संपादने
Marathi

डिझायनर केकसाठी प्रसिद्ध असलेले ʻबेकर्स हटʼ

17th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

लहानपणी स्वयंपाकघरात पाऊलही न ठेवलेली मुलगी कालांतराने बेकिंगच्या क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवते. हा चकित करणारा प्रेरणादायी जीवनप्रवास आहे दक्षिण मुंबईतील परळ विभागात राहणाऱ्या मनाली राजन मोरे आणि त्यांच्या ʻबेकर्स हटʼचा. बेकिंगमध्ये स्वतःची कारकीर्द घडवणाऱ्या मनाली यांनी फार कमी वयातच बेकर्स हटची सुरुवात करुन स्वप्नपूर्तीचा देखील अनुभव घेतला. 

image


आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना मनाली सांगतात की, "शालेय जीवनात मला चित्रकला या विषयाची आवड होती. तेव्हा मला वाटायचे की, मी याच क्षेत्रात पुढील शिक्षण घेईन. शालेय जीवनात महत्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या दहावीच्या परिक्षेत मला चांगले गुण मिळाले होते. त्याकाळी चांगले गुण मिळाल्यास अकरावी करिता विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा, हा नियमच जवळपास सर्वांना सरसकट लागू होता. मी देखील त्या कालखंडाचा आणि पर्यायाने त्याच नियमाचा एक भाग होती. त्यामुळे अकरावीकरिता मी दादर येथील किर्ती महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. किर्ती महाविद्यालयाच्या मार्गावरच इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आहे. महाविद्यालयात ये-जा करत असताना मला त्या हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी दिसत असत, जे शेफ कोट आणि शेफ कॅप घालून तेथे वावरत असत. मला का कोण जाणे, पण तेव्हा त्या शेफ कोट आणि कॅपबद्दल कमालीचे आकर्षण वाटत असे. त्या आकर्षणापायी मी गुगलवरुन हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात अधिक माहिती काढली. माझ्या संपूर्ण कुटुंबात या क्षेत्राबद्दल कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे इंटरनेटच मला माझ्या गुरुप्रमाणे होते. अखेरीस अथक प्रय़त्नांनंतर मी वांद्रे येथील रिझवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला". मनजोगत्या शाखेत प्रवेश मिळाल्यानंतर मनाली यांच्या प्रशिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. एखाद्या पदार्थाचे माप मला चिमूटभर किंवा थोड्या प्रमाणात असे समजत नसे. मात्र मोजमापाच्या चमच्याच्या सहाय्याने मी बेकिंगमधील कोणताही पदार्थ उत्कृष्ट बनवत असे. त्यामुळे किचन कुकिंगपेक्षा बेकिंगमध्ये कारकिर्द घडवण्याचा माझा निर्णय निश्चित झाला, असे आपल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रशिक्षण कालावधीतील अनुभवाबद्दल बोलताना मनाली सांगतात.

image


बेकर्स हटची सुरुवात कशी झाली, याबाबत बोलताना मनाली सांगतात की, ʻहॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तीन वर्षे वेगवेगळ्या हॉटेलच्या किचनमध्ये कामाचा अनुभव घेतला. २०१२ साली ऑबेरॉय हॉटेलमध्ये काम करत असताना माझ्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे मी हॉटेलमध्ये काम करणे सोडून दिले. त्यानंतर मी लहान पार्ट्यांकरिता केकची ऑर्डर घेत असे आणि घरीच केक बनवून त्यांना देत असे. मी घरीच केक आणि इतर बेकरी उत्पादनच्या ऑर्डर्स घेत असे. माझ्या एका मैत्रिणीने मला माझ्या आय़ुष्यातील पहिली केकची व्यावसायिक ऑर्डर मिळवून दिली आणि त्या ग्राहकांकडून माझ्या केकला प्रतिसाद देखील चांगला मिळाला. त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आणि मी अधिक जोमाने केकच्या ऑर्डर्स घेऊ लागले. तेव्हा मनात कुठेतरी माझ्या केकची एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, माझे एखादे संकेतस्थळ असावे, असे मला वाटायचे. मात्र त्यासाठी भरपूर खर्च होत असल्याने मी ते लांबणीवर टाकत होते. बेकर्स हटची एक विशेष आठवण सांगायची म्हणजे, माझा एक मित्र वेबसाईट तयार करण्याचे काम करतो. त्याने त्याच्या प्रोजेक्टकरिता माझ्या बेकरी व्यवसायाची निवड केली. त्याने बेकर्स हट नावाचे एक संकेतस्थळ तयार केले. त्यानंतर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट म्हणून ते संकेतस्थळ सुरु केले.ʼ बेकरी व्यवसायात कुटुंबियांसोबतच मित्रमैत्रिणींचा भक्कम पाठिंबा मिळाल्याचे मनाली सांगतात. बेकर्स हटला दोन वर्षे पूर्ण झाली असून, संकेतस्थळ, इन्स्टाग्राम, फेसबूक यावरुन मनाली यांना अनेक केकच्या ऑर्डर्स मिळतात. शून्य गुंतवणुकीतून सुरू झालेले मनाली यांचे बेकर्स हट ʻपर्सनलाईज्ड डिझाईनर केकʼकरिता विशेषकरुन प्रसिद्ध आहे. कुटुंब आणि मित्रमैत्रिणींच्या पाठिंब्याच्या आधारावर आजवर आलेली आव्हाने मी पार करत गेली, असे मनाली सांगतात.

image


सध्या मनाली घरातूनच ʻबेकर्स हटʼचे कामकाज पाहत आहेत. आपल्या भविष्यकाळातील योजनांबद्दल बोलताना मनाली सांगतात की, ʻमला स्वतःचे एक सेंट्रलाईज किचन तयार करायचे आहे. त्यानंतर मला स्वतःची बेकरीदेखील सुरू करायची आहे.ʼ मनाली यांना डिझायनर केकचे प्रशिक्षण वर्ग घ्यायची इच्छा असून, यासाठीदेखील त्या प्रय़त्नशील आहेत. बेकरी व्यवसायात झालेल्या बदलाबद्दल बोलताना मनाली सांगतात, ʻबेकिंगचा व्यवसाय हा आता खुप प्रगत झाला आहे. पूर्वीप्रमाणे आता बेसिक केकचा जमाना राहिलेला नाही. आता ग्राहक डिझायनर केकला जास्त पसंती देतात. तसेच या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करायची देखील तितकीच संधी आहे.ʼ या क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुणांना मनाली सल्ला देतात की, ʻया क्षेत्रात आल्यास सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत करावी लागते. मात्र त्याचे फळ निश्चितच चांगले आणि गोड आहे. प्रामाणिकपणे मेहनत करा, संयम बाळगा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.ʼ बेकिंगव्यतिरिक्त मनाली यांना ट्रेकिंग आणि भटकंतीची आवड आहे. मनाली यांच्या या बेकर्स हटबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही http://bakershutt.com/index.html या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

image


Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags