संपादने
Marathi

आदिवासी भाषा, साहित्य जपण्याची जिद्द : प्रसन्ना

Chandrakant Yadav
18th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एका आदिवासी गावात त्यांना मारझोड झाली. खांदे दुखावले. गंभीर इजा झाली. उपचारासाठी त्यांना आपल्या घरी विशाखापट्टणमला परतावे लागले. एस. प्रसन्ना श्री यांचा हा अनुभव. पण जशा त्या बऱ्या झाल्या, त्यांनी पुन्हा विशाखापट्टणम सोडले आणि पूर्ववत आदिवासींमध्ये मिसळल्या. आपल्या कामाला सुरवात केली. मारहाणीने खचल्या नाहीत. आदिवासींचे तोंडी साहित्य उदाहरणार्थ गाणी, लोककथा वगैरे समजून घेत ते सगळेच लिपिबद्ध करण्याचा एस. प्रसन्ना श्रींचा मानस होता.

१९९१ ते २००५ दरम्यान मध्य भारतातील जवळपास १६७ आदिवासी गावांतून अशा गोष्टी एकत्र करत, त्या समजून घेत आणि त्या सगळ्या लिपिबद्ध करत म्हणजेच लिहून घेत त्या फिरत राहिल्या. २००६ पर्यंत त्यांनी आदिवासींच्या १८ लिपीही शोधून काढल्या. विशेष म्हणजे तोवर या लिपींबद्दल कुणालाही काहीही माहिती नव्हती. किवा कुणी ती मिळवण्याचा प्रयत्नही केलेला नव्हता. १८ आदिवासी लिपी शोधून समाजासमोर ठेवण्याचे श्रेय केवळ त्यांचे आहे.

image


आंध्र प्रदेश विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीज्च्या अध्यक्षा प्रा. डॉ. एस. प्रसन्ना यांची ही यशकथा आहे. स्वत: प्रसन्ना देखिल आदिवासी आहेत. त्यांच्या जमातीतून इंग्रजीच्या प्राध्यापिका बनल्या, अशाही त्या एकमेव आहेत.

प्रवासाचा प्रारंभ

प्रसन्ना यांनी ध्येयाला वाहिलेल्या आपल्या या प्रवासाला १९९१ मध्ये प्रारंभ केला. त्यांची मुलगी त्यावेळी फार लहान होती. प्रसन्ना यांनी तेव्हा विशाखापट्टणमजवळील अराकू घाटाचा दौरा केला. हा भाग निसर्गरम्य आहे. इथे कितीतरी आदिवासी जमाती वास्तव्याला आहेत. या जमातींची पारंपरिक गाणी ऐकून प्रसन्ना कमालीच्या प्रसन्न झाल्या. जेव्हाही या भागात त्या जात तेव्हा सोबत टेपरेकॉर्डर नेत आणि गाणी रेकॉर्ड करत. प्रसन्ना सांगतात, ‘‘आदिवासींमध्ये मिसळणे म्हणजे तोंडाचा खेळ नाही. जाती बाहेरच्या लोकांना हे लोक जणू जगाबाहेरचे समजतात. मी नेहमी त्यांच्या गावी जाई. ही बाई वारंवार का येते म्हणून ते माझ्याकडे संशयाने पाहू लागलेले होते. एक प्रकारची भीती त्यांना बसली होती. गावच्या प्रमुखाने मला शेवटी बोलावूनच घेतले. मी इथे का येते म्हणून चौकशी केली. मोठ्या मुश्किलीने अखेर मी त्यांचा विश्वास जिंकला. त्यांची भाषा शिकले. हळूहळू त्यांनी मला स्वीकारले. फार संघर्ष मला त्यासाठी करावा लागला.’’

शोध आपुल्या मुळांचा...

प्रसन्ना स्वत:च आदिवासी. त्यांच्याही मुळा घाटातल्या. दुर्गम पहाडी भागातल्या. प्रकाशम जिल्ह्यातील एका आदिवासी गावात त्यांच्या पूर्वजांचे घर आजही आहे. अर्थात त्यांनी हे घर कधीही पाहिलेले नाही. त्या तिथे गेलेल्याही नाहीत, पण त्यांना हे ठाऊक होते, की नैसर्गिक साधनसामुग्रीसाठी आदिवासी कसे नाडले जातात आणि प्रस्थापित व्यवस्था आदिवासींना कायम धाकात ठेवत आलेली आहे. प्रसन्ना यांची आजी त्यांना एकदा म्हणाली होती, ‘‘तू जग आपल्या डोळ्यांनी बघू इच्छितेस, की चष्म्याने?’’ प्रसन्ना स्वाभाविकपणे म्हणाली, ‘‘डोळ्यांनी.’’ याचदरम्यान आजीने मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. मातृभाषा येणे आणि तिचा अभिमान बाळगणे याबद्दलही आजी बोलली. मातृभाषेत व्यक्ती जेवढी पक्की कळते, तेवढी मुख्य प्रवाहातील वा नव्याने अंगिकारलेल्या भाषेतून कळत नाही.

प्रसन्ना म्हणतात, ‘‘आपल्या चोहिकडे जे जे म्हणून उपलब्ध आहे, ते ते आपलेसे करण्यात वावगे काहीही नाही, पण प्रत्येकाला आपल्या स्वत:च्या मुळांचा, परंपरेचा, संस्कृतीचा गर्व असावा. आणि या मुळांशी आपली नाळ जुळलेली आहे म्हणून प्रत्येकानेच अभिमानही बाळगायला हवा.’’

image


आदिवासी मौखिक परंपरांचे संरक्षण, आदिवासी समुदाय आणि व्यक्तींची ओळख, महिला बचत गट, शाळा, युवा मंडळे, समुदायांच्या नेत्यांशी भेटीगाठी अशा विषयांमध्येच प्रसन्ना आजकाल गुरफटलेल्या असतात. आदिवासींच्या जगण्यात सुधारणा घडवून आणणे, आदिवासी भाषांच्या ज्ञानाबद्दल जागरूकता आणणे, आदिवासी भाषा नामशेष करण्याच्या सांस्कृतिक डावाविरुद्ध संघर्ष करणे हे सारे प्रसन्ना यांचे ‘मिशन’ आहे. विविध आदिवासी जमातींतील अनेकांसाठी त्या प्रेरणा बनलेल्या आहेत.

आव्हानेच आव्हाने

आदिवासींमधील विविध जमातींतून स्वीकारार्ह होण्यासाठी प्रसन्ना यांना कठोर संघर्ष करावा लागलेला आहे. आदिवासी स्वत:च आसपासच्या व मुख्य प्रवाहातील अन्य भाषांच्या प्रभावात येऊन स्वत:ची भाषा विसरत चाललेले होते, या मुख्य अडचणीविरुद्ध त्यांना विशेष लढा द्यावा लागला. आदिवासी भाषांतील कितीतरी मूल्यवान शब्द लुप्त झालेले होते. कितीतरी लुप्त होण्याच्या मार्गावर होते. प्रसन्ना यांनी विचार केला, की जे काही आदिवासींचे साहित्य शिल्लक आहे, ते तरी सांस्कृतिक वारसा म्हणून संकलित करायला हवे. त्याचे रेकॉर्ड ठेवायलाच हवे.

अशा विषयावर काम करायला एक बाईमाणुस असणे ही प्रसन्ना यांची दुसरी मोठी समस्या होती. नोकरशाहीपासून ते सामान्य माणसांपर्यंत कुणीही त्यांना अनुकुल होईना. समाजातील प्रस्थापित घटक आदिवासींची परिस्थिती सुधारण्याच्या प्रसन्ना यांच्या प्रयत्नांच्या विरोधात होते. आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार करून, त्यांना आपल्या हक्कांबद्दल संघटित करून प्रसन्ना नोकरशाहीविरुद्ध उभे करीत आहे, असा नोकरशाहीचा समज होता. प्रसन्ना यांना एका गावात झालेल्या मारहाणीमागे असाच एक नाराज गट होता.

सहधर्म्यांकडून प्रेरणा

जगाच्या पाठीवर इतर भागांतून आदिवासी साहित्याला भाषेचे रूपडे देत पुनरुज्जिवित करू इच्छिणाऱ्या अन्य मान्यवरांकडूनही प्रसन्ना यांना प्रेरणा मिळाली. समाजशास्त्रज्ञ असलेले पती आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेली मुलगी यांचेही सहकार्य त्यांना लाभले. प्रसन्ना यांचा अवघड मार्ग यामुळेच सुकर होऊ शकला. प्रसन्ना यांनी आजअखेर २५ पुस्तके लिहून झालेली आहेत. पैकी काही पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट आहेत.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags