७० वर्षाच्या अमला रुईया यांनी राज्यस्थानच्या २०० दुष्काळग्रस्त गावात केली हरितक्रांती

७० वर्षाच्या अमला रुईया यांनी राज्यस्थानच्या 
२०० दुष्काळग्रस्त गावात केली हरितक्रांती

Monday April 25, 2016,

5 min Read

त्यांना अध्यात्माची आंतरिक ओढ होती पण एका घटनेने त्या खूप विचलित झाल्या व त्यांनी असे काम केले की ज्यामुळे काल पर्यंत ज्या भागातील लोक दुष्काळाच्या छायेखाली पाण्याच्या एका थेंबासाठी व्याकूळ होत होते, आज त्याच भागात बाराही महिने पाणी आहे. आपल्या विचारांशी दृढ व नशिबाशी दोन हात करणा-या ७० वर्षीय अमला रुईया भलेही मुंबईत रहात असतील पण त्यांनी आपल्या कामाने राज्यस्थानच्या दुष्काळग्रस्त भागाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. त्यांनी पारंपारिक जलसंचयनाचा तांत्रिक पद्धतीने उपयोग करून २०० जलकुंड बनविले ज्यात १ करोड लिटर पाणी जमा होते. तसेच त्यांनी राज्यस्थान व दुसऱ्या राज्यातील अनेक ठिकाणी २०० पेक्षा जास्त चेकडॅम तयार केले जिथे कधी काळी लोक पाण्यासाठी व्याकूळ होते. आज तिथे पाण्यामुळे हिरवळ तर आहेच व आसपासच्या सगळ्या विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेल्या आहेत.

image


देशातील ६०% शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसामुळे काही भागात ओला दुष्काळ पडतो तर काही भाग हा कोरडा रहातो. स्वातंत्र्यानंतर सरकारने या समस्येच्या निवारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या पण परिस्थितीत काही विशेष फरक पडला नाही. पण असे काही लोक आहेत जे अश्या प्रकारच्या योजनेला सत्यात परिवर्तीत करून दाखवतात त्यांच्यापैकीच एक आहेत अमला रुईया. त्यांचे सासर राज्यस्थानच्या रामगढ जिल्यातील शेखावटी भागातील आहे. त्या सांगतात की, ‘’मला अध्यात्माची आवड आहे. ९० च्या दशकात जेव्हा राज्यस्थान मधील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे हृदयद्रावक चित्र टीव्ही वर बघितले तेव्हा माझी या लोकांसाठी काही तरी करण्याची इच्छा जागृत झाली.”

image


 त्यावेळेस दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अल्पशा प्रमाणात का होईना आनंद देण्यासाठी अमलाच्या सास-यांनी पाण्याच्या टँकरने पाणी व जेवण दिले. परंतु अमला रुईया यांना समाधान वाटले नाही. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की विपरीत परिस्थिती सुद्धा येथील लोकांना त्यांचे जीवन सामान्यपणे जगता आले पाहिजे. अमला रुईया सांगतात की,”मला काय काम करायचे आहे याची कल्पना नव्हती व मी या बाबतीत खूप विचार केल्यावर असे लक्षात आले की काही एनजीओ आहेत जे या क्षेत्रात सफलतापूर्वक काम करीत आहेत. त्यांच्या कामाला मी आधार बनवून आपल्या कामाची सुरवात केली. याची सुरवात मी आमच्या पूर्वजांचे गाव शेखावटी पासून केली. हे थार मरूस्थलच्या जवळील एका समांतर जागेवर आहे जिथे पडलेले पावसाचे पाणी जमीन शोषून घेते. अशातच आम्ही तेथे जलकुंड बनवण्याचा निर्णय घेतला जो पारंपारिक पाणी साठवण्याचा उपाय आहे.”

image


या प्रकारे अमला रुईया यांनी त्या भागातील लोकांच्या मदतीने सन २००० मध्ये शेखावटी व त्याच्या आसपासच्या भागात रहाणा-या शेतकऱ्यांच्या शेतात २०० जलकुंड (शेततळे) बनवले. २-३ तास पडणाऱ्या पावसाने प्रत्येक कुंडात साधारणतः १६००० ते ५०,००० लिटर पर्यंत पाणी साठा होतो. विशेष गोष्ट म्हणजे यामुळे येथे पूर्ण वर्ष पिण्याचे पाणी उपलब्ध असते. त्यामुळे शेतक-यांना शेतीसाठी व स्त्रियांना घराजवळच वापरासाठी पाणी मिळू लागले आहे व त्या पशुपालन पण करू लागल्या आहेत. तसेच दुध, दही, खवा इ. विकून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढू लागले आहे.

image


अशाच प्रकारे अमला यांना जेव्हा राज्यस्थानातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल कळले तेव्हा त्यांनी अश्या भागातील लोकांची तहान भागवण्यासाठी चेकडॅम बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी राज्यस्थानच्या ‘निम का थाना’ या भागाची निवड केली कारण हा भाग डोंगराच्या पायथ्याला होता व चेकडॅम अश्याच जागेवर तयार केले जातात जिथे उंचावर पडणाऱ्या पावसाचे पाणी एकत्र जमा होऊन खाली वाहून येते. दोनच तासाच्या पावसाने त्यांनी बनवलेले चेकडॅम भरून वहायला लागतात व त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. ज्या विहिरीतील पाण्याचा स्तर ८० फुटापेक्षा खाली होता तोच आता वाढून ३० फुटापर्यंत आला आहे. यानंतर सदर ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात वर्षातून दोन खरिब व रब्बी पिके घेऊ लागले आहेत. तसेच काही भागात पाणी आणखी जास्त असल्यामुळे शेतकरी भाज्या पिकवू लागले आहेत. शेतकऱ्यांना पाणी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले व ते अतिरिक्त धान्य विक्री करू लागले आहेत तसेच त्यांची पशुपालनाची आवडही वाढू लागली आहे.

image


अमला रुईया गर्वाने सांगतात की ज्या भागात त्या काम करत आहे तेथे गाव सोडून शहरात जाणा-यांची संख्या कमी झाली आहे व जे लोक गाव सोडून गेले होते ते परत गावात आले आहे. गावातील स्त्रिया आता घरी राहूनच काम करू लागल्या व त्यांची मुले शाळेत जावू लागली आहेत. हा अमला रुईया यांच्या प्रयत्नाचाच परिणाम आहे की त्यांना आता पर्यंत राज्यस्थान व्यतिरिक्त महाराष्ट्र, बिहार, युपी व हरियाना सारख्या राज्यात २१६ चेकडॅम बनवण्यात यश आले आहे. अमला रुईया सांगतात की या चेकडॅम मुळे शेकडो गावातील लाखो लोकांना याचा फायदा झाला आहे. जलसंचयनाच्या कामाला योग्य प्रकारे आकार देण्यासाठी अमला रुईया यांनी ‘आकार चॅरीटेबल ट्रस्ट’ नामक एक संस्था उघडली. याच्या मदतीसाठी गावकरी नवीन जागेवर चेकडॅम बनविण्यासाठी ३० ते ४०% खर्च देतात व उर्वरित रक्कम सदर ट्रस्ट देते. याचा एक फायदा असतो की गावकरी या डॅमला आपला समजतात व पावसाळ्याच्या अगोदर त्याची तपासणी करून डागडुजी करतात. या ट्रस्टची ९ सदस्यांची एक छोटीशी टीम आहे जी हा सगळा कारभार चालवते. विशेष म्हणजे अमला यांच्या प्रयत्नाने या भागातील लोकांचे आर्थिक उत्पन्न हे ५०० करोडच्या जवळपास पोहचले आहे.

आपली संस्था चालवण्यासाठी त्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. चेकडॅम, जलकुंड बनवण्यासाठी लागणारा पैसा त्यांनी मित्र, नातेवाईक तसेच स्वतःच्या घरातून उभा केला. त्याचबरोबर गावक-यांनी पण आर्थिक रुपात भागीदारी केली. अमला रुईया सांगतात की आतापर्यंत त्यांनी ८ करोड व गावकऱ्यांनी २.४० करोड रुपये खर्च केले आहेत. या उस्फूर्त कामगिरी बद्दल त्यांना १० लाख रुपये ऑस्ट्रेलियन उच्च आयुक्त यांच्याकडून मिळाले आहेत. त्यांची इच्छा आहे की देशातील इतर भागातही अशा प्रकारचे चेकडॅम बनविले जावेत ज्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संजीवनी मिळेल.  

वेबसाइट : http://aakarcharitabletrust.weebly.com/

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

शिक्षणातून वंचित मुलांचं आयुष्य बदलणाऱ्या कुमारी शिबुलाल

पुण्यातील सात हजार विद्यार्थ्यांचा पाणी वाचवण्याकरता अनोखा उपक्रम

"मी जन्माने तर जीनियस होतेच पण इडियट बनण्याचा निर्णय माझा होता, मला माझ्या निर्णयावर गर्व आहे"

लेखिका - गीता बिश्त 

अनुवाद - किरण ठाकरे 

    Share on
    close