संपादने
Marathi

स्वप्नांनाच उद्दिष्ट बनवा : रश्मी बंसल

Chandrakant Yadav
9th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

रश्मी बंसल यांच्याकडून वाचकांना प्रकाशपर्वाची खास भेट आहे आणि ती म्हणजे ‘अराइज, अवेक’, जवळपास सर्वच पुस्तक विक्रेत्यांकडे ती उपलब्ध आहे. उद्यम आणि उद्यमींसंदर्भात लिहिणाऱ्या या लेखिकेने गतवर्षी स्वत:ही आपल्या ‘ब्लडी गुड बुक्स’ या नव्या उद्यमाचा श्रीगणेशा केला. उद्यमावर त्यांची अनेक पुस्तके आलेली आहेत. महाविद्यालयीन युवक-युवतींसमवेत संवाद साधणे रश्मी यांना विशेष भावते. ‘इकोसिस्टिम’ या विषयातले गहन ज्ञान रश्मी यांच्या ठायी आहे आणि वाचकांना तसेच विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा हमखास फायदा होतो.

रश्मी यांचे वडिल म्हणजे एक विख्यात खगोल-भौतिक शास्त्रज्ञ. रश्मी यांचे बालपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या (TIFR) परिसरात गेले. दक्षिण मुंबईच्या एका टोकाला ते आहे. ‘टीआयएफआर’ संस्थेबाबत त्या म्हणतात, ‘‘बालपण घालवण्यासाठी हे एक अद्भूत ठिकाण आहे. मी इथे लहानचे मोठे झाले, हे माझे भाग्यच.’’ सेंट जोसेफ हायस्कूल आणि आर सी चर्च (कुलाबा) मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि पुढे अहमदाबाद आयआयएममधून त्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली.

शांतचित्त रश्मी विद्यार्थिनी म्हणून हुशार होतीच, दिसायचीही हुशार. नेमके तेवढेच बोलणे, हा रश्मीचा स्वभाव आणि त्यात डोळ्यावर नंबरचा चष्मा, कुणीही तिला पाहताच क्षणी म्हणावं मुलगी गुणी आहे, अशी. वर्गात नेहमी पहिलीच यायची. केव्हाही बघा हातात कुठले ना कुठले पुस्तक असेलच. त्यामुळे कॉलनीतले लोक आणि वर्गातले, शाळेतले मित्र-मैत्रिणी सगळेच रश्मीला पट्टीची अभ्यासू समजत असत. पण रश्मी आज स्वत:चीच पोलखोल करतात, ‘‘मी अभ्यासू वगैरे होते, पण पट्टीची नव्हे. टोकाची तर मुळीच नाही, मी बरेचदा कादंबऱ्या वाचत असे आणि सगळ्यांना वाटायचे काय सतत अभ्यास करते ही मुलगी.’’

image


गणित हा विषय तर रश्मी यांना अजिबात आवडत नसे. पुढे कॉलेजलाही त्यांनी कला शाखा निवडली. अर्थशास्त्रात बीए केले. आयआयटी, अभियांत्रिकी, मेडिकल आणि अमेरिकेतून शिष्यवृत्ती मिळवून पीएचडी वगैरे करणे, अशा गोष्टींचेच वलय असलेल्या वातावरणात रश्मी राहायची आणि तिने यातले काहीही निवडले नाही म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रश्मी सांगतात, ‘‘मी कला शाखेत ॲअॅडमिशन घेतली हा जणू सगळ्यांनाच एक धक्का होता. अरे रश्मी तू तर हुशार आहेस. पहिली यायचीस तू आणि हे काय, आर्टस्ला गेलीस, असे सगळेच मला म्हणत, पण मला माहिती होते, माझा मार्ग बरोबर आहे म्हणून.’’

लेखिका बनण्याचे कारण

कॉलेजला असतानापासूनच रश्मी पुस्तके लिहित आलेल्या आहेत. एमबीए झाल्यानंतर लगेचच त्यांनी आपले स्वत:चे ‘जेएएम’ हे प्रकाशन गृहदेखील सुरू केलेले होते.

‘स्टे हंग्री, स्टे फुलीश’, हे रश्मी यांचे पहिले पुस्तक. CIIE, IIM, अहमदाबादेतील प्रा. राकेश वसंत यांनी या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना रश्मींना सुचवली होती. रश्मी सांगतात, ‘‘एकाच वेळी २५ उद्योजकांना भेटून त्यांच्या गोष्टी ऐकणे रंजक ठरेल, असे मला वाटले. वैयक्तिक प्रशिक्षणाच्या पातळीवर हा खरोखरच एक छान अनुभव होता. मी तो अनुभव अगदी मनापासून आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविला.’’ अशा स्वरूपाच्या लिखाणातून त्या सामान्यत: आपली मते रेटत नाहीत. आपल्या वैयक्तिक अनुभवांची छटाही त्यात उमटू देत नाहीत. त्या म्हणतात, ‘‘आता या उद्योजकांच्या कथांची मी पहिली श्रोता वा प्रेक्षक असते. त्या इतरांना सांगताना मग थोडाफार का होईना माझा प्रभाव (मी कितीही टाळला तरी) त्यात असेलच.’’

आपल्या लिखाणासाठी रश्मी नेहमी कांगोरे असलेल्या कथानकांच्या शोधात असतात. उद्योजकाच्या जीवनात चढउतार असतील, तर ती रश्मी यांची पहिली पसंती असेल. आणखी उदाहरण द्यायचे तर नव्या आणि विशेषत: पहिल्या पिढीचे उद्योजक. ज्यांना त्या-त्या व्यवसायाची परंपरा नसते. वाडवडिलांची कुठलीही पुण्याई नसते आपल्या दमावर जे उद्यमात उभे राहिलेले असतात.

रश्मी म्हणतात, ‘‘खरंच. एखाद्या कथेच्या कुठल्या कांगोऱ्याने माझे लक्ष वेधून घेतले, यापेक्षा अधिक काही मी कथासृजनाबद्दल सांगू शकत नाही. कथा विश्वासार्ह असायला हवी. वाचकांचे तादात्मीकरण कथेसोबत झाले पाहिजे. सांगायच्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रामाणिक तर असायलाच हवे. महत्त्वाचे म्हणजे ती रंजकही असली पाहिजे. सांस्कृतिक पार्श्वभूमीचे चित्रण कथानकांमध्ये असायलाच हवे, हा माझा प्रयत्न आवर्जून असतो. जो कुणी वाचेल त्याला ही गोष्ट माझ्यासारख्याच कुणाची तरी गोष्ट आहे. माझ्याच गावची गोष्ट आहे.’’

आपल्या पुस्तकांमध्ये नाविन्य आणि नवविचारांचा समावेश असावा म्हणून रश्मी सतत देशभर फिरत असतात. दरवर्षी जवळपास ८० ते १०० शाळा-महाविद्यालयांचा दौरा करतात.

‘‘तरुणांमध्ये उत्साह असतो, पण त्यांना आपण कुठल्या दिशेने पुढे जावे, हे कळत नाही. आणि वेगळे काही करण्याचा दमखम असलेले काही युवक तर जवळपास प्रत्येक कॉलेजात, शाळेत भेटूनच जातात. अशा युवकांच्या कथांनीच मला ‘अराइज, अवेक’ लिहायला भाग पाडले.

कॉलेजात शिकत असताना आपली कंपनी सुरू करणाऱ्या युवकांच्या कथा रश्मी यांच्या ‘अराइज, अवेक’ या नव्याकोऱ्या पुस्तकात आहेत.

‘‘युवकांना मला एकच सांगायचेय, प्रयोग करत रहा. नाविन्याच्या शोधात रहा. एखादे स्वप्न बघा आणि स्वप्नपूर्तीसाठी स्वत:ला जुंपून घ्या. कॉलेजात तुम्ही मजा करायला येता. काही तरी करून दाखवायला येतात. अशात स्वत:चा खर्च भागेल, एवढी कमाई झाली तर सोन्याहून पिवळे. पण तुमची एखादी कल्पना तुमच्यासाठी एक कायमचा मार्ग तयार करू शकते, हे देखील लक्षात घ्या. जशी संधी दिसली, तसे तुटून पडा आणि लागा कामाला…’’

उद्यमी

आतापर्यंत जितक्याही उद्योजकांना रश्मी भेटल्या, त्या सर्वांमध्येच उद्दिष्ट, उद्दिष्टाबद्दलचा उत्साह आणि उद्दिष्टप्राप्तीचा कैफ… ही वैशिष्ट्यांची त्रिसूत्री रश्मी यांना आढळली. रश्मी आपल्यावतीने आणखी एक सूत्र यात जोडतात ते म्हणजे, ‘दुर्दम्य आत्मविश्वास.’

महाविद्यालयांतून आणि माध्यमांतून उद्यमशिलतेबाबत आता आधीच्या तुलनेत अधिक जागरूकता आहे, असे रश्मी यांना वाटते. उद्यम या विषयावर आधीच्या तुलनेत अधिक चर्चासत्रे आयोजिली जातात. व्यापार योजनांवर स्पर्धाही घेतल्या जातात. तरीही बऱ्याच कॉलेजांतून अशी आयोजने म्हणजे औपचारिकता पूर्ण करण्यापलीकडे काहीही नसते. उद्यम वा उद्योजकता हे विषय मुळात तात्विक नाहीत ते थेट व्यावहारिक आणि म्हणून थेट अनुभवायचे विषय आहेत. कॉलेजच्या परिसरांतूनच विद्यार्थ्यांना आपला लहानमोठा धंदा सुरू करायला प्रोत्साहित करायला हवे, अशी रश्मी यांची अपेक्षा आहे.

त्या म्हणतात, ‘‘प्रत्येक बॅचचे कमीत कमी दहा टक्के विद्यार्थ्यांनी पदवी मिळवल्यानंतर लगेच आपला स्वत:चा असा कुठला तरी व्यवसाय सुरू करायला हवा, असे उद्दिष्ट आम्ही राष्ट्रीय पातळीवर निश्चित करायला हवे.’’

image


महिला उद्योजक

रश्मी यांचे पुस्तक ‘फॉलो एव्हरी रेनबो’ हे महिला उद्योजिकांवर आधारित आहे. रश्मी सांगतात, ‘‘कुटुंब सांभाळून ज्या महिलांनी व्यापारातही चुणूक दाखवली, अशा महिलांवर लिहावे हा या पुस्तकाचा मूळ उद्देश होता. व्यवसाय सुरू करताना, सांभाळताना कौटुंबिक जबाबदाऱ्या या महिलांसमोर एक पारंपरिक आव्हान आहे. सनातन संकट आहे. व्यापार आणि परिवार या दोन्हींत ताळमेळ साधत स्थैर्य कसे साधावे, त्याचा मंत्र देणारे हे पुस्तक आहे.’’

महिला साधारणपणे असा व्यवसाय निवडतात, जो वेळखाऊ असतो. ज्यात जम बसायला एक वेळ जावा लागतो. क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्यानेच ज्यात पुढे जाता येते. रश्मी सांगतात, ‘‘महिलांमध्ये महत्त्वाकांक्षेचा अभाव वगैरे असतो, असा याचा अर्थ नाही. खरंतर कुटुंब आणि व्यवसाय यातला ताळमेळ बिघडायला नको म्हणून व्यवसाय निवडताना महिलांनी ही खबरदारी घेतलेली असते. मुले जसजशी मोठी होत जातात, व्यापारही वेग धरतो. मग व्यापाराला जास्त वेळ देणे जिवावर येत नाही, अशा पद्धतीने महिलांचे व्यवस्थापन चालते.’’

महिला उद्योजिकांसमवेतच्या अनुभवांच्या आधारावर रश्मी छातीठोकपणे सांगतात, की अनेक प्रकरणांतून ज्यात महिलांनी लगेच वेग धरणारा व्यवसाय करायला निवडलेला असेल तर घरातल्या अन्य सदस्यांचा सहभागही त्यात हमखास आढळलेला आहे. कुटुंबातल्या अन्य सदस्यांच्या जोरावर आपल्या खांद्यावरील जबाबदारी काहीशी कमी होतेच, हा विश्वास त्यामागे असतो.

रश्मी यांच्या मते, पैसा हा असा भाग आहे, ज्यात सामान्यपणे महिलांची भूमिका कमीच असते. हस्तक्षेप तर जवळपास नसतोच. बहुतांश महिलांनी आपल्या मातांना घरातल्या आर्थिक व्यवस्थापनाच्या भानगडीत पडलेले पाहिलेले नसते. मुलींना त्या तरुण होतात तोवरही आर्थिक व्यवस्थापन शिकवले जात नाही. अर्थात महिलांवर यासंदर्भात बंधने घातली जातात, असेही नाही. मुळात ही एक अशी कौटुंबिक बाब आहे, जिच्यापासून कमीतकमी भारतीय महिला दोन हात दूर राहणेच पसंत करतात. ‘हे आणा, ते आणा’ इथपर्यंतच या बाबतीत महिलांची मजल सामान्यपणे भारतात असते.

रश्मी म्हणतात, ‘महिलांनो पैशांच्याबाबतीत जास्तीत जास्त माहिती तुम्हाला असायला हवी. पैसा, आर्थिक प्रकरणात भागीदारी, पैशांची व्यवस्था, गुंतवणूकदारांशी बोलणे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पैशाबाबतच्या अज्ञानातून व्यावसायिक म्हणून स्वत:च्या मार्गात स्वत:च एक अडसर ठरू नका.’’

ताळमेळ

रश्मी सतत या गावाला, त्या गावाला, अशा फिरस्तीवर असतात. मग कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह विविध आघाड्यांवर त्या वेळेचा ताळमेळ कसा बसवतात? त्या सांगतात, ‘‘मी सगळ्या आघाड्या मस्त सांभाळते, असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. पण मी प्रयत्न करते. कामांचा आणि जबाबदाऱ्यांचा प्राधान्यक्रम ठरवते. खरं सागायचं तर घरातली बहुतांश कामे मी करतच नाही. कुणासाठीही सगळं काही नेटानं पार पाडणं अवघडच आहे. मला वाटतं खुप साऱ्या गोष्टी मानसिक स्थैर्यावर अवलंबून असतात. काही का घडे ना तुम्ही स्थिरचित्त कसे राहाता, यावरही बरेच काही अवलंबून असते.’’

रश्मी कुणासोबतही भागीदारीचा व्यवसाय करत नाहीत. आपल्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला हवे असेल तर भागीदारीच्या भानगडीत पडू नये, असे त्या म्हणतात.

उद्यमविकासात गुंतवणूकदारांची भूमिका

रश्मी यांच्या मते विविध लोकांना एकत्र आणून त्यांच्यात संपर्काचे माध्यम म्हणून काम करणारे आणि सल्लागार म्हणूनही गुंतवणूकदार तुमच्या उद्योगाला कमालीचे सहाय्यक ठरतात.

‘‘अर्थात दैनंदिन कामकामाजात त्यांच्या सहभागाची काही गरज नाही. पण ते उद्योजकांना मार्गदर्शक ठरू शकतात. बाजारातल्या बारिकसारिक तपशिलांची माहिती उद्योजकांना त्यांच्याकडून मिळू शकते. हा मोठा नाजुक ताळमेळ असतो. तुम्ही त्यांचा आधार तर घ्यायचा, पण त्यांना हे जाणवायला नको, की तुम्ही त्यांच्यावर अवलंबून आहात म्हणून. आपण सांगू ते कंपनी करेल, या थाटात गुंतवणूकदार येता कामा नये. कारण उद्योजक आणि त्याची मुख्य टीम यांनाच जर आपण व्यवसायाचे मालक आहोत, कर्तेधर्ते आहोत, असे वाटत नसेल तर गुंतवणूकदाराशी संबंध पुढे रेटले जाऊ शकत नाहीत.’’

‘इकोसिस्टिम’सुधारणेसाठी तीन सल्ले

रश्मी यांच्या मते हे तीन सल्ले खालीलप्रमाणे आहेत

१) संरक्षक आणि सल्लागार म्हणून लायक माणसे. अशी माणसे ज्यांना उद्योगयात्रेचा पुरेसा अनुभव आहे आणि ज्यांच्या अनुभवाचा कंपनीला उपयोगही होतो.

२) युवा उद्योजक. उर्जा आणि नवविचारांनी भारलेले. विद्यार्थी आणि सल्लागारांदरम्यान चर्चासत्रे आदींच्या माध्यमातून नेहमी संपर्क असायला हवा. उद्योगाच्या व्यावहारिक पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव हा तात्विक तपशिलापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही लहानमोठे व्यवसाय सांभाळण्याची परवानगी देतात, उदाहरणार्थ कँटिन चालवणे, तर त्यांना काहीतरी नवे करण्याची संधी मिळते. एखादा व्यवसाय स्वत: चालवण्याचे शिक्षणही मिळते.

३) तिसरी गोष्ट म्हणजे युवा आणि नव्या दमाच्या उद्योजकांना मदत करायला बँकांनीही पुढे सरसावले पाहिजे. सरकार उद्योजकांच्या सहाय्यासाठी कितीतरी योजना सुरू करते, पण बँकांचे व्यवस्थापक अजूनही व्यापार-उत्पादन, यांत्रिकी वा उद्योगाच्या वर्तुळाबाहेर पडायलाच तयार नाहीत.

आगामी योजना

रश्मी दोन पुस्तकांवर काम करताहेत. एक आहे, ‘अक्षय पात्र संस्थान पर’, हे पुस्तक मध्यान्ह भोजन योजनेवर आधारित आहे. दुसऱ्या पुस्तकाचे नाव आहे, ‘उम्मीद’. ‘झी टीव्ही’चे सहकार्य त्याला आहे. ‘अपेक्षा’ या संकल्पनेवर आधारलेल्या व ‘झी टीव्ही’च्या प्रेक्षकांकडून मागवल्या गेलेल्या कथांचा हा संग्रह असेल. थोडक्यात कथांची निवड आणि संपादन रश्मी यांचे आहे.

रश्मी म्हणतात, ‘‘त्यामागे एक दृष्टिकोन आहे आणि तो म्हणजे, परिस्थिती कशी का असे ना, सामान्य माणसात एक असा संकल्प दृढ करायचा आणि एक अशी दृष्टी रुजवायची, की तो त्याच्या उद्दिष्टापर्यंत धडकलाच पाहिजे!’’

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags