संपादने
Marathi

… कारण हे व्यर्थ न हो बलिदान- शहीद संतोष महाडिक अमर रहे!

kishor apte
21st Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘हे जीवन काय आहे? केवळ आनंदच तर आहे तुम्ही जगा आणि इतरांचे जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न करा. शेवटी या जगाचा निरोप घेताना आपण काय देवून जाणार आहोत याचा विचार करा,’ काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना नुकतेच शहीद झालेल्या कर्नल महाडिक यांचे हे बोल... भारताच्या उत्तर सीमेवरचा पहिला जिल्हा कुपवाडा येथे लष्करात ते तैनात होते. त्यावेळी तेथील स्थानिक तरुणांना समुपदेशन करताना त्यांनी आपले हे विचार व्यक्त केले. दिवाळीच्या दुस-याच दिवशी १४नोव्हेंबरला दहशतवाद्यांशी लढताना कर्नल शहीद झाले. आज सारा देश त्यांच्यातील सैनिकीवृत्ती आणि त्यात दडलेल्या समाजसेवकाची आठवण करताना हळहळत आहे.


image


साधारणपणे कर्नल हा कडक शिस्तीचा आणि कर्तव्यकठोर माणूस असेल असा सर्वसामान्य समज असतो, पण संतोष यांनी आपल्या मृदू स्वभावाने दहशतवादाची शिकार झालेल्या आणि सातत्याने पाकिस्तानमधून स्थानिक तरूणांना भडकवण्याचे प्रयत्न होत असताना जे विश्वासाचे आणि सौहार्दाचे वातावरण तेथे तयार केले त्यामुळे एखादा जवान कारवाईत शहीद झाला तर स्थानिक लोक शोक व्यक्त करण्यासाठी व्यवहार बंद ठेऊ लागले होते. ४१ आरआर मराठा लाइफ इंन्फंट्रीच्या या कर्नलच्या कामाची, त्याच्या शौर्याची, सह्रदयतेची आणि देशाचा सैनिक असूनही त्यापलिकडे देशासाठी राष्ट्र उभारणीसाठी त्या वातावरणातही काहीतरी करण्याची धडपड केवळ महिनाभरापूर्वी त्याला भेटलेल्या मुंबईच्या दोघा पत्रकारांनी याची देही याची डोळा अनुभवली.

मुंबईतील पत्रकार केतन तिरोडकर आणि मिलिंद लिमये एका शैक्षणिक-सामाजिक उपक्रमासाठी जम्मू-काश्मीरला चार आणि पाच सप्टेंबरला जावून आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या अनाथ मुलांच्या देखभाल आणि शिक्षणासाठी काम करणा-या एका संस्थेला ते नियमित मदत करत असतात. त्यासाठीच यावेळी ते तेथे पोहोचले होते. कर्नल संतोष महाडिक या अवलीयाची त्यांची तेथे योगायोगाने भेट झाली. त्यांच्या आतिथ्यशील प्रेमळ वागण्याने प्रभावित पत्रकार मिलिंद यांनी त्यांच्या हौतात्म्यानंतर आठवणी जागवताना सांगितले की, “श्रीनगर जवळच्या हैदरपूरा येथे शिक्षणदिनानिमित्त शैक्षणिक मदत करण्यासाठी मी आणि माझा मित्र केतन पोहोचलो. विमानतळावर पोहचताना आमच्या मनात गेल्या काही वर्षात या भागात कोणते बदल झाले आहेत याची उत्सुकता होती. सुदैवाने मागील भेटीच्यावेळी जो तणावाचा माहोल जाणवला होता तो यावेळी काहीसा निवळल्याचे आम्हाला जाणवले” मिलिंद सांगतात.

ते म्हणाले की, “ विमानतळावर पोहचताना आमच्या मनात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि त्याभागातील काम पहावे असा विचार आला. केतनचा मित्र संदिप भाजीभाकरे मुंबईच्या पोलीसदलात असल्याने त्यांना फोन लावून याबाबत कुणी मदत करेल का म्हणून विचारणा केली तर त्यांनी कर्नल संतोष महाडिक यांचा मोबाईल क्रमांक दिला.”

मिलिंद सांगतात, “श्रीनगरच्या टँक्सी स्टँडवर आम्ही आमचा फोन सुरू केला आणि सुखद धक्काच बसला. संतोष महाडिक यांचा संदेश होता, “वेलकम, कुपवाराला या आणि फोन करा”. मिलिंद सांगतात की, तणावग्रस्त भागातील एका लष्करी अधिका-याचे हे आतिथ्य पाहून आम्हाला लगेचच तेथे जावे की काय असे वाटू लागले. पण आम्ही ज्या कामासाठी आलो ते करून दुस-या दिवशी सकाळी जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. जाताना २००४ मध्ये आम्ही या भागात आलो असताना जो तणाव जाणवला होता तो कुठेच दिसला नाही. सारे काही आलबेल असल्याचे आणि जणू आपण आपल्याच राज्यातल्या गावी आलो असल्याचे वाटत होते,” मिलिंद सांगत होते.

ते म्हणाले की, “आम्ही लाल चौकला गेलो, फोटोसेशन केले, दाल लेक परिसर पाहिला आणि त्याच भागातील हॉटेलवर मुक्काम केला. मनात काश्मीर पूर्वस्थितीत येत असल्याचे समाधान वाटत होते आणि लष्कराच्या जवानांचे या भागातील काम पाहण्याची उत्कंठा होती”.

दुस-या दिवशी कुपवाडाला जाण्याची तयारी करून हे दोन्ही पत्रकार निघाले. त्यांनी कर्नलना त्याबाबत सूचना दिली. गुलमर्ग,उधमपूर-बारामुल्ला रेल्वेलाइन पहात लोलाब परिसरातील लष्करी छावणीवर हे लोक पोहोचले. तेथील कालारुस गावाच्या उंचटेकडीवर लष्कराचा ४१ आरआर मराठा लाईट इंन्फंट्रीचा तळ दिसला. कर्नल संतोष यांनी आमच्या आगमनाबाबतची माहिती दिली असल्याने तेथील मेजर अजय यांनी आम्हाला आमचा मोबाईल आणि गाडीसह पुढे जाऊ दिले. बाहेर छत्रपती शिवरायाचा पुतळा होता. आणि आमच्या समोर हसतमुख चेह-याचे कर्नल संतोष महाडिक स्वत: बाहेर येऊन स्वागताला तयार होते.” मिलिंद सांगतात. “ आत गेल्यावर आम्हाला दिसले की कर्नल यांच्याकडे स्थानिक भागतील काही शिक्षक आले होते आणि त्यांच्याशी ते या भागात साहसी पर्यटनाच्या संधी कशा विकसित होऊ शकतात यावर समुपदेशन करताना दिसत होते. मिलिंद सांगतात की, “आपले म्हणणे या स्थानिकांना पटवून देण्याच्या ओघात कर्नलनी आम्हाला प्रश्न केला आणि आम्हीही ते सांगतात ते योग्य असल्याचा निर्वाळा दिला. या भागात पर्यटनाला चालना दिलीतर शांत-समृध्द काश्मीर पुन्हा साकारता येईल असे आमचेही म्हणणे पडले. या स्थानिकांशी मग आमचाही परिचय झाला त्यांनी त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह केला. त्यातील एक शिक्षक अश्रफ बट यांनी आम्हाला त्यांच्या घरी भोजनाला आग्रहाने नेले. त्यांनी कालारुस गावाची माहिती दिली की येथून एक भुयार जाते ते थेट रशियात उघडते त्यामुळे गावाला ‘कालारुस’ असे नाव पडले आहे.” मेंढीचे दुध, भाजलेला मका असा पाहूणचार करत या स्थानिकांनी मोठ्या आपलेपणाने परिसर फिरवला आणि पु्न्हा लष्कराच्या छावणीत आणून सोडले. हे सारे अनपेक्षित होते. भारतीय लष्कराच्या कर्नल संतोष यांनी स्थानिकांमध्ये तयार केल्या जाणा-या नफरतच्या वणव्यातही आपुलकीची हिरवळ राखली असल्याचे दिसत होते.


image


“काहीवेळ आराम करून कर्नल महाडिक यांच्या सोबत लष्कराच्या संरक्षणात आम्ही तो परिसर पाहिला सा-या बाजूंनी शस्त्र सज्ज जवानांनी घेरल्यानंतर आम्हाला आपण कुठे आहोत याची जाणिव झाली” मिलिंद सांगतात. कर्नल म्हणाले, ‘या भागात अचानक कुठेही हल्ला होऊ शकतो पण तुम्ही आमच्या सोबत आहात निर्धास्त रहा’ वाटेत कर्नल म्हणाले की “ही आमची भुमी आहे इथल्या लोकांच्या आनंदासाठी आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावली आहे. शेवटी जीवन काय आहे? आनंदच ना?” मिलिंद सांगत होते. ते पुढे म्हणाले, “या भागातील नवतरूणांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे म्हणून लष्कराच्या प्रयत्नातून विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात .त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्याच्या शिक्षकांना कर्नल संतोष यांनी पुण्यात प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता”. गावातील लोकांच्या सतत संपर्कात राहिल्याने त्यांच्यात आता एक नाते तयार झाले आहे. स्थानिकांसाठी आरोग्य शिबिरे, संगणक प्रशिक्षण, क्रीडा साहित्य आणि खेळाची मैदाने देण्याचा प्रयत्न यासोबतच किमान शंभर तरूणांना समुपदेशन करून कर्नल संतोष यांनी त्यांना दहशतवादाच्या मार्गावरून ह्रदयपरिवर्तन करून परत आणले आहे आणि स्वयंरोजगारासाठी मदत केली आहे. लष्कराचा एक अधिकारी प्रतिकूल परिस्थितीत एका हातात एके४७ घेवून दुस-या हातात पुस्तक घेऊन स्थानिकांना शिकवतो आहे हे चित्र फारच सुंदर दिसते मात्र त्यामागची तळमळ, मेहनत, देशभक्ती आणि धडाडी यांना सलाम केल्याशिवाय चैन पडत नाही. मुळच्या सातारा जिल्ह्यातील कर्नल संतोष यांच्या वडिलांचा कपडे शिवण्याचा तर भावाचा दुधाचा व्यवसाय आहे. कुपवाडा या देशाच्या उत्तरेतील पहिल्या जिल्ह्याला विकासातील पहिला जिल्हा करण्याचा त्यांचा ध्यास होता. २१पँराएसएफ मधील या कमांडोने या आधी आसामच्या अशांत भागातही असेच चांगले काम केल्याने त्यांना सेना मेडलने गौरवण्यात आले होते.


image


आता मार्च महिन्यात त्यांची पोस्टिंग दुसरीकडे होणार होती. दहशतवादाने काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याला कुरूप बनविले आहे त्याला साहसी पर्यटनाच्या माध्यमातून आणि सीमेपलिकडून होणा-या घातकी कारवायांना रोखून विकासाचे कमळ फुलवण्याच्या प्रयत्नात हा शूर-सह्रदयअधिकारी शहीद झाला. स्थानिक लोकांना तुम्ही या देशाचे आहात हे पटवून देताना बाहेरून येणा-यांना आतिथ्यशिलतेने हा भाग आपलाच आहे हे सांगत हा सैनिक अधिकारी खरोखर सा-यांच्या आनंदासाठी दिवस रात्र झटत होता. दोन लहानग्यांचा पिता असलेल्या शहीद संतोष यांच्या कुटूंबीयावर तर नियतीची कु-हाड कोसळली आहे मात्र तरीही त्यांच्या पत्नीने निर्धार केला आहे की त्यांची दोन्ही मुले मोठी होऊन लष्कराच्या सेवेत जातील! या शूर-वीराला मनापासून अभिवादन करताना त्याच्या धैर्यवान कुटूंबीयानाही सलाम करावा लागेल. कोणतेही युध्द नसताना या देशाच्या अशा हजारो गुणी सैनिकांना आज घातकी हल्ल्यात शहीद व्हावे लागते आहे. शहीद संतोष यांच्या या अकस्मात जाण्याला नियतीच्या दुर्दैवाची झालर असली तरी यापुढे आमचे सैन्य हकनाक मरणार नाही यासाठी भारत सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा यासाठी शहीद संतोषचे मित्र पत्रकार केतन तिरोडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे संतोष यांच्या सारख्या हजारो गुणी सैनिकांसाठी ते ही कायद्याची लढाई लढणार आहेत.कारण --- हे व्यर्थ न हो बलिदान!

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

    Latest Stories

    आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा