कुशल कामगारांच्या निर्मितीसाठी ग्रामीण बँकेच्या आदर्श मॉडेलचा वापर : क्लाऊडफॅक्टरी
कर्ज घेण्यासाठी ज्यांच्याकडे तारण ठेवण्यासारखं काही नाही अशा लोकांना कर्ज उपलब्ध करुन देणारी आणि त्या कर्जाची यशस्वी वसुली करणारी प्रणाली बांग्लादेशच्या ग्रामीण बँकेने निर्माण केली. मोहम्मद युसूफ यांच्या प्रयत्नांनी समाजातील अशा वर्गाला त्याचा फायदा झाला ज्यांना कोणी कर्ज देण्यास तयार नव्हतं. त्यांची हमी घेऊन त्यांना लघुकर्ज देण्यात आलं. कर्जासाठी हमी देण्याच्या याच मॉडेलचा उपयोग व्यापारातील आऊटसोर्सिंगसाठी कल्पकतेने करण्याची किमया साधलीये ‘क्लाऊडफॅक्टरी’ आणि त्यांच्या टीमने...
क्लाऊड फॅक्टरी ही एक आऊटसोर्सिंग कंपनी आहे. डाटा एन्ट्री, प्रक्रिया, स्टोरेज आणि वर्गीकरणासारखी संगणकामार्फत केली जाणारी कामं कंटाळवाणी कामं ही कंपनी करते. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांनी एकत्र येऊन नेपाळसारख्या विकसनशील देशातील मानवी संपत्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. क्लाऊडफॅक्टरीच्या माध्यमातून त्यांनी कर्मचाऱ्यांना संगणकाचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्या कामाचा योग्य मोबदलाही दिला.
क्लाऊडफॅक्टरी हे कमी भांडवलावर चालणाऱ्या आणि सामाजिक परिणामांचा विचार करुन आखण्यात आलेल्या काही व्यापारी मॉडेलचं एकत्रित रुप आहे. त्यांचं आऊटसोर्सिंग पूर्णपणे क्लाऊडवर आधारित असल्यानं वाहतूक खर्च आणि वेळेच्या मर्यादेचं त्यांच्यावर कोणतंही बंधन नाहीये. प्रामुख्याने उत्पादनक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कार्यप्रणालीवर आधारित क्लाऊडफॅक्टरीचं काम आहे. याद्वारे कोणत्याही कामाचं संगणकावर आधारित कार्यांमध्ये विभाजन केलं जातं. त्यामुळे ही कामं सोप्या पद्धतीनं कामगारांना शिकवता येतात आणि कामगारांची कार्यक्षमता वाढते.
यासोबतच क्लाऊड फॅक्टरी सामाजिक पातळीवर पुढाकार घेऊन कामगारांचे विभागानुसार गट तयार करते आणि त्यांच्या कामाचं साप्ताहिक मूल्यांकन केलं जातं. व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर मुल्यांकन केलं जातं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं काम चांगलं नसेल तर त्याचा परिणाम गटाच्या कामावर, इतर सदस्यांवर आणि स्वत: त्या व्यक्तीवरही दिसतो. कामगारांमधील या जाणिवेनं त्यांच्या कामात खूप सकारात्मक बदल दिसू लागला आणि इथूनच जबाबादारी वाढते असं क्लाऊडफॅक्टरीचे विक्री आणि विपणन उपाध्यक्ष टॉम पुस्करीच सांगतात. तसंच हा फक्त व्यवसाय नसून त्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्याचाही प्रयत्न असल्याचं पुस्करीच सांगतात. त्याचबरोबर समाजातील गरीबी दूर करण्यासाठी प्रयत्न करतील अशा काही व्यक्ती या नवीन माध्यमातून निर्माण करण्यासाठी त्यांचं चरित्र मुल्यांकनही करत असल्याचं पुस्करीच सांगतात.
कंपनीच्या व्यवसायातून मिळणारा नफा आणि या उपक्रमात सामाजिक जाणीवेचं ठेवलेलं भान यामुळे गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी तयार झाल्याचं पुस्करीच सांगतात. सुरूवातीला आम्ही थोड्याच भांडवलावर काम सुरू केलं कारण सुरूवातीला फक्त नफा हा आमचा हेतू नव्हता, तर त्याला सामाजिक संदर्भ होते, त्यामुळेच गुंतवणूकदारांचा आम्हाला पाठिंबा लाभला. क्लाऊडफॅक्टरीमध्ये सध्या दीडशे कर्मचारी आहेत. “आमच्या प्रतिस्पर्धी मोबाईलवर्क्स कंपनीने आतापर्यंत १० लाख कामं पूर्ण केल्याचा दावा केला आहे. पण क्लाऊडफॅक्टरी दर आठवड्याला किमान १ लाख कामं पूर्ण करण्यास सक्षम आहे”, असा दावा पुस्करीच करतात.
क्लाऊडफॅक्टरीने कामाचं जे मॉडेल तयार केलंय ते नफा मिळवून देणारं असल्यानं त्यांना यश मिळालंय. पण नफा कमावण्याबरोबरच आर्थिक तंगीमुळे चांगलं काम करु न शकणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देऊन कुशल कामगारांची एक फौज तयार करण्याचं त्यांचं ध्येय आहे. क्लाऊडमधून तयार झालेले कार्यकर्ते भविष्यात विविध क्षेत्रात काम करु शकतात, कारण त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीनं काम कसं करायचं आणि नेतृत्व कसं करायचं याचं प्रशिक्षण देतो, असं टॉम पुस्करीच सांगतात.