संपादने
Marathi

.....अन इथे भरते गरिबांची ‘रस्त्यावरची शाळा’

2nd May 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

मिरारोड येथील कनाकिय परिसरातून जर तुम्ही प्रवास करीत असाल तर तेथील रस्त्यावरील एका आडोशाला मोकळ्या आकाशाखाली वस्तीतील गरिब मुलांची भरलेली ‘रस्त्यावरची शाळा’ तुमच्या नजरेस पडेल. चिवचिवणारी, हसतमुख मुले, काहींच्या अंगावर फाटके कपडे तर काही उघडे बोडके चिमुरडे हातात कोरी पाटी घेऊन शिक्षणाचे धडे गिरविताना दिसून येतात.

image


देशात मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतू त्या योजना रस्त्यांवर राहणाऱ्या गरीबांच्या झोपडपट्ट्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचताना दिसून येत नाहीत, जरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या तर त्या घरातील मुलं शाळेची पायरी चढण्यास टाळाटाळ करतात. अखेर त्यांचे संपूर्ण आयुष्य फुटपाथवर भीक मागून किंवा छोट्या-छोट्या वस्तू विकून पोट भरविण्यातच जाते. म्हणूनच गरिबांच्या मुलांना शिकता यावे यासाठी ‘गरिबांची रस्त्यावरची शाळा’ भरविण्याच्या अभिनव उपक्रमासाठी मिरारोड परिसरातीलच नरेश जैन,यासिन हुसेन,चारमी मेहता,अकील विजयन, आसिफ हे सुशिक्षीत तरूण-तरूणी पुढे सरसावले आहेत.

image


 या शाळेत कोणतेही वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, फळ्यावर काही लिहून माथी मारण्याचा प्रयत्न नाही. परीक्षा घेणे-उत्तीर्ण करणे-पुढच्या वर्गात प्रमोट करणे असलाही प्रकार नाही; तज्ज्ञांची पुस्तके प्रमाण मानून विद्यार्थ्यांची बुद्धी घडवण्याचे काम तेथे होत नाही! येथे फक्त पैशांअभावी अज्ञानाचा अंधार पसरलेल्या गरिबांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटविण्याचे कार्य चालते. तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. आज प्रत्येकजण उच्च शिक्षण घेऊन आपल्या करियरच्या वाटा निवडून पैसे कमविण्याचे स्वप्न पाहताना आपण पाहतो. परंतू आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा खर्‍या अर्थाने व्हावा म्हणून गरिबांच्या मुला-मुलींना शिकविण्याचा विचार सहसा कोणी करीत नाही. रस्त्यावरच्या कुटूंबांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे मुलांचे शिक्षण घेणे तर अवघडच ...म्हणूनच आपण केलेल्या शिक्षणाचा उपयोग योग्य रितीने व्हावा या कल्पनेतून मिडा रोड परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंरोजगार करणारे युवक, स्वतःचा प्रपंच सांभाळणारी गृहिणी अशा चार जणांनी एकत्र येऊन त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्याचा विडा उचलला आहे.

image


 दुपारी दोन ते चार यावेळेत आठवड्यातून सहा दिवस कनाकिया परिसरातील एका आडोशाला सर्व गरीब घरातील मुला-मुलींना जमा करून त्यांना शिकविण्यासाठी हे तरूण दिवस-रात्र एक करीत आहेत. आज या ‘गरिबांची रस्त्यावरच्या शाळे’त जवळपास ३० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये रस्त्यांच्या कडेलाच फुटपाथवर आपला फाटक्या संसाराचा गाडा चालविणार्‍यांची, बांधकाम मजुरांची, करचावेचक कामगारांची मुले-मुली शिकत आहेत. त्यांना नॉर्मल आयुष्य म्हणजे काय हेच माहीत नसते. अगदी लहान लहान वयातच काय काय अत्याचार सहन करायला लागतात त्यांना! इथे वस्तीत छोट्या छोट्या मुला-मुलींना रात्री-बेरात्री रस्त्यावरच झोपावे लागते. रात्री तीन-चार वाजेपर्यंत या मुलांना झोप नसते. सकाळी ही मुलं तशीच उठतात. मिळाली तर नाश्त्याला चहा-खारी मिळते. दुपारी तशीच अंघोळ न करता आहे त्याच कपड्यांत किंवा आपली आपण तयार होऊन शाळेत येतात. घरात साधे प्यायचे पाणीही भरलेले नसते! तर मग बाकीच्या गोष्टींची काय कथा! 

image


ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत छोटी-मोठी मजुरीची कामे करून हातावर पोट भरवित आलो आहोत, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवून खर्च करण्यापेक्षा त्यांनीही छोटी-मोठी कामे करून आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा या वस्तीतील प्रत्येक पालकांकडून व्यक्त करण्यात येते. परंतू त्यांच्या मुलांनी जर शिक्षण घेतले तर आणखी चांगल्या ठिकाणी नोकरी करून पैसा कमवू शकतील, हा विचार या वस्तीत राहणार्‍या पालकांच्या गळी उतरविण्यासाठी या तरूणांनी दारोदारी भटकून शिक्षणाचा प्रसार केला, असे याच ग्रूपमधील नरेश जैन यांनी सांगितले. यात काही पालकांनी त्यांना दारातूनच हकलून देण्याचे ही प्रसंग अनेकदा घडले. परंतू आम्ही हार मानली नाही आणि आमचे प्रयत्न सुरूच ठेवले, असे यासिन हुसेन सांगतात. या शाळेत मुलांना फक्त अक्षरी धडे शिकविले जात नाहीतर त्यांचे राहणीमान लक्षात घेता आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासोबत त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षणही दिले जाते. मुलांमधील बहुआयामीपणा-कौशल्यबहुलता यांचा विकास समांतरपणे कसा साधता येईल, मुलांना ‘माणसे’ बनण्याचे आणि ‘माणसे’ म्हणून आत्मविश्वासाने जगण्याचे बळ कसे देता येईल, त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता येईल असे व तत्सम अनेक प्रयोग तेथे चालू आहेत, असे चारमी मेहता सांगतात. या विद्यार्थ्यांच्या गरीबीमध्ये वाढदिवस म्हणजे काय हेच जणू त्यांना माहित नसते. म्हणून या विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवशी मॅकडोनाल्डमध्ये नेऊन सर्वांसोबत केक कापून उत्साहात साजरा केला जातो.

image


 या मुलांना शिकविण्यासाठी त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्यही उपलब्ध असणे गरजेेचे आहे, हे लक्षात या तरूणांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून प्रत्येक मुलाला शैक्षणिक साहित्य पुरवतात. तसेच कधी कधी तर सर्व मुलांच्या न्याहरीची ही व्यवस्था हे तरूण करीत असतात. या रस्त्यावरच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्याची उत्सुकता ही आहेच, यातील काही विद्यार्थी हुशार देखील आहेत. या विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व सोयसुविधा जर मिळाल्या तर ते भविष्यात चांगले करियर घडवतील, असा विश्‍वास अकरावीत शिकणारा अकील विजयन व्यक्त करतो. त्यांच्या या शाळेत या मुलांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविल्यानंतर पुढील शिक्षणासाठी चांगल्या शाळेत दाखल करण्याचा मानस नरेश जैन, यासिन हुसेन, चारमी मेहता, अकील विजयन या तरूणांच्या ग्रूपने केला आहे. त्यासाठी गरज पडल्यास बाहेरील दानशुरांची मदत घेऊन या मुलांना सुशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा चंग बांधला असल्याचे आसिफ सांगतात. या सर्व तरूणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या अभिनव उपक्रम शिक्षणाच्या नावाने बाजार सुरू करणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे.

"आमच्या सारख्या गरिबांच्या घरात मुलांना शाळेत पाठविण्यासाठी इतरांप्रमाणे कडक इस्त्री केलेले गणवेश, नवे कोरे पुस्तक घेण्यासाठी पैसे नसतात. अशात आमच्या गरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेत घेण्यासाठी नाके मुऱडली जातात. त्यामुळे अनेक मुलं ही रस्त्यावर छोटे-मोठ्या साहित्याची विक्री करण्यासाठी भटकतात. मिरा-रोड मधील या रस्त्यावरील गरिबांच्या शाळेने आम्ही गरिबांना शिक्षणाच्या मार्गावरचा दिवा पेटवून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे फुटपाथवर राहणारे मुलं देखील धडे गिरवीत आहेत. या शाळेतून माझा मुलगा मोठा अधिकारी नाही परंतू सुशिक्षित होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागेल, अशी आशा आहे". – सुनिता पवार, पालक.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एका ड्रायव्हरचा इंजिनिअर मुलगा ‘जिज्ञासा’ मार्फत देत आहे गरीब मुलांना शिक्षणाची उत्तम संधी 

रोज पोहत जाऊन मुलांना शिकवणारे शिक्षक ज्यांनी वीस वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही

‘टिच फॉर इंडिया’तून जय मिश्रा यांची गरीबांच्या शिक्षणासाठी धडपड!

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags