संपादने
Marathi

मी लिहिलेल्या कथा जगण्याची हिंमत माझ्यात नव्हती - कल्की कोचलिन

Team YS Marathi
16th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

बॉलिवूड हे कल्की कोचलिनकरिता असंभाव्य असे स्वप्न होते. या क्षेत्राच्या त्या कधीही सक्रिय भाग नव्हत्या. हिंदी चित्रपट ʻदेव डीʼमधुन कल्की कोचलिन यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्या चित्रपटातील भूमिकेकरिता त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला. युअरस्टोरीने कल्की कोचलिन यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या कारकिर्दीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नाटक आणि चित्रपटसृष्टीबद्दलच्या आपल्या प्रेमाबद्दल बोलताना कल्की सांगतात की, ʻमाझ्या पालकांचा अभिनय, नाटक आणि चित्रपट या क्षेत्रांशी काहीएक संबंध नव्हता. माझे वडिल व्यवसायाने अभियंते होते. त्यांनी मायक्रोलाईट विमान बनविले होते. माझी आई पुदुच्चेरी येथील आशियातील सर्वात जुनी असलेली फ्रेंच शाळा लायसी फ्रान्केस येथे फ्रेंच भाषा शिकवायची. माझे बालपण जगातील अनेक कला-चित्रपट पाहण्यात गेले. त्यात शेखर कपूर, गुरुदत्त आणि सत्यजित रे यांच्या चित्रपटांचादेखील समावेश होता. मी कुटुंबासोबत अनेक नाटकेदेखील पाहायला जायची. मला वाटते, त्या नाटकांमुळे मी प्रभावित झाले. त्यानंतर शाळेत मी नाटकांच्या क्लबमध्ये सहभागी झाले. वयाच्या सहाव्या वर्षी मी पहिल्यांदा नाटकात माझी भूमिका पार पाडली.ʼ अभिनय क्षेत्रात पूर्णवेळ कारकिर्द घडविण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल कल्की सांगतात की, ʻमी विद्यापीठातून उच्च शिक्षण घ्यावे, याकरिता माझे पालक आग्रही होते. मला काय करायचे आहे, याबाबत मला थोडीशी कल्पना होती. माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांनी मला नाटक शाळेत शिक्षणासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला होता कारण त्यांच्या मते मला या क्षेत्रात रस होता. मला कथा आणि नाटक लिहिण्यास आवडायचे. त्यांनी मला या गोष्टीकरिता प्रोत्साहन दिले. अखेरीस मी लंडन येथे नाटक या विषयात बीए करण्यास गेले. जेव्हा मी माझे वर्ग सुरू केले. तेव्हा मला जाणीव झाली की, लोक नाटकांच्याबाबतीत किती समर्पित आहेत आणि या गोष्टीचा माझ्यावर प्रभाव पडला. त्यानंतर मी नाटक कंपनीत सहभागी झाले. माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी भारतात परतले आणि रंगभूमीशी संबंधित काम करू लागले. मी नाटक आणि चित्रपटांच्या पटकथादेखील लिहिते.ʼ नाट्यक्षेत्रात काम करण्याच्या निर्णयाला घरातून विरोध झाला का, याबाबत विचारले असता कल्की सांगतात की, ʻमी भाग्यवान होते की, माझ्या पालकांनी कधीच माझ्यावर त्यांचे निर्णय लादले नाहीत. माझ्या मते, माझ्या वडिलांना ते करत असलेल्या कामात मी जर रस दाखवला असता, तर ते आवडले असते. मात्र तसे झाले नाही. मला कधीही याबाबत कोणताही दबाव सहन करावा लागला नाही. मला असे वाटत नाही की, माझे पालक तसे जुन्या विचाराचे होते. कारण फार तरुण वयातच त्यांनी फ्रान्स ते भारत असा प्रवास केला होता. कुटुंबापासून लांब राहण्याचा त्यांचा निर्णय हे फार मोठे पाऊल होते. ते स्वतः त्यांच्या स्वप्नपूर्तीचे प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी कधीच मला जे करायचे आहे, त्यापासून रोखले नाही. मात्र मी अभिनयाच्या क्षेत्रात येईन, याबाबत ते साशंक होते. मी पैसा कसा कमवेन, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. प्रत्यक्ष जीवनातील हे सर्व प्रश्न होते. मात्र त्यांनी मला जे करायचे होते, त्यापासून कधीच अडवले नाही. ते म्हणायचे की, तू जे काही करत आहेस, त्यासाठी तूच जबाबदार आहेस. तुझ्या कोणत्याही गोष्टीकरिता आमच्याकडून पैसे मागू नकोस कारण तुझ्या कारकिर्दीची निवड तू स्वतः केली आहेस. मी माझ्या निर्णयाकरिता जबाबदार असल्याची शिकवण त्यांनीच मला दिली.ʼ, असे कल्की सांगतात.

image


नाट्यक्षेत्रात काम करत असताना आपला दैनंदिन खर्च कशाप्रकारे भागवायच्या याबाबत कल्की सांगतात की, ʻलंडनमध्ये असताना मी डिस्लेक्सिया आजाराने ग्रासलेल्या मुलांच्या शिकवणीचे काम करायचे. याशिवाय मी काही काळ वेट्रेस म्हणून काम केले आहे. भारतात मी मॉडेलिंग, लेख लिहिणे यांसारखी कामे केली. मला हे समजत नव्हते की, माझे घरभाडे मी कसे देणार आहे. मात्र जिथे इच्छा असते, तिथे मार्गही निघतो.ʼ कला आणि संस्कृतीबाबत भारत आणि लंडनची तुलना करताना कल्की सांगतात की, ʻमी जेव्हा लंडनमध्ये गेले, तेव्हा मी १८ वर्षांची होते. जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची आणि धाटणीची थिएटर्स पाहिल्यानंतर माझ्यावर त्यांचा प्रभाव पडला. लंडन हे रंगभूमीचे केंद्र आहे. जगभरातील लोक तेथे नाटक शिकण्यासाठी किंवा नाटकात काम करण्यासाठी येतात. मला तेथे काही भारतीय निर्मात्या कंपन्यादेखील पाहायला मिळाल्या, ज्या मी कधी भारतात पाहिल्या नव्हत्या. भारतापेक्षा लंडनमध्ये त्यांना अधिक प्रोत्साहन मिळत होते. तेव्हा मला खरोखर निराश वाटले. कारण ती कथानके प्रभावी होती. मात्र आपल्याला त्यातील क्षमताच समजत नव्हती. माझ्या कथा या भारताशी संबंधित होत्या, जेथे मी लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे मला भारतातच परतणे, योग्य वाटत होते.ʼ कथाकथन आणि भारतातील नाट्यक्षेत्र याबद्दल स्वतःची मते मांडताना कल्की सांगतात की, ʻदुर्दैवाने भारतात नाट्यकला या कलापद्धतीला चांगला पाठिंबा मिळत नाही. आपल्याकडे या कलेत जास्त पैसेदेखील मिळत नाहीत. अनेक नाट्यकलाकार उदरनिर्वाहाकरिता नोकरीदेखील करतात. फक्त नाट्यकलेच्या आधारावर कोणी आपला उदरनिर्वाह करू शकत नाही. मीदेखील फक्त नाट्यक्षेत्रात काम करत नाही. मी चित्रपटक्षेत्रातदेखील काम करते. मात्र अनेक गोष्टी आपल्या देशाला सांगणे गरजेचे आहे आणि अनेकदा आपण त्या सांगत नाही, असे मला वाटते. चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील अनेक सूत्रांकडे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येते की, लोककथा आणि त्यासारख्या गोष्टी गेल्या अनेक काळापासून सांगितल्या जात आहेत. नवी कल्पना सुचणे दुर्मिळच असते. त्यामुळे अनेक गोष्टी या अजून शोधण्याच्या बाकी आहेत.ʼ आपल्या लिखाणाबद्दल बोलताना कल्की सांगतात की, ʻफार तरुण वयापासून मी लिखाणाला सुरुवात केली. माझ्या मते, लिखाण ही एक उपचारपद्धती आहे. मी लहानपणी खूप लाजाळू होते. माझ्या मनातील भावना लोकांना सांगण्याऐवजी मी त्या लिहून काढत असे. त्यानंतर मी माझ्या कल्पनेवर आधारित कथा लिहू लागले. कारण त्या जगण्याएवढी हिंमत माझ्यात नव्हती. माझ्या मते अनेक लेखकांच्या याच भावना असतील. अभिनय ही एकच गोष्ट अशी आहे, जेथे मी त्या भूमिका जगू लागले. मात्र लिखाण मी फार कमी वयातच सुरू केले होते आणि मी कायम ते करत राहिन. मी जेव्हा बऱ्याच कालावधीकरिता बेरोजगार होते, तेव्हा मी लिखाणाला सुरुवात केली. मला आलेल्या नैराश्याला वाट मोकळी करुन देण्यासाठी मी लिखाणाचा मार्ग निवडला.ʼ, असे कल्की सांगतात.

नाट्यक्षेत्र ते बॉलिवूडपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना कल्की सांगतात की, ʻहे सर्व अचानक संधी चालून आल्याप्रमाणे घडले. बॉलिवूडमध्ये मला संधी मिळेल, असे मला वाटले नव्हते किंवा बॉलिवूडचा एक भाग होण्याचा प्रयत्नदेखील मी कधी केला नव्हता. कारण हिंदी भाषेवर माझे प्रभुत्व नव्हते किंवा नृत्यकलेतदेखील मी अव्वल नव्हते. पण जेव्हा मला पैशाची गरज भासू लागली तेव्हा मी जाहिरातींच्या निवड चाचण्यांना जात असे. ʻदेव डीʼ चित्रपटाकरिता निवड चाचणी झाली, तेव्हा मी माझे नशीब आजमवण्यासाठी तेथे गेले होते. मला जेव्हा त्या चित्रपटात संधी मिळाली, तेव्हा मला खूप आनंद झाला आणि त्या भूमिकेसाठी मी कठोर मेहनत घेण्यास सुरुवात केली. हिंदी भाषेची शिकवणीदेखील मी दोन महिन्याकरिता लावली होती.ʼ हिंदी चित्रपटात कारकिर्दीला सुरुवात करताना कल्की यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्याबाबत बोलताना कल्की सांगतात की, ʻमाझ्या मते प्रत्येकाला छोट्या मोठ्या प्रमाणात आव्हानांचा सामना करावा लागतो. काहींना त्यांच्या दिसण्यावरुन, बोलण्यावरुन किंवा ते कुठुन आले आहेत, यावरुन अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मी एका परदेशी नागरिकाप्रमाणे दिसते तसेच माझी भाषाशैलीदेखील तशीच आहे. सुरुवातीच्या काळात माझी हिंदी भाषेवरील पकड कच्ची होती. मला भाषेवर मेहनत घेण्याची गरज होती. मी दिसते कशी, यावर मला मेहनत घेण्याची गरज नव्हती. जेव्हा मी सत्य मान्य केले, तेव्हा मी स्वतःमध्ये आवश्यक असलेले बदल घडवले. मी प्रत्येकात वेगळी उठून दिसत होते. आपल्या प्रत्येकात विविधता असते. जर आपण सारखे दिसू लागलो, तर ते रोबोटप्रमाणे वाटेल.ʼ

आपल्या भविष्यकाळातील योजनाबद्दल बोलताना कल्की सांगतात की, ʻमी नेहमीच म्हणत असते की, मला एक पुस्तक लिहायचे आहे. मात्र आता मी शिकले आहे की, जास्त नियोजन करू नये. कारण तुम्हाला माहित नसते की, नियतीने तुमच्यासमोर काय वाढून ठेवले आहे. मात्र मला विश्वास आहे की, एक दिवस माझ्या गाठीशी एवढा अनुभव असेल की, मी पुस्तक लिहू शकेन. मी जगातील सर्वात वाईट आणि अयशस्वी नियोजनकार आहे. मी उद्याच्या पलीकडे कोणतेही नियोजन करू शकत नाही. माझ्या मते, तो क्षण जगणे महत्वाचे असते. तुम्ही सध्याच्या घडीला काय करत आहात, याकडेच लक्ष द्या.ʼ तरुण पिढीला कल्की सल्ला देतात की, ʻमला असे वाटत नाही की, तुम्ही तुमच्या चुका टाळायला हव्या. चुकांमुळेच माणूस सुधारतो. चुकांमुळेच तुम्ही तुमच्या आय़ुष्यात अनेक गोष्टी शिकू शकता. तुमच्या आय़ुष्याचा निर्णय तुम्हीच घ्यायला हवा. आपण कायम इतरांकडून सल्ले घेतो. मग ते आपल्या धर्मातून असो, आपल्या गुरुकडून असो, पुस्तकातून असो किंवा पालकांकडून असो. मात्र अखेरीस तुम्हाला तुमच्या स्वतःपेक्षा कोणी चांगल्या प्रकारे ओळखत नाही. त्यामुळे स्वतःशी नेहमीच सत्याने वागा, रिस्क घ्या आणि तुम्हाला खरोखरच जे करायचे, ते कराʼ, असे कल्की सांगतात.

लेखक - आदित्य भूषण द्विवेदी

अनुवाद - रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags