धर्मापलीकडे जाऊन मुलांच्या शिक्षणाकरिता झटणारी ʻदिपालयʼ

धर्मापलीकडे जाऊन मुलांच्या शिक्षणाकरिता झटणारी ʻदिपालयʼ

Wednesday December 30, 2015,

6 min Read

१४ वर्षीय शाहिनच्या बालपणाचं हे अखेरचं वर्ष असू शकतं. पुढच्या वर्षी तिचे पालक तिला शाळेतून काढण्याची आणि तिचं लग्न लावून देण्याची शक्यता आहे. हरियाणातील सोलाह पट्टी परिसरातील अनेक कुटुंब अशीच भूमिका घेतात. जेव्हा आम्ही तिला पाहिलं तेव्हा ती तिच्या वर्गमित्रांसोबत इतर मुलांप्रमाणे दोरीने खेळत होती. जेव्हा तिचे आमच्याकडे लक्ष गेले तेव्हा तिने तिच्या दुपट्ट्याच्या सहाय्याने संपूर्ण चेहरा झाकून घेतला. ती तिची सवयच होती. कारण तिचे डोके कधीही दुपट्ट्याशिवाय राहणे योग्य नसल्याचे तिला माहित होते. गुसबेथी गावातील दिपालय शाळेतील शाहिनची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत, जिने यशस्वीरित्या आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शाहिनच्या गावातील मुलींनी आजपर्य़ंत कधी शाळेतील वर्गात पाऊलदेखील ठेवले नाही.

image


दिपालयातील स्वयंसेवकांकरिता यशाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यापैकी अनेक व्याख्यांशी आपला दृष्टीकोन मिळेल किंवा एकमत होईल, असे सांगता येणार नाही. मात्र त्या सर्व तुम्हाला सखोल विचार करायला भाग पाडतील. तुम्हाला जे हवे आहे ते करा, जेवढे तुम्हाला शक्य होते तेवढे करा. भलेही तुम्ही अशा समाजात असाल, जेथे तुमच्या विचारांशी कोणी सहमत नसेल. शाहिन हिचे कदाचित काही भविष्यही नसेल. मात्र आपण एक आशा कायम ठेऊ शकतो की, जेव्हा शाहिनला एखादी मुलगी होईल तेव्हा तिच्या भविष्याबद्दल शिक्षणाबद्दल कदाचित शाहिनला जास्त समजेल, जे तिच्या पालकांना समजले नाही. अशाच प्रकारे भारतात बदल होऊ शकतात. मुख्याध्यापक इंदरजीत कुमार सांगतात की, ʻगावातील लोकांना त्यांच्या मुलींना शाळेत शिक्षणाकरिता पाठवायचे नाही. त्यांच्या मते शिक्षणामुळे त्यांच्या मनावर परिणाम होतील.ʼ इंदरजीत यांनी हल्लीच दिपालयमध्ये काम सुरू केले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलांकरिता दिपालय काम करते. शाहिन जात असलेली शाळा १५ वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. सोलाह पट्टी ही मुस्लिम प्रभूत्व असलेली पाच गावांचा समावेश असलेली वस्ती आहे. त्यात किरोरी, गुसबेथी, पिपाका, पटुका आणि भूतलका या गावांचा समावेश आहे.

image


इथे पोहोचण्यासाठी मी हरियाणातील मानेसर येथील टेकड्या पार केल्या. गोंधळाचे, कर्णकर्कश आवाजाचे गुरगावमधील ट्राफिक पार पडल्यानंतर मी हिरवळीच्या शांत अशा वातावरणात प्रवेश केला. लाल विटांचे बांधकाम असलेल्या एका छोट्या शाळेत लहान मुले तीनचा पाढा बोलत होती. शाळेची जमीन धुळीने माखली होती, त्यावर लहान लहान पायांचे ठसे उमटले होते. काही मुले चपला घालून होती तर काही अनवाणी. ताहिल हा माझ्या नजरेत बसण्याचे कारण म्हणजे त्याची उंची इतर मुलांपेक्षा जास्त होती आणि त्याच्या चेहऱ्यावरील केस. दुसऱ्या इयत्तेत शिकणारे मुल तुम्ही असे अपेक्षित करणार नाहीत. वयाच्या १५व्या वर्षी तो त्याच्या वर्गमित्रांकरिता सात वर्षांचा होता. त्याचे वडिल गरीब शेतकरी होते. मात्र तरीही ते त्याला शाळेत पाठवण्यासाठी राजी झाले होते. सोलाह पट्टी परिसरातील अनेक मुलांचे बालपण त्यांच्या वडिलांना शेतात मदत करण्यात जाते. झाडांना पाणी घालणे, पिक कापणी, अशी कामे त्यांना करावी लागतात. जर त्या मुली असतील तर त्यांना स्वयंपाक घराची कामे, पाणी भरणे, लहान भावंडांचा सांभाळ करणे, अशी कामे करावी लागतात. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा विवाहदेखील करण्यात येतो. ʻमुले शेतात पालकांना मदत करत असल्याने या हंगामात वर्गात हजेरी कमी असतेʼ, असे इंदरजीत मान्य करतात.

image


ʻलोक गरिब आहेत. येथील अधिकतम लोक शेतकरी, चालक किंवा मजूर आहेत. येथील सर्वाधिक लोक हे अशिक्षित असून, त्यांना अपत्येदेखील अधिक आहेत. मोठी कुटुंबपद्धती त्यात कमावती व्यक्ती एकच असल्याने मुलांना लहानपणापासूनच त्यांना मदत करावी लागते. अनेक कुटुंबांचा त्यांच्या घरातील लहान मुलांना शाळेत पाठवण्यास विरोध असतो.ʼ, असे ते सांगतात. मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, हे सर्वात मोठे आव्हान होते. कारण मुळात त्यांच्या पालकांनीच कधी शाळेचे तोंड पाहिले नसल्याने शिक्षणाचे महत्व त्यांना समजत नाही. अनेक पालक अजिबात लिहू किंवा वाचू शकत नाहीत. त्यामुळे स्वयंसेवकांना दारोदारी जाऊन या मुलांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून द्यावे लागते. इंदरजीत सांगतात, ʻआम्हाला व्यावहारीक विचार करावा लागतो. आम्ही त्यांना सांगतो, जर त्यांना त्यांच्या मुलाला वाहन चालक बनवायचे असेल, तर त्याने आठवी इयत्ता पास करणे गरजेचे आहे. कारखान्यातील कामगार बनवायचे आहे, तर त्याने दहावीपर्य़ंत शिकणे गरजेचे आहे. मुलांना शिकू द्यावे, यासाठी आम्ही त्यांना राजी करण्याचा प्रयत्न करत असतो.ʼ मुलींना शाळेत पाठवण्यासाठी तयार करणे, हे त्याहूनही आव्हानात्मक असल्याचे ते सांगतात. शिक्षणामुळे त्या आधुनिक बनतील, तसेच त्यांच्या पसंतीच्या मुलासोबत पळून जाऊन विवाह करतील, असा त्यांचा समज आहे. स्त्रिया या आज्ञाधारक मुली तसेच पत्नी असाव्यात, असे त्यांचे म्हणणे असते. शिक्षणामुळे सबलीकरण होत असल्याने त्यांच्याकरिता ते अडथळ्याप्रमाणे असते. अनेक गावकऱ्यांना तर वर्गांमुळेदेखील त्रास होतो. मुलींनी बसमधून प्रवास करणे किंवा मुलांसोबत एकाच वर्गात बसणे, त्यांना मान्य नसते. त्यामुळे पालकांना तयार करण्यासाठी लहान मुलांनी मुलींना ʻदिदीʼ आणि मोठ्या मुलांना ʻभैय्याʼ म्हणून संबोधण्यास त्यांनी सुरुवात केली. तीन शालेय बसेसपैकी एका बसचा वापर फक्त मुलीच करतात. मुलींकरिता या बसचे प्रतिमाह शुल्क ७५ रुपये तर मुलांकरिता २२५ रुपये एवढे आकारण्यात येते.

image


ʻजेव्हा मी दिपालयसोबत काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की माझे काम हे गावोगावी जाऊन लोकांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी राजी करणे, हे होते.ʼ, असे इंदरजीत सांगतात. ते पुढे सांगतात, ʻहे काही मुख्याध्यापकाचे खरे काम नव्हे. परंतू मी हे काम करतो, कारण माझा विश्वास आहे की, शिक्षणामुळे या लोकांच्या मानसिकतेत बदल घडेल.ʼ इंदरजीत सांगतात की, ते स्वतः बिहारमधील एका खेडेगावातून आले आहेत. ʻमी जेव्हा लहान होतो तेव्हा मी माझ्या आजोबांकडून ऐकले आहे की, एका विशिष्ट जमातीतील लोकांचा तुम्हाला स्पर्श झाला तर तुमचा नाश होतो. तेव्हा माझा त्यावर विश्वास बसत असे. पण जेव्हा मी शाळेत जायला सुरुवात केली, तेव्हा मला समजले की, हे कसे पूर्णतः चुकीचे आहे.ʼ, असे ते सांगतात. ते सांगतात की, समाधानकारक गोष्ट म्हणजे गावातील लोकांनी पालकसभेला जाण्यास सुरुवात केली होती. गेल्या महिन्यात ८१ जणांनी शाळेला भेट दिली. ११०३ मुले शाळेत येत असून, त्यांच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे. अनेक पालकांनी फक्त शाळेची फी जास्त असल्याची तक्रार केली. हा खूप चांगला बदल असल्याचे ते सांगतात. शाळेत मुलामुलींचे प्रमाण ६०:४० असे आहे. वार्षिकरित्या १२ लाखाचा निधी गोळा करण्यात ही शाळा यशस्वी ठरते. मात्र त्यांचा खर्च हा ७० लाखाच्या घरात जातो. देणगीद्वारे आम्ही आमचे काम सुरू ठेवत असल्याचे इंदरजीत सांगतात. सदर शाळा घरातून पळून गेलेल्या मुलांकरिता वसतीगृह चालवते. वार्डन जॉन रमेसन आणि त्यांची पत्नी या मुलांसोबत राहतात, त्यांच्यासोबत जेवतात. तसेच त्यांचे वाढदिवसदेखील साजरे करतात. ʻचांगली बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना आम्ही उच्च शिक्षणाकरिता पाठविण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतोʼ, असे ते सांगतात. ख्रिश्चन धर्माचा वसतीगृहाचा वॉर्डन आणि हिंदू धर्मीय मुख्याध्यापक हे मुस्लिम प्रभूत्व असलेल्या गावांसाठी सामाजिक कार्य करतात. येथे कोणीही धर्माबद्दल बोलत नाही, ही सर्वोत्तम गोष्ट आहे. त्यांचा विश्वास फक्त त्यांच्या या कार्य़ावर आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ते कोणता देव मानतात किंवा कोणत्या धर्माचे आहेत, याचा काहीएक फरक पडत नाही. उलट जर कुठे देव असेल तर यांचे काम पाहून तो नक्कीच आनंदी होईल. कारण ते माणुसकीच्या धर्माचे पालन करत आहेत.

image


(१९७९ साली स्थापन करण्यात आलेली दिपालय ही आयएसओ ९००१-२००८ प्रमाणित एक स्वयंसेवी संस्था आहे, जी शहरी आणि ग्रामीण भागातील गरिबांसाठी काम करते. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यात ती अनेक प्रकल्प राबवत आहे. आजच्या तारखेपर्यंत त्यांनी २,७०,००० पेक्षा अधिक मुलांना सुशिक्षित केले आहे. या संस्थेला देणगी स्वरुपात काही द्यायचे असल्यास किंवा त्यांच्यासोबत काम करायचे असल्यास तुम्ही [email protected], [email protected] या संकेतस्थळांना भेट देऊ शकता.)

(या कथेत मुलांची नावे बदलण्यात आली आहेत.)

लेखक - रचना बिश्त

अनुवाद - रंजिता परब