संपादने
Marathi

‘ब्ल्यू पॉटरी’ – नामशेष होऊ घातलेल्या पिढीजात कलेचं पुनरूज्जीवन

जयपूरच्या कारागिरांच्या भूतकाळातून त्यांचं वर्तमान आणि भविष्यही घडवणा-या...लीला बोर्डिया

6th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आपला परंपरागत कामधंदा सोडून शहरी रोषणाईमुळे पसरणा-या अंधारात हरवलेल्या कारागिरांना मदत करणं हेच त्यांनी आद्य कर्तव्य मानलं होतं. पण या कारागिरांना मदत करता करता कधी त्या स्वत: एक व्यावसायिक बनल्या, त्यांचं त्यांनाही समजलं नाही. इतिहासजमा होत चाललेली ‘ब्ल्यू पॉटरी’ची कला पुन्हा जिवंत करण्याचं काम त्या करत होत्या. त्या कारागिरांना त्यांच्या पिढीजात कलेसोबतचं नातं जिवंत ठेवता आलं आणि पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना शहरांकडे पाहण्याची गरज उरली नाही. 65 वर्षीय लीला बोर्डिया यांची काम करण्याची जिद्द आणि दूरदृष्टी यामुळेच कदाचित हे शक्य होऊ शकलं..नक्कीच !

खरंतर याची सुरुवात झाली ती 1950 मध्येच. राजस्थानच्या एका मारवाडी परिवारात लीला बोर्डिया यांचा जन्म झाला. समाजसेवेचं व्रत त्यांना घरातूनच मिळालं होतं. आपल्या आईला इतर काही महिलांसोबत कलकत्त्याच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन तिथल्या लोकांना मदत करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. कधीकधी तर त्या स्वत:ही आईसोबत जात होत्या. काही वर्षांनंतर लीला यांना कळलं की त्यांची आई ज्या महिलांसोबत जायची, त्यातल्याच एक होत्या मदर तेरेसा !

एक अविरत सेवा..कलेची..आणि मानवजातीचीही...

एक अविरत सेवा..कलेची..आणि मानवजातीचीही...


1974मध्ये लीला बोर्डियांचं लग्न झालं आणि त्या जयपूरला आल्या. मोकळा वेळ जावा म्हणून त्या जवळच्याच एका शाळेत बालवाडीला शिकवायला जाऊ लागल्या. एक दिवस काही कामानिमित्त त्यांना घराजवळच्या एका झोपडपट्टीमध्ये जावं लागलं. तिथे त्यांनी पाहिलं की पोटाची खळगी भरण्यासाठी गावातून शहरांमध्ये आलेली माणसं कोणत्या नरकयातनांमध्ये आपलं आयुष्य घालवतायत.

लीला सांगतात, “तिथल्या माणसांचा रोजचं आयुष्य जगण्यासाठी चाललेला झगडा पाहून मी मुळापासून हादरून गेले. माझ्यापरीनं शक्य ती सर्व मदत मी त्यांना करायला लागले. त्यांची मदत करता करता माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्यापैकी बरेच जण आपली पिढीजात कला जोपासत खूप सुंदर अशी रंगीत मातीची भांडी तयार करत होते.”

थोडी अजून चौकशी आणि अभ्यास केल्यानंतर लीला बोर्डिया यांना या कलेबद्दल अर्थात ‘ब्ल्यू पॉटरी’बद्दल खूप काही समजलं. त्यांच्या असं लक्षात आलं की हे कारागीर जी मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवत होते, त्याच्यासाठी बाजारात फारशी मागणी नाहीये. पण त्याचवेळी त्यांना त्या कलेमध्ये आणि त्या भांड्यांच्या निळ्या रंगामध्ये आशेचा किरण दिसत होता.

लीलांनी त्या कारागिरांना भांडी बनवण्याच्या त्यांच्या परंपरागत पद्धतीमध्ये काही बदल करायचा सल्ला दिला. मात्र आपल्या पिढीजात पद्धतीचाच अवलंब करण्यासाठी ते कारागीर आग्रही होते. शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर एक कारागीर त्यांनी सांगितल्याप्रमाणे भांडी आणि इतर वस्तू बनवण्याच्या पद्धतीत बदल करण्यासाठी तयार झाला.

योगायोगाने याचदरम्यान लीलांची भेट 1977मध्ये फ्रान्सहून आलेल्या पॉल कोमर यांच्याशी झाली. पॉलने त्यांना मोत्यांपासून बनवलेले पडदे निर्यात करण्याचा सल्ला दिला. लीला सांगतात ही संधी साधून त्यांनी त्यातल्याच काही कारागिरांच्या मदतीने हे पडदे बनवले आणि ऑर्डर पूर्ण केली. याचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की सर्वच कारागिरांमध्ये हा संदेश गेला की लीला बोर्डिया यांना परदेशातून कामाच्या ऑर्डर मिळू लागल्या आहेत. आणि आता हे कारागीर स्वत:हूनच लीला यांच्याकडे येऊ लागले.

लीलांनी त्या कारागिरांना त्यांच्या मूळगावी जाऊन ही काम करण्यासाठी तयार केलं आणि थेट तिथे जाऊनच त्या या कारागिरांकडून ही कलाकुसरीची कामं करून घेऊ लागल्या. लीला सांगतात, “मी ठरवलं होतं की मला जे जे काम मिळेल, ते मी या कारागिरांच्या गावी जाऊनच त्यांच्याकडून बनवून घेईन. आणि माझा निर्णय योग्यच होता याची साक्ष मला लवकरच पटली.”

लीलांना सर्वात पहिलं काम कुठलं करायचं होतं तर ते म्हणजे या कारागिरांना पुन्हा त्यांच्या मूळ कलेपर्यंत घेऊन जाणं. त्यांची कला जिवंत ठेवण्यात त्यांना मदत करणं. “पण काही काळ गेल्यानंतर मला हे जाणवलं की आता हे फक्त एक समाजकार्य राहिलं नाहीये. त्याहून काहीतरी मोठं काम यातून होऊ शकेल.” यातूनच त्यांनी ‘ब्ल्यू पॉटरी’च्या माध्यमातून काहीतरी नवीन करण्याचे प्रयत्न सुरु केले.

ब्ल्यू पॉटरी’मध्ये एका विशिष्ट मातीचा उपयोग केला जात होता. ही माती फक्त दोन रंगांची होती. पांढरी आणि निळी”, लीला सांगत होत्या, “मी फक्त या दोन रंगांमध्ये एका तिस-या रंगाची भर घातली. पिवळा रंग. यानंतर तर जणूकाही या कलेचं रुपडंच बदललं आणि आम्हाला भरपूर नवीन ऑर्डर्स मिळाल्या.”

याचदरम्यान एक विशेष गोष्ट घडली. ‘फार पॅव्हेलियन्स’ या सिनेमाचं शूटिंग त्यावेळी जयपूरमध्ये सुरु होतं. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अॅमी आयर्विंगनं तिथल्या कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी केल्या. याशिवाय या कारागिरांना ताज ग्रुपकडून जयपूरमधल्याच रामबाग पॅलेसच्या एका भागावर पारंपरिक राजस्थानी पद्धतीने नक्षीकाम करण्याचं काम मिळालं. हाच भाग आजही नीलमहल या नावानं ओळखला जातो. हे सांगताना लीला बोर्डिया यांच्या डोळ्यांत चमक होती, “याचदरम्यान आम्हाला काही परदेशी ऑर्डर्स मिळाल्या आणि तेव्हाच आम्ही आमची अशी स्वतंत्र कंपनी स्थापन केली. ‘नीरजा इंटरनॅशनल’.” इथूनच लीला बोर्डिया यांचा एका छोट्याशा मदतीपासून सुरु झालेला प्रयत्न राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचला.

‘नीरजा इंटरनॅशनल’चं काम नक्की कसं चालतं यावर बोलताना लीला म्हणाल्या, “जेव्हा नीरजा इंटरनॅशनलला कोणतंही काम मिळतं, तेव्हा कच्च्या मालासहित ते काम थेट कारागिराच्या गावात त्याच्या घरी पोहोचवलं जातं. माल तयार झाल्यानंतर कारागिराला त्याच्या कामाचा मोबदला तिथेच दिला जातो आणि माल जयपूरला आणला जातो. जयपूरमध्ये मालाची तपासणी करून तो ऑर्डरनुसार ग्राहकांना पाठवला जातो.” हे सांगताना लीला बोर्डिया यांच्या चेह-यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. त्या सांगतात की त्यांनी कधीही माल तयार करण्यासाठीच्या कच्च्या मालामध्ये भेसळ करण्याचा किंवा तो बदलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी तोच कच्चा माल वापरला जो हे कारागीर पिढ्यानपिढ्या वापरत आले होते. याचाच परिणाम म्हणून सध्या लीलांनी आसपासच्या 15 गावांमधल्या 500 कुटुंबांना या व्यवसायाशी जोडून घेतलं आहे. आणि ‘ब्ल्यू पॉटरी’ची प्राचीन कला जिवंत ठेवली आहे.

“आमच्यासोबत काम करणारे कारागीर कमीत कमी 20 हजार रुपयांपासून ते तब्बल 2 लाख रूपये महिन्याला कमावतात. त्यामुळे आम्ही या कारागिरांचं त्यांच्या पिढीजात कलेशी असलेलं नातं जिवंत ठेवलं आहे. आणि नामशेष होऊ लागलेली एक प्राचीन कलाही आम्ही वाचवू शकलोय.” लीलांच्या डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्नं अगदी सहज दिसत होती.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags