संपादने
Marathi

‘दुर्गसखा’चे पर्यटनातून एक पाऊल मानवतेकडे...

Pramila Pawar
21st Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

पायाला भिंगरी लागली आणि सह्यपर्वतातील पाऊलवाटावरून भटकंती सुरु झाली. अनेक गड, जलदुर्ग, भुईकोट आणि शिखरांच्या भेटी होऊ लागल्या. हा आनंद लुटत असताना डोळ्यांना आणि मनाला खटकत होते ते या अमूल्य ऐतिहासिक ठेव्याची पर्यटकांकडून होत असलेली हेळसांड आणि विटंबना. अनेकदा डोळ्यांसमोर हे घडत असुनही, सहनही होत नाही ...अशी अवस्था होत होती. याच वेदनेतून जन्म झाला ‘दुर्गसखा’चा...

image


सुधागड येथे पहिले दुर्गभ्रमण जुलै २००९ मध्ये आयोजित करणार्‍या ‘दुर्गसखा’ने त्यांच्या गडभेटींचे आत्तापर्यंत शतक पूर्ण केले. महाराष्ट्र ही इतिहासाची जन्मभूमी. प्रभू रामचंद्रांपासून शिवप्रभूंपर्यंत अनेक शूरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी. त्यांच्या तेजस्वी दर्शनमात्रे बहरलेल्या अनेक कथा-दंतकथा महाराष्ट्राचा कणा समजल्या जाणार्‍या सह्याद्रीतच नव्हे तर या इथल्या मातीच्या कणाकणात भिनलेल्या आहेत. इथल्या बालकांच्या बाळमुठींमध्ये अभिमान फुंकून त्यांचं वज्रमुठींमध्ये परिवर्तन करण्याची अलौकिक शक्ती या कथांमध्ये आहे. परंतू गेल्या काही वर्षात भटकंती करताना एक गोष्ट खटकली. ती म्हणजे, परवशतेतले तोफगोळे सुद्धा माशी झटकावी तसे झटकून टाकणारे हे मानी पुराणपुरुष स्वराज्यात मात्र स्वैराचाराच्या नंग्यानाचाने अपमानित होऊन माना टाकत आहेत. राजगड काय किंवा त्याच्या समोरचाच तोरणा काय, हे आणि असेच अनेक भले मातबर किल्ले अंगाखांद्यावर पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि खोके झाडाझुडपांआड लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. या समस्येचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करत असताना ‘दुर्गसखा’च्या असं लक्षात आलं की गडदुर्गांकडे बघण्याचा दृष्टीकोन हेच या सगळ्या समस्येचं मूळ आहे. किल्ला-गड म्हणजे शहरातल्या गोंगाटापासून दूर जाऊन निवांत सायंसंध्या करण्याचं ठिकाण किंवा अंगातली रग आणि चित्रकलेची खुमखुमी जिरवण्याचं ठिकाण. त्यामुळे या ठिकाणी गेल्यावर अस्सल शिवभक्तांची मान आदराने तुकवली न जाता शरमेने झुकवली जाते आणि म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून ठाण्यातील काही तरुण मित्र मंडळींनी ‘दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट’ या छोटेखानी दुर्ग व समाजसेवी संस्थेची स्थापना केली. इथे तरुण या शब्दाचा ‘मनाने तरुण’ असा अर्थ अभिप्रेत आहे. जनसामान्य आणि दुर्ग यांच्या भेटी होताना त्यांच्यातला पर्यटक लुप्त होऊन दुर्गभ्रमण लुब्ध व्हावा म्हणून प्रबोधनात्मक दुर्गभ्रमण आयोजीत करण्यात येतात. या दुर्गभ्रमणदरम्यान सहभागींना पर्यावरण, इतिहास तसेच उपेक्षितांच्या अपेक्षांची जाणीव करून दिली जाते. गेली सात वर्ष ‘दुर्गसखा’ सातत्याने हे कार्यक्रम राबवत असून विविध किल्ल्यांवरून आत्तापर्यंत अनेक पोती कचरा गोळा करण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यात वृक्षारोपण, गडांवरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, फसव्या वाटांवर मार्गदर्शक रंगवणे, गडाची माहिती देणारे फलक असेही छोटे छोटे उपक्रम राबवले आहेत.

image


संस्थेतर्फे दरवर्षी दोन ‘दूर्ग अभ्यास भ्रमण’ आयोजित केले जाते. त्या कार्यक्रमादरम्यान गडावर हिंडताना इतिहास अभ्यासक सभासदांना दुर्गांची बलस्थाने व दुर्गांचा इतिहास उलगडून दाखवतात आणि प्रश्नोत्तरादरम्यान शंकांचे निरसन केले जाते. तसेच या सोबत महिला विशेष दुर्गभ्रमण ही आयोजित केली जाते. या कार्यक्रमाद्वारे राजगड, रायगड, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी-नाणेघाट, सुधागड , सरसगड, रोहीडा, चौल, रेवदंडा, फणसाड अभयारण्य, कोर्लई , कोरीगड, लोहगड, राजमाची, कोथळीगड, विकटगड, अशा दुर्गांचा दूर्ग अभ्यास भ्रमण आत्ता पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. तसेच शहापूर येथील माहुली गड स्वच्छता मोहीम वर्षातून दोनदा आखली जाते.

image


‘दुर्गसखा’ ही दोन उपक्रमांमधून काम करते. संस्थेची दोन ध्येयवाक्य आहेत ते म्हणजे ‘पर्यटनातून प्रबोधन’ आणि ‘एक पाऊल मानवतेकडे’.

पर्यटनातून प्रबोधन हे घडत असताना या गडदुर्गांच्या परिसरात राहणार्‍या आदिनिवासी बांधवांनाही मदतीची गरज आहे याची जाणीव झाल्याने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील विविध आदिवासी पाड्यांवरील शालेय विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ व्हावा म्हणूनही दुर्गसखाने प्रयत्न केले आहेत. यामध्ये विविध पाड्यांमध्ये, शाळेपर्यंतचा प्रवास सोपा होण्यासाठी सायकली, त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शैक्षणिक सी.डी. आणि दूरदर्शन संच, संगणक साक्षरतेसाठी काही निवडक शाळांमध्ये संगणक, विद्यार्थी दत्तक योजना, अनेक विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप, दिवाळीत फराळ आणि फटाके यांचे वाटप, गावकर्‍यांच्या आग्रहाखातर ग्रंथालय, गरजूंना कपडे वाटप अशा अनेक समाजोपयोगी कामांचा समावेश आहे. ही सारी कामे प्रत्येकजण आपापल्या प्रापंचिक जबाबदार्‍या सांभाळून स्वयंप्रेरणेने करीत असतो.

image


दुर्गसखाचे सर्व सभासदही पूर्णवेळ आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. मात्र महिन्याला एक दोन दुर्गांची भेट घेतल्याशिवाय त्यांना करमत नाही. अर्थात, वर सांगितल्याप्रमाणे ही भेट सोबतच्या मंडळींच्या मानसिकतेत चांगला बदल घडविण्यासाठीच असते. चांगलं काम हे चुंबकाप्रमाणे असतं आणि ते अजून विविध चांगल्या कामांना त्याच्या कर्त्याकडे खेचून घेतं. सह्याद्रीत भटकायचं म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर राहणार्‍या आदिनिवासींनाही भेटणं आलंच. म्हणूनच, आदिवासी बांधवांची नवीन पिढी उत्तम शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून तेथील विविध आदिवासी पाड्यांवरील शालेय विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ व्हावा म्हणूनही दुर्गसखाने त्यांच्या ध्येयवाक्यात एक वाक्य अजून जोडते केले ते म्हणजे ‘एक पाऊल मानवतेकडे’.

image


दुर्गसखाने त्याच्या दुसर्‍या वर्षात पदार्पण केले आणि ३० जानेवारी २०११ या रोजी शहापूर पासून ३६ किमी अंतरावर असलेल्या बेलवली या गावत शैक्षणिक साहित्य वाटप आणि सायकल वाटपाचा पहिला कार्यक्रम ठेवण्यात आला. तसेच माळ गावात असणार्‍या गतिमंद मुलांनी बनवलेल्या दिवाळीसणातील पणती, कंदील, रांगोळी उटणे अशी साधन त्यांच्याकडून घेऊन ती शहरात ना नफा ना तोटा या तत्वावर लोकांपर्यंत पोहचवली गेली. दुर्गासखा गेल्या सहा वर्षांपासून अशी अनेक समाजोपयोगी कार्य करीत आहेत.

मात्र या मदतीमधे सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, पष्टेपाडा या आदिवासी पाड्यावर घडलेला शैक्षणिक चमत्कार. होय चमत्कारच. कारण येथील आदिवासी मुलं टच स्क्रीनच्या फळ्यावर अभ्यास करतात, त्यांचं पाठ्यपुस्तक म्हणजे त्यांचा ‘टॅब’ आणि त्यांची तोंडी परिक्षा म्हणजे व्हिडीयो रेकॉर्डिंग. ज्या गावापर्यंत पक्का रस्ता नाही तिथे या गोष्टी आढळणं हा चमत्कारच आहे आणि हे घडवून आणलं आहे तेथील जिद्दी शिक्षक संदीप गुंड सर, शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ डोंगरे आणि केंद्रप्रमुख महेंद्र धीमते यांनी. शाळा आधी कशी होती आणि ती कशी निर्माण झाली याचा एक व्हिडीओ सुद्धा युट्यूब सारख्या सांकेतीक स्थळांवर उपलब्ध आहे. २०१२ ते २०१३ या एका वर्षात त्या शाळेचा पूर्ण कायापालट तेथील शिक्षक , केंद्रप्रमुख, गावकरी आणि इतर अनेक संस्थांच्या मदतीने पूर्ण करण्यात आला.संगणक दिलेल्या पष्टेपाडा शाळेतील एक विद्यार्थी २०११-१२ च्या वर्षातील प्राथमिक शिषवृत्ती परीक्षेत मेरीटमध्ये आला. या जिद्दीतूनच उभी राहिली महाराष्ट्रातील पहिली आणि राष्ट्रपतींनी गौरवलेली ‘डिजीटल शाळा’.

खडू-फळा विरहीत शाळेचा ध्यास घेतलेल्या गुंड सरांनी, दुर्गसखाने शाळेला दिलेला संगणक वापरून प्राथमिक चाचण्या सुरू केल्या. त्यांना या माध्यमाची ताकद पूर्ण उमगली आणि पाहता पाहता जनाधाराच्या मदतीने शाळेने कायापालट केला. शाळेची जुनी गळकी इमारत दुरूस्त करून तिला ‘छोटा भीम’ आणि इतर मजेशीर कार्टून्सची रंगविण्यात आलं. शाळेत थ्री डी एनिमेशनचे टि. व्ही. घेऊन पाड्यातच तारांगण तयार करण्यात आलं. दुर्गसखाच्या सुबोध पाठारेने त्यांना अँड्रॉईडवर चालणारा मल्टीटास्किंग इंटरएक्टीव प्रोजेक्टर शोधून दिला. ज्यामुळे अगदी मोबाईलवरही डिजीटल पाठ्यपुस्तक लोड करून ते प्रोजेक्टरद्वारे मुलांना शिकवता येऊ लागलं. लवकरच या चमत्काराची महती गावोगावी आणि अनेक जिल्ह्यांत पसरली. तेथील आधुनिक शाळांच्या सहली या शाळेला भेट देण्यासाठी येऊ लागल्या आणि त्याचा परिणाम वीजबिलाच्या भरारीमधे झाला. सुरूवातीला त्यांच्या शिक्षकमित्रांनी वर्गणी काढून बीलाची चुकवणी केली. पण नंतरमात्र खर्च परवडेनासा झाला. इथेही पुन्हा दुर्गसखाच शाळेच्या मदतीला धाऊन आलं. पुणेस्थित ‘आपुलकी’ या संस्थेशी निगडीत संजय पाचपोर यांच्या मदतीने शाळेसाठी सुमारे एक लाख रूपयांची सोलार सिस्टीम बसवण्यात आली आणि वीजमंडळाच्या मीटरला कायमचाच निरोप देण्यात आला. पण एक झाले की दुसरी अडचण येतच होती, अँड्रॉईडवर चालणारा मल्टीटास्किंग इंटरएक्टीव प्रोजेक्टर चालवण्यासाठी वीज ही हवीच. हे फक्त आपल्या शाळेपुरत नसावे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हापरिषद शाळा आणि पाड्यातील शाळेत डीजीटलाईजेशन व्हावं हे तेथील संदीप गुंड सरांना वाटू लागले, महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा आणि त्यात शिकणारे सर्व विद्यार्थी हे माझे आहेत. त्यांना हे आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या खटा-टोप पुन्हा सुरु झाला. अन यावेळी सुद्धा दुर्गसखाने वैज्ञानिकदृष्ट्या त्याच्यावर तोडगा काढला. दुर्गअभ्यासवर्ग-दुर्गभ्रमण करण्याच्या वेळी वापरली जाणारी बैटरी ही त्या प्रयोगात वापरण्यात आली. प्रोजेक्टर हा २५ वोल्टेजवर चालणारा असाच निवडला होता, त्याचा आउटपुट हा त्या बैटरीला जोडण्यात आला आणि प्रश्नांचे उत्तर आनंदायी मिळाले. त्या अडीज किलोच्या बैटरीवर ५ तासाचे ५ धडे शिकवले जाऊ लागले. पण बैटरीला ही चार्ज करण्यासाठी वीज हवीच. त्यामुळे हा पूर्ण प्रोजेक्ट नाशिकजवळ असणार्‍या सोलार प्लेट बनवणार्‍या कंपनीस दाखवण्यात आला. त्यांना हा प्रोजेक्ट आवडला आणि त्यासाठी त्यांनी १२ बाय ७ इंच च्या ४ प्लेटी जोडून एक पोर्टेबल प्लेट तयार करून दिली. आता डीजीटलाईजेशन हे पूर्ण एका बॅगेत समाविष्ट झाले आहेत. आज शाळेतील सगळी उपकरणं ही या सोलार सिस्टीमने निर्माण केलेल्या वीजेवरच चालतात. अगदी व्यवस्थित आणि रोज.

आज पष्टेपाडा हे महाराष्ट्रात नाही तर प्रत्येक राष्ट्रात जाऊन पोहचले आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच श्री प्रकाश बाबा आमटे यांच्या हेमलकसा या लोकबिरादरी शाळेने या डिजिटलशाळेची दखल घेतली. शालेय अभ्यासक्रमाच्या डीजीटलाईजेशनचा हा प्रयोग महाराष्ट्रातील ७०० शाळांमध्ये राबवला जाणार आहे. ‘दुर्गसखा’ दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेते. तसेच सुमारे २००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे टप्प्याटप्याने वाटप करण्यात आले. धसई या गावामध्ये काही होतकरू व सेवाभावी वृत्तीच्या तरुणांनी लहान गाव असूनही एक छोटे वाचनालय सुरु केले.दुर्गसखाने या वाचनालयाला आत्तापर्यंत सुमारे २५००० रुपयांची पुस्तके दिली आहेत. सदर पुस्तके ही अनेक दुर्गसख्यांनी घरोघरी स्वत: फिरून जमा केली आहेत. तर अशी आहे ही आपले खाजगी व्याप सांभाळून ही समाजाच्या उन्नतीसाठी धडपडणार्‍या शिवप्रेमी, सह्यप्रेमी आणि निसर्गप्रेमी तरूणांच्या ‘दुर्गसखा’च्या वाटचालीची ओळख.

image


आपण आनंदात असताना दुसर्‍याही कोणालातरी आनंदाची गरज आहे. याची जाणीव असणं हेच माणुसकीचं खरं लक्षण आहे. - पु.लं देशपांडे.

आपणही जर यांच्या भावी उपक्रमांमधे सहभागी होऊ इच्छित असाल तर त्यांच्या www. durgasakha.org या संकेतस्थळाला भेट द्या.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा