संपादने
Marathi

परिवर्तनासाठी एक पाउल, ‘LetzChange’

4th Nov 2015
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

‘लेट अस चेंज’ ही विक्रांत भार्गव यांची कल्पना आहे. विक्रांत आयआयटी आणि आयआयएमचे पदवीधर आहेत. लोककल्याण, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक विकासाबद्दलच्या आत्मीयतेतून त्यांनी ‘लेट अस चेंज’ संस्थेची स्थापना केली. देशातील बहुतांश स्वयंसेवी संस्थांमध्ये आपल्या उदात्त कार्याच्या प्रचार-प्रसारावर फारसा खर्च करण्याची क्षमता नाही, ही बाब त्यांच्या लक्षात आली. अत्यंत विपरीत परिस्थिती जगाची फारशी पर्वा न करता आपल्यापरीने विविध स्वयंसेवी संस्थांकडून तोकड्या साधनांसह सामाजिक परिवर्तनाचे कार्य सुरू आहे, हेही लक्षात आले. मग या संस्थांना आपण काही हातभार लावावा, असे त्यांनी ठरवले.

थोडक्यात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीसाठीच त्यांनी ‘लेट अस चेंज’ सुरू केली. २१ जानेवारी २०१४ मध्ये संस्थेची औपचारिक स्थापना झाली आणि त्यानंतर अवघ्या महिनाभरातच ‘लेट अस चेंज’ने एक कोटीचा आकडा पार केला. तथापि राजकीय उलथापालथींमुळे देणग्या मिळवणे सध्या जरा कठीणच बनलेले आहे. संस्थांबद्दलच्या विश्वासाचा अभावही त्यामागे कारणीभूत आहेच.

image


‘लेट अस चेंज’चे प्रमुख (ऑपरेशन्स) राहुल चोव्वा सांगतात ‘‘देशात जवळपास ३३ लाख स्वयंसेवी संस्था आहेत. ५० ते ५० हजार रुपयांपर्यंत देणगी देण्यास तयार बसलेल्या देणगीदारांचा विश्वास या संस्थांना कमवावा लागेल.’’ ते पुढे सांगतात, ‘‘संस्थांची विश्वासार्हता सध्या कळीचा मुद्दा बनलेली आहे. शून्य टक्के विश्वासही ज्यांच्यावर ठेवू नये, अशा अनेक संस्था आहेत. या संस्थांना पैसे देणे म्हणजे चोराला चावी देण्यासारखे आहे. लाखोंची काय कोट्यवधींची देणगी देणारे देणगीदारही बरेच आहेत. ऑनलाइन देणग्या गोळा करण्यात संस्थांच्या मदतीला आम्ही पुढे सरसावलेलो आहोत.’’

‘‘अमेरिका आणि इंग्लंडमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्थांची यादी उपलब्ध असते. तशी सोय आपल्याकडे नाही. पुष्कळशा संस्था बंदही पडलेल्या असतात. चांगले स्वयंसेवी कार्यकर्ते मिळत नाहीत. तांत्रिक कारणेही असतात किवा मग साधनसामुग्रीच्या अभावामुळेही या संस्था बंद पडतात,’’ असेही विक्रांत नमूद करतात.

विक्रांत यांनी एक आणखी संस्था ‘लेट अस ड्रिम’ही स्थापन केलेली आहे. ‘लेट अस चेंज’चीच ती एक शाखा आहे, असे समजा. विविध स्वयंसेवी संस्थांना देणग्या मिळवून देणे तसेच या संदर्भातील विषयांवर मदत करणे, हे या शाखेचे काम आहे. इंग्लंड, अमेरिकेप्रमाणे भारतातही लोकांमध्ये ऑनलाइन देणग्या देण्याची सामान्य सामाजिक प्रवृत्ती विकसित व्हावी, स्वाभाविक बनावी, हे विक्रांत यांचे उद्दिष्ट आहे.

image


ते सांगतात, ‘‘देणगीदारांच्या संख्येत वाढ व्हावी म्हणून आम्ही सोशल मिडियाचा वापरही करतो. स्वयंसेवी संस्था किती अडचणींचा सामना करतात, हे आम्ही जवळून बघितलेले आहे. विशेषत: ग्रामिण भागात काम करणाऱ्या अनेक संघटना हलाखीच्या स्थितीत असतात. विपरित परिस्थितीतही आपले कार्य सामाजिक बांधिलकीतून सुरूच ठेवणाऱ्या या संस्थांना मदत करायलाच हवी. विशेष म्हणजे या संस्था काम खूप करतात, पण त्यांचे काम देणगीदारांपर्यंत पोहोचत नाही. तशी कुठलीही व्यवस्था उपलब्ध नसते आणि या संस्थाही स्वत:साठी अशी व्यवस्था निर्माण करत नाहीत, किवा करण्याच्या स्थितीत नसतात. म्हणून ‘लेट अस चेंज’ने अशा संस्थांची जबाबदारी स्वीकारलेली आहे.

राहुल पुढे सांगतात, ‘‘२०१२ मध्ये आम्ही भारतातल्या विविध भागांतून १२० बिगर शासकीय संस्था चिन्हांकित केल्या होत्या. त्यातून १०८ संस्था निवडल्या आणि दहा-बारा लघुपट निर्मात्यांना एकत्रित केले. सर्व संस्थांपर्यंत आणि ते राबवत असलेल्या उपक्रमांपर्यंत आम्ही जाऊन भिडलो. या संस्थांच्या प्रयत्नांवर आधारलेल्या इन्फोकमर्शियल (infocommercial ) डॉक्युमेंटरी बनवल्या. अर्थातच या फिल्म नफा कमवण्यासाठी बनवलेल्या नव्हत्या. नंतर आम्ही या सर्व संस्थांचे एक प्रोफाइल बनवले.

‘लेट अस चेंज’ने हे सगळे कार्य एक सामाजिक जबाबदारी म्हणून एका उदात्त हेतूसाठी पार पाडले. संभाव्य ऑनलाइन देणगीदारांसाठी हे कार्य मोलाचे असे होते. स्वयंसेवी संस्थांबद्दलचा अविश्वास, उदासीनता, संशय टोकाला पोहोचलेला असतानाच्या स्थितीत ‘लेट अस चेंज’चे कार्य मैलाचा दगड ठरले. संबंधित सामाजिक संस्थांचा खराखुरा चांगुलपणा नेमकेपणाने पोहोचवून देणगीदारांच्या दातृत्वभावनेला हात घालणे ‘लेट अस चेंज’ला छान जमले.

पुष्कळ संस्था आपला वार्षिक अहवाल सरकारकडे सादर करतात. शंभर पानांचा हा दस्तऐवज कुणीही सविस्तर वाचत नाही. अहवाल बनवणे आणि तसेच संपूर्ण वाचला जाईल, असा बनवणे शिकवण्यासाठी एक व्हिडियो ‘लेट अस चेंज’ने बनवलेला आहे. काही निवडक संस्थांना तो उपलब्धही करून दिलेला आहे. विक्रांत सांगतात, ‘‘80G या 35C अशा प्रमाणीकरणाविषयीही आम्ही मार्गदर्शन करतो. त्याआधारे करांमध्ये सवलत मिळते. देणगीदारांना आम्ही हे देखील समजावतो, की कोणत्या प्रकारच्या किती देणगीने किती प्रकारचे फायदे प्राप्त होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे देणगी द्यावयाच्या संस्थेच्या कामांची काही चांगली उदाहरणेही त्यांना थोडक्यात सांगतो. ’’

image


कुठलेही लोककल्याणाला वाहिलेले प्रतिष्ठान स्थापन करणे आणि चालवणे हे एक अवघड असेच कार्य आहे. कार्यप्रणाली तुम्हाला अशा पद्धतीने विकसित करायची असते, की लोकांमध्ये तुमची विश्वासार्हता वाढतच राहायला हवी. तिला कशानेही तडा जाता कामा नये. आर्थिक देवाण-घेवाण यात होत असल्याने विश्वासार्हता हीच गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची ठरते. विश्वासार्हतेच्या बळावरच आम्ही ठामपणे बोलू शकतो. आम्ही संपर्क १०८ संस्थांशी केला, पण ७१ संस्थांचीच शिफारस केली. या संस्था खरोखर प्रामाणिकपणे काम करत होत्या. म्हणजे एखाद्या देणगीदाराने त्याच्या पातळीवर जरी ही बाब तपासली तरी आपण खोटे पडता कामा नये, ही खबरदारी आम्ही घेतलेली होती.’’

‘‘अनेक संस्था आमच्या वेबसाइटच्या सदस्य होऊ इच्छितात, पण आमच्या निवडप्रक्रियेच्या कसोटीवर उतरल्याशिवाय आम्ही कुणालाही आमचे सदस्य करून घेत नाही,’’ राहुल सांगतात, ‘‘नव्या संस्थांची निवड करताना आम्ही फार काळजी घेतो. देणगीदाराने दिलेली रक्कम समाजोपयोगी कार्यावर खर्च केली जाईल, त्याची हमीच आम्ही घेतलेली असते. आम्ही निवडलेली एखादी संस्था स्वत: जेव्हा अन्य एखाद्या संस्थेची देणगीसाठी शिफारस करते, तेव्हा आम्ही त्याला महत्त्व देतोच. कारण शिफारस करणारी संस्था आमच्या निवडप्रक्रियेतून गेलेली असते. आम्हाला काय अपेक्षित असते, हे या संस्थेला ठाऊक असते. सध्या २० संस्थांची परीक्षण प्रक्रिया सुरू आहे. महिनाभरात बहुदा त्या आमच्या यादीवर असतील. धार्मिक स्वरूपाच्या आणि राजकीय पक्षांशी संलग्न असलेल्या संस्थांना आम्ही आमच्या यादीत घेत नाही. अर्थात धार्मिक स्वरूपाच्या संस्थांच्या विरोधात आम्ही आहोत असा मात्र याचा अर्थ नाही. बहुतांश देणगीदारांना धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या संस्थांना देणगी द्यायची नसते, हे त्यामागचे कारण आहे.’’

संस्था निवडण्यासंदर्भात तपशीलवार माहिती देताना राहुल सांगतात, ‘‘खरं म्हणजे आम्ही आमच्यासाठी नव्हे तर एखाद्या संस्थेच्या उपक्रमासाठी हातभार लागावा अशी तजवीज करतो. उदाहरणार्थ अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करणे. आता अशी शाळा सुरू करणारी संस्था आम्हाला सांगते, की यासाठी इतका पैसा लागणार आहे आणि मग आम्ही उपक्रम आणि येणारा खर्च याची आमच्या पातळीवर पडताळणी करतो. मगच तो उपक्रम फंडिंगसाठी म्हणून आमच्या वेबसाइटवर अपलोड करतो.’’

राहुल म्हणतात, की आम्ही संस्थेच्या नोंदणीपोटी कुठलेही शुल्क आकारत नाही. मोठ्या संख्येने आमच्यासोबत पात्र संस्था संलग्न होत नाही, तोवर ही सवलत सुरूच राहील. कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांसमवेत आमची या संदर्भात चर्चाही चाललेली आहे. उत्तम वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. उदाहरणार्थ एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीतील चांगल्या पगाराचा असा कर्मचारी हेरणे जो मासिक हप्त्याने रक्कम पाठवून एखाद्या संस्थेच्या एखाद्या चांगल्या उपक्रमाला वर्षानुवर्षे सहकार्य करेल.

कामाचा वाढता व्याप पाहाता मनुष्यबळाची आवश्यकताही ‘लेट अस चेंज’ला भासेलच, यासंदर्भात राहुल हसतच सांगतात, ‘‘आम्हालाही तुमच्यासोबत घ्या म्हणून बरेच अर्ज आम्हाला वेबसाइटवर प्राप्त होतात. स्वयंसेवक म्हणून घ्या, असेच अर्ज अर्थात जास्त प्रमाणात असतात. पण तसे काही शक्य नाही. कारण आमचा थेट असा संबंध कुठल्याही संस्थेशी नाही. आम्ही फक्त देणगीदार आणि संस्था यांच्यादरम्यान दुवा म्हणून काम करतो. पण अशा संस्था जर आम्हाला उपलब्ध झाल्या, ज्यांना स्वयंसेवकांची आवश्यकता आहे, तर मग आम्ही हा नवा विचार करू शकतो. ‘लेट अस चेंज’पुरते बोलायचे तर इथे आमच्याकडे काम करणारे बहुतांश तरुणच आहेत. विशेष म्हणजे आम्ही ज्या लोकांसाठी काम करतो, ते सगळेच आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. ‘नॉन कार्पोरेट’ वातावरणात आमच्याकडले हे सगळेच तरुण उत्साहाने काम करतात.’’

image


‘आणखी देणगीदारांनी आमच्यासोबत संलग्न व्हावे म्हणून आम्ही ‘चॅम्पियन ऑफ दी चेंज’ हा एक नवा उपक्रम राबवतो आहोत. यात आम्हाला असे लोक अपेक्षित आहेत, जे अन्य देणगीदारांशी संपर्क साधू शकतात आणि नवे देणगीदार आणि आमच्यातला दुवा म्हणून काम करू शकतात. एक सॉफ्टवेअर कंपनी आमच्यासाठी ‘डोनर मॅनेजमेंट सिस्टिम’ विकसित करते आहे, आम्ही तसा करारही या कंपनीशी केलेला आहे. एखादा देणगीदार जेव्हा आमच्या वेबसाइटवर नोंदवला जातो, तेव्हा त्याच्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून त्याच्याशी संलग्न असलेल्या लोकांशी आम्ही संपर्क साधतो आणि त्यांना आमच्या या उपक्रमासाठी आमंत्रित करतो.

खरं तर आम्ही लोकांना एक ‘देणगी संवर्धन व्यासपीठ’ उपलब्ध करून देऊ इच्छितो.

आमचे हे अभियान विशेषत: तीन वर्गांभोवती फिरते : १) शाळकरी मुले (ईमेलच्या माध्यमातून) २) युवक, १५ ते २५ वयोगट (फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून) आणि ३) व्यावसायिक (लिंक्डइनच्या माध्यमातून)

‘लेट अस चेंज’ने बरेच काही केलेले आहे. बरेच काही चाललेले आहे आणि पुढेही वाटा तशा अनंतच आहेत. संपणाऱ्या नाहीतच. देशभरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांशी लोकांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘लेट अस चेंज’ करीत आहे. लहानसहान आणि अत्यंत महत्त्वाची कार्ये पार पाडणाऱ्या संस्थांना ‘लेट अस चेंज’ प्रकाशात आणत आहे. माहिती आणि ज्ञानाचे एक प्रभावी माध्यम म्हणून काम करत आहे.

…आणि दिवस मावळतीला आला तसे राहुल आपले बोलणे आवरते घेतात… एक मंद स्मित करतात… म्हणतात, ‘‘तर हा होता आमचा थोडक्यात परिचय’’ आणि त्यांचे हेच मंद व स्वाभाविक स्मित जणू ‘‘लेट अस चेंज’’च्या धोरणांवरले तोरण असते!!

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags