संपादने
Marathi

‘कचऱ्यातून चामडे गोळा करणारा मुलगा’ ते ‘लेदर एक्सपोर्टर’ – एक थक्क करणारा प्रवास

Anudnya Nikam
16th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘स्थळ – धारावी, मुंबई. ७० फूटाच्या झोपडीमध्ये आई-वडिल आणि पाच भावंडे असे सात जणांचे कुटुंब नांदत असते. चामड्याच्या कंपन्यांबाहेर पडलेल्या कचऱ्यातून गोळा केलेले छोटे-मोठे चामड्याचे तुकडे गावोगावच्या गटई कामगारांना विकून मिळणाऱ्या पैशात घर चालत असते. चिमुरडा राजेश वडिलांचे बोट धरुन कचऱ्यातील चामडे गोळा करायला जात असतो. दिवसांमागून दिवस जात असतात. अचानक या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळते आणि घराची जबाबदारी पेलवण्याच्या जाणीवेने लहान वयातच राजेश प्रत्यक्ष व्यवसायात उतरतो. मार्गात आलेल्या साऱ्या अडचणींवर मात करत, जिद्द, चिकाटी, मेहनत करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर माणसं जोडतो. संधी कमावतो आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत एक दिवस लेदर इण्डस्ट्रीमधला मोठा एक्सपोर्टर म्हणून नावारुपास येतो.’ एखाद्या सिनेमाची कथा वाटावी अशी ही जीवनकहाणी आहे लेदर एक्सपोर्टर राजेश खंदारे यांची.

image


४१ वर्षांचे राजेश आज ‘राजदीप लेदर प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘सिण्ड्रेला फूटवेअर’ या दोन कंपन्यांचे मालक आहेत. राजेश वयाच्या १३-१४ व्या वर्षापासून शिक्षण सांभाळून वडिलांना व्यवसायात मदत करु लागले होते. मात्र एक-दोन वर्षातच मुंबईतील चामड्याचे कारखाने बंद होऊ लागले आणि कचऱ्यामध्ये मिळणारे चामड्याचे तुकडे मिळेनासे झाले. “१९८९-९०ला व्यवसाय बंद झाला. इतकी वर्ष याच व्यवसायावर आमचं घर चालत होतं. त्यामुळे आता काय करायचं हा प्रश्न उपस्थित झाला. अशातच काही लोकांनी आम्हाला सांगितलं की चेन्नईला चामड्याचे मोठे कारखाने आहेत. तिथे तुम्हाला चामड्याचे तुकडे नक्की मिळतील. हे ऐकून मी चेन्नईला जायचं निश्चित केलं. आई-बाबा नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यावेळी त्यांनी मला २५ हजारांचं भांडवल उभं करुन दिलं. मी ते घेऊन चेन्नईला गेलो आणि तिथे मला प्रगतीचा मार्ग मिळाला,” राजेश सांगतात.

image


ते पुढे सांगतात, “चेन्नईला मला मुंबईच्या तुलनेत खूप स्वस्तात चामडं मिळू लागलं. मग १५-२० हजाराचा माल घेऊन मुंबईला यायचं आणि इथे आणून तो विकायचा याचा मला चस्काच लागला. हळूहळू ओळखी वाढत गेल्या, मुंबईतल्या एक्सपोर्टर्सकडूनही मोठमोठ्या शीट्सची मागणी होऊ लागली आणि मी चामड्याच्या तुकड्यांऐवजी पूर्ण चामड्याच्या शीट्स आणू लागलो. बघता बघता माझा व्यवसाय वाढत गेला. ‘राजदीप लेदर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने मी मोठ्या प्रमाणावर लेदर ट्रेडिंग करु लागलो. माझ्या प्रामाणिकपणामुळे लोकांनीही मला खूप चांगल्या संधी दिल्या आणि १९९८-९९ पर्यंत माझ्या कंपनीची वार्षिक उलाढाल १५ ते २० कोटींच्या घरात गेली.”

चेन्नई ते मुंबई मालवाहतूक करण्यासाठी राजेश यांनी स्वतःचे तीन ट्रक घेतले आणि ‘राजदीप रोडलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने ट्रान्सपोर्ट कंपनी सुरु केली. “हे ट्रक मी केवळ माझ्या मालाची ने-आण करण्याकरिता वापरले. २०११ -१२ पर्यंत म्हणजे सहा-सात वर्ष मी ही ट्रान्सपोर्ट कंपनी चालवली. दरम्यान, धारावीमध्ये २५ हजार फूटाच्या जागेवर लेदर फिनिशिंगचं एक युनिट सुरु केलं. इथे चामड्यावर प्रक्रिया केली जाते. लेदर टॅनिंग, फिनिशिंग, कलरिंगची कामं या युनिटमध्ये होतात. हळूहळू बाहेरच्या देशातील कंपन्यांबरोबर काम करण्याची संधीही मिळाली आणि मी चामडं एक्सपोर्ट करु लागलो,” असं राजेश सांगतात.

image


यशाचं एक एक शिखर काबीज करणाऱ्या राजेश यांनी २००७ साली कच्च्या मालाच्या ट्रेडिंगबरोबरच मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. “इण्डस्ट्रीची जसजशी ओळख होत गेली तसतसं माझ्या लक्षात आलं की कच्च्या मालाच्या ट्रेडिंगमध्ये मिळणाऱ्या मार्जिनच्या दसपट मार्जिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मिळतं. त्यामुळे मी ‘सिण्ड्रेला फूटवेअर’ नावाने स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरु केली. आज फूटवेअरबरोबरच आम्ही चामड्याचे बेल्ट, बॅग, लेदर ऍक्सेसरीजही बनवतो आणि एक्सपोर्ट करतो. आजघडीला जगभरात जवळपास सगळीकडे आमचा माल एक्सपोर्ट होतो,” राजेश सांगतात.

राजेश यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. “मुळात सुरुवातच गरीबीतून झाली होती. आई-वडिलांनी दिलेले २५ हजार आणि त्यांचा आशिर्वाद एवढ्या भांडवलावर चिकाटीने चेन्नईचा रस्ता धरला होता. वाटेत अडथळे खूप होते. पण मी त्यांना फार महत्त्व देत नाही. कुठलंही काम करताना वाटेत अडचणी या येणारच. अनेकदा नफ्यामध्ये असलेल्या गोष्टीही सोडून द्याव्या लागतात. अशा परिस्थितीतही प्रामाणिकपणा आणि चिकाटी ठेवणं गरजेचं असतं. या प्रवासात तुम्हाला वाईटाबरोबर चांगली माणसंही भेटत असतात. ती जोडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मलाही अशी अनेक चांगली माणसं भेटली. फूटवेअर एक्सपोर्ट करणाऱ्या एका महिलेने मला सर्वप्रथम संधी दिली. त्यानंतर मलिक एक्सपोर्ट्सचं नाव मी आवर्जून घेईन. मला भेटलेल्या चांगल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला संधी दिली. त्यामुळेच मी हे यश संपादन करु शकलो. आजही मी पैशांपेक्षा माणसं जोडण्याला, ती जपण्याला अधिक महत्त्व देतो,” राजेश सांगतात.

image


गरिबीतून वर आलेले राजेश आजही आपले जुने दिवस विसरलेले नाहीत. म्हणूनच आपला व्यवसाय सांभाळतानाच सामाजिक क्षेत्रातही कार्यरत राहून ते गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. ‘संत कक्कया विकास संस्थे’चे ते सचिव आहेत. “संस्थेच्या माध्यमातून आम्ही धारावीतील ‘श्री गणेश विद्यामंदीर’ शाळेतील २५०० दलित आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पुरवितो. संस्थेद्वारे मुलांना स्कॉलरशीप मिळवून देण्याचं आणि त्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचं माझं उद्दीष्ट आहे. धारावीमध्ये चांगली शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठीही मी गेल्या ३-४ वर्षांपासून प्रयत्न करतो आहे. एका शाळेचं बांधकाम सध्या सुरु आहे. विविध राजकीय पक्षांबरोबरही मी काम केलेलं आहे. मात्र याचा उपयोग मी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करण्यासाठी केला. धारावीतील लोकांना चांगलं राहणीमान अनुभवण्याची संधी मिळावी म्हणून येत्या काळात एक कन्स्ट्रक्शन कंपनी सुरु करुन त्या अंतर्गत त्यांच्यासाठी नेरळमध्ये ५००० घरांचं गृहसंकुल उभारण्याची योजना आहे. १५-२० लाखांमधील ही घरं असतील,” असं राजेश सांगतात.

आपल्याप्रमाणेच गरिबीतून वर येऊ इच्छिणाऱ्या मुलांना आणि एकूणच तरुण पिढीला ते मोलाचा सल्ला देतात. ते सांगतात,“कोणत्याही परिस्थितीत चिकाटी सोडू नका, खोटया आमिषाला भूलू नका, त्वरित पैसा मिळवण्याच्या मागे लागू नका, मेहनत करुन पैसा कमवण्याची तयारी ठेवा. माझ्या गरजा आजही तेवढ्याच आहेत जेवढ्या धारावीतील झोपडीत राहताना होत्या. स्वतःच्या गरजा अनाठायी वाढवू नका. केवळ पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करु नका तर त्यांच्याप्रमाणे पैसाही कमवा आणि मुख्य म्हणजे कमवलेल्या पैशाची बचत करायला शिका.”

आजकाल आसपास घडणाऱ्या घडामोडींमुळे प्रामाणिकपणाने वागून आणि भरपूर पैसा जवळ असल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही असा समज समाजामध्ये रुढ होताना दिसतोय. मात्र मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक माणूसही यशस्वी होऊ शकतो, गरिबीवर मात करु शकतो याचे राजेश खंदारे हे एक उत्तम उदाहरण आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags