संपादने
Marathi

महिलांचे खऱ्या अर्थाने भाऊ आहेत अरुणाचलम मुरुगानन्थम

अरुणाचलम मुरुगानन्थम यांच्या अनोख्या कामगिरीने जगभरातल्या महिलांचे आयुष्य बदलले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा लाभ करोडो महिलांना होत आहे. जोपर्यंत त्यांनी बनवलेल्या उत्पादनापेक्षा आणखी काही नाविन्यपूर्ण, माफक दरात उत्पादन केलं जाणार नाही तोपर्यंत महिलांना त्यांचे उत्पादन लाभदायी ठरणार आहे. तामिळनाडूच्या कोयम्बतूर शहरामध्ये राहणारे मुरुगानन्थम यांनी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या मशीनची निर्मित्ती करून जगभरात एक सामाजिक क्रांती केली आहे. मुरुगानन्थम यांच्या कारख़ान्यांमध्ये तयार होणाऱ्या या मशीनद्वारे तयार केल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर जगभरातल्या करोडो महिला करत आहे. ज्याच्या वापरणे अनेक अडचणींवर मात करणे त्यांना शक्य झाले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या यशामागे अनेक लहानमोठे पैलू दडलेले आहे, कुतूहल निर्माण करणारे आहे, नवनवीन गोष्टीचा वेध घेणारे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या पत्नीचे मन जिंकण्यासाठी मुरुगानन्थम यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षातच त्यांचे खूप मोठे यश सामावलेले आहे. मुरुगानन्थम यांना महिलांनी न सांगितलेल्या त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांच्या आई आणि पत्नी पासून दूर राहावे लागले, त्यांचा तिरस्कार सहन करावा लागला. एवढेच नाही तर सामाजिक रोषालाही सामोरे जावे लागले. अनेकांनी त्यांना वेडा म्हणून हिणवले. त्यांना मनोरुग्ण म्हणूनही हिणवले. गावपंचायतीने तर त्यांना वाळीत टाकण्याचे फर्मान सोडले. अपमान, निंदा, द्वेष, तिरस्कार आणि बहिष्कार सारं काही सहन करून सुद्धा मुरुगानन्थम यांनी हार नाही मानली. महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याचे आपले प्रयोग त्यांनी सुरूच ठेवले. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या प्रयोगांना यश मिळाले आणि एक मोठी सामाजिक क्रांती झाली आणि त्याचे प्रणेते ठरले मुरुगानन्थम. त्यांच्या या सामाजिक क्रांतीने त्यांचे नांव जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नोंदवले गेले. महत्वाचे म्हणजे मुरुगानन्थम यांनी एकट्यानेच आपल्या छोट्याशा कारखान्यात हे सर्व प्रयोग केले. त्यांच्याबरोबर कोणीही सहाय्यक नव्हता ना कोणी सल्लागार. हे काम करत असताना त्यांना कोणी आर्थिक मदतही केली नाही. दिवस-रात्र आपल्या मेहनतीची कमाई त्यांनी या प्रयोगासाठी वापरली. जिद्द, सातत्य, कठोर परिश्रम करत त्यांनी अविरतपणे प्रयोग केले. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. मुरुगानन्थम यांची यशोगाथा प्रभावित करणारी आहे, प्रेरणा देणारी आहे. लोकांमध्ये नवीन उत्साह संचारणारी आहे.

1st Jul 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

या ऐतिहासिक कहाणीची सुरवात झाली तामिळनाडूच्या कोयम्बतूर या शहरापासून काही किलोमीटर दूर पापनायकनपुडूर गावापासून. पापनायकनपुडूर गावात अरुणाचलम मुरुगानन्थम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अरुणाचलम हथकरघा एक विणकर होते. आई वनिता या गृहिणी होत्या. त्यांचे कुटुंब खूप मोठे होते. मुरुगानन्थम यांच्या पणजोबांची २४ आणि आजोबांची ६ अपत्य होती. आजोबांच्या सहा मुलांमध्ये अरुणाचलम यांच्या वडिलांचा तिसरा क्रमांक होता. मुरुगनाथम यांच्या आईच्या परिवारात २३ मुले होती त्यांच्या आईचा क्रमांक चौथा होता. मुरुगानन्थम यांचे एकत्रित कुटुंब होते. त्यांचे अनेक नातेवाईक त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात वास्तव्याला होते. मुरुगानन्थम हे आपल्या आई-वडिलांचे पहिलेच अपत्य होते. त्यानंतर त्यांना दोन बहिणी झाल्या.

image


आश्चर्याची बाब म्हणजे वनिता जेव्हा पहिल्यांदा गर्भवती होत्या तेव्हा त्यांची इच्छा होती की, त्यांना पहिली मुलगी व्हावी. पण त्यांना मुलगा झाला. त्यांचे आई-वडील प्रचंड धार्मिक होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचे नाव तामिळ भाषेतील दैवत म्हटल्या जाणाऱ्या ‘मुरुगन’ यांच्या नावावरून ‘मुरुगानन्थम’ असे नाव ठेवण्यात आले. सर्वजण त्यांना प्रेमाने ‘मुरुगा’ म्हणायचे. त्यांच्या आईला मुलींची आवड म्हणून त्यांची आई त्यांना मुलींसारखे कपडे घालत असत. लहानपणीच्या आठवणी ते खूप आनंदाने सांगतात.

“लहानपणी माझी आई मला मुलींप्रमाणे नटवायची, माझे केस कापत नसे. माझ्या लांब वाढलेल्या केसांची ती वेणी घालायची . नटूनथटून मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा मला माझे मित्र चिडवायचे, पण काही दिवसांनी मात्र मला त्याची सवय झाली”.

image


मुरुगा यांना शिक्षणसाठी सरकारी शाळेत घालण्यात आले. तेव्हाची शाळा हल्ली असणाऱ्या शाळेप्रमाणे नव्हती. शाळेमध्ये चार भिंती आणि दरवाजे नव्हते. खाली जमिनीवर बसूनच अभ्यास करावा लागायचा. सर्व शिक्षण तमिळ भाषेतच होत होते. शाळेजवळच खेळण्यासाठी मैदान होते. शेती परिसर, पशुपक्षी यांच्या मध्येच मुरुगा यांचे बालपण गेले. मुरुगानन्थम सांगतात की, “ माझं शिक्षण चार भिंतीच्या आत झालं नाही, निसर्गाशी जवळ राहून माझं शिक्षण झालं. मी लहानपणी फुलपाखरू, पक्षी आणि जनावरांच्या मागे मागे पळायचो. झाडांवर चढायचो, शेत आणि मैदानात खेळायचो. लहानपणी ९० टक्के गोष्टी मी निसर्गाकडून शिकलो आणि केवळ १० टक्के शिक्षण मी शाळेतील शिक्षकांकडून घेतले.”

मुरुगानन्थम यांचा जन्म सोनार समाजात झाला, पण त्यांची मैत्री गुराखी, कसाई, न्हावी यांच्या मुलांबरोबर होती. ते सांगतात की, “मला उत्सुकता असायची की एक गुराखीचा मुलगा एकटाच कसे काय दोनशे-तीनशे बकऱ्यांचा सांभाळ करायचा ? मी त्या गुराख्याच्या मुलाबरोबर तासनतास घालवायचो, त्याच्या जनावरांना फिरवायचो. कसाई किवा न्हाव्याच्या मुलाबरोबर खेळून आल्यावर माझी आई माझ्या डोक्यावर घडाभर पाणी ओतायची. अंघोळ करून शुद्ध झाल्यावरच मला घरात घ्यायची”.

मुरुगानन्थम फक्त त्याच्या वयातील मुलांशी खेळायाचे असे नाही तर ते त्यांच्या वडिलांना कामात मदतही करायचे. मुरुगानन्थम यांना लहान वयातच समज आली होती की त्यांच्या वडिलांचे अत्यंत मेहनतीचे काम आहे. लाकडाच्या मशीनवर सुती कापड विणणे सोपे काम नव्हते. मुरुगानन्थम यांचे वडील एक कलाकारही होते. पंधरा दिवसांनी ते सुताच्या साडीचे डिझाईन बदलयाचे आणि नवीन डिझाईन तयार करायचे. मुरुगानन्थम त्यांचे वडील अरुणाचलम यांची मेहनत आणि कारीगिरी पाहून खूप प्रभावित व्हायचे. त्यांच्या वडिलांच्या कमाईवरच घर चालायचे, पण वडिलांचे छत्र त्यांना फार काळ लाभले नाही. रस्त्यावर एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचा अपघात झाला तेव्हा मुरुगानन्थम उच्च माध्यमिक शाळेत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तीन मुलांना आणि कुटुंबाला सांभाळायची जबाबदारी वनिता यांच्यावर आली. त्या दिवसांमध्ये तमिलनाडु येथील गावातील महिलांना फक्त शेतातच काम दिले जायचे. त्यांच्या आईने शेतात मजुरी करायला सुरवात केली. शेतात दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या आईला केवळ १० ते १५ रुपये मिळायचे. संसार चालवायला एवढीशी रक्कम पुरेशी नव्हती. वनिता जरी दिवसाचे १० ते १५ रुपये कमवत असल्या तरी आपल्या मुलांनी खूप शिकून मोठ्या पदावर काम करावे अशी त्यांची इच्छा होती.

मुरुगानन्थम सांगतात, “ माझ्या आईला मी पोलिस अधिकारी, माझ्या छोट्या बहिणीने वकील आणि सर्वात लहान बहिणीने कलेक्टर व्हावे असे वाटत होते. माझ्या आईला तमिळ चित्रपट पाहायला आवडायचे. चित्रपट पाहून आई खूप प्रभावित व्हायची. तिला वाटायचे की, ज्याप्रकारे चित्रपटामध्ये वैजयंतीमाला, हेमा मालिनी आणि साहुकार जानकी कमाल करून दाखवतात, त्याचप्रकारे तीही तिच्या आयुष्यात काहीतरी कमाल करून दाखवेल. चित्रपट आणि वास्तविक आयुष्य यामधला फरक तिच्या लक्षात यायचा नाही. वास्तव स्वीकारणे खूप कठीण असते.” मुरुगानन्थम यांना त्यावेळी त्यांच्या आईच्या इच्छा आंकाक्षा पूर्ण करणे अशक्यप्राय वाटत असले तरी त्यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दाखवून दिले.

मुरुगानन्थम यांनी जेव्हा पाहिले की, घराचा भार उचलण्यासाठी आई दिवस-रात्र मेहनत करते आहे, तेव्हा त्यांनी एक निर्णय स्वतःच घेऊन टाकला. चौदा वर्षाच्या मुरुगा यांचा तो निर्णय होता शाळा सोडून देऊन आईला हातभार लावायचा. त्यांनी निर्णय घेतला आणि शाळा सोडून दिली. दहावीचा अभ्यास मध्येच सोडून दिला. मुरुगानन्थम यांनी सांगितले की,

“ मी शाळा सोडून देण्याचा निर्णय एका लिंबाच्या झाडाखाली बसून घेतला होता. त्यादिवशी सुद्धा मी माझ्या एका गुराखी मित्राबरोबर जनावरांना चरवायला घेऊन गेलो होतो. मध्येच आम्ही एका लिंबाच्या झाडाखाली थांबलो होतो. त्या ठिकाणीच मला जाणीव झाली की माझी आई एकटीच मेहनत करत आहे. म्हणून मग मी शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.”

शाळा सोडून दिल्यानंतर मुरुगानन्थम यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली. कधी फटाक्यांची विक्री केली तर कधी गणपतीच्या मूर्ती विकल्या. काही दिवस त्यांनी उसाचीही विक्री केली. कोणाचं तरी पाहून त्यांनी इडल्यादेखील विकल्या. एका छोट्याशा वेल्डिंग वर्कशॉप मध्ये नोकरी मिळाल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. वयाने लहान असल्याने तिथले वरिष्ठ त्यांना बीड़ी-सिगरेट आणि चहा-पाणी आणायचे काम सांगत असत, असे असले तरी इतरही कामे त्यांनी लवकरच शिकून घेतली.

image


वेल्डिंगच्या कामाबरोबरच त्यांना आणखी एक काम करावे लागायचे ते म्हणजे वेल्डिंग वर्कशॉपचा मालक जेव्हा दारू पिऊन कुठेही पडायचा तेव्हा मुरुगानन्थम त्याला उचलून घरी सुखरूप पोहचवत असे. मुरुगानन्थम यांनी सांगितले की, “वर्कशॉपचे मालक इतके दारू प्यायचे की तोल जाऊन ते नेहमी नाल्यामध्ये पडायचे, त्यांचे भारदस्त शरीर नाल्यातून बाहेर काढून त्यांना खांद्यावर उचलून घरी घेऊन जाणे म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत होती, पण त्यांना मी व्यवस्थितपणे घरी पोचवायचो.

image


अशा प्रकारचे काम त्यांना बरेच दिवस करावे लागले, मात्र जेव्हा त्यांना हे काम नकोसे झाले तेव्हा त्यांनी वर्कशॉपच्या मालकाला जाऊन सांगितले कि ते पुन्हा काम करण्यासाठी वर्कशॉपमध्ये नाही येणार. मुरुगानन्थम यांचे बोलणे ऐकून वर्कशॉपचे मालक बेचैन झाले. मालकाला मुरुगानन्थम यांच्या चांगुलपणाची जाण होती, त्यांनी मुरुगानन्थम यांना सोडून जाऊ नये म्हणून सांगितले आणि त्यांच्या वर्कशॉपचे मालक म्हणून काम पाहायला सांगितले. मालकाचे बोलणे ऐकून मुरुगानन्थम यांना धक्का बसला, कारण त्यांना हे कळत नव्हते की मालक नशेमध्ये तर बोलत नाही ना. पण तसे काही नव्हते मालकाने गंभीरपणे हा प्रस्ताव समोर ठेवला होता. तेव्हा कुठे मुरुगानन्थम यांना खात्री पटली, पण मुरुगानन्थम यांच्याकडे इतकी रक्कम नव्हती की ते हे वर्कशॉप खरेदी करतील. त्यांनी तसे मालकालादेखील सांगितले. मुरुगानन्थम असमर्थ असल्याचे पाहून मालकानेच त्यांना एक उपाय सांगितला. मालक त्याचे वर्कशॉप सावकाराकडून कर्ज काढून चालवत होता. त्यांनी मुरुगानन्थम यांना सावकाराकडून कर्ज घेऊन वर्कशॉप खरेदी करण्याचा सल्ला दिला. मुरुगानन्थम यांनाही मालकाने दिलेला सल्ला पटला. आणि किरकोळ कामगाराचे काम करणारे मुरुगानन्थम वर्कशॉपचे मालक झाले.

image


मालकी हक्क मिळाल्यावर मुरुगानन्थम यांनी वर्कशॉपची साफसफाई केली. वर्कशॉपचे नावही बदलले. धार्मिक प्रवृत्तिचे असल्याकारणाने त्यांनी वर्कशॉपचे नाव धनदेवता लक्ष्मीचे नाव दिले. मुरुगानन्थम आता व्यावसायिक झाले होते. ते सांगतात, मी खूप आनंदी होती कि, मी स्वतःचा व्यवसाय करायला सुरवात केली होती. सुरवातीपासूनच मला काहीतरी वेगळे करायचे होते, ज्याची संधी माझ्या हाती लागली होती.”

मुरुगानन्थम यांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. जे इतर वर्कशॉपमध्ये काम चालयचे तसे न करता त्यांनी वेल्डिंगच्या नवनवीन डिजाईन तयार केल्या. बंगले, भवन, दुकानं, यासाठी लागणाऱ्या ग्रीलसाठी नवीन डिझाईनच्या जाळ्या त्यांनी बनवल्या. मुरुगानन्थम गर्वाने सांगतात की, “त्या दिवसात बहुतांश वेल्डर दारू प्यायचे आणि नशेतच काम करायचे. नशेत राहून गोल, चौकोनी अशा विविध प्रकारच्या डिझाईन बनवणे शक्य होत होते. डोळे बंद करून कोणीही वेल्डर अशी काम करू शकत होता, मात्र मी असे काहीही केले नाही. घरासमोर माझ्या बहिणी ज्या डिझाईनच्या रांगोळ्या काढायच्या तश्याच पद्धतीचे मी ग्रील बनवायचो”

मुरुगानन्थम यांच्या या नाविन्यपूर्ण डिजाईनमुळे त्यांच्या कामाची मागणी वाढू लागली. खूप कमी वेळात त्यांचे नाव मोठे झाले. लोकं दुरून त्यांच्याकडे काम घेऊन येऊ लागले. नुसते नावच मोठे झाले नाही तर त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारली. त्यांचा व्यवसाय चांगल्याप्रकारे जोर धरू लागला होता. त्यांचे लग्नाचे वयही झाले होते. त्यांच्या आईने मुली शोधण्यास सुरवात केली.

१९९८मध्ये मुरुगानन्थम यांचा विवाह शांती यांच्याबरोबर झाला. लग्नानंतर मुरुगानन्थम यांच्या जीवनात बरेच बदल झाले. आपल्या पत्नीला खुश ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू लागले. तिच्यावर त्यांची छाप पडेल यासाठी प्रयत्न करू लागले. एकत्रित कुटुंब पद्धती असल्या कारणाने त्या दोघांना फार काळ एकत्र घालवता येईना. फारच अल्प काळ ते एकमेकांना भेटत असत. दुपारी जेवणाच्या वेळी त्यांना थोडासा वेळ मिळायचा.

असेच एक दिवस मुरुगानन्थम यांनी पहिले की त्यांची पत्नी त्यांच्यापासून काहीतरी लपवते आहे. मुरुगानन्थम यांची उत्सुक्ता जागृत होऊ लागली की अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांची पत्नी त्यांच्या पासून लपवत होती. पण व्यर्थ, त्यांना हे नाही कळू शकले.

एक दिवस मुरुगानन्थम यांनी बघितले की त्यांची पत्नी वृत्तपत्राची पाने आणि कचऱ्यातून कपड्याचे तुकडे शोधत होती. अरुण्चालम हे बघून थक्क झाले. न राहून त्यांनी त्यांच्या पत्नीला या सगळ्यांची विचारणा केली. पत्नीने सांगितले की,’’मासिक पाळीच्या वेळेस ती या कपड्याच्या तुकड्याचा आणि पेपरच्या पानाचा वापर करते. पत्नीने हे पण सांगितले की, जर तिने नविन कपडा विकत घेतला तर पैसे खर्च होतील आणि दुधा सारख्या बऱ्याच गरजेच्या वस्तू घरात येणे बंद होईल. आश्चर्याची गोष्ट ही होती की पहिल्यांदाच मुरुगानन्थम यांना महिलांच्या मासिक पाळीच्या संदर्भात कळाले होते. यानंतर त्यांनी महिलांच्या मासिक पाळी संदर्भात अधिक माहिती गोळा केली की अस्वच्छ कपडे आणि पेपरची पाने वापरल्याने प्रकृती खराब होऊ शकते प्रसंगी अनेक आजाराना तोंड द्यावे लागते. कॅंन्सर पण होऊ शकतो. या माहितीमुळे घाबरून गेलेल्या मुरुगानन्थम यांना लाभदायक अशा सॅनिटरी नॅपकिन बद्दल कळले. ते लगेच मेडिकल स्टोअर मध्ये गेले आणि सॅनिटरी नॅपकिन मागितले. या मागणीमुळे दुकानदाराचे हावभाव बघून मुरुगानन्थम यांना जाणवले की शक्यतो महिलाच या वस्तूची खरेदी करतात. त्याने आपल्या पत्नीला नॅपकिन भेट म्हणून दिले. स्वाभाविक पणे ब्रांडेड नॅपकिनची किमत एकूण थक्क झालेल्या पत्नीने मुरुगानन्थम यांना नॅपकिन परत न आणण्याचा सल्ला दिला.

image


मुरुगानन्थम यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले की कॉटनच्या एका तुकड्याचे ४० रुपये का वसूल केले जातात. त्या वेळेस १० ग्रॅम कापूस १० पैशाला विकत मिळत होता. म्हणजे सॅनिटरी नॅपकिनची किंमत वजनाप्रमाणे ४ रुपये पाहिजे होती. या उलट नॅपकिनमची किंमत ४० रुपये होती, म्हणजे ४० पट जास्त होती. मुरुगानन्थम यांचे डोके चक्रावून गेले. त्यांनी निर्णय घेतला की त्यांच्या पत्नीच्या आरोग्यासाठी तो स्वतः नॅपकिन बनवतील.

image


एक दिवस त्यांनी कापसापासून एक नॅपकिन बनवून आपल्या पत्नीला त्याचा वापर करून प्रतिसाद द्यायला सांगितला. पत्नीने महिनाभर थांबायला सांगितले. मासिक पाळी एक महिन्यानंतर येते ही नवीन गोष्ट मुरुगानन्थम यांना कळली. पण मुरुगानन्थम त्यांनी बनवलेल्या उत्पादनाच्या प्रतिसादासाठी एक महिना थांबू शकत नव्हते. त्यांची उत्सुकता प्रचंड होती. त्यांनी गावातल्या इतर स्त्रियांची माहिती मिळवली जी ऐकून त्यांना आश्चर्य वाटले की गावातल्या जास्तीत जास्त स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी वाळू, राख, झाडाची पाने यांचा वापर करतात, ज्यामुळे त्यांची प्रकृती खराब होऊन अनेक आजार उद्भवतात. आता, मुरुगानन्थम यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी निश्चय केला की जोपर्यत ते स्त्रियांसाठी स्वस्त, टिकाऊ, आणि आरोग्यदायक सॅनिटरी नॅपकिन बनवत नाही, तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही. त्यानी हा शोध लावण्यासाठी बहिणींची मदत घेतली, पण बहिणींनी त्याला स्पष्ट नकार देऊन असा प्रस्ताव न आणण्याबाबत धुडकावले. पण ते विचलित झाले नाही. त्यांनी निश्चय केला की ते मुलींच्या कॉलेज मध्ये जाऊन स्वतः बनवलेले नॅपकिनचे मोफत वाटप करून मुलींकडून प्रतिसाद घेतील. त्यांनी कॉलेजच्या २० मुलींची निवड करून सॅनिटरी नॅपकिन सोबत एक फिडबॅक फॉर्म पण दिला. प्रतिसादाच्या अपेक्षेने कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी बघितले की मुली मनाविरुद्ध फॉर्म भरत होत्या, त्यांना जाणवले की मुलींचा प्रतिसाद योग्य नाही.

image


यावेळेस मुरुगानन्थम यांनी जो निर्णय घेतला तो अचंबित करणारा होता. त्यांनी स्वतः नॅपकिन वापरून त्याची योग्यता पडताळून पाहण्याचा निर्णय घेतला. पुरुष असल्यामुळे त्यांना मासिक पाळी येऊ शकत नाही, म्हणून आपल्या शरीरातून रक्तस्त्राव होण्यासाठी कृत्रिम बनावटीचे गर्भाशय त्यांनी तयार केले. रक्त खरे असले पाहिजे यासाठी खाटीकाकडे जाऊन बकरीचे रक्त घेतले आणि आपल्या प्रयोगासाठी वापर केला. नॅपकीन लावून ते कधी चालायचा, कधी पळायचे , कधी साईकल चालवायचे. त्यांना जाणून घ्यायचे होते की त्यांचे नॅपकीन किती रक्त, किती वेळ शोषु शकते. मुरुगानन्थम यांच्यासाठी हा एक प्रयोग होता. पण त्यांची कृती बघून लोकांनी त्यांना वेडे ठरविले.

image


एकदा काय झाले रविवारच्या दिवशी मुरुगानन्थम मेडिकल कॉलेजच्या मुलींनी वापरलेले सॅनीटरी पॅड्स उघडून त्यावर अभ्यास करत होते. हातामध्ये चाकू होता आणि आजूबाजूला लाल रंग पडलेला होता. दुरून बघून त्यांच्या आईला वाटले की रविवार असल्यामुळे त्यांचा मुलगा ‘मुरुगा’ कोंबडी कापत आहे. जेव्हा आईने जवळ येऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. मुरुगानन्थम रक्ताने माखलेल्या सॅनीटरी पॅड्स वर काम करत होते. ते पाहून आईचा पारा चढला. त्यांना हे कळलेच नाही की त्यांचा मुलगा बायकांच्या सॅनीटरी पॅड्सशी संबंधित काय काम करतो आहे. आईला वाटले की त्यांच्या मुलाला एखाद्या भुताने झपाटले आहे किवा कोणीतरी त्यांच्यावर जादूटोणा केला आहे. आपल्या मुलाला वेडा ठरवत त्या घर सोडून निघून गेल्या.

image


त्यांना वैतागून त्यांची पत्नी माहेरीदेखील निघून गेली. तिथे गेल्यावर तिने घटस्फोटाची नोटीसदेखील पाठवली. मुरुगानन्थम सांगतात की, “ पत्नी माहेरी निघून गेल्यामुळे माझा फायदाच झाला, मला प्रयोग करायला वेळ मिळू लागला”.

आई आणि पत्नी सोडून गेल्यानंतर गावातले लोक त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागले. त्यांना वाटू लागले की मुरुगानन्थम यांचे अनेक बायकांशी अनैतिक संबंध आहे. ते सारखे बायकांच्या किवा मुलींच्या आजूबाजूला फिरत असतात. रक्ताने माखलेले कपडे धुण्यासाठी जेव्हा ते गावातल्या तलावावर जायचे तेव्हा लोकांना वाटायचे की त्यांना काहीतरी लैगिक आजार झाला आहे. गावक-यांना मुरुगानन्थम यांच्या हालचाली विचित्र, असभ्य, आणि गलिच्छ वाटायला लागल्या. गावक-यांना वाटायचे की मुरुगानन्थम यांना भूतबाधा झाली आहे आणि भूत काढण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतली पाहिजे. एक दिवस गावकऱ्यांनी मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार मुरुगानन्थम यांना झाडाला बांधून बेदम मारले, विनवणी करून कसे तरी मुरुगानन्थम तिथून वाचले, पण त्यांना गाव सोडावे लागले.

image


या घटनेनंतरही मुरुगानन्थम यांनी आपले प्रयोग करणे थांबवले नाही. वेगवगळ्या प्रयोगांतर्गत सुद्धा त्यांना हे कळले नाही की आंतरराष्ट्रीय कंपन्या सॅनिटरी नॅपकिन कशा पासून तयार करतात. त्यांना कळले की कापसाऐवजी दुसऱ्या वस्तूचा यात वापर होत आहे.

आपल्या ओळखीच्या एका प्राध्यापकाच्या मदतीने सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपन्याना पत्र लिहायला सुरवात केली. प्रयत्न करून सुद्धा मुरुगानन्थम यांना उत्तर मिळाले नाही. जवळ जवळ २ वर्षाच्या प्रयत्नांनी मुरुगानन्थम यांना कळले की सॅनिटरी नॅपकिन मध्ये सॅलुलोज फाईबर चा वापर होत आहे. सदर सॅलुलोज फाईबर पाईन बार्क वूड पल्प पासून काढतात. या माहिती मुळे मुरुगानन्थम मध्ये एक नवा उत्साह संचारला आणि नवीन आशा जागृत झाल्या. आता त्यांनी सॅनिटरी नॅपकिन बनविणाऱ्या मशीनचा शोध सुरु केला. बाजारातल्या सगळ्यात स्वस्त मशीन ची किमत ३.५ करोड एकूण ते थक्क झाले. त्यांनी निश्चय केला की ते स्वतः त्या मशीनची निर्मिती करतील.

image


निर्णय मोठा होता मात्र परिस्थिती अत्यंत बिकट होती, घरी आई होती ना पत्नी. घर कुटुंब काहीच राहिले नव्हते. साथ देणारे सुद्धा कोणी राहिले नव्हते. जुने मित्रही त्यांना वेडे समजत होते. परिस्थिती हालाखीची होती. अनेक आव्हानं समोर येऊन ठाकली होती, तरीही माघार घ्यायची नाही असे ठरले होते. गरीब महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनवायच्या निर्णयावर ते ठाम होते. त्यांचे प्रयत्न सुरूच होते.

image


आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण परिस्थितीचा कसा सामना केला हे मुरुगानन्थम आम्हाला सांगत होते, “ आर्थिक परिस्थिती फारच वाईट होती, मला दहा बाय बाराच्या खोलीत रहायची वेळ आली. त्या छोट्याश्या खोलीत आणखी पाच जण राहायचे. माझ्या बरोबर राहणारे सर्व हमाल होते. त्या छोट्याश्या खोलीत एवढेजण खूप कठीण परिस्थितीत राहात होते. मला अजूनही आठवते त्या खोलीत मला एकदाही सरळ पाय पसरून झोपता आले नाही. दरवाज्याला टेकूनच मी झोपायचो. त्यामुळे मला पाठीच्या कण्याचा आजार जडला.”

image


सगळं काही सुरळीतपणे चाललं होतं, व्यवसायात जम बसला होता, गावात आणि नातेवाईकांमध्ये खूप आदर होता, मात्र त्यांच्या जिद्दीमुळे ते सारे काही गमावून बसले होते. हमालांबरोबर राहून सुद्धा मुरुगानन्थम यांनी सॅनिटरी नॅपकिन बनवायचे काम सुरु केले. त्यांनी मशीनसाठी लागणाऱ्या उपकरणांचा शोध घेतला. आठवड्यातून दोन-तीन दिवस त्यांनी वेल्डिंगचे काम करायला सुरवात केली. त्यातून जे पैसे मिळायचे त्याचा वापर ते मशीन बनवायला करू लागले. ते रात्रंदिवस मेहनत करू लागले. कामात ते एवढे व्यस्त झाले की त्यांना दाढी करायला सुद्धा वेळ मिळायचा नाही. मुरुगानन्थम दररोज लोखंडाच्या लहानमोठ्या तुकड्यांना तोडायचे आणि जोडायचे. वेल्डिंगचे काम चांगले ठाऊक असल्याने ते मशीन बनवू शकतील यावर त्यांचा ठाम विश्वास होता. शेवटी त्यांच्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागले. तब्बल आठ वर्षानंतर उत्तम दर्जाची स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनवायची मशीन तयार करण्यात त्यांना यश मिळाले. फक्त ६५ ह्जार खर्चून सदर मशीन त्यांनी बनवली.

image


मुरुगानन्थम सांगतात की, “ मी ‘ट्रायल एंड एरर’ पद्धतीचा अवलंब केला. मी मशीन बनवायचो आणि जमले नाही की संपूर्ण मशीन तोडून टाकायचो आणि पुन्हा नव्याने मशीन बनवायला सुरवात करायचो. असे अनेक वर्ष काम सुरु होते, शेवटी मला यश मिळाले.” या नंतर मुरुगानन्थम यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. ते सतत यशस्वी होत गेले. त्यांची ख्याती वाढतच गेली.

image


त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, त्यांना आईआईटी (IIT) मद्रासला जाण्याची संधी मिळाली. आईआईटी मद्रासने मुरुगानन्थम यांना खास आमंत्रित करून जाणून घेतले की सॅनिटरी नॅपकिन बनवायच्या मशीनचा शोध कसा लावला. त्यांची गोष्ट एकूण आईआईटीचे वैज्ञानिक आणि समस्त लोक प्रभावित झाले. या लोकांनी पुढे त्यांच्या नावाची शिफारस 'इनोवेशन्स अवार्ड' साठी केली. मुरुगानन्थम यांना हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळाला.

image


या पुरस्कार नंतर मुरुगानन्थम यांना खूप प्रसिद्धी मिळाली, मिडियामध्ये त्यांच्या बद्दल चांगल्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या. प्रसारमाध्यमांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यांच्या यशोगाथा बीबीसी, सीएनएन, अल ज़जीरा यासारख्या नामवंत प्रसारमाध्यमांनी जगभरात पोहोचवल्या आणि दाखवल्या. काहीजणांनी तर त्यांना ‘बायकांचे सॅनिटरी नॅपकिन वापरणारा पहिला पुरुष’ असेही संबोधले तर काहीजणांनी ‘महिलांसाठी काम करणारा पुरुष क्रांतिकारी’ असेही म्हटले.

image


मुरुगानन्थम यांच्या मशीनमुळे संपूर्ण देशात कमी किंमतीतले आणि स्वस्त दरातील सॅनिटरी नॅपकिन बनवून विकायला सुरवात झाली जे स्त्रिया आणि मुलींसाठी उपयोगी होते. अरुणाचलम यांच्या या शोधामुळे अनेक महिला कार्यकर्त्यांना भारतातल्या स्त्रियांच्या या गरजेबद्दल जागरूकता आणण्यास मदत मिळाली. देशभरातल्या कितीतरी मुली आणि स्त्रियांसाठी हे नॅपकिन वरदान ठरले.

image


मुरुगानन्थम यांनी स्वतः हे नॅपकिन बनवून विकायला सुरवात केली. तेव्हाही त्यांना फार वाईट अनुभव आला. त्यांनी ‘कोवई’ नावाने सॅनिटरी नॅपकिनला बाजारात आणले. मात्र खराब मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्यूशनमुळे त्यांना बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करता आले नाही. लोकांना स्वस्त मिळणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनवर विश्वास ठेवला नाही. त्यावेळी लोकांना वाटलं स्वस्त असेल म्हणजे दर्जा चांगला नसेल. पण तसे काहीएक नव्हते. बाजारात माल विकला गेला नाही म्हणून माल त्यांच्याकडेच पडून राहिला. त्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागले. मुरुगानन्थम यांनी उरलेला सर्व माल आपल्या पत्नीला वापरायला दिला. असे केल्याने त्यांना खूप फायदा झाला. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या.

image


झाले काय की जेव्हा मुरुगानन्थम यांनी उरलेले सर्व नॅपकिन त्यांच्या पत्नीला जेव्हा देऊन टाकले तेव्हा तिने त्या नॅपकिनची विक्री तिच्या मैत्रीणीना आणि इतर महिलांना करायला सुरवात केली. मुरुगानन्थम जेव्हा घरात नसायचे तेव्हा इतर महिला घरी यायच्या आणि त्यांच्या पत्नीकडून सॅनिटरी नॅपकिन खरेदी करायच्या. यामुळे मुरुगानन्थम यांना सॅनिटरी नॅपकिन विकायचा नवीन फाॅर्मुला मिळाला. याच फाॅर्मुल्याचा वापर करत मुरुगानन्थम यांनी सॅनिटरी नॅपकिन बनवायचे नवीन मॉडेल बनविले. मॉडेल असे बनविले ज्यावर फक्त महिलाच काम करतील आणि तयार केलेले सॅनिटरी नॅपकिन आजूबाजूच्या परिसरातील महिलांना विकतील.

image


महत्वाची गोष्ट म्हणजे मुरुगानन्थम यांनी आपल्या कंपनीत तयार करण्यात आलेल्या मशीन फक्त महिलांच्या विकास आणि कल्याणाकरिता काम करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था आणि व्यवसाय करू इच्छीणाऱ्या महिलांनाच उपलब्ध करून दिली जाते. या मशिनीच्या माध्यमातून भरपूर नफा कमावणे हा हेतू नसून या मशीन मार्फत तयार होणारे सॅनिटरी नॅपकिन जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोचविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

image


मुरुगानन्थम यांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या या मशिनीमुळे देशभरात स्वस्त सॅनिटरी नॅपकिन तयार होऊ लागले आणि विक्री होऊ लागली. महिला आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे सोपे झाले. मुरुगानन्थम यांच्या स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनविणाऱ्या मशीनमुळे अनेक महिला कार्यकर्त्यांना, भारतातील मुलींमध्ये आणि इतर महिलांमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यात मदत मिळाली. त्यामुळे महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत झाली.

image


हा मुरुगानन्थम यांच्या मेहनतीचा, प्रयत्नांच्या संघर्षाचा परिणाम आहे की भारतात एक नवी क्रांती झाली आणि स्त्रियांना त्याचा लाभ झाला. भारतातल्या २९ राज्यात आणि सात केंद्र शासित प्रदेशात मुरुगानन्थम यांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या मशिनीच्या माध्यमातून महिला सॅनिटरी नॅपकिन बनवून विकत आहेत. भारताशिवाय इतर १९ देशांमध्ये सुद्धा मुरुगानन्थम यांच्या मशीनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुरुगानन्थम त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या या संशोधनासाठी आणि समाजकार्यासाठी ओळखले जाऊ लागले आहे. आज मुरुगानन्थम फक्त संशोधकच नाही तर एक सफल उद्यमी, समाजसेवक, मार्गदर्शक, आदर्श आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे.

image


देश आणि प्रदेशातील मोठमोठी संस्थानं अरूणाचलम यांच्या विचारांना आत्मसात करण्यासाठी, त्यांना सन्मानित करण्यासाठी बोलवत आहे. भारतीय औद्योगिक संस्था आणि आईआईटी, आईआईएम यांसारख्या संस्था त्यांना विद्यार्थांना व्यावसायिक मार्गदर्शन देण्यासाठी आमंत्रित करत आहेत. भारत सरकारतर्फे मुरुगानन्थम यांना देशातील चौथ्या सर्वोच्च नागरीक सम्मान ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

image


मुरुगानन्थम यांचे स्वप्न आहे की जगभरातील सर्व महिलांनी मासिक पाळीच्या वेळी सुरक्षित सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा. हे स्वप्न साकार करण्यासाठी मुरुगानन्थम यांनी ठरवले आहे की, भारत हा १०० टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करणारा देश बनेल. मुरुगानन्थम यांनी भारताचे सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेशातून आपल्या मोहिमेस सुरवात केली आहे. ते राज्य सरकारच्या मदतीने प्रयत्नशील आहेत की उत्तरप्रदेश भारतातले असे पहिले राज्य असेल जिथे प्रत्येक महिलेला परवडणाऱ्या दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होईल. 

image


उत्तरप्रदेशच्या यशानंतर ते भारतातल्या अन्य राज्यांमध्येदेखील त्यांची ही मोहीम राबवणार आहे.मुरुगानन्थम यांचे आणखी एक स्वप्न आहे की त्यांच्या या स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनविणाऱ्या मशीनच्या माध्यमातून भारतातील कमीत कमी १० लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.

image


इथे हे सांगणे गरजेचे आहे की मुरुगानन्थम यांच्या या यशानंतर त्यांचे कुटुंब त्यांच्याजवळ परत आले. मुरुगानन्थम यांची पत्नी शांती आणि मुलगी प्रीती यांच्याबरोबर तमिलनाडुच्या कोयम्बतूर शहरात राहतात. त्यांच्या पत्नी ज्या प्रयोगांना गलिच्छ समजून सोडून गेल्या होत्या, त्याच प्रयोगांचा आणि पतीच्या यशाचा त्यांना गर्व आहे. त्यांची आई सुद्धा त्यांच्या या कार्यामुळे प्रभावित झाल्या आहे. त्या म्हणतात की फक्त दहावी शिकलेल्या त्यांच्या लाडक्या ‘मुरुगा’ने एवढे मोठे काम करून दाखवले. जर तो जास्त शिकला असता तर याहीपेक्षा जास्त मोठे काम केले असते. पापनायकनपुडूर गाव आता गाव राहिले नसून एक उपनगर परिसर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पनायकनपुडूर इथल्या गावकऱ्यांना पण त्यांनी केलेल्या चुकांचा पश्चाताप होत आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

कृषी क्षेत्रात क्रांतीची सुरवात करणारे सुभाष मनोहर लोढे यांनी कधीकाळी रस्त्यावर विकली होती घड्याळं

लहानपणी थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करणारे करुणाकर रेड्डी आज ७५ लाख लोकांना उपलब्ध करून देत आहे शुद्ध पिण्याचे पाणी

 ‘वेटर’च्या कामापासून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारे तुषार मुनोत उभारणार सेवन स्टार हॉटेल

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

    Latest Stories

    आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा