संपादने
Marathi

अण्णांनी पोलिसाला त्याच्याच काठीने इतके मारले की त्याच्या डोक्याला आठ टाके पडले...भाग- ३

24th Aug 2016
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

अण्णांना त्यांचे मामा मुंबईला घेऊन गेले होते. मुंबईमध्ये अण्णांनी सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. घरची बिकट परिस्थिती आणि आर्थिक चणचण यामुळे अण्णांना लहान वयातच नोकरी करावी लागली होती. अण्णांनी मुंबईमध्ये फुले, फुलांचे हार आणि फुलगुच्छ तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली. फुलांचा व्यवसाय करण्यामागे एक विशिष्ट कारण होते. अण्णा शाळा सुटल्यावर फुलांच्या एका दुकानात जाऊन काम करायचे. तिथे इतरांना काम करताना पाहून ते फुलांचे हार आणि गुच्छ बनवायला शिकले. अण्णांनी बघितले की त्या दुकानदाराने त्याच्या फुलांच्या दुकानात काम करण्यासाठी पाच मजूर नेमले होते. आणि दुकानदार त्यांच्या गरीब परीस्थतीचा फायदा घेत होता. अण्णाने विचार केला की स्वतःचे दुकान सुरु करण्यातच फायदा आहे. अण्णा सांगतात, “ फुलांचे काम करणे म्हणजे सात्विक काम. देवाला हार-फुलमाळा अर्पण केल्या जातात. यामुळे मी हा व्यवसाय करायचे ठरवले.”

मुंबईमध्ये अण्णांच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाले. तसे म्हटले तर किसन बाबूराव हजारे मुंबईत पहिल्यांदा अण्णा हजारे बनले होते. एक सामाजिक कार्यकर्ता आणि आंदोलनकर्ता बनायची त्यांची सुरुवात इथूनच झाली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे किशोरावस्थेतच अण्णा यांनी अन्याय आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती. त्यांचे वय लहान होते पण त्यांची अन्यायाविरोधात झगडण्याची वृत्ती आणि नेतृत्वक्षमता पाहून पीडित त्यांच्याकडे मदत मागायला येत असत.

image


अण्णा जिथे फुलं विकायचे तिथे अन्य मजूर आणि स्वयंरोजगार करणारे फळे, फुले, भाज्या विकत असत. अण्णा बघायचे की, पोलीसवाले दररोज गरीब कष्टकरयांकडून ‘हफ्ता’ वसूल करायचे. हफ्ता नाकारल्यास मारझोड करत जोरजबरदस्तीने हफ्ता वसूल करत असत. अण्णा मात्र हफ्ता देण्याच्या विरोधात ठाम होते. अण्णांचा विरोध पाहून अन्य विक्रेते हफ्त्याचा विरोध करत त्यांच्याकडे मदतीसाठी यायचे. अण्णा पोलीसवाल्यांना समजवायचे की, हफ्ता वसुली करणे चुकीचे आहे. आणि गरीब कष्टकार्यांना त्रास देणे अन्यायकारक आहे. काही पोलीस अण्णांचे म्हणणे ऐकायचे काही मात्र दुर्लक्ष करायचे. अण्णा सांगतात की, “कितीही समजावले तरी पोलिसांना फारसा फरक पडायचा नाही, कारण त्यांना हफ्ता वसूल करण्याची सवय झाली होती.”

काही कालावधीतच अण्णा पीडित आणि शोषित व्यक्तींचा बचाव करणारे नायक बनले होते. किसन सर्वांचे ‘अण्णा’ झाले होते. अन्याय सहन करणे आणि इतरांवर होणारा अन्याय बघत शांत बसणे त्यांना मान्य नव्हते. तरुण होते, अंगात उत्साह होता, आईने दिलेले शिकवण त्यांच्या मनात भिनलेली होती, शक्य होईल तेवढी लोकांची मदत करायची. अण्णा अन्यायाचा विरोध करणारे कार्यकर्ता बनले होते.

अशा प्रकारच्या अन्यायाविरोधात झगडताना एक घटना अशी घडली की अण्णा यांना मुंबई सोडणे भाग पडले. एके दिवशी एका फळविक्रेत्याने हफ्ता नाही दिला म्हणून पोलिसाने त्याला खूप बदडले. पोलिसांचा मार खाल्यानंतर तो विक्रेता अण्णांकडे आला. अण्णा त्याच्याबरोबर पोलिसांकडे गेले. अण्णाने पोलीसवाल्याला जेव्हा जाब विचारला की ते गरिबांना का त्रास देतात म्हणून ? तेव्हा पोलीसांनी मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. अण्णांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, “ मी पोलीसवाल्याकडे गेलो आणि त्याला विचारले की, का गरिबांना त्रास देता म्हणून ? त्याने माझ्यावरच ओरडायला सुरुवात केली. त्याच्या हातात एक काठी होती, ती काठी मी माझ्याकडे ओढून घेतली आणि त्याच काठीने त्या पोलीसाला मारायला सुरुवात केली. त्याला इतके मारले की, त्याच्या डोक्याला आठ टाके पडले.”

अहिंसा आणि शांतीचे दूत मानले जाणारे अण्णा असे करू शकतात यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. पण अण्णांनी पोलसाला बेदम चोप दिला होता. गांधीवादी विचारधारेवर विश्वास ठेवणारे अण्णा ही घटना सांगताना म्हणतात की, वास्तवात माझ्या हातून हिंसा घडली होती. त्यावेळी माझ्या जीवनात गांधीजी नव्हते. माझ्यासमोर तर शिवाजी महाराज आदर्शवत होते. त्यांच्यानुसार राजा किवा पटेल जेव्हा चूक करतो तेव्हा त्याचे हात कापले पाहिजे.”

पोलिसाला मारले म्हणून अण्णांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी केला होता. अटकेपासून बचाव व्हावा म्हणून अण्णांना भूमिगत व्हावे लागले. पोलिसांना चकमा देत ते वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. अण्णांनी सांगितले की, “दोन ते तीन महिने मी भूमिगत होतो. माझ्या फुलांच्या व्यवसायाचे खूप मोठे नुकसान झाले. खरे तर फळविक्रेते माझे नातेवाईक नव्हते, मात्र अत्याचाराविरोधात लढणे माझे कर्तव्य होते, जे मी पूर्ण केले.”

अण्णा सांगतात त्यांच्यासाठी ते दिवस फारच कठीण होते. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्यांना अनेकदा रेल्वेस्थानकावर झोपावे लागले. कधी कोणत्या तर कधी कोणत्या मित्राकडे राहून त्यांनी रात्री घालवल्या. त्यांना कायम सतर्क राहावे लागायचे. त्यांनी पोलिसाला मारले होते म्हणून सर्व पोलीस त्यांना शोधण्यासाठी प्रयत्नशील होते. फुलांचे दुकान बंद झाले होते म्हणून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. अण्णा सांगतात कि, “ते दिवस फारच भयंकर होते. खूप धोका पत्करावा लागला होता, खूप अडचणींना सामोरे जावे लागले होते. पोलीस मात्र मला पकडू शकले नाही.” अण्णा जेव्हा भूमिगत होते तेव्हा त्यांना समजले की भारत सरकारने युवकांना सेनेत भरती होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी अण्णांनी निर्णय घेतला की सेनेत भरती व्हायचे आणि सैनिक बनायचे. अण्णा सेनेत भरती झाले आणि अटक होण्यापासून वाचले.

मात्र... मुंबईने त्यांना एक आंदोलनकारी आणि सामाजिक कार्यकर्ता बनले होते. पोलीसाच्या घटनेआधी अण्णांनी मुंबईमध्ये भाडेकरूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन सुरु केले होते. त्या दिवसात मुंबईमध्ये काही गुंड भाडेकरूंकडे जायचे आणि त्यांना घर खाली करायला धमकी द्यायचे, त्यांच्याकडून वसुली करायचे. अण्णांना जेव्हा हे प्रकरण समजले तेव्हा त्यांनी त्यांच्या विचारांचे समर्थन करणाऱ्या काही मित्रांसमवेत एक संघटन तयार केले. अण्णांनी त्यांच्या मित्रांबरोबर जाऊन त्या गुंडांना धमकी दिली की जर वसुली बंद झाली नाही तर परिणाम वाईट होतील. अण्णांची धमकी, त्यांची हिम्मत पाहून मोठमोठे गुंड त्यांना घाबरायचे. अण्णा सांगतात की, “ मी लहानपणापासूनच अन्यायाविरोधात लढण्यास सुरुवात केली. मी लहान होतो पण त्या गुंडांना सांगितले की गुंडगिरी करणे आम्हालाही जमते, यामुळे तेथील गुंड त्यांना घाबरत होते.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा 

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

    Latest Stories

    आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा