रोज पोहत जाऊन मुलांना शिकवणारे शिक्षक ज्यांनी वीस वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही

रोज पोहत जाऊन मुलांना शिकवणारे शिक्षक ज्यांनी वीस वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही

Monday December 14, 2015,

2 min Read

मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचं मोठं महत्त्व आहे. हे महत्त्व मुलांना समजावं यासाठी दोघांची भूमिका प्रमुख असते. एक मुलांचे आई-वडिल जे त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देतात आणि दुसरे शिक्षक. जे मुलांमध्ये अभ्यासाबाबत गोडी निर्माण करतात. या दोन्हीपैकी एकानंही सूट दिली तर त्याचा परिणाम हा मुलांवर होतो. मुलांचं भविष्य कमकुवत होऊ शकतं. मुलांना प्रेरणा देणाऱ्या एका शिक्षकाचा हा थक्क करणारा प्रवास आहे.

केरळमधल्या मल्लापूरममधल्या पडिजट्टुमारी अब्दुल मलिक. ४२ वर्षांचे मलिक हे येथील मुस्लिम निम्न प्राथमिक शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते शाळेत पोहत जातात. त्यांच्या शाळेत रस्त्यानंही जाता येतं. पण तो मार्ग आहे २४ किलोमीटर. या २४ किलोमीटर लांब खराब रस्त्यावरुन शाळेत जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात अब्दुल घरातून शाळेत आणि शाळेतून परत घरी पोहत परतही येतात. या सर्व दगदगीमध्ये त्यांनी आजवर शाळेतून एकदाही रजा घेतलेली नाही. हे विशेष.

image


रस्त्यानं प्रवास करताना त्यांना तीन बस बदलव्या लागतात. ही सारी दगदग पोहून प्रवास केल्यानंतर वाचते. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते सांगतात...

“ मी पहिल्या वर्षी रस्त्यानंच प्रवास केला. पण त्यानंतर माझ्या एका सहका-यानं दिलेल्या सल्ल्यानंतर नदी पोहून या काठावरुन त्या काठावर जाण्यास सुरुवात केली. माझ्या शाळेच्या तीन बाजुला पाणी आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्या परिवहन सेवेच्या माध्यमातून शाळेत पोहचण्यापेक्षा पोहत शाळेत जाणंच जास्त योग्य आहे ”

आपल्यासोबतचे कपडे तसंच पुस्तक भिजू नयेत म्हणून अब्दुल ते एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये घेऊन जातात. नदी पार केल्यानंतर बॅगेतले कोरडे कपडे घालून ते शाळेत जातात.

अब्दुल हे पर्यावरण प्रेमीही आहेत. गेल्या काही वर्षांपासून नदीत वाढलेली घाण आणि प्रदूषण पाहून ते दु:खी होतात. ते अनेकदा आपल्या विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी सोबत घेऊन जातात. हे आगळेवेगळे शिक्षक मुलांमध्येही मोठे लोकप्रिय आहेत. नदीच्या काठावर पोहचल्यानंतर ही सारी मंडळी प्लॅस्टिक, कचरा तसंच नदीच्या किनाव-यावर आलेल्या अन्य वस्तू गोळा करुन त्याची योग्य जागी विल्हेवाट लावण्याचं काम करतात. अब्दुल सांगतात, “ आपल्याला या नदींना वाचवायला हवं.निसर्गानं दिलेली ती एक बहुमोल भेट आहे.”

मूळ लेख : थिंकचेंज इंडिया

अनुवादकः डी. ओंकार