संपादने
Marathi

ट्रीप प्लॅन करताय? मग तर ‘इन्स्पायरॉक’शिवाय पर्यायच नाही !

Team YS Marathi
24th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जगातल्या बहुतेक सर्व मोठ्या आणि प्रसिद्ध गोष्टींची सुरुवात काहीतरी हटके असते..इन्स्पायरॉक ही त्यातलीच एक! वॉशिंग्टनजवळच्या जगप्रसिद्ध कॅस्केड पर्वतरांगांमध्ये २०१२च्या जुलै महिन्यात ट्रेकिंग करत असताना अनुप गोयल आणि प्रकाश सिकची या दोन तरूणांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली आणि सुरुवात झाली ‘इन्स्पायरॉक’ची ! या दोघांची २५वर्षांची मैत्री ‘इन्स्पायरॉक’च्या रूपाने एका भक्कम व्यवसायात रुपांतरीत झाली...ज्याला ‘मेक माय ट्रीप’चा भरभक्कम आधार मिळाला..

सुरुवातीचे दिवस...

सुट्टीवर कुठे जायचं म्हटलं की प्लॅनिंग आलंच..आणि कुठला लांबचा परदेश दौरा असेल तर मग विचारायलाच नको. भारंभार वेबसाईट्स, पर्यटनावरची पुस्तकं, मित्रांशी-ओळखीच्यांशी चर्चा, प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग, वेळापत्रक आणि असं बरंच काही. तरीही ऐनवेळी गोंधळ उडायचा तो उडतोच. आणि हाच गोंधळ अनुप आणि प्रकाश यांच्यासाठी संधी ठरला. त्यांना वाटलं की ट्रीप प्लॅन करणं हे गोंधळाचं आणि वैतागाचं काम न रहाता धमाल मस्तीचं असावं, आणि तंत्रज्ञानाची त्यात मोठी मदत होऊ शकेल. अनुप सांगतात, “काही महिने या कल्पनेवर विचार केल्यानंतर तिला वास्तव स्वरूप द्यायचा निर्णय आम्ही घेतला आणि जन्म झाला ‘इन्स्पायरॉक’चा”.

अनुप गोयल आणि प्रकाश सिकची

अनुप गोयल आणि प्रकाश सिकची


तंत्रज्ञानाच्या विश्वात...

‘इन्स्पायरॉक’ने लोकांना ट्रीप प्लॅन करण्यासाठीचा एक धमाल पर्याय उपलब्ध करून दिला. यामुळे ट्रीप प्लॅन करताना कोणत्या ठिकाणांचा विचार करायला हवा, त्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्या याची आवश्यक ती सगळी माहिती लोकांना एका क्लिकवर उपलब्ध झाली. अनुप सांगतात यासाठी त्यांना खूप मोठा डेटा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या यंत्रणांचा अभ्यास करावा लागला.

जगभरातले ५० देश, ११ हजार ठिकाणं, तिथली हजारो आकर्षणं आणि त्याबाबत मिळालेली अवाढव्य माहिती. हा इतका सगळा पसारा ‘इन्स्पायरॉक’ने उभा केला. एखादं ठिकाण लहान मुलांसाठी योग्य आहे किंवा नाही, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी वर्षातला कोणता काळ सर्वात योग्य ठरेल, रात्रीच्या मुक्कामासाठी एखादं ठिकाण सुरक्षित आहे किंवा नाही अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं याच अवाढव्य माहितीतून लोकांना अगदी सहज उपलब्ध करून दिली गेली.

“या माहितीचा उपयोग आम्हाला लोकांना हव्या त्या प्रकारांमध्ये करण्यासाठी झाला” अनुप पुढे सांगतात, “आमच्या कम्प्युटर सायन्समध्ये कॉग्निटिव्ह मॉडेलिंग नावाचा एक प्रकार आहे. यात कम्प्युटरच्या मदतीनं लोकांच्या समस्या सोडवल्या जातात. त्याच पद्धतीचा वापर करून आम्ही अगदी काही सेकंदांमध्ये इतक्या सगळ्या पर्यायांमधून एक पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देतो.”

अनुप सांगतात ‘इन्स्पायरॉक’ला भेट देणारे सर्व ग्राहक ब-याचदा ट्रीपसाठी भरपूर सारे पर्याय तयार करून ठेवतात, जेणेकरून त्यांना त्यातला एक पर्याय निवडता यावा. पण एकदा का त्यांनी त्यांचा पर्याय निवडला, की नंतर मात्र आपला ठरलेला प्लॅन आणि आपल्या आवडत्या ठिकाणांविषयी शक्य ती सर्व माहिती मिळवणं, त्याच्याविषयी अधिकाधिक जाणून घेणं त्यांना मोठं गंमतीशीर वाटतं. बरेच जण त्यांच्या ट्रीपविषयी खूपच सिलेक्टिव असतात. त्यामुळे एकदा त्यांचं समाधान झालं नाही, तर ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रीप्स प्लॅन करतात.

“ट्रीप प्लॅन करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.” अनुप सांगतात, “काहीजण अगदी सहज त्यांच्या ट्रीप्स प्लॅन करतात. पण काहीजण मात्र खूपच सावध असतात आणि अत्यंत काळजीपूर्वक त्यांच्या ट्रीप्स ठरवतात. अशांसाठी खास त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीप्सचे पर्यायही उपलब्ध आहेत. याशिवाय ‘इन्स्पायरॉक’वर लोकांना त्यांनी ठरवलेल्या ट्रीपमध्ये नंतर बदलही करता येतो. अगदी जोपर्यंत त्यांना हवी तशी ट्रीप प्लॅन होत नाही तोपर्यंत!”

संस्थापक आणि पहिली टीम...

१९९१ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात कम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स करत असताना अनुप आणि प्रकाश एकमेकांना भेटले. दोघांना फिरण्याची, ट्रेकिंगची जबरदस्त आवड. ‘इन्स्पायरॉक’च्या पहिल्या काही महिन्यांमध्ये फक्त हे दोघंच काम करत होते. लोकं त्यांच्या सुट्ट्या, ट्रीप कशी प्लॅन करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नेहमी फिरणा-यांच्या, ट्रेकर्सच्या, ट्रॅव्हल एजंट्सच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून या गोष्टी जाणून घेण्यासाठी बराच खटाटोप केला. तेव्हा कुठे खरी सुरुवात झाली.

“आमच्या या अजब खटाटोपाला आमच्या मित्रमंडळींची मोठी मदत झाली. आमची टीम जसजशी वाढत गेली, तसतसं अवघड वाटणारं काम अधिकाधिक सोपं होत गेलं. आणि ट्रीप प्लॅन करणं अधिक धमाल मस्तीचं”, अनुप म्हणतात. ‘इन्स्पायरॉक’ एखाद्या भक्कम रॉकप्रमाणे म्हणजेच कातळाप्रमाणे उभं रहायला तीन वर्ष जावी लागली. आणि ‘टीम इन्स्पायरॉक’साठी ही तीन वर्ष खूप कष्टाची ठरली. त्यांनी ‘इन्स्पायरॉक’ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले. पहिले तीन प्रयत्न अपयशी ठरले. पण अखेर त्यांच्या कष्टाचं चीज झालं आणि चौथ्या प्रयत्नात त्यांना आणि त्यांच्या ‘इन्स्पायरॉक’ला चांगला प्रतिसाद मिळाला. अनुप अभिमानाने सांगतात की आजघडीला ‘इन्स्पायरॉक’च्या सेवेचा लाभ घेणारे हजारो लोकं जगभरातल्या १५० देशांमध्ये विखुरलेले आहेत. जगभरातल्या वेगवेगऴ्या टाईमझोनमध्ये आणि ठिकाणांनुसार ‘टीम इन्स्पायरॉक’ काम करते, सेवा पुरवते. आणि टीमचा प्रत्येक सदस्य हा जात्याच एक प्रवासप्रिय व्यक्ती आहे, ज्याला भटकायला आवडतं.

‘इन्स्पायरॉक’..एक अनोखा अनुभव !

अनुप अभिमानाने सांगतात, “एखाद्या खंडातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रीप प्लॅन करणारं आणि ग्राहकांच्या आवडीनुसार त्यात हवे ते बदल करुन देणारं ‘इन्स्पायरॉक’ हे एकमेव ट्रीप प्लॅनर आहे. तुम्हाला फक्त तुमची आवड, प्रवासाचे दिवस आणि ठिकाण ‘इन्स्पायरॉक’ वेबसाईटवरच्या फॉर्ममध्ये भरायची आणि अवघ्या काही क्षणांमध्ये तुमची बेस्ट ट्रीप प्लॅन करून तुमच्या समोर येते.” अनुप पुढे सांगतात, “याआधीही असा प्रकारचा प्रयत्न अनेकदा झाला. पण त्यापैकी एकही यशस्वी होऊ शकला नाही. कारण ते करताना उद्भवणा-या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी प्रामाणिक आणि सचोटीने प्रयत्न करणं आवश्यक असतं.” आजघडीला युरोप आणि अमेरिकेतल्या एकूण ५० देशांमधल्या ट्रीप्स ‘इन्स्पायरॉक’वर प्लॅन करता येऊ शकतात.

‘इन्स्पायरॉक’ची आर्थिक गणितं...

‘मेक माय ट्रीप’च्या मदतीने ‘इन्स्पायरॉक’ने आत्तापर्यंत तब्बल ३० लाख अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा केलाय. ‘मेक माय ट्रीप’चे संचालक आणि ग्रुप सीईओ दीप कालरा म्हणतात, “‘इन्स्पायरॉक’ तुम्हाला एका नव्या आणि अनोख्या पद्धतीने तुमची ट्रीप प्लॅन करून देते.” ते पुढे सांगतात, “अशा प्रकारच्या नवनव्या कल्पना फक्त ‘टीम इन्स्पायरॉक’मधूनच येत नाहीत. ते कायम बाहेरच्या जगातून अशा नवनव्या कल्पनांचा शोध घेत असतात. कोणतीही ट्रीप प्लॅन करायची हे वाटतं तितकं सोपं काम नाही. त्यासाठी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर माहिती असावी लागते, वेगवेगळ्या गोष्टी जुळवून आणाव्या लागतात आणि एवढं करूनही तुमच्या कामात विविधता असावी लागते. ‘इन्स्पायरॉक’ने या सर्व बाबींमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केलीये. त्यांच्या आजवरच्या यशावरून ही गोष्ट अगदी सहज स्पष्ट होते.”

भविष्यात युरोप आणि अमेरिकेबरोबरच जगभरातल्या इतर देशांमध्येही सेवा पुरवण्याचं ‘इन्स्पायरॉक’चं ध्येय आहे. अनुप सांगतात त्याप्रमाणे, ट्रीप प्लॅनिंगच्या क्षेत्रात त्यांना अव्वल व्हायचंय..अगदी इतर कोणत्याही नावाच्या वर !

लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : प्रवीण एम.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags