संपादने
Marathi

अपयशाचे विष पचवतच इंदूरच्या ‘विटीफिड’ला आले अमृताचे दिवस!

Team YS Marathi
29th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एखादे ‘स्टार्टअप’ केले म्हणजेच एखादा उद्यम नव्यानेच सुरू केला आणि उद्यमाची चारही उत्पादने पाठोपाठ फेल गेली. बाजारात सपशेल आपटली. तर अशा उद्यमाचे भवितव्य ते काय? असा प्रश्न कुणालाही पडणे साहजिक आहे… कुणीही हेच म्हणेल ना, की पैलवानाची पाठ लागली

…पण एका ‘स्टार्टअप’च्या बाबतीत असे काही म्हणण्याची सोय नाही. का नाही? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ‘स्टार्टअप’च्या मध्यप्रदेशातील इंदुरातल्या कार्यालयात एका बेधुंद रविवारच्या... उत्साहाने भारलेल्या भरदुपारच्या हुर्रे हुर्रे आणि अशा आनंदोद्गारांतूनच अखेर मिळेल.

काय झाले होते या रविवारी? कसला आनंदोत्सव होता हा? तर या नवीन उद्यमाची म्हणजेच ‘स्टार्टअप’ची खास ओळख असलेल्या एका पोर्टलने ६० दशलक्ष व्हिजिटर्स मिळवलेले होते. शिवाय महिन्याकाठी २५० दशलक्ष पेज व्ह्यू मिळवण्यात या पोर्टलला यश आलेले होते.

बाप रे! पाठोपाठ पाठ लागलेला पैलवान नंतर इतक्या कुस्त्या मारू शकतो! इतकी मजल गाठू शकतो! आम्ही पडलो तरी उठणार... पुन्हा पडलो तरी पुन्हा उठणार... यशाची पाठ सोडणार नाही, त्याला पायाशी लोळण घ्यायलाच लावू, ही जिद्द या ‘स्टार्टअप’शी निगडित संस्थापक मंडळीमध्ये होती आणि या जिद्दीतूनच या सगळ्यांनी यशाच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या. प्रस्थापितांची सद्दी मोडित काढली! ‘विटीफिड’ हे ते जादुई नाव!! आणि विनय सिंघल, प्रवीण सिंघल, शशांक वैष्णव ही ती जादूगार त्रिमूर्ती!!!

image


‘ऑल इंडिया ॲअॅचिव्हर्स ऑर्गनायझेशन’तर्फे बँकॉक येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने प्रगती करणारी कंपनी म्हणून या ‘स्टार्टअप’ला पुढे गौरवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे दस्तुरखुद्द ‘गुगल’तर्फे ‘गुगल’ची उत्पादने वापरणाऱ्या यशस्वी कंपन्यांच्या ‘केस स्टडीज्’मध्ये या ‘स्टार्टअप’चा अंतर्भाव करण्यात आला.

स्थापनेनंतर अवघ्या वर्षभराच्या काळातच या ‘स्टार्टअप’च्या वेबसाइटचा समावेश भारतातील सर्वाधिक ५०० लोकप्रिय वेबसाइटस् मध्ये झाला. ‘विटीफिड’ ही ती वेबसाइट. दर्जेदार आशयाच्या नकाशावर विट्टीफिडला मानाचे स्थान मिळाले. आपल्या ‘व्हायरल कंटेंट’च्या बळावर या वेबसाइटने वाचकांना अक्षरश: ताब्यात घेतले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

विटीफिड डॉट कॉम Wittyfeed.com चे ब्रँडिंग ‘चार्टिकल प्लेटफॉर्म’ म्हणून झाले. चॅट (गप्पा) आणि आर्टिकल (लेख, निबंध) या दोन संकल्पनांचे मिश्रण म्हणून चार्टिकल हा खास शब्द त्यासाठी योजला गेला. ज्याला कुणाला अभिव्यक्त व्हायला आवडते, त्याच्यासाठी हे व्यासपीठ खुले आहे. वाचकांसाठी तर इथे खजिना आहे. फोटोस्टोरी (चित्रकथा) आणि लघुनिबंध लिहिणाऱ्या आधुनिक ब्लॉगर्ससाठी तर हे माध्यम म्हणजे यू-ट्युबसारखेच. तथापि विटीफिड जर कशामुळे जगभरात लोकप्रिय झाली असेल तर ती या वेबसाइटने उचलून धरलेल्या व्हायरल कंटेंटमुळे… इंटरनेटवरील हा ट्रेंड विटीफिडसाठी जणू वरदानच ठरला.

अपयशाचे हलाहल पचवल्यानंतर विट्टीफिडला अमृताचे दिवस कसे आले, त्याची कथा मोठी रंजक आहे. एव्हरीस्ट्री डॉट कॉम evrystry.com आणि दीस्टडपिडस्टेशन डॉट कॉम thestudpidstation.com या वत्सना टेक्नॉलॉजीस् लिमिटेडच्या (Vatsana Technologies Ltd) व्यावसायिक उपक्रमांचेच विट्टीफिड हे एक भावंडं… पण तुलनेत ते ‘कमाऊ पुत’ (कमवणारे अपत्य) ठरले! Vatsana Technologies Ltd ची सगळी कथा YourStory back in September 2014 च्या माध्यमातून आधीच सांगण्यात आलेली आहे. वर्षभरातच विटीफिडने आपल्या नव्या अवताराच्या बळावर ५ दशलक्ष ते २५० दशलक्ष असा ‘पेज व्ह्यूज़’चा टप्पा गाठला. असे नेमके काय घडले… काय जादू झाली… विटीफिडचे सहसंस्थापक विनय सिंघल सांगतात, ‘‘हे काही रातोरात घडले नाही. कुठलीही जादूची कांडी वगैरे फिरली नाही. चार वर्षे आमच्या हातून ज्या काही चुका घडल्या, त्यातून शिकत, जे काही दोष राहिले, ते दूर करत हा टप्पा आम्ही गाठलेला आहे. आमच्या उत्पादनाचे नाव व्हावे म्हणून काही अवघड धडे आम्ही गिरवले. याआधीचे आमचे कंटेंट पोर्टल ‘एव्हरीस्ट्री’ फारसे काही साध्य करू शकलेले नव्हते. वाचकही संतुष्ट नव्हते आणि आम्हीही अर्थातच संतुष्ट नव्हतो. आम्ही ‘विटीफिड’ या नव्या पोर्टलला नवे रूपडे दिलेच, त्यासह त्याची संभावना आम्ही ‘प्लेटफॉर्म’ (व्यासपीठ) म्हणून केली. तसेच ब्रँडिंगही केले.’’

४५००० नियमित युजर्सचा पल्ला विटीफिडने नुकताच ओलांडलेला आहे. एकाच दिवसात ६ दशलक्ष व्हिजिटर्स उपलब्ध होण्याचा विक्रमही करून दाखवला आहे. विटीफिडच्या टिममध्ये ३५ जण आहेत. भल्या मोठ्या स्क्रिनवर यशाचे हे आकडे झळकवण्यापूर्वी तालबद्ध पद्धतीने पाय हलवून या विट्टीफिड ‘पस्तिशी’ने हा आनंद सिलिकॉन व्हॅलीच्या शैलीत मग का म्हणून साजरा करू नये. ‘विटीफिड’च्या इंदुर कार्यालयातील जल्लोष हा असा होता. अपयशानंतर मिळवलेल्या यशाबद्दलचा!

कथाकथन अन् ‘मनी’जतन!

विट्टीफिड आपल्या वाचकांना आशयघन मजकूर वाचायला उपलब्ध करून देते. गोष्ट सांगण्याची हातोटी कथाकथनासारखी असते. ‘डिस्प्ले अॅडस्’ आणि ‘टूल्स’ अशा स्वरूपातील जाहिरातींतून कंपनीला उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ Google AdX, OpenX, epom, Content.ad. विट्टीफिडची खासियत म्हणजे आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची आगळी पद्धत. Viral9.com ही पोर्टलची वितरण साखळी. बोर्डवरील ६ हजारांहून अधिक सोशल मिडिया इन्फ्ल्युएंसर्स विट्टीफिडने गोळा केलेले हे कंटेंट व्हायरल करत असतात. विट्टीफिडच्या वेबसाइट व्ह्यूजच्या आधारावर गुगलने एक समर्पित खाते व्यवस्थापन तंत्र खास विटीफिडसाठी नेमून दिलेले आहे.

‘विटीफिड’चे सहसंस्थापक शशांक वैष्णव सांगतात ‘‘आमच्याकडे आता अशी टीम आहे, जी मोठ्या प्रमाणावर व्हायरल कंटेंट शोधून काढते. व्हायरल कंटेंटभोवती कशा पद्धतीची शब्दरचना गुंफावी म्हणून लेखकांना मार्गदर्शन केले जाते. मगच व्हायरल कंटेंट वेबसाइटवर पोस्ट केले जातात. तथापि आता काय व्हायरल आहे आणि काय नाही, ते ठरवण्यात विटीफिडला आघाडी मिळावी, नेतृत्व मिळावे म्हणून आवश्यक ते तंत्र, आवश्यक ती यंत्रणा आम्ही विकसित करत आहोत. काम चाललेले आहे.’’ कंटेंट वेबसाइटमध्ये शशांक यांनी पुढाकार घेतला तेव्हा ते कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होते, हे विशेष!

‘‘आणखी एक मुद्दा. भविष्यातील जाहिराततंत्र वेगळेच असेल. आज आहे तसे ‘ॲअॅड लिंक्स’ स्वरूपात ते उद्या नसणार. स्टोरीज् सोबतच् जाहिरातीही जवळपास संयुक्त स्वरूपात इथून पुढे द्याव्या लागतील,’’ ‘विटीफिड’चे सहसंस्थापक प्रवीण सिंघल सांगतात.

image


‘विटीफिड’चे वेगळेपण

सध्या आहेत, तितक्या ‘कंटेंट क्युरेटर वेबसाइट्स’ पुरेशा नाहीत? प्रवीण सांगतात, ‘‘जेव्हा आम्ही वेबसाइट सुरू केली तेव्हा हा प्रश्न साहजिकच मनात आला होता. बझफिड Buzzfeed आणि डिप्लाय Diply हे दोन स्पर्धक आमच्यासमोर होते. दोन्ही प्रस्थापित होते. बाजारातली ही बडी नावे होती. पण आम्ही स्वत:चे वेगळेपण जोपासलेले होते. आम्ही केवळ कंटेंट ग्रहण करणारी आणि प्रसारण करणारी वेबसाइट नव्हतो. आम्ही व्यासपीठ निर्माण करत होतो. विशेष गोष्ट म्हणजे हे व्यासपीठ एक ‘चार्टिकल प्लॅटफॉर्म’ होते. फोटो ब्लॉग त्यावर करता येत असे आणि तुमचे शब्द तुम्हाला हव्या तितक्या लोकांसोबत शेअर करता येत होते.’’

इथं काम करायचंय? उठा आणि नाचा!

विटीफिड नावाप्रमाणेच वेबसाइटचे उद्दिष्ट मजेदार आहे. ज्याला कुणाला इथे काम करायचे असेल अगदी कुठल्याही भूमिकेत, त्याला तसे करायला सांगितले जाते. म्हणजे विनोद सांगा, स्टँड-अप कॉमेडी करा, डांस करा. विनय सांगतात, ‘‘चाकोरीबाहेर पडून काही करू इच्छिणाऱ्या लोकांना आम्ही खुली संधी देतो. कुणी तरी आपल्याला तपासतं आहे, याची यत्किंचितही भीती न बाळगता इथे या व्यासपीठावर तुम्ही काहीही बनू शकता. काहीही करू शकता.’’

प्रवीण म्हणतात, ‘‘आमचे बहुतांश सहकारी हे नवे आहेत. नव्या प्रतिभांवर आमचा विश्वास अधिक आहे. कारण ते नवनव्या गोष्टी शिकायला तयार असतात आणि विट्टीफिडच्या वातावरणात सहज रुळतात’’

एकत्रितपणे राहण्यासाठी अविवाहित मुलांकरिता एक अपार्टमेंटची सोय विटीफिडने करून ठेवलेली आहे. सर्वांच्या मासिक गरजा पूर्ण होतील, असा मोबदला विटीफिडकडून दिला जातो. खास स्वयंपाक्याची व्यवस्थाही करून दिलेली आहे. मुलांचे आरोग्य चांगले राहील, असे भोजन पुरवण्याची काळजी तो मनापासून घेतो.

इंदूरला हलले मुख्यालय

विनय आणि प्रवीण हरियानातील भावंडं. चेन्नईतील महाविद्यालयीन जीवनात इंदुरकर शशांकच्या संपर्कात आले. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला असताना त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. चेन्नईहूनच पुढे तीन वर्षे तो चालवला. विनय हा शशांकसमवेत इंदूरला आला असता, इंदूर हेच या प्रकल्पासाठी मुख्यालय म्हणून उत्तम ठिकाण असल्याचे त्याला जाणवले. पुढे तीन महिन्यांतच (२०१४ मध्ये) मुख्यालय इंदूरला हलले. आणि मग प्रकल्पाने मागे वळून पाहिले नाही.

चालू व्यवहार पाहता २०१५/१६ या पहिल्याच आर्थिक वर्षात विटीफिडला ६ दशलक्ष डॉलरची उलाढाल होईल, अशी संस्थापकांना अपेक्षा आहे. हे अवघ्या टिमचे यश असल्याची संस्थापकांची भावना आहे.

शशांक म्हणतात, ‘‘आम्ही लोकांमधील कौशल्याला फक्त भाव देत नाही, आम्ही कौशल्य असलेल्या लोकांना भाव देतो. अमुक एक कौशल्य दाखवा म्हणून सांगतही नाही. ज्या सहकाऱ्याला जे भावते, ते तो येथे करतो. आणि म्हणून इथे आमच्याकडे काम करणारे सगळेच आपापल्या कामावर मनापासून प्रेम करतात. आम्ही निव्वळ एक कंपनी नाही. आम्ही एक कुटुंबकबिला आहोत. आम्ही अवघे एक आहोत. मालक-कर्मचारी असे नाते इथे नाही. इथे सारेच एकमेकांचे सहकारी आहेत.’’

‘‘यशासाठी ठराविक असा कुठलाही साचा नाही. पण जर तुमच्याकडे सशक्त समर्पित टीम असेल तर तुम्ही स्वत: यशासाठी तुमचे स्वत:चे साचे निर्माण करू शकता,’’ असे विनय यांचे अनुभवांती तयार झालेले मत आहे.

दरम्यान, आशय उद्योगाची (the content industry) घोडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे. ब्लॉगर आणि लेखक असलेले मार्क शेफर यांचा अभिप्राय बरेच काही सांगून जाणारा आहे. ते म्हणतात, वेबआधारित माहिती (बहुतांशी ग्राहकोन्भिमुख) उद्योगात २०२० पर्यंत ६०० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. ‘पीक्यू मिडिया’च्या अंदाजानुसार येत्या २०१९ पर्यंत या उद्योगातील एकट्या आशय विपणनाचीच उलाढाल (content marketing) ३१३ बिलियन डॉलरपर्यंत उलाढाल होईल.


लेखिका- मुक्ती मसिह

अनुवाद- चंद्रकांत यादव

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags