संपादने
Marathi

स्नॅक्समध्ये योगा बार, पोटोबा प्रसन्न, डोकोबाही गार!

27th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

तुम्ही कधी ‘योग पट्टी’ वा ‘योगा बार’बद्दल काही ऐकले आहे? योगशास्त्रातील अवघड आसने सोप्पी व्हावीत म्हणून मदत करेल, अशी ही काही पढवणारी पट्टी नव्हे… हा बार साबणाचाही प्रकार नाही. बरं… ‘तसला’ ‘बार’ही हा नाही बरं का… म्हणजे ‘अल्कोवैद्यका’तील ‘कॉकटेल’चे काही घोट रिचवले आणि गळा ओला… तर्र होऊन जर्रा हलके-हलके वाटावे... म्हणजेच तर्र करणाराही हा बार नव्हे... तर मग हे आहे तरी काय? तर ही पट्टी पढवणारी नाही, की हा बार आंघोळीचा नाही, अन्‌ ‘तर्र’ करणारा तर मुळीच नाही... हो, पण तरतरी आणणारा जरूर आहे. एेका, आम्ही सांगतो आहोत एका गरगरित, कुरकुरित आणि विशेष म्हणजे पौष्टिक अशा खाण्याच्या ‘पट्टी’बद्दल म्हणजे खाण्याच्याच ‘बार’बद्दल! सुहासिनी आणि अनिंदिता संपत कुमार या भगिनींनी ऑगस्ट २०१४ मध्ये आपले हे नावीन्य बाजारात आणलेले आहे.

तत्पूर्वी, या दोन्ही बहिणी अमेरिकेत, न्युयॉर्कमध्ये होत्या. ‘इन्स्टंट एनर्जी’ (त्वरित उर्जा) आणि पौष्टिक पदार्थांनी युक्त असलेल्या पट्टींसाठी (आपल्याकडल्या चिक्कीसारख्या वा वडीसारख्या म्हणा, पण चिक्की किवा वडी मात्र नाही.) तिथे भलीमोठी बाजारपेठ आहे. ‘योगा बार’च्या आधी अनिंदिता ‘अर्नेस्ट अँड यंग’समवेत काम करत होत्या. सुहासिनी ‘व्हार्टन बिझनेस स्कूल’मध्ये शिकत होत्या. न्युयॉर्कमध्ये राहणाऱ्या सुहासिनीला कॉलेजसाठी म्हणून घर ते फिलाडॅल्फिया असा लांब प्रवास करावा लागे. सुहासिनी सांगतात, ‘‘प्रवासादरम्यान खाण्यासाठी म्हणून अनिंदिता या पट्टी मला स्वत: बनवून देत असे. प्रवासादरम्यान तर या पट्टी अगदी ‘नो टेंशन’ होत्या. एक-दोन खाल्ल्या, की भूक तर भागायचीच, ताजेतवाने वाटायचे आणि बाकीचाही कुठला त्रास नाही.’’


image


अमेरिकेतील सुहासिनीच्या प्रवासाचा हाच अनुभव दोन्ही बहिणींकरिता व्यवसायाच्या या नव्या क्षेत्रातील प्रवासासाठी प्रेरणेचा झरा ठरला. ‘एनर्जी’चे भंडार असलेल्या खाण्याच्या या पट्टींबाबत दोघांनी गांभिर्याने विचार करायला सुरवात केली. भारतात चिक्की, वड्या असे काही पदार्थ इन्स्टंट एनर्जीसाठी आहेत, पण पट्टीची गोष्टच वेगळी. एकतर अमेरिकेतल्यासारखी पट्टी भारतात मिळत नाही. दुसरे म्हणजे आपल्या फॉर्म्युल्याने बनणारी पट्टी तर जगात कुठेही मिळत नाही. आपण स्वत:च ती आजमावलेली आहे. उत्तम आहे. मग खाऊ घालावी का लोकांना. करावा का पट्टीचा व्यवसाय, असा विचार दोन्ही बहिणींनी केला. पट्टींसाठी भारतातील बाजारपेठेत म्हणजे मोकळे रान होतेच. म्हणजे भारतात या उत्पादनाला फारशी स्पर्धा वगैरेही नव्हती. मग ठरवून टाकले, की आपण इथे हे सुरू करावे. न्युयॉर्कमधल्या ‘होल फुड’सारख्या काही स्थळांचा दौरा केल्यानंतर लक्षात आले, की खाण्याचे असे कितीतरी प्रकार आहेत, जे भारतातही बनवलेही जाऊ शकतात आणि विकलेही जाऊ शकतात.

भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रारंभिक गुंतवणूक ही सर्वांत मोठी समस्या दोन्ही बहिणींसमोर होती. दोन्ही बहिणींपेक्षा आणखी एक मोठी बहीण आहे. ती आधीपासूनच भारतातच राहते. आरती हे या ज्येष्ठ भगिनीची नाव. आरती यांनी त्यांचा हा भार हलका केला. पैसे उपलब्ध करून दिले. पुढे मग दोघींनी वाटचाल सुरू केली. सुहासिनी म्हणतात, ‘‘सुरवातीच्या काळात आम्हाला जे कुणी भेटले ते सगळे मदत करणारेच भेटले. आमची पहिली पाककृती आम्ही एका जणाशी ‘लिंक्ड-इन’च्या माध्यमातून संपर्क साधून मिळवली. कुठलेही आढेवेढे या सद्‌गृहस्थाने घेतले नाही.’’

त्या पुढे सांगतात, ‘‘कुठलाही नवा व्यापार-उदीम करायला भारत हे एक आदर्श असे ठिकाण आहे. इथे प्रोत्साहनाची वाणवा नाही, की मनुष्यबळाची वाणवा नाही. काय उत्पादन करावे, हे निवडण्याची गोष्ट असो, की सुरवातीच्या काळात चांगली माणसे मिळण्याचा प्रश्न असो, इथं हे सगळं उपलब्ध आहे. युनिट बसवण्यासाठी सरकारकडून आम्हाला अगदी सहजसुलभ पद्धतीने अनुदानही मिळाले आणि विजया बँकेकडून हातोहात कर्जही मंजूर झाले. कर्जासाठीची हमीही खरंतर सरकारनेच घेतली.’’

पट्टी उत्पादन सुरू करण्यापूर्वी दोन्ही बहिणींनी तीन मुख्य विषयांवर एक निर्णय परस्पर संमतीने घेऊन टाकलेला होता. एक म्हणजे पट्टी बनवण्यासाठी सगळं काही नैसर्गिकच वापरणार. कुठल्याही प्रकारचे फ्लेवर (कृत्रिम स्वाद) वापरायचे नाहीत. अगदी छोटा घटक म्हणूनही कृत्रिम पदार्थ वापरायचे नाहीत. दुसरी म्हणजे, उत्पादन स्वस्त आणि सगळ्यांच्याच आवाक्यातले असावे. तिसरा निर्णय म्हणजे, कच्चा माल म्हणून शक्य तितके प्राधान्य भारतीय पदार्थांना दिले जाईल.

योग पट्टीत वापरले जाणारे घटकपदार्थ देशाच्या विविध भागांतून मागवले जातात. उदाहरणार्थ देशातला कुठला भाग, प्रदेश वेलदोडा पिकासाठी सुप्रसिद्ध असेल तर तेथून वेलदोडा मागवायचा, असे.

सुहासिनी पुढे सांगतात, ‘‘बाजारातील अन्य स्पर्धक ‘राईटबाईट’ आणि ‘नॅचर्स व्हॅल्यू’प्रमाणे त्या आपल्या उत्पादनात मक्याचे पीठ किंवा अन्य अतिरिक्त मिश्रक वापरत नाहीत. अतिरिक्त जीवनसत्वेही मिसळत नाहीत. प्रिझर्व्हेटिव्ह वापरत नाही. जेणेकरून खाद्यपदार्थ वर्षानुवर्षे खराब होऊ नये. परिणाम असा होतो, की दुकानदारांच्या शेल्फमध्ये पट्टी जास्तीत जास्त ३ महिने तग धरून राहू शकते. मग आणखी एक परिणाम पुढे असा होतो, की खुप सारा माल आमच्याकडे परत येतो.’’

एकंदरीत परिस्थितीचा विचार करता माल परत येऊ नये म्हणून काय करता येईल, त्याचा विचार दोन्ही बहिणी करत आहेत. नैसर्गिक घटकांच्याच वापरावर ठाम असण्याच्या धोरणात दोन्हींना थोडीफारही लवचिकता आणायची नाहीये.

सुहासिनी सांगतात, ‘‘सुरवातीपासूनच आपले एक आगळे तंत्र विकसित करण्याच्या बाजूच्या आम्ही होतो. व्यवसाय सुरू करायला आणि उत्पादन सुरू करायला अपेक्षित पैशाची तजवीज करण्यात सहा महिन्यांचा काळ जावा लागला. यानंतर आमच्यासारखाच व्यावसायिक दृष्टिकोन असलेले सहकारी शोधण्यात सहा महिने गेले.’’ व्यापाऱ्यांनी आपला माल विकायला तयार व्हावे. दुकानदारांनी आपल्या शेल्फमध्ये त्याला जागा द्यावी म्हणून दोन्ही बहिणींना फार कष्ट उपसावे लागले.

आपल्या पाककृतीला अंतिम रूप देऊन बाजारात माल आणण्याच्या आधी दोघी जणींना शहरातील ५० हून अधिक बेकरीवाल्यांसह काम करावे लागले. शिवाय उत्पादनासाठी आवश्यक मशिनरी शोधण्यात आणि उत्पादनासाठी सक्षम करण्यात देशभरात ठिकठिकाणी चकरा माराव्या लागल्या.

सुहासिनी म्हणतात, ‘‘भारतात व्यवसाय करणे म्हणजे एक विशेष अनुभव आहे. तुम्हाला विविध स्तरातल्या लोकांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घ्यावा लागतो. प्राथमिक स्तरावरची कामे तर स्वत:लाच करावी लागतात. अर्थात हे सगळे मजेशीर आहे. तुम्हाला कामाचा कंटाळा येता कामा नये, बास.’’

दोन्ही बहिणींना एक स्वच्छ अशी नीटनेटकी जागा हवी होती. डोमलूर औद्योगिक वसाहतीत तशी जागा सुदैवाने मिळालीही. योगा बार मुख्यत: २५ ते ३० या वयोगटाला डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला आहे. युवक सतत कार्यमग्न असतातच, शिवाय या वयोगटाची जीवनशैलीही एकुणात व्यग्र अशीच असते. आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या बाबतीतही हा वयोगट इतरांच्या तुलनेत अधिक संवेदनशील असतो.

सुहासिनी यांच्या मते त्यांच्या उत्पादनाची ग्राहक मुख्यत्वे अशी मंडळी आहे, जी आरोग्यदायी अल्पोपहार अगर स्नॅक्सना पसंती देते.

सध्याच्या परिस्थितीत मुख्यत: अन्न-ग्रेनोला आणि उर्जा-पोषण अशा जेवण पट्ट्यांचा बाजार एकट्या अमेरिकेतच २०१६ च्या डिसेंबरपर्यंत ८.३ कोटी डॉलरच्याही पुढचा टप्पा गाठण्याची चिन्ह आहे.

योगा बारव्यतिरिक्त ‘राईटबाईट’ आणि ‘नेचर्स व्हॅल्यू’ची उत्पादनेही भारतात आता लोकप्रिय होत आहेत. हे दोन्ही ब्रँड भारतात २००५-२००६ मध्ये सुरू झाले होते. अर्थात तेव्हा अशा प्रकारच्या खाद्यसंस्कृतीबाबत इथे बऱ्यापैकी अनभिज्ञताच होती. नाश्त्याची अशी कुठली पट्टी असते, हे देखिल कुणाला इथे फारसे माहिती नव्हते.

कुमार भगिनींनी भारतामध्ये ‘योगा बार’ अगदी योग्य वेळी सुरू केला. ४० टक्क्यांहून अधिक भारतीय आरोग्य आणि तंदुरुस्तीशी नाते सांगणाऱ्या उत्पादनांनाच आपली पसंती देतात. आरोग्यविषयक जागरूकता ही स्वत:च दिवसेंदिवस वाढत चाललेली एक बाजारपेठ आहे. जागरूकतेच्या या कसोटीवर योगा बार उतरतोच उतरतो. आणि म्हणून बदलत्या काळाच्या कसोटीबरहुकूम तंतोतंत आहे.

सुहासिनी यांच्या मते भारतात विशेषत: ‘आरोग्यदायी आहार’ या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होते आहे. खाद्यतंत्राच्या क्षेत्रात अत्यंत वेगाने देशभरात गुंतवणूक चाललेली आहे आणि दररोज नवनवे उद्योजक या क्षेत्रात उतरताहेत. आरोग्यदायी खाद्यपदार्थांची संस्कृती रुजत असल्याचे भारतीय ग्राहकांनाही याची देही याची डोळा बघायला मिळते आहे. अर्थात सगळ्यांना याचा फायदाच आहे. सुहासिनी म्हणतात, ‘‘आमचे मुख्य उद्दिष्ट एफएमसीजी बाजार आहे, पण लवकरच आम्ही कन्फॅक्शनरी आणि बिस्किट बाजारातल्याही एका मोठ्या हिश्श्यावर आमचा अधिकार सांगू शकतो.

सध्या ‘योगा बार’ बंगळुरूतील मोजक्या ‘हेल्थकार्ट’, ‘बिगबास्केट’, ‘गोदरेज’ आणि ‘नामधारी’सारख्या रिटेल आउटलेटवरच उपलब्ध आहे. याशिवाय योगा बार ‘गुगल’, ‘लिंक्डइन’ आणि ‘इनमोगी’सारख्या मोठ्या कंपन्यांच्या कँटिनमध्येही उपलब्ध आहे.

सुहासिनी सांगतात, ‘‘ऑगस्टमध्ये अगदी सुरवातीच्या काळात आम्ही दिवसाला २ हजार पट्टी विकत होतो. आता एकट्या बंगळुरूच्याच बाजारात आमच्या सरासरी २० ते ३० हजार पट्टी विकल्या जात आहेत. पैकी ३० ते ४० टक्के वाटा आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीचा आहे.

सुरवातीच्या काळात ‘योगा बार’ आउटसोर्सिंग केलेले पॅकेजिंग डिझाईन लेवून बाजारात उतरले होते. अजूनही दोघा बहिणींना वाटते, की हे डिझाईन चांगले आहे म्हणून, पण असेही वाटतेच, की त्यात आणखी काही दुरुस्तींना आणि नवी भर टाकायला वाव आहे.

महत्त्वाचे म्हणजे अगदी हृदयावर हात ठेवून दोन्ही बहिणींना जगाला हे सांगायचे आहे आणि दाखवून द्यायचे आहे, की ‘योगा बार’ हा उर्जा, शांतता, प्रेम, सद्भावना आणि सुंदर स्वादाचे दुसरे नाव आहे.

सुहासिनी सांगतात, ‘‘बंगळुरूमधील स्वत:च्या स्टोअरनंतर अन्य शहरांतूनही स्वत:चे स्टोअर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. अर्थात देशभरातील ग्राहकांचे पोटोबा प्रसन्न करण्याचा आमचा मानस आहे. पोटोबा प्रसन्न असेल तर ‘डोको’बाही शांत राहातात, यावर आमचा विश्वास आहे.’’

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags