अभेद्य क्षेत्राचा ठाव घेणारी एक क्षलाका लिसा स्राव, मद्य व्यवसायाचे नियम नव्याने लिहित आहेत…

अभेद्य क्षेत्राचा ठाव घेणारी एक क्षलाका लिसा स्राव, मद्य व्यवसायाचे नियम नव्याने लिहित आहेत…

Sunday December 06, 2015,

7 min Read

लिसा स्राव म्हणतात, "महिला उद्योजिकांनो, पारंपारिक जोखडामध्ये स्वतःला अडकवून घेऊ नका. नवनवीन वाट धुंडाळा ."

'अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये महिलांना स्थान नाही' या समजाकडे दुर्लक्ष केलेल्या, भारतीय अल्कोहोल इंडस्ट्रीने फारसं कौतुक केलं नाही, तरीही या इंडस्ट्रीत आपले पाय घट्ट रोवणाऱ्या लिसा यांना आपण आता भेटणार आहोत.

आज 'आय ब्रान्ड बेवरेजेस लिमिटेड'च्या अध्यक्षा आणि कार्यकारी संचालिका म्हणून त्यांनी मद्य व्यवसायाचे नियम नव्याने लिहिलेत. ऑगस्ट २०१० मध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. ब्लेंड, डिझाईन, लुक, आणि चव याबाबतीत आंतरराष्ट्रीय दर्जा पण सामान्य ग्राहकांनाही परवडणाऱ्या किंमतीत उत्पादन बनवण्याचं त्याचं ध्येय होत. त्या म्हणतात, "यामुळेच आम्ही वेगळे आणि सरस ठरलो."


image


व्यवसायाच्या सुरुवातीला नवीन वातावरणात सिद्ध करायला फार थोड्यांनी संधी दिली.

"सहा महिन्यात नवखे आपला गाशा गुंडाळत असताना, आमच्या प्रगतीचा आलेख मात्र उंचावला!"

लिसा भारतात आल्यावर त्यांना मद्याचा दर्जा आणि किंमत यांच्यात तफावत असल्याच दिसलं. भारतात प्रिमियम लिकर सेगमेंटकडेही फारस लक्ष नसल्याचं आढळलं. यामुळेच त्यांनी किंमत आणि उत्पादनाचा दर्जा यांची योग्य सांगड घालून भारतात लिकर क्षेत्रात उतरायचं ठरवलं.

पंजाबी कुटुंबातल्या लिसांचा जन्म आणि बालपण लंडनमधलं. तिथेच त्या वाढल्या. त्या नेहमी भारतात येत असत. त्यामुळे भारताशी त्यांची नाळ जोडून राहिली.

२००३ मध्ये लग्न झाल्यावर आपल्या पतीसोबत त्या कायमच्या भारतात स्थायिक झाल्या. इसाबेला आणि मार्क्युस या आपल्या बछड्यांच्या संगोपनासाठी त्यांनी काही काळ कामातून उसंत घेतली. बालसंगोपनातून काही वेळ हाती आल्यावर त्यांनी स्वतःच काहीतरी सुरु करायचं ठरवलं.

त्या सांगतात, "मला लहान असताना शार्कची आवड असल्यानं बायोलॉजीस्ट/जीवशास्त्रज्ञ व्हावसं वाटायचं. पण जीवशास्त्राकडे फारसा ओढा नसल्यामुळे मी वेगळा मार्ग निवडला आणि मिडिया इंडस्ट्रीकडे वळली. इंग्लंडमधल्या आघाडीच्या मिडिया कंपन्या वायकाॅम, विवेन्दी युनिव्हर्सल आणि न्यूज़ कॉर्पोरेशन सोबत मी काम केलं." लिसा बर्मिंगहममधल्या अस्टन विद्यापीठाच्या व्यवस्थापन आणि प्रशासकीय विषयात बी. एस. सी. (ऑनर्स) आहेत. आंतरराष्ट्रीय विपणन आणि ग्राहकांचा प्रतिसाद यात त्यांचं स्पेशलायझेशन आहे.

जलपान उत्पादन निर्मितीशी (beverage manufacturing) त्यांचा खूप जुना आणि जवळचा संबंध आहे. वडिलांमुळे लिसा या क्षेत्रात आल्या असं म्हटल्यास त्यात गैर नाही. पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी यु. के. मध्ये 'डबल डच' हा बिअर ब्रान्ड आणला. त्या म्हणतात, "मी भारतात आल्यावर मला जाणवलं की, इथे आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादनं फारशी उपलब्ध नाहितच. शिवाय त्यात फार काही विविधताही नाही. याचवेळी मला भारतातल्या अब्जावधींची उलाढाल असलेला मद्य उद्योग आणि दुर्लक्षित असलेला प्रिमियम सेगमेंट खुणावू लागला. आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादन आणि किफायतशीर किंमत यांची सांगड घालून, मी 'आय ब्रांडस् बेवेरेजेस' बाजारात आणलं.

दोन वर्ष अथक परिश्रम आणि विविध चाचण्यांनंतर आम्ही ऑगस्ट २०१०मध्ये भारतात ग्रांटन व्हिस्की, हे आमचं फ्लागशिप प्रोडक्ट आणलं. आज, 'आय ब्रांडस बेवेरेजेस' ही अनेक पुरस्कार मिळवणारी भारतातली वेगाने वाढणारी कंपनी आहे. प्रिमियम व्हिस्की ब्रांड , थ्री रॉयल्स , डिलक्स व्हिस्की ब्रान्ड , ग्रांटन ही आमची हुकमी उत्पादन आहेत. यातल्या ग्रांटनला नुकताच IND SPIRIT २०१४ अवार्ड्समध्ये पॅकेजिंगसाठी पुरस्कार मिळाला. जमैकन फ्लेवर्ड डार्क रम (Jaimaikan flavoured dark Rum), रम ९९ (Rum ९९), खूप दुर्मिळ अशी फ्रेंच ब्रांडी (french brandi), ग्रांटन एक्स ओ ब्रांडी (Granton XO Brandy) ही आमची आणखी काही उत्पादन आहेत.


image


"मला वाटतं, या व्यवसायासाठीच माझा जन्म झालाय. पूर्णपणे पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या, क्षणाक्षणाला संघर्ष असणाऱ्या या स्पिरीट इंडस्ट्रीत मी एकमेव स्त्री म्हणून दिलेलं आव्हान मला स्फूर्ती देतं. मी कधी या इंडस्ट्रीत येईन, इथे जम बसवेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आज मी इथे माझं बस्तान बसवलं आहे."

लिसा 'आय ब्रांडस बेवेरेजेस' च्या सगळ्या कामांमध्ये सहभागी असतात. व्यवसायातले डावपेच, विकास, वाढ, निर्मिती, विक्री, जाहिरात, प्रॉडक्ट डिझाईन किंवा पॅकेजिंग या सगळ्या कामांमध्ये त्यांची देखरेख , पकड असते. लिसा नेहमीच तत्पर असतात. त्याचं आपल्या कामावर प्रचंड प्रेम आहे म्हणूनच उत्पादनाच्या वेष्टनाचंं मूळ रेखाटनही त्या स्वतःचं करतात.

आंतरराष्ट्रीय दर्जाची चोख उत्पादन बनवण्याकरता त्यांच्याकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलेल्यांचं सल्लागार मंडळ आहे. त्या अभिमानाने सांगतात, "आमचं उत्पादन हेच आमचं युएसपी (USP) आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना उच्च प्रतीचं मद्य तितक्याच आकर्षक वेष्टनात सादर करतो."

लिसा म्हणतात, " आम्ही अजून नवखे आहोत पण वेगाने विस्तारत आहोत." चार वर्षात 'आय ब्रांडसचे' (I Brands) पंजाब, हरयाणा, चंडीगड, आसाम, अरुणाचलप्रदेश, उत्तराखंड, गोवा, पोन्डिचेरी याठिकाणी पाच हजार विक्रीकेंद्र आहेत. आम्हाला हल्लीच पहिली पराॅमिलिटरी आॅर्डर (अशासकीय सैन्य बळ संबंधित ) पण मिळालीय."

लिसांची स्वप्न फार आशादायी आहेत. त्या म्हणतात, "आमच्या उत्पादनांना लोकांची पसंती मिळतेय. आमचं फ्लॅगशीप प्रोडक्ट 'ग्रान्तोन व्हिस्की' हातोहात दुकानातून संपते. आता आम्ही दिल्ली, राजस्थान, त्रिपुरा, मेघालय, आणि उत्तर भारताकडे लक्ष केंद्रित करतोय. पुढील काही वर्षात आम्ही कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, प.बंगाल त्याबरोबरच अंदमान आणि निकोबार बेटावरही आमची उत्पादनं पोहचवणार आहोत. पुढच्या तीन वर्षात शंभर कोटींच्या उलाढालीचं आमचं उद्दिष्ट्य असून देशातल्या पहिल्या पाच लीकर कंपन्यांमध्ये आमची गणना होण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत.

मी जन्मजात उद्योजक असून माझं माझ्या कामावर प्रेम आहे.

माझ्यावर स्टीव्ह जॉब्स यांचा चांगलाच प्रभाव आहे. "आपण जगात काहीतरी बदल घडवू शकतो असा विचार करणारे वेडे लोक खरचं काही तरी करू शकतात." याच मंत्राचा जप करत आज 'आय ब्रांडस' यशाची चव चाखू लागलाय.

त्या सांगतात, "आम्ही दोघी बहिणींना पण मोठं करताना आमच्या आई बाबांनी मुलगा असल्यासारखचं वाढवलं. घरगुती काम असो किंवा एखाद्या कागदपत्राची पूर्तता, मला नेहमीच जबाबदाऱ्या दिल्या जात असतं. या जबाबदाऱ्या मी नीट पार पाडते की नाही याकडे लक्ष असायचं. यामुळे माझं व्यक्तिमत्व घडत गेलं. माझे बाबा माझ्या शक्तीचा स्त्रोत आहेत."

लिसाचे पती त्यांना नेहमी खंबीर साथ देतात. त्यांनी जेव्हा हा जगावेगळा निर्णय घेतला, तेव्हा ते त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्या सांगतात, 'आय ब्रांडस' च्या सुरुवातीच्या काळात माझ्या सुरक्षिततेकरता मिटींग्जना ते नेहमी माझ्यासोबत येत. कंपनी उभारताना येणाऱ्या अनंत अडचणींचा सामना करताना ते नेहमीच आधार आणि प्रोत्साहन देत आलेत."

लीकर इंडस्ट्री महिलेकरता मोठं आव्हान होतं .

लिसा आपला अनुभव सांगतात, 'आय ब्रांडस बेवेरेजेस' चा पाया उभारताना मोठी आव्हानं समोर होती. या कठीण मार्गावरून परत फिरण्याचा अनेकांनी सल्ला दिला. गुंतवणूकदार, सल्लागार मंडळाचे सदस्य नेमण्यापासून ते वितरकांना उत्पादन त्यांच्याकडे ठेवायला पटवून देण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण अलोट जिद्दीच्या जोरावर, मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या मर्यादित गुंतवणुकीवर कंपनी सुरु केली. व्यवसाय सुरु करायला आवश्यक असणाऱ्या भांडवलापेक्षा ही रक्कम तुटपुंजी होती."

महिला या उद्योगात यायला घाबरत असत पण त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकून मक्तेदारी भेदत स्वतःला सिद्ध केलं.

अखेर लिसांच्या कष्टांचं चीज झालं. त्या म्हणतात, "देशभरात 'आय ब्रांडस' ला अभूतपूर्व यश मिळालं." अतिशय कठीण आणि गुंतागुंतीच्या या इंडस्ट्रीत उत्तम दर्जा आणि लोकप्रियतेमुळे ते बाजारात टिकून राहिले पण अवघ्या तीन वर्षात कंपनीची उलाढाल दुप्पट झाली.

त्या पुढे म्हणतात, "कंपनीच्या ४ वर्षांच्या कार्यकाळात ४ पुरस्कार मिळाले. मानाच्या लीकर अवार्ड सेरेमनीमध्ये 'सर्वोत्कृष्ट नवोदित कंपनी', स्पिरीट २०१४ पुरस्कार, आयएनडी स्पिरीट २०१४ आकर्षक वेष्टन पुरस्कार, आणि नुकताच फ्रान्चाइझी इंडिया २०१४ मध्ये ४ थ्या क्रमांकाचा नाविन्यपूर्ण नवोदित उद्योजक पुरस्कार मिळाले. आज कंपनी या स्थानावर पोहचण्यासाठी मी आणि माझ्या टीमने घेतलेली मेहनत आणि आमची निष्ठा यांना मिळालेली ही पोचपावती आहे."

आठ राज्यातल्या किरकोळ बाजारात 'आय ब्रांडस' ची ५ हजार आउटलेटस /विक्रीकेंद्र आहेत. परामिलीटरी अवार्ड ही पण आमची मोठी कामगिरी आहे.

"पुरस्कार, घाऊक किरकोळ बाजारातला स्वीकार यामुळे आमचा नवीन ब्रांड बाजारात स्थिरावला आणि त्याची लोकप्रियता अधोरेखित झाली. आता वितरक स्वतःहून आमच्याशी संपर्क साधत आहेत. "

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या उद्योगात उडी घेताना 'महिला' म्हणून लिसा यांना अनेक अडथळे पार पडावे लागले. "मी जेव्हा बाजारात गेले तेव्हा लोक माझ्यावर हसायचे. माझा इथे टिकाव लागणार नाही असं म्हणत. कोणीच माझ्याशी गांभीर्याने बोलायचं नाही. व्यावसायिक बैठकांमध्ये वितरक माझ्या मॅनेजरशी बोलत कारण तो पुरुष होता. माझ्याशी बोलणं टाळत. आता ही परिस्थिती बदलतेय. हा उद्योग आता अधिक संघटीत होतोय. पुढील काळात या उद्योगाच्या नाड्या किरकोळ बाजाराच्या हाती येतील. ही एक अभूतपूर्व गोष्ट असेल."

महिला म्हणून जीवन कठीण की सोपं असं विचारल्यावर त्या म्हणतात, "माझा दृष्टीकोन वेगळा आहे. २१ व्या शतकातली स्त्री म्हणून माझ्याकडे अमर्यादित पर्याय आहेत. ज्यांचा वापर करून मी माझ्या आणि आजूबाजूच्या वातावरणात बदल घडवू शकते. पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात आया ठेवून मुलांचं संगोपन करणं सोपं आहे. पण माझ्याकरिता काम आणि आयुष्य यांचा ताळमेळ घालणं जास्त महत्वाचं आहे. सकाळी लवकर कामाला सुरुवात करून मी संध्याकाळचा वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत उत्तमपणे घालवते. कामांची आखणी करून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवल्यास ती यशाची गुरुकिल्ली ठरते."

महिला उद्योजिकांना त्या सल्ला देतात, "कालबाह्य परंपरा आणि झापडामध्ये स्वतःला अडकवू नका. आपली सामर्थ्य, क्षमता जाणून व्यवसायात पूर्ण लक्ष द्या. मी नेहमीच आव्हानांना सामोरी गेले आणि त्यावर मत करत नवीन काहीतरी शिकत राहिले. माझ्याकडे असामान्य इच्छाशक्ती आणि ऊर्जा आहे. आयुष्यात काहीतरी ध्यास असू द्यात. करायचं म्हणून काहीतरी करू नका. धीट बना. दूरदृष्टी, ध्येय आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही स्त्री तिला हवं ते मिळवू शकते. नेहमी मोठी स्वप्न पहा!"

"मला अल्बर्ट आईनस्टाईनचं वाक्य नेहमी आठवतं. 'जी स्त्री गर्दीच्या मागे जाते ती गर्दीतच हरवते. पण जी एकटी चालते, ती आपला मार्ग स्वतः शोधते. जिथे आधी कोणीही गेलेलं नसतं,' आणि इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी सांगते माझ्यात एकटीनं मार्ग धुंडाळण्याची धमक आहे, जी मला आयुष्यात पुढे नेतेय."

आपली मुलं आणि कुटुंबाकरता लिसांकडे एक हळवा कोपरा आहे. "आय ब्रांडस' हे माझं बाळच आहे. महिलांनी आपल्या पायावर उभं राहण्याकरिता मी नेहमीचं प्रयत्न करते. मुलींच्या शिक्षणामुळेच समाज सजग होईल."

"नवीन गोष्टी निर्माण करण्याचं कौशल्य माझ्यात आहे. त्यामुळे मी कल्पनाविश्वात रमते. मला नवीन काहीतरी करायला आवडतं. चित्र रंगवता रंगवता मी चिंतन करते. बोरिस वालेजो आणि ज्युली वेल यांचं काम मला नेहमी प्रेरणा देतं. मला नवीन गोष्टी धुंडाळायला आणि प्रवास करायलाही आवडतं. चवीढवीचं खायलाही मला तितकीच मजा येते.

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : साधना तिप्पनाकजे