणाही मला इथूनच मिळाली”.

२०१३ मध्ये अर्ध मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदा धावण्याचा क्षण त्यांच्या आयुष्यातला दुसरा महत्वाचा क्षण होता. मॅरेथॉनमुळे त्यांना आयुष्यात प्रशिक्षणाचं महत्व कळलं. कोणताही अडथळा आला तरी नेहमी पुढेच जात राहिल पाहिजे ही प्रेरणाही त्यांना इथूनच मिळाली.

स्टार्ट अप मध्ये काम

स्टार्ट अप मध्ये काम करण्याचे ते खंदा पुरस्कर्ता आहेत. त्यांच्या मते, कॉरपोरेटमध्ये काम करताना आजूबाजूच्या वातावरणामुळे निवांतपणे तुम्ही नवीन गोष्टी, कौशल्य आत्मसाद करता. स्टार्ट अपमध्ये काम करताना तुम्ही काम करता करताच शिकत जाता. कॉर्पोरेटमध्ये काम करण्याचा पूर्वानुभव आणि कौशल्य कामाची आखणी करताना खूप महत्वाची ठरतात. कॉर्पोरेटमध्ये कामाचा अनुभव असलेल्यांकडे प्रश्न सोडवण्याची आणि बांधणी प्रक्रिया वेगाने करण्याची क्षमता असते. श्रेय प्रसन्नपणे सांगतात, “माझ्यातल्या या क्षमतांमुळेच मी आज या ठिकाणी पोहोचलोय”. पण वेगाने वाढणाऱ्या स्टार्ट अपमध्ये यशस्वी होण्याकरता खूपशा अदृश्य क्षमताही हव्यात.

श्रेयनी ‘ओयो’मध्ये कामाला सुरूवात केली तेव्हा या स्टार्ट अपचं काम अगदी मर्यादित स्वरुपात होतं. ते आपला अनुभव सांगतात. ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांच्याकडे २०० लोकांकरता १०० पेक्षा जास्त खोल्यांचं बुकींग नोंदवलं गेलं आणि अवधी केवळ ४८ तास होता. श्रेय सांगतात, “आमच्याकडे त्यावेळी एकूण ३०० खोल्या होत्या आणि त्यातल्या फक्त ५० खोल्या तयार आणि उपलब्ध होत्या. एका रात्रीत १०० खोल्या म्हणजे एकाच दिवसात सरासरी ४० टक्के व्यवसाय. आम्ही ही संधी हातातून घालवायची नाही असं ठरवलं. हे सगळं घडलं रात्री दहा वाजता. पहिल्या दिवशी आमची बिझनेस डेव्हलपमेंट टीम कामाला लागली. त्यांनी संध्याकाळी पाच पर्यंत गुडगावमध्ये डीएलएफ फेज दोन मध्ये भागीदारीत तीन नवीन प्रॉपर्टीज घेतल्या. आम्ही या जागा शोधल्या आणि त्या कराराने घेतल्या. परिस्थिती अगदी स्पष्ट होती, २४ तासांत या खोल्यांची साफसफाई करुन त्या पाहुण्यांना राहण्यायोग्य बनवणे. पहिल्या दिवशी सकाळीच आमच्या दर्जानुसार खोल्या तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली. सकाळी १० वाजता एका माणसाला आमच्या नेहमीच्या कपडे पुरवठादाराकडे उश्या, पडदे, चादरी आणि टॉवेल्स आणायला पाठवलं. नंतर या पन्नास खोल्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाहुण्यांना राहण्यायोग्य बनवण्याकरता साफ करण्याच्या कामाला सुरूवात झाली. अजून एक सदस्य रात्रभर काम करून आमच्या बोर्ड विक्रेत्याकडून ओयो डोलोप्स (माहितीपुस्तक, फलक) तयार करवून घ्यायच्या कामाला लागला. दुसऱ्या दिवशी पाहुणे यायच्या दोन तास आधी म्हणजे दुपारी एक वाजता ते लावण्यात आले. या नवीन प्रॉपर्टीजमधल्या २० रुम्स कसून साफ करवून घ्यायला मी जातीने हजर होतो. त्यासोबत इतर सदस्यांसोबतही समन्वय साधत होतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी चार वाजता खोली सफाईला सुरूवात झाली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता हे काम पूर्ण झालं. खोल्या राहण्यालायक तयार झाल्या. अखेरीस सहा जणांच्या टीमने तीन नवीन हॉटेल्स ताब्यात घेऊन बघता बघता त्यांना आमच्या पाहुण्यांना राहण्याजोग बनवलं. आमच्या कामातली तत्परता आणि वेगामुळे आम्ही हे निभावलं आणि आज हा अनुभव आणि तत्परता आमच्या कामाची पद्धत बनलीय”.


image


श्रेय म्हणतात, टीमचे सदस्य खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या मते ‘काहीही अडचण असली तरी आपली टीमच सगळी काम पूर्णत्वाला नेते’. आणि काम रेटून पूर्ण करण्याची हीच शक्ती स्टार्टअप ला यशाच्या उंचीवर घेऊन जाते.

संस्थापकाचे बोल

रस्सीखेच आणि प्रक्रिया यांच्यात समन्वय साधण्याचा गुण श्रेय यांच्याकडे आहे. एखाद्या स्टार्टअप कर्मचाऱ्याकडे ही क्षमता असणं खूप महत्वाचं आहे. रितेश म्हणतात, “त्यांना माहिती आहे गिअर्स कधी बदलायचे आणि काहीही करुन काम कसं साध्य करायचं. आम्ही ‘ओयो’मध्ये जे काही उभारत आहोत त्या प्रक्रियेत आमची मूलगामी तत्त्व आहेत. या प्रक्रियेला वेगवान बनवण्याच्या नाड्या आमच्या हातात आहेत. या प्रक्रियेचा वेग कमी झाल्यावर त्यातल्या मोकळ्या जागा भरायचं कामही आम्ही करतो. प्रश्न सोडवण्याची आमची ही पद्धतच आम्हांला वेग देतेय आणि आमच्या यशाचं गमक आहे”. ते पुढे सांगतात की, श्रेय आमच्या सोबत सुरुवातीपासून काम करत आहेत. ओयोच्या सगळ्या मुख्य प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलीय. त्यामुळे त्यांना सगळे जण ओळखतात आणि त्यांच्यासोबत काम करायला लोकांना आवडतं.

श्रेय बद्दल अधिक माहिती सांगताना ओयोमध्ये काम करताना घडलेला एक किस्सा रितेश सांगतात, “एका नवीन हॉटेलला ओयोमध्ये रुपांतरीत करताना काय केलं पाहिजे याची माहिती सांगणारं पहिलं प्ले बुक (Play book) श्रेयने तयार केलं. यामध्ये न संपणारी तपासयादी (चेकलिस्ट), विक्रेत्यांसोबतची घासाघीस आणि काय काय करावं याची माहिती होती. आम्ही या प्रक्रियेला परिवर्तन म्हणू लागलो आणि आमचे टीम सदस्य बनले परिवर्तन करणारे. यात श्रेय बनले मुख्य परिवर्तनकार (Optimus Prime)”.

जाता जाता ओयोचे मुख्य परिवर्तनकार श्रेय एक मोलाचा सल्ला देतात, “तुम्ही जे करत आहात ते कराच. पण जर तुम्हांला ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने करावीशी वाटत असेल तर ते करण्यासाठी तुम्ही बोलून मोकळे व्हा, टाळू नका”.

लेखक : तन्वी दुबे

अनुवाद : साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags