संपादने
Marathi

तणावमुक्त आनंदी जीवनाचा मूलमंत्र ‘आय ऍम फाईन’

Anudnya Nikam
28th Jan 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

स्ट्रेस फॅक्टर.. हा आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेला वेताळ आहे. अनपेक्षितपणे आलेल्या संकटांबरोबरच धकाधकीचे जीवन आणि स्पर्धात्मक युग यामुळे अनेकदा माणसांनी विकतची दुखणी मागे लावून घेऊन स्वतःच या वेताळाला आमंत्रण दिलेले असते. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितकीच निरनिराळी स्ट्रेस म्हणजेच तणावाची कारणे पहायला मिळतात. या स्ट्रेस फॅक्टरला वेळीच योग्य पद्धतीने हाताळले नाही तर तो आरोग्याला घातक ठरतो. यामुळे विविध आजार संभवतात. अनेकदा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते. यावर मात करण्यासाठी आपल्या मनावर ताबा मिळवून मानसिक शांतता अनुभवायला शिकणे अत्यंत गरजेचे असते. योग, ध्यानधारणा, व्यायाम, हास्यविनोद या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या मनावरचा ताण हलका करुन आपल्याला मानसिक शांती आणि आनंद मिळवून देतात. मात्र अनेकदा तणावपूर्ण परिस्थितीत माणसाला या गोष्टींसाठी सक्रिय होण्याची इच्छाच होत नाही. कारण त्याच्या मनात तेच तेच विचार पुन्हा पुन्हा येत असतात. जे त्याला अस्वस्थ करत असतात. डिप्रेस करत असतात. अशावेळी एकच उपाय त्याला तारु शकतो आणि तो म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे आपले मन मोकळे करणे. ‘व्यक्त होणे’ हा मनावरील ताण कमी करण्याचा एक खूप सोपा मात्र सहसा लक्षात न येणारा असा रामबाण उपाय आहे. हाच रामबाण उपाय सर्वांपर्यंत पोहचवून सगळ्यांचे जीवन तणावमुक्त करण्यासाठी निरज गौर यांचा ‘आय ऍम फाईन’ग्रुप कार्यरत आहे.

image


बी.ई (मेकॅनिकल) असलेल्या निरज यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. एकदा ते आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसले असताना गप्पा गप्पांमध्येच आपापल्या समस्या त्यांनी एकमेकांना बोलून दाखविल्या. “हळूहळू आमची चर्चा रंगत गेली. सरतेशेवटी या चर्चेतून समस्या सुटल्या नसल्या तरी आपापली दुःख एकमेकांना सांगितल्याने मनावरचा ताण हलका झाल्याचे आम्हाला जाणवले. केवळ शेअरिंगमुळे एवढी शांती मिळत असेल तर हा जालीम उपाय आपण इतरांपर्यंतही पोहचवला पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि १२-१२-१२ च्या मुहूर्तावर मी माझ्या काही मित्रांच्या सोबतीने ‘आय ऍम फाईन’ ग्रुप सुरु केला,” निरज सांगतात.

image


सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आय ऍम फाईन’ ग्रुप लोकांशी कनेक्ट झाला आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून तणावमुक्त, आनंदी जीवन जगण्यासाठी लोकांना प्रवृत्त करु लागला. प्रत्येक गुरुवारी पुण्यामध्ये ‘आय ऍम फाईन’ ग्रुपची शेअरिंग मिटींग होते. “माझ्या बाणेरमधल्या ऑफीसमध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर, पार्कमध्ये आम्ही ही मिटींग घेतो. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती दिली जाते. दर आठवड्याला मिटींगमध्ये स्ट्रेस, रिलेशनशिप यासारखे विविध विषय आम्ही चर्चेसाठी घेतो. याबाबत ज्याला कुणाला सर्वांसमोर येऊन बोलायचे असेल तो बोलतो. ज्याला सर्वांसमोर बोलायचे नसते तो दुसऱ्यांचे अनुभव ऐकतो. अनेकदा नव्याने आलेले सदस्य सर्वांसमोर बोलायला संकोचतात. अशावेळी ते केवळ श्रोत्याची भूमिका घेतात. मात्र त्यामधूनही त्यांना खूप फायदा होतो. दुसऱ्यांची दुःख ऐकल्यावर आपल्याप्रमाणेच समस्या असणारे इतर लोकही आहेत, किंबहुना अनेकजण आपल्यापेक्षा मोठ्या समस्यांना, त्रासाला सामोरे जात आहेत याची त्यांना जाणीव होते आणि नकळत त्यांना त्यांची समस्या सामान्य वाटू लागते. समस्येकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलल्यामुळे त्यामुळे होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी वाटू लागते. परिणामतः मनावरचा ताण आपोआपच कमी होतो,” असं निरज सांगतात.

image


शेअरिंग मिटींगबरोबरच ‘आय ऍम फाईन’ ग्रुप आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या विविध कार्यशाळा तसेच सायकल एक्सपिडीशन सारख्या विविध फिजीकल ऍक्टिविटीजही आयोजित करतो. ज्यामुळे मानसिक आणि शारिरीक ताण दूर होऊन लोकांना जगण्याचा नवा उत्साह मिळतो. “आतापर्यंत आम्ही मनाली ते खारदुन्ग ला पास, पुणे ते गोवा आणि पुणे ते वणी अशा तीन सायकल एक्सपिडीशनचे आयोजन केले. या एक्सपिडीशन्सना लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला,” असं निरज सांगतात. केवळ सायकल एक्सपिडीशनच नाही तर ‘आय ऍम फाईन’च्या सर्व उपक्रमांना पुणे आणि पुण्याबाहेरील लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

image


येत्या फेब्रुवारी महिन्यात ‘आय ऍम फाईन’ दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करणार आहे. ज्याला ‘हॅप्पीनेस ऍक्शन प्लॅन’ असे नाव देण्यात आले आहे. “ही कार्यशाळा निसर्गाच्या सानिध्यात भरवली जाणार आहे. यामध्ये आपल्या मनातल्या गोष्टी दुसऱ्यांकडे व्यक्त करण्याच्या सेशनबरोबरच योगा, शारिरीक व्यायाम व इतर फिजीकल ऍक्टीवीटीज करुन घेतल्या जातील. तसेच तणावमुक्त आणि आनंदी जीवनाकरिता भविष्यातील योजना ठरविण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जाईल,” असं निरज सांगतात.

दीड वर्षापूर्वी निरज यांनी ‘आय ऍम फाईन’ याच नावाने एक पुस्तकही लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी तणावरहित, आनंदी जीवनाचे सूत्र सांगितले आहे. जे कुठल्याही वयोगटातील व्यक्ती आचरणात आणू शकतो. भविष्यात पुण्यामध्ये १०-१२ जणांच्या क्षमतेचे मानसिक पुनर्वसन केंद्र सुरु करण्याची त्यांची योजना आहे.

अनेकदा सुख-दुःखाचे मूळ असते ते शब्दांमध्ये. शब्दांच्या खेळामधूनच सुख-दुःख जन्म घेते. या खेळामध्ये चांगले शब्द वापरुन सुसंवाद घडला तर मन सुखावते आणि खेळ बिनसला तर विसंवाद दुःखाला कारणीभूत ठरतो. मात्र कुठल्याच प्रकारच्या शब्दांचा वापर न करणे, सर्व गोष्टी, सगळ्या भावना मनात साठवून ठेवणे हे त्याहून जास्त घातक असते. शब्द मनात साठून राहिले तर त्यांचे विष होते आणि ते हळूहळू आपल्याला संपवते. म्हणूनच व्यक्त होणे आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पहाणे आनंदी जीवनासाठी खूप गरजेचे आहे. या दोन गोष्टींचा अवलंब केल्यास स्ट्रेस फॅक्टरवर मात करुन प्रत्येकजण मनापासून म्हणू शकेल ‘आय ऍम फाईन’.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags