संपादने
Marathi

विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात : 'आयटीच'

Team YS Marathi
21st Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Shareसोहिनी पुरोहित यांनी १९९९ साली ग्रॅज्युएट झाल्यावर सर्वसामान्यांप्रमाणेच लगेचच नोकरी करायला सुरूवात केली. त्या अकाउंटंट म्हणून काम करत होत्या. पण लग्न झाल्यानंतर घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना नोकरीला रामराम करावा लागला. पण त्यांच्यातली शिकण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दिवसेंदिवस ही मनिषा अधिक उफाळून येत होती. अखेर लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर त्यांनी बी.एड. करण्याचा निर्णय घेतला. सोहिनी आपल्या ध्येयाबाबत बोलतात, “मला लहानपणापासूनच शिक्षिका बनण्याची इच्छा होती. पण घरच्या परिस्थितीमुळे मला नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यामुळे माझं बी.२०१४ मध्ये त्यांनी बी.एड.चं शिक्षण पूर्ण केलं. त्या सध्या आयटीच (iTeach) या संस्थेच्या माध्यमातून, पुण्यातल्या येरवडा भागातल्या बाबू जगजीवन राम सेकंडरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हिंदी विषय शिकवतात.

शिक्षणव्यवस्थेत सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? या प्रश्नाला बहुतांश लोक ‘विद्यार्थी’ असं उत्तर देतील. पण आपण नीट विचार केला तर जाणवेल, शिक्षणव्यवस्था सक्षम करण्याकरता ‘शिक्षक’ हा घटकच सर्वात महत्त्वाचा आहे. विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातला बहुतांश वेळ शिक्षकांसोबत व्यतीत करतात. पालकांसोबत ते अगदी थोडा वेळ असतात. मातीच्या ओल्या गोळ्याला घडवण्याचं काम शिक्षक करतात. त्यामुळे दर्जेदार शिक्षण देणं आणि पिढ्या घडवण्याची जबाबदारी मुख्यतः शिक्षकांवरच आहे. शिक्षणव्यवस्थेतलं शिक्षकांचं हे महत्त्व जाणून आयटीच ही सामाजिक संस्था उत्तमोत्तम ‘शिक्षक’ घडवण्याचं काम करत आहे. ही संस्था प्रामुख्याने अल्प उत्पन्न गटांसाठी असणाऱ्या शाळांकरता काम करते. या शाळांमधील शिक्षक हे विशिष्ट ध्येयाने झपाटलेले असतात. मुलांच्या विकासाकरता सजग असतात. त्यामुळे या शिक्षकांमधल्या गुणांना खतपाणी देऊन त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास भावी पिढीकरता ते उत्तम आदर्श निर्माण होतील. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि इतर पूरक उपक्रमांची गोडी वाढेल.

बी.एड पुरेसं नाहीयं का?

शिकवण्याचंच योग्य शिक्षण घेतल्यानंतरही या वेगळ्या प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे? असं विचारल्यावर सोहिनी सांगतात, “बीएडचं शिक्षण घेत असताना आम्ही शाळेमध्ये दोन आठवडे प्रशिक्षणार्थी म्हणून वर्ग घेतो. पण त्या दोन आठवड्यात काहीही कळत नाही. विद्यार्थ्यांना सामोरं कसं जायचं? पाठाची तयारी कशी करायची या सगळ्यांबाबत खूप गोंधळ उडतो. विद्यार्थ्यांशी संबंधित काहीही माहिती या पदवीअभ्यासक्रमातून मिळत नाही. आयटीचच्या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी-शिक्षक संबंध यावरच भर देण्यात येतो. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी जर उद्धट, उर्मट वागत असेल तर त्याच्या घरातून त्याला पुरेसं वात्सल्य मिळत नसेल. किंवा त्याच्याकडे घरच्यांचं दुर्लक्ष होत असण्याची शक्यता असते. त्या विद्यार्थ्याशी मैत्रीचं नातं निर्माण करून त्याला ट्रॅकवर आणण्याच काम कसं करावं, याबाबत आम्हाला कार्यशाळांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. बीएडच्या शिक्षणात विद्यार्थांच्या जडणघडणीच्या दृष्टीने ज्या मूलभूत गोष्टींची कमतरता आहे, त्यांचा समावेश आयटीचच्या प्रशिक्षणात केला आहे”.

image


कथा 'आयटीच'च्या संस्थापकांची : 

 शिक्षकांना प्रशिक्षण देणारी आयटीच ही भारतातली पहिली संस्था आहे. शाळांमध्ये शिकवत असणाऱ्या शिक्षकांकरता या संस्थेचा दोन वर्षांचा कार्यक्रम आहे. याद्वारे त्यांना विकासाच्या संधी, कौतुक आणि प्रोत्साहन दिलं जातं. अल्प उत्पन्न गटांकरता असणाऱ्या शाळांमधील शिक्षकांवर त्यांचा मुख्य भर आहे. या शाळांमध्ये नोकरीदरम्यानचं प्रशिक्षण, त्यांची कामाबाबत असणारी ओढ, आपुलकी या गोष्टींची फार कमी दखल घेतली जात असल्यामुळे त्यांचा शिकवण्यातला रस कमी होऊ लागतो. या सगळ्याचा परिणाम मात्र बिचाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्यावर होतो.

प्रशांत मेहर्षी यांनी आयटीचची स्थापना केली. एमबीए झाल्यावर त्यांनी १५ वर्ष आयटी आणि विमा क्षेत्रात काम केलं. तर सौम्या जैन हा पेन विद्यापीठातून एमएस झालेला तरूण अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत चार वर्ष नोकरीस होता. यशस्वी करिअर असतानाही प्रशांतना आयुष्यात कशाची तरी कमतरता जाणवत होती. आणि मग त्यांना शिक्षणाच्या प्रातांत आपल्या शोधाचं परिमाण सापडलं. गेली दोन वर्ष टीच फॉर इंडियाच्या (टिएफआय) माध्यमातून प्रशांत पुण्यातल्या पालिका शाळांमधल्या चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थांकरता काम करत आहेत.

image


स्वदेश चळवळीचा सौम्यावर खूप खोलवर परिणाम झाला आणि मग त्याने आपल्या मायभूमीकडे परतण्याचा निर्णय घेतला. परत आल्यावर आपल्या ज्ञानाचा उपयोग त्याने तळागाळासाठी करण्याचं ठरवलं. सौम्या मध्यमवर्गीय खाजगी शाळांमधील सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांकरता काम करत आहे. गेली अडीच वर्ष या क्षेत्रात काम करताना त्यांना अनोखं मानसिक समाधान मिळतयं. सरकारी शाळांमधील शिक्षणव्यवस्था, शिक्षकांची मानसिकता आणि त्यांच्या गरजा यांचं अवलोकन त्यांना करता आलं. खाजगी शाळांच्या कामाची पद्धत, शिक्षकांच्या गरजा, नेमणूका आणि प्रशिक्षण याचाही आढावा त्यांनी घेतला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरता या सगळ्या व्यवस्थेतल्या त्रुटींवर काम करून सुधारणा आणण्याचे प्रयत्न ते करत आहेत.

पंखांना बळकटी

टिएफआयने आपल्या फेलोशिप कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्षी ‘बी द चेंज प्रोजेक्ट’ (बीटिसीपी) हा आणखी एक उपक्रम सुरू केलाय. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न वर्गाबाहेर येऊन सोडवण्यावर भर देण्यात आलाय. प्रशिक्षणार्थींनी विद्यार्थ्यांसोबत मैत्री करून त्यांच्या भावविश्वात काय सुरू आहे? त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणं तसंच फेलोशिप व्यतिरिक्त आणखी एखादा उपक्रम सुरू करावसं वाटत असेल तर तो करणं, या बाबी बीटिसीपी अंतर्गत करायच्या आहेत. सौम्या सांगतात, “प्रशांत आणि मी आम्हां दोघांमध्येही उद्योजक बनण्याचं कुठेतरी दडलं होतं. आम्ही दोघंही दोन गोष्टींच्या शोधात होतो, एक म्हणजे सहसंस्थापक जो या प्रवासातला सहप्रवासी असेल आणि दुसरं म्हणजे व्यवसायाची संधी. आमच्या व्यावसायिक संधीची आस जरा वेगळी होती. आम्हाला व्यवसायासोबत शिक्षणव्यवस्थेतल्या रिकाम्या जागा शोधून त्या भरायच्या आहेत”.

समस्यांचं अवलोकन

विद्यार्थ्यांच्या जवळ जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षक. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजून घेण्याकरता आणि त्यांच्यात शिक्षणाविषयी रस निर्माण करण्याकरता, ताकदीचे शिक्षक असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या कामाचा आवाका कसा वाढेल, या गोष्टी ते आनंदाने कशा करतील याकडे लक्ष देणं सुरू केलं. गेल्या अडीच वर्षातल्या त्यांच्या अनुभवाने त्यांना जाणवलं की, दरवर्षी नवीन शिक्षकांची खोऱ्याने भरती होते. पण या नव्या शिक्षकांना भरतीपूर्व प्रशिक्षण (मुलांशी कसं मिळतं-जुळतं घ्यावं, त्यांच्या कलाने जात कसं शिकवावं, त्यांना समजून घेणं) दिलं जात नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणक्षेत्रातल्या जमेच्या बाजू कळतच नाही आणि मुलांशी नातं निर्माण करण्याऐवजी ते फक्त ‘शिकवणं एके शिकवणं’ एवढचं करत राहतात. पण यामुळे मुलांच्या दृष्टीने एक आदर्श शिक्षक बनण्याच्या वाटेवरून ते दूर निघून जातात. खाजगी शाळांमध्ये आणखी काही वेगळ्या समस्या असतात. भरती, प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांना नोकरीत टिकवून ठेवणे. तर दुसरीकडे कितीतरी नवीन शिक्षकांना नोकऱ्याच मिळत नाहीयेत. सौम्या आणि प्रशांत दोघांच्या मते, “शिक्षकांना प्राविण्य मिळवण्यासाठी व्यावसायिक विकासात्मक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रोत्साहन देणे, उत्साह वाढवणे, योग्य तो मोबादला देणे या गोष्टींमुळे शिक्षकांमध्ये काम करण्याची उमेद वाढेल. याचा चांगला परिणाम शिकवणं आणि शिकणं या दोन्ही बाबींवर होईल”.

image


आराखडा आणि अंतिम मॉडेल

सध्या शिक्षक असणाऱ्यांकरता त्यांनी एक वर्षाचं प्रशिक्षण कार्यक्रम आखला. वेळोवेळी घेतली जाणारी कामाची दखल, प्रोत्साहन या सगळ्यापासून हे शिक्षक कोसो दूर होते. या गोष्टी आयटीचच्या लक्षात आल्यावर, त्यांनी नुकतीच शिक्षकाची पदवी प्राप्त केलेल्या लोकांना आपल्या कामात जोडून घेतलं. आयटीचच्या कार्यक्रमात सामील असणाऱ्या शाळांमध्ये आयटीच फेलो म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जेणेकरून त्यांच्या कामाची दखल घेऊन, प्रोत्साहन आणि उत्तेजन देता येईल.

image


या फेलोशीप अंतर्गत शिक्षकांनी दर महिन्याला दोन कार्यशाळांना उपस्थित राहायला हवं. संबंधित शिक्षकांच्या शाळांमध्येच या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. अध्यापनशास्त्र, मूल्यशिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शिकणं आणि शिकवण्याच्या नव्या पद्धती या विषयांचा या कार्यशाळांमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. कार्यशाळा झाल्यावर शिक्षकांनी कार्यशाळेतल्या पाठांच्या आधारे वर्गात शिकवणे अभिप्रेत आहे. कुठे अडलं तर मदतीला शिक्षकगुरू असतातच.

शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन आणि बक्षीस देण्याकरता आयटीचने “स्टार क्लब” सुरू केला आहे. दर महिन्याला ही स्पर्धा घेतली जाते. वार्षिक अधिवेशनात प्रत्येक फेलोच्या कामगिरीच्या निकषांवर त्यांना पुरस्कार दिला जातो. याशिवाय दर सहा महिन्याला फिल्ड ट्रीपवर नेलं जातं. ज्यात त्यांना शिकायलाही मिळतं, त्यांच्यातल्या गुणांना वाव मिळतो आणि कामातून थोडी उसंत घेत मजाही करता येते. या नवीन शिक्षकांना प्रशिक्षण वेतनही देण्यात येतं. आयटीचमध्ये विलग्रोने सुरूवातीचं भांडवल गुंतवलं आहे.

स्पर्धात्मक मूल्यांकन

या दोघांनी आपलं संशोधनाचं काम एकदम चोख केलं आहे. व्यवस्थेतल्या रिकाम्या जागा ते यशस्वीरित्या भरून त्यांच्या स्पर्धकांना बोट तोंडात घालायला लावत आहेत. संस्थापकांनी आम्हाला सांगितलं की, “टिएफआयकडे प्रशिक्षित शिक्षक आहेत. नेतृत्व उभारणीवर टिएफआयचा भर आहे. तसंच त्यांच्याकडील फेलो केवळ दोन वर्षच त्यांच्याकडे काम करतात. कारण त्यानंतर त्यांनीही शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिकवावं असं अपेक्षित आहे. शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या खूप चांगल्या चांगल्या संस्था आहेत. त्यांच्यासोबत मिळून आम्ही काम करत आहोत. शिक्षकांना प्रशिक्षण देणारी ही सेवा बऱ्याच शाळांच्या पसंतीस उतरत आहे”.

भारतातल्या बीएड होणाऱ्या प्रत्येक नव्या पदवीधारकाला आयटिचचं प्रशिक्षण घ्यावसंच वाटलं पाहिजे, हे आयटिचचं स्वप्न आहे. शिक्षकांचा पाया भक्कम करून त्यांना समजून घेऊन, त्यांना त्यांच्या कामातून आनंद मिळवून द्यायचा आहे.

आपल्या ध्येयाविषयी संस्थापक सांगतात, “२०२० पर्यंत आम्हाला मुंबई, कोलकत्ता, दिल्लीसारख्या १० महानगरांमध्ये आमचं काम घेऊन जायचं आहे. पुढील तीन वर्षांत आणखी २०० फेलोंना आमच्या कामात सामील करून घेणार आहोत. चांगले शिक्षक घडवण्याच्या या कामामुळे भारतातली शिक्षणव्यवस्था सुदृढ होईल आणि भावी पिढीही. पर्यायाने एक समृद्ध भारत...”

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

गुरूजींनाच शिकवण्याच्या नव्या कल्पना शिकवणारे ‘गुरूजी’!

प्रत्येक मुलाला मिळेल शिक्षण, भारताच्या प्रगतीचं हेच लक्षण

येथे अनेक शिक्षिका घडतात...

लेखिका – स्निग्धा सिन्हा

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags