संपादने
Marathi

नभ पंखांखाली! निशिताची गगनभरारी!!

Chandrakant Yadav
10th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘‘प्रगतीची वाट हीच माझ्या जीवनाची वाट आहे. अखेरच्या क्षणापर्यंत मी याच वाटेवर चालणार आहे. ‘कम्फर्ट झोन’ भेदण्यात मला हेच तत्व उपयोगाला आले. त्रास पत्करला, जोखमी स्वीकारल्या. मात केली आणि मग मात दिली.’’ ‘माय लाइफ ट्रान्स्क्रिप्ट’च्या सीईओ निशिता मंत्री यांचे हे सांगणे.

निशिता यांनी आपल्या जीवनातल्या प्रत्येक नकारात्मक बाजूला आपल्या प्रयत्नांच्या बळावर सकारात्मक दिशेत वळवण्यात यश प्राप्त केले. निशिता एका विखुरलेल्या कुटुंबातील मुलगी. जाडजुड असल्याकारणाने सगळेच तिला हसत. एक बेपर्वा, उद्दाम अशी मुलगी म्हणून त्या वाढल्या, पण पुढे अर्थातच सगळे बदलले. या बदलाचे श्रेय त्यांच्या आईलाच आहे. निशिता आईला ‘मिस्टर आई’ म्हणतात. अर्थात यात गमतीचा भाग नाही. आईला उद्देशून ‘मिस्टर आई’ ही संभावना अत्यंत गंभीर अशी आहे. निशिता यांच्यासाठी बापाची भूमिकाही आईनेच बजावली, हे या संभावनेमागचे कारण.

image


आईनेच त्यांच्यात आत्मविश्वासाची रुजवण केली. आयुष्यात जेव्हा केव्हा काही समस्या आली असेल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला आईच त्यांच्यासोबत उभी राहिली आणि समस्येचा, संकटांचा सामना कसा करावा, ते शिकवले. निशिता यांनी सीईओ म्हणूनही पुढे प्रत्येक संकटाचा मुकाबला मोठ्या धाडसाने केला, धैर्याने केला. मजबूत पायावर उभे असलेले स्वत:चे व्यक्तिमत्वच त्यासाठी त्यांना उपयोगी पडले. आईचीच ही देणगी.

निशिता स्वत: फार बोलत नाही. अनेकदा तर मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌ अशी त्यांची भूमिका असते. तुमचे काम बोलत असेल तर तुम्हाला फार बोलण्याची आवश्यकता पडत नाही, या तत्वावर त्यांचा विश्वास आहे. त्या म्हणतात, ‘‘मी नेहमी स्वत:शी स्पर्धा करते. स्वत:लाच आव्हान देते आणि स्वत:शी मुकाबला करत स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणते.’’

अर्थात जगण्याने त्यांना खूप काही दिलेले आहे, पण जसजसे वय वाढते आहे, तसतशी वडिलांची उणीव त्यांना जास्तच भासते आहे. ते असते तर हे करता आले असते, ते असते तर ते शक्य झाले असते, असे सारखे त्यांना वाटत राहते. जिवलग मित्राचा अभावही त्यांना जाणवतो. इतरांसाठी आपण दुसरा पर्याय आहोत, ही भावना त्यांना सलत राहते. मग हीच सल त्या एका चांगल्या वळणावर लावत गेल्या. पुस्तके त्यांच्या मदतीला जणू धावून आली. कार्यशाळांचा धडाका त्यांनी लावला. वाटचाल पुढेच पुढे सुरू ठेवली. मागे वळून पाहणे जरा कमी केले.

निशिता यांचे आयुष्य आता स्वत:च्या आयुष्याबाहेर पडले. इतरांच्या आयुष्यात आपण काही चांगले बदल घडवून आणायचे, अशी त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली. सुखासाठी लोक किती झगडतात. अनेक लोकांना स्वत:ची ओळखही पुरती पटलेली नसते, या उणिवा आपण भरून काढू शकतो म्हणून निशिता यांनी एका चांगल्या अर्थाने इतरांच्या आयुष्यात डोकावणे सुरू केले. ‘माय लाइफ ट्रान्स्क्रिप्ट’ हे त्यांच्या याच आकांक्षेचे रूपडे! मूल्यशिक्षण देणारी ही एक संस्था आहे. तीन वर्षांपासून ते पुढे निर्णयक्षम वयापर्यंत मुला-मुलींना मूल्यशिक्षण देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

निशिता सांगतात, ‘‘लहानपणापासूनच मूल्यांची रुजवण आमच्यात होत आलेली असेल तर जसजसे आम्ही मोठे होत जातो, खुप साऱ्या गोष्टी, खुप सारे मुद्दे स्पष्ट होत जातात.’’ अर्थात हे निशिता यांचे पहिलेच कार्य आहे, असे नाही.

image


निशिता यांचा एकुणातील प्रवास हा सतत कार्यमग्नतेचा प्रवास आहे. अभ्यासात त्या हुशार होत्या. मुंबई विद्यापीठातून त्यांनी ‘मास मिडिया अँड कम्युनिकेशन’मध्ये पदवी संपादन केली. पुढे ॲअॅडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगमध्ये एमए करण्यासाठी त्या लिड्‌स विद्यापीठासाठी रवाना झाल्या. मंदीच्या काळात भारतात परतल्यानंतर त्यांच्या मारवाडी मुळांनी त्यांना व्यवसायात ओढून आणले.

कुठल्याही अनुभवाचा आधार नसताना एखादा व्यवसाय सुरू करणे काही चांगले नाही, असे सगळेच सांगतात. निशिता यांच्या मित्रांचेही हेच म्हणणे होते, पण निशिता यांच्या मते ही गोष्ट म्हणजे एक पृर्वग्रहदूषित दृष्टिकोनच. त्या सांगतात, ‘‘मला व्यवसायासाठी एखाद्या आराखड्याची, अनुभवाची अशी गरज नव्हती. कारण मला पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करायचाच नव्हता. मला माझ्या पद्धतीनेच त्याची सगळी रचना करायची होती. मग अनुभवाचा संबंध येतोच कुठे?’’

२००९ मध्ये त्यांनी ‘बांबू शुट स्पर्धा’ सुरू केली. मुंबईतील काही कॉलेजांतून तसेच व्यवस्थापन संस्थांतून अध्यापनही सुरू केले. आजही हे सुरू आहे. त्यांनी एक पुस्तकही लिहिलेय. ‘ब्रँड मॅनेजमेंट’ हे या पुस्तकाचे नाव. हे पुस्तक ‘मास मिडिया अँड कम्युनिकेशन’च्या पदवीसाठी तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट झालेले आहे, हे विशेष!

‘‘मी जेव्हा मागे वळून पाहते. सहा वर्षांच्या या प्रवासात माझ्या दिमतीला कुठलेही साचेबद्ध नियोजन नव्हते. मी फक्त माझे मन आणि विचार असे मोकळे म्हणजे अगदी मोकाट सोडलेले होते म्हणा हवं तर. वाटेवर जे जे म्हणून आले, त्या त्या सगळ्यातनं मी शिकत गेले. आपले स्वत:चे काम सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे माझ्या मनाने मला सांगितले. मी ते ऐकले आणि माझी स्वप्ने रचली. ती साकार करत गेले.’’

आई-वडिल विशेषत: आई, निशिता यांच्यासाठी प्रेरक आहेत. वडिलही नेहमी म्हणत, बाकी काहीही असो. मी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यावर खुप प्रेम करतो. निशिता सांगतात, ‘‘तुमच्या जवळच्या लोकांकडून जेव्हा तुम्ही असे आश्वस्त करणारे शब्द नेहमी-नेहमी ऐकता, तेव्हा त्यातनं तुमच्यात शक्तीचा संचारतेच. प्रयत्न करण्याची शक्ती, अपयश पचवण्याची शक्ती, आणि काही तरी मी करेनच, करून दाखवीनच, या आत्मविश्वासासाठीची शक्ती मला या शब्दांतूनच मिळाली.’’

आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनुभवांनी निशिता यांनी महिला व्यावसायिकांसमोर उभ्या ठाकणाऱ्या समस्यांच्या, अडचणींच्या बाबतीत खुप काही जाणून घेतले आणि आता त्या आपल्या WIN (वुमेन एंटरप्रनर्स इंडिपेंड नेटवर्क) नावाच्या एका उपक्रमातून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताहेत. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताहेत. ‘विन’ हा घरबसल्या काम करणाऱ्या फ्रीलांसर महिलांचा एक गट आहे. या सगळ्या जणी आपापल्या कामात उत्कृष्ट आहेत, पण आपल्या गुणांचे भांडवल करण्यात त्या कुठेतरी कमी पडतात. नेमकी इथेच त्यांना निशिता यांच्याकडून मदत मिळते. निशिता म्हणतात, ‘‘आम्ही या महिलांची मदत करतो. त्यांचे ब्रँडिंग करतो. त्यांच्या कौशल्याला मूल्य मिळवून देण्यात त्यांची मदत करतो.’’

निशिता यांची आगामी कार्यशाळा ही ‘भावनात्मक निर्मळपणा आणि तो कायम राखण्यातील कौशल्य’ या विषयावर आधारित आहे. आव्हानांचा सामना करण्यात भावनात्मकदृष्ट्या निर्मळ असणे मला नेहमी मदत करणारे ठरले आहे, असे निशिता स्वत: सांगतात. आपल्या कामाबद्दल इतर लोक काय म्हणतात, त्यापेक्षा आपल्याला स्वत:ला काय वाटते, यावरच निशिता यांचा भर राहिलेला आहे. त्या आशावादी आहेत. नकारात्मक लोकांपासून आणि अशा विचारांपासून त्या चार हात दूर राहातात.

image


स्वाभिमान आणि स्वत:ला परिपूर्ण मानणे, अगदी कुठल्याच बाबतीत कमी न लेखणे या गोष्टी त्यांच्या जगण्यात सगळ्यात महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत.

त्या म्हणतात, ‘‘स्वाभिमान आणि स्वमूल्य एकसारखे वाटण्याचा संभव आहे, पण दोघांत एक फरक आहे. तुमचा ‘स्वाभिमान’ जगाला तुमची ओळख करून देतो आणि तुमचे ‘स्वमूल्य’ तुम्हाला तुमची ओळख करून देते.’’

निशिता बरेचदा आपल्या ग्राहकांना कमी लेखत. त्यांच्या टिममधील अन्य सदस्यांनाही निशिता यांचा हा दृष्टिकोन पटत नसे. निशिता सांगतात, ‘‘एकदा एका मित्रासोबत कॉफी पित असताना मी आत्मचिंतन केले आणि मला एक नवा मार्गच सापडला. ध्येयाच्या दिशेने पसरलेला हा जणू एक प्रकाश होता. अरे ग्राहकासाठीच तर आपली सेवा आहे, त्याला कमी लेखून कसे चालेल. कॉफी संपली पण चिंतनाचा प्रवास सुरूच राहिला, यातनं जे काही समोर आले ते सगळेच महत्त्वाचे आहे. निशिता स्वत:ची ‘प्रगतिपथावरील एक स्त्री’ अशीच व्याख्या करतात. इतर महिलांसाठी विशेषत: उद्यमी महिलांसाठी कॉफी टेबलवर सुरू झालेल्या चिंतनातून त्यांनी काही टिप्स काढलेल्या आहेत,

महिलांसाठी टिप्स अशा :

१) मोकळेपणाने बोला

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक ऊर्जा असते. सकाळी सहापासून महिला कामाला भिडू शकतात आणि मध्यरात्रपर्यंत कामावर टिकू शकतात. महिला फक्त कामाचे तेवढे बोलण्यात मागे पडतात. महिला तक्रारी करतात, पण वास्तविक मुद्दे समोर आणत नाहीत. काळज़ीची कारणे वाटून घेत नाही. आपले मन मोकळे करत नाहीत.

२) आपले प्राधान्यक्रम ठरवा

एका महिला व्यावसायिकासमोर नेहमीच आपला व्यवसाय आणि घरातल्या कामांचा ताळमेळ बसवण्याचे आव्हान असते. मुले, नवरा, सासू-सासरे, आई-वडिल, सामाजिक जबाबदाऱ्या अशा खुप गोष्टी असतात. महिला नातेसंबंधांना जरा जास्तच प्राधान्य देतात. मी सांगेन, की परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम ठरवा.

३) आपली आवड निश्चिेत करा

महिला त्यागाची मूर्ती असते. महिलांनीच त्याग करायला हवा, ही जी काही पारंपरिक भावना आहे, महिलांनी तिचाच त्याग आधी करावा. बहुतांश महिला तडजोडी आणि त्यागाच्या या ‘खतरनाक’ चक्रव्युहात अडकून आपले व्यक्तिमत्वच हरवून बसतात. ‘मला काय आवडते, माझी पसंत काय, हे त्या सांगतच नाहीत. आपल्या आतला आवाज ऐका. मनाचे ऐका. आपली आवड ठरवा. आवडीचे काम ठरवा. आपल्यातले जे जे सर्वोत्तम आहे, ते ते सारे या कामात झोकून द्या. यश तुमच्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही…

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags