संपादने
Marathi

‘इको वर्क्स’च्या मदतीने वास्तूच्या अंतर्भागात बागकाम करुन प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यास हातभार लावा

24th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जसजसे आपण विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत आहोत वातावरणात प्रदूषणाचे प्रमाण व अत्यंत विषारी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी झाडे-झुडपे तर देशातील कित्येक शहरांतून हळूहळू नाहीशीच होत चालली आहेत. अशा परिस्थितीत ‘इनडोअर बागा’ म्हणजेच ज्या घरामध्ये किंवा इतर कुठल्याही वास्तूच्या आत बनविल्या जाऊ शकतात अशा बागा आता निरोगी आरोग्याप्रती जागरुक लोकांची गरज बनत चालल्या आहेत. मात्र अशा बागा तयार करताना अनेक अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागतो. मग मातीची व्यवस्था करणे असो वा रोपांना योग्य पोषक तत्व आणि सूर्यप्रकाश मिळण्याची खात्री करणे असो किंवा मग त्यांना सतत पाणी देणे असो. ही सर्व अशी आव्हाने आहेत ज्यांना पार पाडणे वाटते तितके सोपे नसते.

image


बंगळुरुचे एक बायोटेक स्टार्टअप ‘इको वर्क्स’ एका अनोख्या उत्पादनाच्या रुपात या समस्येवर वैज्ञानिक उपाय घेऊन पुढे आले आहे. हे एक गंधरहित सुपर एबसॉर्बेट क्रॉस लिंक्ड पॉलीमर जेल आहे. त्यांनी तयार केलेले ‘इको वंडर जेल’ एखाद्या स्पंजसारखे दिसते. जे पाण्याला शोषून घेते आणि रोपांना आवश्यक पोषक तत्व पुरविण्यास सक्षम असते.

‘इको वंडर जेल’ शहरी भागातील घरांमध्ये किंवा इतर वास्तूंमध्ये हिरवाई वाढविण्यास सक्षम असे एक नवीन आणि अनोखे उत्पादन आहे. जे दिसायलाही खूप आकर्षक आहे. हे जेल बागकामातील अडचणी दूर करुन हे काम खूप सोपे करते. तसेच हे जेल बागकामाला नवी दिशा देत इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रातही त्याचा विस्तार करण्यास मदत करत आहे.

इस्राइलच्या प्रसिद्ध तेल अवीव विद्यापीठाने उपग्रहाच्या मदतीने मिळविलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार बंगळुरुमध्ये सन २००२ ते २०१० दरम्यान वायू प्रदूषणात जवळपास सरासरी ३४ टक्के वाढ झाली आहे. सध्या बंगळुरुमधील १० टक्के वयस्कर लोक आणि ५० टक्क्यांहून अधिक लहान मुले अशा आजारांनी ग्रासली आहेत ज्याचे मूळ त्यांच्या परिसरातील प्रदूषित वातावरणामध्ये सामावलेले आहे. म्हणजेच ते प्रदूषित हवेमुळे निर्माण झालेल्या रोगांच्या तावडीत सापडले आहेत. केवळ बंगळुरुच नाही तर कमी-अधिक फरकाने जवळपास हीच स्थिती देशातील इतर शहरांचीही आहे आणि या सगळ्याला फक्त एकच गोष्ट जबाबदार आहे आणि ती म्हणजे शहरी भागातील झाडा-झुडुपांचे घटते प्रमाण.

अशात चित्तवेधक गोष्ट ही आहे की एक पूर्णपणे अनपेक्षित स्रोत, ‘युनायटेड स्टेट्स नॅशनल एरोनॉटीक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ म्हणजेच ‘नासा’ने या संकटावर एक जैविक उपाय उपलब्ध केला आहे. अंतराळात ऑक्सिजनचा कमीतकमी वापर करण्यासाठी मानवरहित यान पाठविण्याविषयी सुरु असलेल्या संशोधनादरम्यान नासाच्या लक्षात आले की अंतर्गत भागातील प्रदूषणावर अंतर्गत भागात लावलेल्या रोपांच्या मदतीने बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविता येऊ शकते.

त्यांच्या या दृष्टीकोनाचा उपयोग जागतिक स्तरावर वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी करता येऊ शकतो. नासाने अंतर्गत भागातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता अंतर्गत रोपांच्या भूमिकेविषयी अधिक जाणण्यासाठी मिसीसिपीमधील आपल्या स्टेनिस स्पेस सेंटरमध्ये बायोहोम नावाची एक संपूर्ण सुविधाच समर्पित केली आहे.

नासाच्या या संशोधनाने प्रभावित होऊन बंगळुरु स्थित एक बायोटेक स्टार्टअप ‘इको वर्क्स’ने एक ‘इको वंडर जेल’ तयार केले. त्यांचे हे जेल अंतर्गत रोपांच्या वापरासंदर्भात जनजागृती करते. ज्याद्वारे अंतर्गत वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याबरोबरच आतील भागातील वातावरण सुद्धा साफ आणि शुद्ध ठेवले जाऊ शकते. हे स्टार्टअप शहरातील भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाद्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळा ‘विठ्ठल माल्या सायंटिफिक रिसर्च फाऊंडेशन’मध्ये (वीएमएसआरएफ) आपले काम कार्यान्वित करते.

image


हे जेल एका अशा प्रणालीवर आधारित आहे ज्यामध्ये एका क्रॉस लिंक पॉलीमरमध्ये पोषक तत्व आणि पर्यावरणाला अनुकूल व सौंदर्याच्या दृष्टीकोनातून तयार केलेल्या रंगांचे मिश्रण वापरले जाते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि सूक्ष्म पोषकतत्व असतात, जे एका नियंत्रित पद्धतीने रोपांना पुरविले जातात. ही सामग्री रोपाच्या वाढीसाठी अनुकूल असते. कमी पाण्यामध्ये आणि धीम्या गतीने चयापचय क्रिया करणारी अंतर्गत सजावटीची रोपे या जेलमुळे खूप चांगल्या पद्धतीने फळतात-फुलतात.

‘इको वंडर जेल’ अंतर्गत रोपांची वेगळी देखभाल करावी लागणार नाही याची खात्री देते. ज्यामुळे घरामध्ये हिरवाई वाढविण्याचे काम लोक पसंत करु लागतात.

‘इको वर्क्स’चे सीईओ समीर वाधवा सांगतात, “सध्या आपल्याला घरांमध्ये किंवा इतर वास्तूंच्या अंतर्गत भागामध्ये खूप कमी रोपं पहायला मिळतात कारण आत ठेवलेल्या रोपांची देखभाल करणे खूप आव्हानात्मक काम असते. आजकालच्या व्यस्त जीवनात लोकांकडे दररोज झाडा-झुडपांची देखभाल करायला वेळ नसतो आणि त्यामुळेच ते यापासून दूर रहाणंच पसंत करतात. हे जेल अंतर्गत बागकामाला देखभालीपासून मुक्त करते. याचा वापर करत असताना तुम्हाला तुमच्या रोपट्यांना महिन्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच पाणी आणि इतर खाद्य द्यावे लागते. त्याशिवाय हे जेल दिसायलाही खूप आकर्षक आहे. ते प्रकाश शोषून घेऊन चमकतं. एकूणच ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे.”

image


समीर सांगतात की ‘इको वर्क्स’ बंगळुरुच्या प्रत्येक कार्यालयातील टेबलावर आणि प्रत्येक घरात कमीत कमी एक रोपटे लावलेले पाहू इच्छिते. हळूहळू या संकल्पनेचा देशातील इतर शहरांमध्ये विस्तार करणे हे त्यांचे पुढचे लक्ष्य आहे. याच्या परिणामस्वरुप आपल्याला केवळ वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठीच मदत मिळणार नाही तर आपली घरे आणि कार्यालये दिसायलाही खूप सुंदर दिसतील. कार्यालयांना आणि घरांना अंतर्गत वायू प्रदूषणापासून मुक्त करण्याचे हे काम करण्यासाठी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केलेल्या समीर यांनी एक खूप चांगली कॉर्पोरेट नोकरी नाकारली आणि हे महान कार्य करु लागले.

या विचाराविषयी विचारल्यावर ‘इको वर्क्स’चे मार्गदर्शक डॉ अनिल कुश सांगतात, “हे जेल वायु शुद्धीकरण आणि निर्मितीला अद्वितीय महत्त्व देते. हे पाण्यासारख्या मौल्यवान गोष्टीच्या योग्य वापराची खात्री देते. याशिवाय रोपट्यांसाठी आवश्यक पोषक तत्वांचे मिश्रण या जेलला शहरी वातावरणात अंतर्गत वापरासाठी आदर्शवत ठरवते. माती आणि खत यासारखे पारंपरिक घटक बाहेरील बागकामाच्या वापरासाठी जास्त उपयुक्त आहेत.”

डॉ कुश गेल्या ३५ वर्षांपासून वनस्पतींचा अभ्यास करित आहेत आणि त्यांना भारतीय कृषि संशोधन परिषद, फ्रान्समधील पॉश्चर संस्था, अमेरिकेतील रॉकफेलर विद्यापीठ आणि सिंगापूरच्या इन्स्टीट्यूट ऑफ मॉलेक्यूलर ऍण्ड सेल बायोलॉजीसारख्या जगातील अग्रगण्य जैव तंत्रज्ञान संशोधन संस्थांबरोबर कामाचा अनुभव आहे. ‘वीएमएसआरएफ’ आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यावरण, ऊर्जा आणि आरोग्याच्या देखभालीकरिता कटिबद्ध संस्था आहे.

‘इको वर्क्स’ बाजारात आधीपासूनच उपलब्ध असणारी जैव तंत्रज्ञान उत्पादनेही तयार करते. त्यांचे आणखी एक उत्पादन ‘इको वेज वॉश’ तुम्हाला फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी त्यावरील कीटकनाशके आणि रोगजंतू नाहिसे करण्यास मदत करते. यांची उत्पादने नामधारीज, टोटल मॉल, फूड वर्ल्ड आणि बिग बास्केटसारख्या विविध स्टोअर्समधून खरेदी करता येऊ शकतात.

याशिवाय त्यांची स्वतःची विशेष नैसर्गिक बागकामाच्या उत्पादनांची एक विस्तृत श्रृंखलाही बाजारात उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातच जैविक अन्नपदार्थांचे उत्पादन घेऊ शकता. त्याशिवाय ‘इको वर्ल्ड’चे पपई पासून बनविलेले एक अनोखे दंतचिकित्सा उत्पादन आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही ड्रिलिंग न करता दाताला संपूर्ण किडण्यापासून वाचवू शकता.

अशा प्रकारच्या नवनवीन उत्पादनांच्या शोधामुळे शहरी भागातील हिरवाईच्या घटत्या प्रमाणावर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लेखक : सौरव रॉय

अनुवाद : अनुज्ञा निकम

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags