संपादने
Marathi

फेरीवाला ते कोट्यवधींचा मालक, डोळस व्यक्तींना प्रेरणा देणाऱ्या एका अंधाचा साहसी प्रवास

sachin joshi
29th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Shareदृष्टी गमावली

भवेश भाटिया जन्माने अंध नव्हते. मोठे होईपर्यंत त्यांना अंधुकसं दिसत होतं. डोळ्याच्या पडद्यावरील स्नायूंच्या ऱ्हासामुळे त्यांना दृष्टीदोष होता. भवेश यांना माहित होतं की काही काळानंतर त्यांची दृष्टी अजून कमी होईल, पण वयाच्या २३ व्या वर्षीच अपेक्षेपेक्षा लवकर त्यांची दृष्टी गेली. त्यांना भविष्यातील तयारीसाठीही वेळ मिळाला नाही.

तेव्हा ते एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते, आणि त्यांच्या कर्करोगग्रस्त आईच्या उपचारांसाठी पैसा साठवत होते. केवळ आईवरच्या प्रेमापोटी ते असं करत नव्हते तर त्यांची आई त्यांची प्रेरणा होती, जीवनातील समस्यांशी लढण्याची शक्ती त्यांना आईकडून मिळत होती. त्यांना स्वत:च्या अस्तित्वासाठी आईला वाचवायचं होतं.


image


४५ वर्षांच्या भवेश भाटिया यांना अजूनही शाळेतील ते दिवस आठवतात, “ शाळेत मुलं मला खूप त्रास द्यायचे, मला सारखं आंधळा मुलगा म्हणून चिडवायचे, त्यामुळे एकदा मी घरी येऊन आईला म्हटलं की उद्यापासून मी शाळेत जाणार नाही. पण माझं म्हणणं मान्य न करता आईनं माझ्या डोक्यावरुन हात फिरवत सांगितलं की, ती मुलं तुला त्रास देतात कारण त्यांना तुझ्याशी मैत्री करायची आहे, पण तू त्यांच्यापेक्षा वेगळा असल्यानं ते तुझ्यापासून लांब राहतात. म्हणूनच तुझं लक्ष त्यांच्याकडे जावं यासाठी ते असं करत असल्याचं त्यांनीच मला सांगितल्याचं आई म्हणाली. आईच्या या म्हणण्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं पण मी ते केलं. दुसऱ्या दिवशी शाळेत त्या मुलांनी मला पुन्हा त्रास दिला तेव्हा मी मैत्रीचा हात पुढे केला आणि आम्ही आयुष्यभरासाठी मित्र झालो.”

“जीवनातील हा सुरूवातीचा धडाच माझ्या व्यवसायातील तत्व बनलाय. माझी गरीबी आणि माझ्यातील दोष ही माझ्यासमोरची आव्हानं होती. पण त्यातील सकारात्मक विचारांमुळेच माझी निर्णयक्षमता वाढली आहे,” असं ते सांगतात. त्यामुळेच आईला गमावण्याची भीती असतानाच दृष्टी गमावणं त्यांच्यासाठी मोठा आघात होता. त्यांना नोकरीवरुनही काढून टाकण्यात आलं. वडिलांनी केलेली बचतही आईच्या उपचारांवर खर्च झाली होती. नोकरी नव्हती आणि नवीन नोकरी ते करुही शकणार नव्हते, या धक्क्यानं लवकरच त्यांच्या आईचं निधन झालं.

भवेश सांगतात, “ आईशिवाय मी पूर्णपणे हतबल झालो होतो. आईने मला घडवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते, तिचं शिक्षण झालं नसलं तरी मला फळ्यावरील काही वाचता येत नसल्यानं ती तासनतास माझा अभ्यास घ्यायची. माझ्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आईने माझा असाच अभ्यास घेतला. ” त्यामुळे आईसाठी भवेश यांना सक्षम बनायचं होतं. त्याची सुरूवात झाली खरी पण तेव्हाच आई जग सोडून गेल्यानं आपल्यावर मोठा अन्याय झाल्याचं भवेश सांगतात.

आघात

आई, दृष्टी आणि नोकरी गेल्यानं ते पूर्णपणे निराश झाले. पण, “ तुला जग नाही पाहता आलं तरी चालेल पण असं काही तरी कर ज्यामुळे जग तुझ्य़ाकडे पाहिल.” आईच्या या शब्दांनी मला हिंमत दिली. त्यामुळे रडत बसण्यापेक्षा आईच्या सल्ल्याप्रमाणे जग ज्याची दखल घेईल असं काही तरी करण्याचा शोध मी सुरू केला.

असं काही तरी शोधणं कठीण नव्हतं, भवेश सांगतात की, “ लहानपणापासूनच मला हातांनी वस्तू बनवण्याचा छंद होता. मी पतंग बनवायचो, मातीची खेळणी, छोट्या मूर्ती तयार करायचो. मी मेणबत्ती तयार करण्याच्या व्यवसायात हात घालण्याचं ठरवलं कारण त्यात माझ्या आकार आणि गंध जाणवण्याच्या ज्ञानाचा उपयोग होणार होता. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला प्रकाशाचं प्रचंड आकर्षण आहे.”

पण सुरूवात करण्यासाठी भवेश यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्तीशिवाय दुसरं काहीही नव्हतं, “ मी १९९९ मध्ये मुंबईच्या राष्ट्रीय अंध प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलं. मेणबत्ती कशी तयार करायची हे मी तिथं शिकलो. मला रंग, सुगंध आणि आकारांशी खेळायचं होतं. पण रंग आणि सुगंध माझ्या बजेटबाहेर होते.” त्यामुळे ते रात्रभर मेणबत्त्या तयार करुन महाबळेश्वरच्या बाजारात एका लोटगाडीवर विक्री करायचो. “ ती लोटगाडी एका मित्राची होती, ५० रुपये रोजाने मी ती गाडी त्याच्याकडून घेतली होती. दुसऱ्या दिवसाचं सामान घेण्यासाठी मी २५ रुपये बाजूला काढून ठेवायचो.” यात प्रचंड मेहनत असली तरी जिवंत राहण्याचा तो एकमेव मार्ग होता. “ असं असलं तरी मला माझ्या आवडीचं काम करायला मिळत होतं,” असं भवेश सांगतात.

भाग्याचा दिवस

एक दिवस एक महिला त्यांच्या गाडीजवळ मेणबत्त्या खरेदी करण्यासाठी थांबली आणि अचानक काही तरी सकारात्मक घडत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांची सौम्य वागणूक आणि त्यांच्या स्मितहास्यानं त्या प्रभावित झाल्या. त्यांची लगेचच मैत्री झाली आणि ते तासनतास गप्पा मारु लागले. कदाचित यालाच पहिल्या नजरेतलं प्रेम असं म्हणतात, पण दोन आत्म्यांच्या संवादाशिवायही या नात्यात खूप काही होतं.

त्यांचं नाव नीता होतं आणि भवेशने त्यांच्याशी लग्नाचा निश्चय करुन टाकला. नीता यांनाही दररोज त्यांच्याशी गप्पा मारव्याशा वाटायच्या तसंच भवेशशी लग्नाचा विचारही त्यांच्या मनात आला. मेणबत्ती विकणाऱ्या गरीब आणि अंध माणसाशी लग्न करायला नीताच्या कुटुंबियांनी खूप विरोध केला पण नीता आपल्या निश्चियावर ठाम होत्या. लवकरच त्यांनी लग्न करुन महाबळेश्वरमध्ये एका छोट्याशा घरात आपल्या संसाराला सुरूवात केली.


नीता या प्रचंड आशावादी होत्या. नवीन भांडी घेण्यासाठी पैसा नव्हता म्हणून भवेश ज्या भांड्यात मेण वितळवायचे त्याच भांड्यात नंतर नीता स्वयंपाक करायच्या. आपल्या पत्नीला याबाबत वाईट वाटत असणार असा विचार भवेश यांच्या मनात आला तरी नीता यांनी कधीही अशी तक्रार केली नाही. आपल्या पतीला शहरात मेणबत्त्या विक्रीला नेण्यासाठी त्यांनी एक दुचाकी गाडी घेतली. नंतर परिस्थिती आणखी सुधारली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या नेण्यासाठी व्हॅनही शिकून घेतली. “ ती माझ्या जीवनातील प्रकाश आहे”, असं भवेश म्हणतात.


image


संघर्ष

साहजिकच नीता यांची साथ लाभल्यानं भवेश यांचा संघर्ष सोपा झाला होता. त्यांना आव्हानं आता मोठी वाटत नव्हती.

“अनेकांकडे मी मदतीसाठी गेलो पण, तू अंध आहेस, तुला काय करता येईल?, अशी उत्तरं मला मिळाली. मी मेणबत्ती बनवणारे मोठे व्यावसायिक आणि इतर संस्थांकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला पण मला कोणीही प्रतिसाद दिला नाही.”

कर्जासाठीचे अर्ज तर स्वीकारलेच जात नव्हते. कोणाकडून पैसे मागितले तर खूप वाईट प्रतिक्रिया असायची. मेणबत्ती तयार करण्यासाठी ते तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला गेले तर त्यांचा अपमान करण्यात आला. भवेश यांना आजही आठवतं, “पत्नीसोबत मॉलमध्ये जाऊन तिथं ठेवलेल्या महागड्या मेणबत्त्या मी हातात घेऊन त्यांचा आकार जाणून घ्यायचो.” त्या स्पर्शातून त्यांना जे काही जाणवायचं ते स्मरणात ठेवून आपल्या सृजनशीलतेच्या सहाय्यानं त्यांनी मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या बनवण्यास सुरूवात केली. अंध व्यक्तींसाठीच्या योजनेद्वारे सातारा बँकेने त्यांना १५ हजार रुपयांचं कर्ज मंजूर केलं आणि हेच त्यांच्या जीवनातलं महत्त्वपूर्ण वळण ठरलं. “ त्या पैशांच्या सहाय्यानं आम्ही १५ किलो मेण, दोन साचे आणि पन्नास रुपयात एक हातगाडी विकत घेतली,” असं भवेश सांगतात. त्यानंतर त्यांनी यातूनच कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला. आज अनेक प्रतिष्ठित कार्पोरेट कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत, तसंच २०० कर्मचारी त्यांच्याकडे आता काम करत आहेत. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व २०० कर्मचारी अंध आहेत.

यशाचं एकमेव रहस्य

“ जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं की अनेकांनी मला कर्ज नाकारलं कारण या जगाचा व्यवहार एकाच पद्धतीने चालतो. लोक डोक्यानं विचार करतात मनाने नाही. माझ्या मते तुमचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर मनाने विचार करा. यात खूप वेळ जाईल पण तुम्ही मन लावून काम केलंत तर तुम्ही तुमचं ध्येय नक्की गाठाल,” असा विश्वास भवेश व्यक्त करतात.

एक दिवस असा होता की दुसऱ्या दिवशी लागणारं मेण घेण्यासाठी भवेश २५ रुपये रोज बाजूला काढून ठेवायचे. आता सनराईज कँडल्स ९ हजार प्रकारच्या साध्या, सुगंधित मेणबत्त्या बनवण्यासाठी २५ टन मेणाचा वापर करतंय. रिलायन्स इंडस्ट्रिज, रनबक्षी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रिज आणि रोटरी क्लब यासारखे काही प्रमुख उद्योग त्यांचे ग्राहक आहेत.

सनराईज कँडल्स अंध व्यक्तींनाच नोकरी का देते याबद्दल भवेश सांगतात, “ आम्ही अंधांना प्रशिक्षण देतो कारण काम शिकून त्यांनी फक्त आम्हाला मदत न करता ते समजून घेऊन उद्या ते स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकता. ” भवेश कल्पकता आणि निर्मितीच्या कामाकडे लक्ष देतात तर नीता या कंपनीचं रोजचं कामकाज आणि प्रशासकीय काम पाहतात. अंध मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी त्या त्यांना प्रशिक्षणही देतात.

खेळाडू

शून्यातून कोट्यवधींचा व्यवसाय सुरू करणाऱ्या भवेशना ज्या अडचणींचा सामना करावा लागला ते पाहता त्यांचा पूर्ण वेळ यातच जात असेल असंच अनेकांना वाटतं. पण ते एक खेळाडूही आहेत आणि आपली क्षमता वाढवण्यासाठी ते व्यावसायिक प्रशिक्षणही घेतात.

“ शाळेत असताना मला खेळात भाग घ्यायला खूप आवडायचं, अंध असणं म्हणजे शरीराने कमकुवत असतो असं नाही. मी खेळाडू असल्याचा मला गर्व आहे,” असं भवेश म्हणतात. सनराईजचं साम्राज्य उभं करण्यासाठी भवेश यांना खेळाकडे लक्ष देता आलं नाही, पण आता व्यवसाय वाढलाय आणि स्थिर झालाय. त्यामुळे ते अत्यंत शिस्तीने प्रशिक्षण घेत आहेत.

“मेणबत्त्यांच्या व्यवसाय स्थिर झाल्यानंतर मी पुन्हा खेळांचा (पिस्तुल, भालाफेक आणि थाळीफेक) सराव सुरू केला.” पॅरालम्पिक खेळांमध्ये मला १०९ पदकं मिळाली आहेत. माझ्या सरावात मी दररोज ५०० बैठका काढतो, ८ किलोमीटर धावतो, आणि कारखान्यातील जिममध्येही जातो. धावण्याच्या सरावासाठी माझी पत्नी नायलॉनच्या एका दोरीचं टोक व्हॅनला बांधते आणि दुसरं टोक माझ्या हातात देते आणि मग मी धावतो," असं भवेश सांगतात. “पण कधीतरी जर मी तिला ओरडलो तर दुसऱ्या दिवशी त्या व्हॅनचा वेग वाढवतात,” असंही ते गंमतीनं सांगतात.

स्वप्न, ध्येय आणि भवितव्य

ब्राजीलमध्ये २०१६मध्ये होणाऱ्या पॅरालम्पिकसाठी भवेश तयारी करीत आहेत. आणखी एक विश्वविक्रम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

“२१ मीटर उंचीच्या जगातील सगळ्यात मोठ्या मेणबत्तीचा विक्रम जर्मनीच्या नावावर आहे. त्यापेक्षा मोठी मेणबत्ती बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. गेल्या एप्रिलमध्ये आम्ही नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि इतर २५ नामवंत व्यक्तींच्या मेणाच्या मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं आहे.”


image


जी ध्येय मी निश्चित केली आहेत ती गाठल्यानंतर मला खूप समाधान मिळेल, असं भवेश सांगतात.

“ माझी काही स्पप्न आहेत आणि काही ध्येयसुद्धा आहेत. माऊंट एव्हरेस्टवर चढणारा पहिला अंध व्यक्ती होण्याचा मान मला मिळवायचा आहे. ब्राझीलमध्ये २०१६ला होणाऱ्या पॅरालम्पिकमध्ये मला देशासाठी सुवर्णपदक मिळवायचं आहे. पण त्याहीपेक्षा मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे भारतातील प्रत्येक अंध व्यक्तीला स्वत:च्या पायावर उभं करायचं आहे.”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags