संपादने
Marathi

“मिमिक्री कलाकारापासून हास्य कलाकार बनण्यासाठी लागली १० वर्ष”

हैदराबादमधून सुरु झाली होती जॉनी लिवर यांच्या यशाची कहाणी

Team YS Marathi
30th Apr 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

संघर्ष आणि यश यांचे नाते अतूट आहे. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. मात्र अनेकदा असे होऊ लागते की संघर्ष खूप दीर्घ काळ चालतो आणि संघर्ष करणारी व्यक्ती त्यामुळे उध्वस्त होऊ लागते. या उध्वस्त होण्यापासून स्वतःला रोखणे आणि स्वतःला ‘चरैवेति’वाल्या (सतत कार्यशील राहणे) स्थितीमध्ये ठेवणे गरजेचे असते. यशाची काहीशी अशीच कहाणी आहे हिंदीतील लोकप्रिय हास्य कलाकार जॉनी लिवर यांची. जॉनी लिवर यांनी हास्याला खूप गांभीर्याने घेतले आणि चित्रपटांबरोबरच रंगमंचावरील हास्यात ते खूप दीर्घ आयुष्य जगले. ते आता आयुष्याची एकोणसाठ वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांचे जीवन हे संघर्षानंतरच्या यशाचे जिवंत उदाहरण आहे. आज जगभरात जॉनी लिवर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. मात्र ही ओळख त्यांना एका अशा कार्यक्रमानंतर मिळाली जो त्यांच्यासाठी नव्हता. त्यांचा पहिला रंगमंचीय कार्यक्रम हैदराबादच्या रवींद्र भारतीमध्ये झाला होता. त्यांचे गुरु आणि हास्य कलाकार रामकुमार यांनी स्वतःची तब्येत खराब असल्यामुळे आपला शिष्य जॉनीला हैदराबादला पाठविले. असं म्हणतात की कला एक न एक दिवस सर्वांसमोर येतेच. फक्त ती योग्य वेळ आणि योग्य संधीच्या शोधात असते. जॉनी यांनी हैदराबादमध्ये आपल्या पहिल्याच शोमध्ये धुम माजवली. तो दिवस आणि आजचा दिवस. जॉनी लिवर यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. हेच कारण आहे ज्यामुळे जॉनी हैदराबादचा कधीच विसर पडू देत नाहीत. काही दिवसांपूर्वी जेव्हा ते हैदराबादला आले होते तेव्हा एका संध्याकाळी मनोरंजक गप्पा झाल्या.

image


एका खाजगी मैफिलीत जॉनी एवढे खुलले की त्यांनी सर्व पत्ते खुले करत आपल्या आयुष्यातील अनेक मनाला भावणाऱ्या घटनांना उजाळा दिला. जॉनी लिवरने गप्पांची सुरुवात हैदराबादपासूनच केली. ज्या शहरात त्यांनी आपला पहिला शो केला होता, त्याच शहरात जेव्हा ते स्वतःचा शो घेऊन येऊ इच्छित होते तेव्हा आंदोलनांच्या घटनांमुळे त्यांना तो शो रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा लवकरच ते इथे आपला शो सादर करण्याची योजना बनवत आहेत. जॉनी यांच्याशी अनेक विषयांवर गप्पा झाल्या. त्यांचे स्वतःचे आयुष्य, कला आणि कलाकारांची स्थिती आणि हास्याची सद्यस्थिती, आणखीही बरेच काही.

image


जॉनी यांनी युअरस्टोरीला सांगितले, “मी आजही तो दिवस विसरु शकत नाही, ज्या दिवशी मी जान राव पासून जॉनी लिवर बनलो. मी हिन्दुस्तान लिवरमध्ये काम करायचो. माझ्या ऑफीसच्या एका कार्यक्रमात जेव्हा मी माझ्या सर्व उच्च अधिकाऱ्यांची त्यांचे नाव न सांगता मिमिक्री केली तेव्हा कर्मचाऱ्यांमधील कोणीतरी जोरात घोषणा केली की ‘तू जॉनी लिवर आहेस’. बस त्या दिवसापासून मी जॉनी लिवर बनलो.”

जॉनी सांगतात, “जेव्हा मी तरुण होतो. हिंदुस्तान लीवरमध्ये नोकरी करत होतो. वडिलांना भिती वाटायची की या हसण्या-हसविण्याच्या चक्करमध्ये मी नोकरी सोडली तर. त्यावेळी मला नोकरी करुन 600 रुपये पगार मिळायचा. स्टेज शो मध्ये भाग घेतल्यावर ५० रुपये मिळायचे. वडिल जेव्हा सेवानिवृत्त झाले होते तेव्हा त्यांना २५००० रुपये मिळाले होते, जे त्यांनी मुलीच्या लग्नासाठी जमा केले होते. त्याच दरम्यान मला कछवा छाप अगरबत्तीची एक जाहिरात मिळाली, ज्यासाठी जाहिरातदाराने खुश होऊन मला २६००० रुपये दिले. वडिल एवढे आश्चर्यचकित झाले. जे वडिल कधी काळी दांडा घेऊन स्टेजपर्यंत मला मारायला आले होते, पण स्टेजसमोर तीन हजार लोकांची गर्दी पाहून मागे परतले होते, त्यांना अंदाज नव्हता की हसण्या-हसवण्याचे कोणी एवढे पैसे देऊ शकतं.”

image


जॉनी आपल्या पेनवाल्या सिंधी चाचांनाही कधी विसरत नाहीत. सिंधी चाचा फुटपाथवर आयुष्य घालवत होते. त्यांनी जॉनीला आपल्या फुटपाथवरच्या दुकानासमोर पेन विकायला सांगितलं होतं. जॉनी जेव्हा वेगवेगळ्या फिल्मी अभिनेत्यांची मिमिक्री करुन पेन विकू लागले तेव्हा चाचांचे सर्व ग्राहक त्यांच्या हिश्श्याला आले. चाचांनी ते पाहून म्हटले, “जॉनी मी तूला पेन विकायला शिकवलं आणि माझे सारे ग्राहक तू घेऊन टाकलेस. आता तू मला मिमिक्री शिकव म्हणजे मी तुझे सगळे ग्राहक घेऊ शकेन.”

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजेच मुंबईच्या धारावीमध्ये जन्मलेल्या जॉनी यांचे सुरुवातीचे जीवन आधी चाळ आणि त्यानंतर एका झोपडीवजा घरात गेले. तिथूनच त्यांनी लोकांच्या भाषाशैलीचे निरीक्षण करायला सुरुवात केली, जे त्यांच्या कलात्मक आणि व्यावसायिक आयुष्याचा हिस्सा बनले. त्या वातावरणाबद्दल जॉनी सांगतात, “तो एक मिनी भारत होता, जिथे देशातील प्रत्येक भाषा बोलणारे लोक होते. ते हिंदीसुद्धा बोलायचे ते त्यांच्या शैलीत. त्यांचे हिंदी समजून घेणे सुद्धा खूप कठीण असायचे. तिथे तर श्रीलंकेचे लोकही होते.”

image


या गप्पांमध्येही जॉनी हैदराबादबद्दल आपले मत मांडण्यास विसरले नाहीत. ते सांगतात, “इथली भाषा पूर्णपणे वेगळी आहे. किंबहुना हैदराबादी काहीही बोलले तरी त्यामध्ये हास्याचा एक खास स्वाद लपलेला असतो. पंजाबी लोकांबद्दल बोलले जाते की ते कुठेही जाओत, आपला हेल सोडत नाहीत, मात्र ते सुद्धा हैदराबादमध्ये आले तर आपला हेल विसरुन हैदराबादी बोलू लागतात.”

जॉनी लिवर यांनी आणखी एक घटना सांगितली. आपल्या पहिल्या चित्रपटाची. एका दक्षिणी फिल्म निर्मात्याने त्यांना १९८० मध्ये ‘ये रिश्ता न टूटे’साठी साईन केले होते. ते सांगतात, “मी कॅमेऱ्यासमोर ऍक्टिंग करायला घाबरत होतो. शुटींग चेन्नईमध्ये होते. मुबंईवरुन चेन्नईला आलो तर होतो, पण विचार करत होतो की पळून जावं. पळून जायचा प्रयत्नही केला. पण फिल्मवाले पकडून शुटींग स्थळी घेऊन गेले. तिथे जेव्हा सर्व लोकांना आपले आपले काम करताना पाहिले तेव्हा जीवात जीव आला आणि लक्षात आले की आपलेच काम आपण करण्यात घाबरण्यासारखे काय आहे.”

image


मुलगी जेमी लीवर आणि मुलगा जेसी लीवरचा विषय आल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते दोघांचीही कधीही शिफारस करत नाहीत, किंबहुना जेमीने लंडनमध्ये उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतरही स्टॅण्डअप कॉमेडीला निवडले आणि टिव्ही मालिकेत निवड झाल्यानंतर वडिलांचे नाव सांगितले.

मुलीविषयी जॉनी सांगू लागले, “मी विचार केला होता की ती उच्च शिक्षण घेऊन काहीतरी काम करेल. यासाठीच तर तिला अभ्यास करण्यासाठी लंडनला पाठविले, पण एक दिवस तिने तिच्या आईला सांगितले की ती स्टॅण्डअप कॉमेडी करु इच्छिते. झोपेतून ती हडबडून उठते आणि झोपेत सुद्धा तेच बडबडते. जेव्हा की तिला खूप समजावले की हे सोपे नाही, मात्र तरीही ती काही केल्या माने ना. त्यानंतर लंडनमधल्या माझ्या एका शोमध्ये जेव्हा तिला दहा मिनिटं दिली गेली, तेव्हा तिने तेवढ्याच वेळात अशी कमाल करुन दाखवली की प्रेक्षकांनी उभं राहून तिची प्रशंसा केली आणि म्हणाले ‘जॉनी आपकी प्रतिस्पर्धी आ गयी’. माझ्या मुलातही तोच कीडा मी पहातोय.”

जॉनी यांना आपण चित्रपटांमध्ये गोविंदाबरोबर एका यशस्वी हास्य अभिनेत्यांच्या जोडीच्या रुपात पाहिले आहे, मात्र एक गोष्ट त्यांच्या मनात नक्कीच राहिली आहे की त्यांना मिमिक्री कलाकारापासून हास्य कलाकाराच्या रुपात आपले स्थान निर्माण करण्यास दहा वर्ष लागली होती. ते सांगतात, “मला फिल्म मेकर्स गांभीर्याने घेत नसत. मी सुद्धा दोन भागात विभागला गेलो होतो. फिल्म आणि स्टेज शो. जास्त ते फिल्म निर्माता दिग्दर्शकांना मी मिमिक्रीच्या कामासाठी आठवायचो, पण जेव्हा बाजीगर चित्रपटातील माझे काम बघितले तेव्हा लोकांनी मला हास्य अभिनेता म्हणून मान्य केले.”

सद्यस्थितीवरही ते मोकळेपणाने बोलतात, “प्रत्येक युगात परिवर्तन आले आहे, यायलाही पाहिजे, पण याचा अर्थ हा नाही की दोन बंद खोल्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या गोष्टी कुटुंबासमोर सादर केल्या जाव्या. हे अमान्य आहे.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

फार रडलोय हसवण्यासाठी…

...उदयोन्मुख महिला कॉमेडी क्वीन्स : ऋचा आणि सुमुखी

भालचंद्रचा बनला भाऊ...

लेखक - एफ एम सलीम, डेप्युटी एडिटर - युअरस्टोरी उर्दू

अनुवाद – अनुज्ञा निकम

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags