संपादने
Marathi

कर्करोगाशी लढणाऱ्या धैर्यशालीनीचे 'द पिंक इनिशिएटीव्ह' !

Supriya Patwardhan
23rd Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कर्करोग... नाव ऐकताच आपल्या मनाचा थरकाप उडवणारा हा आजार.... त्याची केवळ कल्पनाच आपल्याला भयभीत करुन जाते. पण 'द पिंक इनिशिएटीव्ह' च्या उज्जवला राजे यांनी स्वतः त्यावर यशस्वी मात करून आज त्यासाठी हजारो रुग्णांना प्रेरणा देण्याचे काम करत आहेत. खरे तर कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि त्यापैकी कितीतरी प्रकारचे कर्करोग हे योग्य आणि वेळीच घेतलेल्या उपचारांमुळे बरेही होऊ शकतात. मात्र याबाबत पुरेशी जागरुकताच नसल्याने याबाबत सामान्य लोकांमध्ये भीती असते. एवढेच नाही तर या अज्ञानातूनच निदान आणि उपचारांना होणाऱ्या विलंबामुळे कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही मोठे आहे. आज घडीला जगभरात कर्करोगाने होणारे मृत्यू सुमारे पन्नास टक्के एवढे आहेत. त्यातही पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्याकडची परिस्थिती तर अधिकच गंभीर म्हणावी लागेल.

कुटुंब, मुलेबाळे यांच्या जबाबदारीसह इतर अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या तब्येतीबाबत अगदीच बेजबाबदार असल्याचे सर्रासपणे आढळून येते. त्यामुळेच शरीराकडून अनेक संकेत मिळत असतानाही त्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात आणि कर्करोग आपला विळखा आणखी आवळत जातो. ही परिस्थिती बदलण्यासाठी आज अनेक व्यक्ती आणि संस्था काम करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक महत्वाची संस्था म्हणजे ‘द पिंक इनिशिएटीव्ह’ ... स्वतः कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेल्या उज्ज्वला संजीव राजे या आहेत या ‘द पिंक इनिशिएटीव्ह’ च्या संस्थापिका... कर्करोगानेच उज्ज्वला यांच्या आईचा मृत्यू ओढावला आणि थोड्याच काळात त्यांनाही या रोगाने ग्रासले... नुकताच याच आजारामुळे झालेला आईचा मृत्यू, कौटुंबिक जबाबदारी आणि मुख्यतः एक लहान मुलगी.... काय अवस्था झाली असेल त्यांची? पण त्या खचल्या नाहीत... आपल्या कमजोरीलाच आपली ताकद बनवत त्यांनी कर्करोगावर तर मात केलीच... पण अनेकींना जगण्याची नवी प्रेरणाही दिली... जाणून घेऊ या उज्ज्वला यांच्या संघर्षाची ही प्रेरणादायी कहाणी...


उज्ज्वला राजे

उज्ज्वला राजे


कर्करोगाशी सामनाः

कर्करोगाशी उज्ज्वला यांचा पहिल्यांदा संबंध आला तो एका प्रकल्पासाठीच्या संशोधनाच्या निमित्ताने... १९९७-९८ च्या सुमारास एका प्रकल्पासाठी त्यांचे न्युटॅसेटिकल्सवर (Neutaceuticals) संशोधन सुरु होते. या संशोधनातून हाय प्रोटीन प्रॉडक्टस् बनविताना त्यांचा कर्करोगाशी पहिल्यांदाच संबंध आला. त्यानिमित्ताने त्यावर अभ्यास करण्याचीही संधी त्यांना मिळाली. केमोथेरपीदरम्यान शरीरातील अनेक चांगल्या पेशीदेखील मृत पावतात. अशा वेळी प्रोटीन शरीरातील कमजोरी दूर करण्यास कशाप्रकारे मदत करु शकेल, याविषयीचा त्यांचा बराच अभ्यास झाला होता. मात्र हा दुर्धर आजार आपल्या अगदी उंबरठ्याशी येऊन ठेपला आहे, या गोष्टीची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.

पुढील अवघ्या दोनच वर्षात त्यांच्या आईला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. उशीरा झालेले निदान आणि मनोधैर्याची कमतरता यामुळे त्यांच्या आईचा उपचारा दरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. आईच्या उपचारांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही त्यात अपयश आल्याची सल आजही उज्ज्वला यांच्या मनात कायम आहे. त्याचबरोबर उशीरा झालेले निदान हेच यासाठी कारणीभूत असल्याची जाणीवही त्यांना आहे.

कर्करोगामागे अनुवांशिकता हे देखील एक महत्वाचे कारण आहे. सुमारे सहा ते आठ टक्के प्रकरणांमध्ये अनुवांशिकता हे कारण असू शकते. कर्करोगाविषयी केलेल्या अभ्यासातून सहाजिकच उज्ज्वला यांना याची जाण होती. त्यामुळेच आईचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगाने झाल्याने त्यांनीदेखील स्वतःची मेमोग्राफी करुन घेतली आणि कोणतीही ठळक लक्षणे नसतानाही त्यांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. पण कर्करोगाबाबत त्यांना असलेल्या योग्य माहितीमुळेचे हे निदान वेळेत झाले. त्यांनीही या प्रसंगाचा धैर्याने सामना केला. तसेच हिंमत न हारता ठामपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि सक्षमतेने सारे उपचार पूर्ण केले.

कर्करोगावर यशस्वी मातः

मन कितीही खंबीर केले, तरी कर्करोगाशी हा लढा सोपा निश्चितच नव्हता. याचे प्रमुख कारण म्हणजे अर्थातच केमोथेरपी... केमोथेरपी म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असाच सर्वसाधारण समज असतो. केमोथेरपीचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. केमोथरपीमध्ये शरीरातील चांगल्या पेशीही मृत पावतात. त्यामुळे थकवा येणे, केस गळणे, भूक मरणे, तोंडाची चव जाणे, यांसारखे अनेक दुष्परिणाम रुग्णाला सोसावे लागतात. एकूणच काय तर हा रोग तुमचे अंतर्गत शरीरच नाही तर बाह्यरुपही पूर्णपणे बदलून टाकतो. सहाजिकच त्याची भीतीही असते आणि मानसिक तणावही...

मात्र या सर्व ताणतणावावर आणि नकारात्मकतेवर मात करण्यासाठी आजुबाजूला सकारात्मकता असणे फार गरजेचे असते. तसेच त्यासाठी योग्य उपचार, डॉक्टर आणि कुटुंबाची साथ अतिशय महत्वाची ठरते. उज्ज्वला यांना सुदैवाने डॉ सुमीत शहा यांच्यासारखे चांगले डॉक्टर भेटले. तसेच त्यांच्या उपचारांबाबत घरच्यांनाही सर्व माहिती असल्याने त्यांची योग्य ती काळजी घेतली. उज्ज्वला यांनी आठही केमोथेरपी या थेट नसांमधूनच घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मनाने खंबीर असणे खूपच गरजेचे होते. तसेच या केमोथेरपीच्या दरम्यान त्या कामही करत होत्या. केमोथेरपीनंतर एक दिवस घरातून काम केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कामावर रुजू होत असत. मात्र हे प्रत्येकालाच शक्य होईल, असे नाही, हे उज्ज्वला आवर्जून सांगतात. कारण त्यासाठी मानसिक तयारीसोबतच प्रकृतीदेखील मजबूत असणे गरजेचे असते. मात्र उज्ज्वला यांना सुदैवाने हे शक्य झाले. तसेच या काळात त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून खंबीर पाठींबाही मिळाला. त्यांच्या उपचारांविषयीची सर्व माहिती असल्याने घरी काम करणाऱ्या बाईने त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व पथ्य सांभाळली... एकूणच काय तर घट्ट मन, मजबूत सपोर्ट सिस्टीम आणि मुख्यतः आर्थिक बळ यामुळेच त्यांना हा लढा देता आला.

एक हळवी आठवणः

पण उज्ज्वला यांच्या मते या संपूर्ण लढ्यात त्यांची प्रेरणा ठरली ती त्यांची नऊ वर्षांची मुलगी... केमोथेरपीमुळे केस जाणार याची कल्पना असल्यांने त्यांनी त्यांचे लांबसडक केस खांद्यापर्यंत कापून घेतले होते. कारण बाह्यरुपापेक्षाही या आजारातून बाहेर पडणे जास्त गरजेचे होते. यासाठी घरातील सर्व तयार होतेच पण त्या लहानगीनेही या प्रसंगाला धैर्याने तोंड दिले. आईचे केस जाणे हा उपचाराचा एक भाग आहे आणि यानंतर ती ठीकही होणार आहे, याची तिला जाणीव होती. एवढेच नाही तर तिने चक्क देवाशीच डील केले होते. तिच्या मते, आईने बाप्पाकडे जाऊन तिला त्रास देण्यापेक्षा माझ्याजवळ राहून मलाच त्रास देऊ दे, असे हे डील होते, अशी एक हळवी आठवण उज्ज्वला सांगातत.


कर्करोगाबाबत जनजागृती  करताना उज्जवला राजे

कर्करोगाबाबत जनजागृती करताना उज्जवला राजे


द पिंक इनिशिएटीव्ह

योग्य वेळेत निदान, योग्य उपचार आणि कुटुंबाचा खंबीर पाठींबा यामुळे कर्करोगाशी हा लढा तर यशस्वी झाला होता, मात्र उशीरा झालेल्या निदानामुळे आईचा झालेला मृत्यू ही गोष्ट उज्ज्वला यांच्या मनातून जात नव्हती. त्यांच्या आईच्या अशा जाण्यामध्ये ‘द पिंक इनिशिएटीव्ह’ या एनजीओची बीजे रोवली गेली होती. कर्करोगाबाबत जनजागृती करणे, हे या संस्थेचे प्रमुख काम आहे. अपुरी माहिती, भीती, लज्जा, इत्यादी अनेक कारणांमुळे स्त्रिया मेमोग्राफी टाळतात. त्यातूनच उशीरा निदान आणि मृत्यू या दुष्टचक्राला सुरुवात होते. त्यामुळेच शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका, गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाचा कर्करोग वेळीच ओळखणे शक्य आहे आणि योग्य उपचारांनी ते बरेही होतात, याबाबतची जागृती संस्थेतर्फे केली जाते. तसेच कर्करोगाच्या लक्षणांबाबतही जागृती निर्माण करण्याचे काम संस्था करते. स्त्रियांनी चाळीशीनंतर न चुकता मेमोग्राफी करावी तसेच आणि पंचविशीनंतर स्त्रियांनी प्रत्येक पाळीच्या पाचव्या दिवसानंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झाम अर्थात स्तनांची परीक्षा करावी, जेणेकरुन काही लक्षणे असल्यास ताबडतोब उपचार सुरु करता येतील, हेदेखील संस्थेच्या वतीने सांगितले जाते.


‘द पिंक इनिशिएटीव्ह’ या एनजीओच्या  माध्यमातून महिलांचे  प्रबोधन करताना उज्ज्वला राजे

‘द पिंक इनिशिएटीव्ह’ या एनजीओच्या माध्यमातून महिलांचे प्रबोधन करताना उज्ज्वला राजे


स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

तणावग्रस्त जीवनशैली, ताण-तणाव, खाण्याच्या चूकीच्या वेळी आणि सवयी, निद्रानाश, फार लवकर वयात पाळी येणे, वयाच्या तिशीनंतरचे गरोदरपण, उशीराचे मेनोपॉज या लहान वाटणाऱ्या समस्याही कर्करोगाच्या विळख्यात नेऊ शकतात. मात्र डॉ सुमीत शाह यांच्या मते हा कर्करोग सुरुवातीच्याच टप्प्यात रोखला जाऊ शकतो. त्यादृष्टीने सेल्फ ब्रेस्ट एक्झाम खूपच गरजेचे आहे. तसेच पुढील लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

१. स्तनावर जाडसर, वेदनारहीत गाठ आढळल्यास मेमोग्राफी करुन घ्यावी. या गाठी स्पर्शाने ओळखता येतात.

२. गाठीचे स्वरुप ओळखणे कठीण झाल्यास दोन्ही स्तनांना स्पर्श करुन फरक ओळखण्याचा प्रयत्न करावा. एखादा भाग, त्वचा किंवा गाठ जाडसर वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. गरोदर स्त्रिया किंवा नवमाता वगळता इतर स्त्रियांच्या स्तनाग्रातून स्त्राव होत नाही मात्र अशा भागातून रक्त वाहत असल्याचे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा.

४. सामान्य स्वरुपात स्तनाग्राची स्थिती ही बाहेरच्या बाजूला अधिक असते, मात्र ते आत ओढले गेल्याचे वाटत असल्यास किंवा त्यांची दिशा बदललेली आढळल्यास काहीतरी समस्या असल्याचे समजावे.

५. स्तनांजवळील त्वचा मुलायम असते. त्यात बदल होणे ही धोक्याची घंटा असू शकते. स्तनांजवळील त्वचा संत्र्यांच्या सालीप्रमाणे जाडसर जाणवल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

६. काखेत गाठ असणे सामान्य बाब आहे. मात्र हात लावल्यावर वेदना होणे किंवा सूज येणे, ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

वेळीच या लक्षणांची जाणीव झाल्यास लवकर निदान आणि उपचार शक्य होतात. त्यामुळे वेळोवेळी स्वतःच्या शरीराची चाचणी करणे आणि या बदलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शरीर हे संकेत देत असते, गरज आहे ते हे संकेत समजून घेण्याची...

उज्ज्वला यांनी आपल्या स्वतःच्याच माध्यमातून हे सिद्ध केले आहे की, या रोगाची सामना कठीण असला तरी अशक्य नक्कीच नाही. मात्र यासाठी गरज असते ती चांगल्या वैद्यकीय तज्ज्ञांची... तसेच कुटुंब आणि मित्रमैत्रिणींचा पाठींबाही महत्वाचा असतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलून त्यांची मदत जरुर घ्यावी. तसेच या काळात योग्य आणि समतोल आहार ठेवावा, हलके व्यायामप्रकार करावेत, हाडांच्या मजबूतीकडे विशेष लक्ष द्यावे आणि मुख्य म्हणजे काम करण्याची शारिरीक ताकद असल्यास, जरुर काम करावे, कारण त्यामुळे आजाराच्या नकारात्मक विचारापासून मन दूर जाऊ शकते. त्याचबरोबर या आजारासाठीचे उपचार खर्चिक आहेत, मात्र त्यासाठी मदत करणाऱ्या संस्थांही पुष्कळ आहेत. त्यामुळे पैशाअभावी उपचार न थांबवता या संस्थांची माहिती मिळवावी, असे अनेक सल्ले उज्ज्वला कर्करोगग्रस्त रुग्णांना देत असतात.

या आजाराने खचून जाऊ नका, तर धैर्याने सामना करा, तुम्ही त्यावर नक्कीच मात कराल, ही प्रेरणा उज्ज्वला यांच्या या संघर्षगाथेतून आपल्याला नक्कीच मिळते.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags