'स्लम बॉय ते मिलिनेयर मॅन' सरथबाबूंची सत्यकथा

14th Oct 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

‘स्लमडॉग मिलिनेयर’ हा चित्रपट भारतात एका झोपडपट्टीत राहणा-या मुलाच्या करोडपती बनण्याच्या एका कथेवर आधारित आहे. ही कथा एका कादंबरीतून घेतली गेली आहे. ही कथा काल्पनिक होती. याच कथेला आधार बनवून तयार करण्यात आलेला हा चित्रपट जगभरातल्या अनेक लोकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटाची प्रशंसा देखील झाली. चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले. चित्रपटाला अनेक श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळाले.

image


मात्र, या चित्रपटाची प्रशंसा सर्वांनीच केली असे नाही. काही लोकांनी हा चित्रपट भारत विरोधी असल्याचे म्हटले. या चित्रपटाच्या माध्यमातून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला होता असे ही काही लोकांनी म्हटले. असे असले तरी या चित्रपटाची चर्चा जगभर झाली. कथा पाहिली आणि ऐकली गेली.

चित्रपटात पाहिलेल्या काल्पनिक कथेसारखीच परंतु काहीशी वेगळी आणि खरीखुरी अशी एक सत्य कथा देखील आहे. भारतातल्या एका झोपडपट्टीत राहणा-या एका तरूणाच्या कोट्याधीश बनण्याची ही एक सत्यकथा आहे आणि लोकांसमोर ती आजही प्रत्यक्ष उपलब्ध आहे. हीच सत्यकथा आज अनेकांना प्रेरणा देत आहे. ही सत्यकथा आहे चेन्नईतील एका झोपडपट्टीत वाढलेल्या सरथबाबूची. सरथ यांनी झोपडीत राहून अभ्यास केला आणि पुढे प्रगती करत आपल्या परिश्रमाने आणि कर्तृत्वाने सुरूवातीला बिट्स-पिलानी आणि नंतर आयआयएम- अहमदाबाद इथे प्रवेश घेतला. तिथे त्याने उच्च शिक्षण घेतले. लाखो रूपयांच्या नोकरीला ठोकर मारत आपला व्यावसाय सुरू करणार-या सरथ यांनी आपल्या आयुष्यात भरपूर अडचणींचा सामना केला. त्यांना अनेक गोष्टींपासून वंचितही राहावे लागले. परंतु त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवत आपल्या यशाच्या मार्गात या कमतरतांना कधीही आड येऊ दिले नाही.

अधिकाधिक लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून अनेक पुस्तकांमध्ये सरथ यांच्या या यशाच्या कथेचा समावेश करण्यात आला आहे. ही कथा भरपूर ऐकवलीही जाऊ लागली आणि तितकीच ती ऐकलीही जाऊ लागली. आपल्याला मिळालेल्या यशामुळे अनेक सन्मान आणि पुरस्कार प्राप्त करणा-या सरथबाबूंचा जन्म चेन्नईच्या मडिपक्कम भागातील एका झोपडपट्टीत झाला. सरथबाबूंचे कुटुंब दलित समाजातले होते आणि अत्यंत गरीबसुद्धा. कुटुंबात दोन मोठ्या बहिणी आणि दोन लहान भाऊ होते. कुटुंब चालवण्याची संपूर्ण जबाबदारी आईवर होती. आई दिवस-रात्र मेहनत करत होती आणि म्हणूनच या पाचही मुलांचे पोट भरत होते. सरथ यांची आई दहावी पर्यंत शिकली होती. या पात्रतेमुळे एका शाळेत मिड-डे मीलच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे जेवण बनवण्याची नोकरी त्यांना मिळाली. ही नोकरी त्यांना मासिक ३० रूपये देत होती. परंतु हे ३० रूपये पाच मुलांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे नव्हते. सर्व मुलांनी भरपूर शिकावे अशी त्यांची इच्छा होती. मुले जर चांगली शिकली तर त्यांना नोक-या मिळतील आणि त्यांना मग अडचणींचा सामना करावा लागणार नाही असे त्यांना वाटत होते.

image


मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण कऱण्याच्या उद्देशाने त्यांच्या आईने शाळेतली नोकरी करण्याव्यतिरिक्त सकाळच्या वेळेला इडली विकणे सुद्धा सुरू केले. इतकेच नाही, तर संध्याकाळच्या वेळेला भारत सरकारच्या ‘प्रौढ शिक्षण अभियान’ कार्यक्रमाअंतर्गत लोकांना शिकवणे देखील सुरू केले. अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या वेळांना, तीन वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळी तीन प्रकारची कामे करत सरथ यांच्या आई आपल्या मुलांच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे कमाऊ लागल्या. आई करत असलेल्या अथक परिश्रमाचा मोठा प्रभाव सरथ यांच्यावर पडला. गरीबी दूर करण्यासाठी नोक-या मिळाव्यात म्हणून आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे असे आईला वाटत होते याची त्यांना कल्पना होती.

सरथ यांनी आपल्या आईला कधीही निराश केले नाही. सरथची शाळेतली कामगिरी इतर मुलांपेक्षा चांगली असायची. परिक्षेमध्ये ते वर्गात नेहमीच पहिले यायचे.

शिकता शिकता त्यांनी चार पैसे कमावून आपल्या आईला मदत सुद्धा केली. ते सुद्धा रोज सकाळी आपल्या आईसोबत इडली विकण्यासाठी जात असत. झोपडपट्टीत राहणा-या लोकांसाठी सकाळच्या नाष्ट्यामध्ये इडली विकत घेणे परवडणारे नव्हते. या कारणामुळे सरथ आणि त्यांची आई श्रीमंतांच्या वसाहतींमध्ये जाऊन इडली विकत असत.

सरथ यांनी दहावीपर्यंत प्रत्येक परिक्षेत चांगले यश मिळवले. परंतु दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली तेव्हा अकरावी आणि बारावीच्या प्रवेश फीच्या रकमांनी सरथला संभ्रमात टाकले. दहावी पर्यंत त्यांना विशेष फी द्यावी लागली नव्हती. परंतु आता फी जास्त भरावी लागणार होती.

image


महाविद्यालयाची फी भरण्यासाठी सरथीनी एक शक्कल शोधून काढली. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये त्यांनी बुक-बाईंडिंगचे काम करणे सुरू केले. सरथ ते काम इतके चांगले होते की त्यांना भरपूर ऑर्डर्स मिळू लागल्या. मागणीप्रमाणे काम पूर्ण करण्यासाठी सरथ यांनी दुस-या मुलांना आपल्यासोबत कामावर ठेवले.

असे करत करत त्यांनी आपली अकरावी आणि बारावी पूर्ण केली.

सरथ यांना बारावी नंतरच्या शिक्षणाबाबत काहीही माहिती नव्हती. याचे कारण म्हणजे एकतर त्यांच्या कुटुंबात कुणीच जास्त शिकलेले नव्हते आणि दुसरे म्हणजे झोपडपट्टीमध्ये त्यांना शिक्षणाबाबत मार्गदर्शन करेल असेही कुणी नव्हते.त्यांच्या मित्राने त्यांना पिलानीच्या बिडला औद्योगिक व विज्ञान संस्था म्हणजेच बिट्स-पिलानी बाबत माहिती दिली. जर सरथना बिट्स-पिलानीमध्ये प्रवेश मिळाला तर त्यांना आपली गरीबी कायम स्वरूपी दूर करू शकेल अशी मोठी नोकरी मिळेल अशी माहितीही या मित्राने त्यांना दिली. सरथच्या डोक्यात ही गोष्ट पक्की बसली. यानंतर मग त्यांनी बिट्स-पिलानीमध्ये प्रवेश मिळावा या उद्देशाने प्रवेश परिक्षेचा अभ्यास सुद्धा सुरू करून टाकला.

सरथना बिट्स-पिलानीमध्ये प्रवेश मिळाला. हे त्यांनी केलेल्या परिश्रमाचे आणि घेतलेल्या ध्यासाचे फळ होते.

झोपडपट्टीत राहणारा एक गरीब मुलगा पहिल्यांदाच आपल्या शहराबाहेर, ते ही देशातल्या सर्वात प्रसिद्द असलेल्या एका संस्थेत शिकण्यासाठी जात होता.

परंतु, इथेही भराव्या लागणाऱ्या फी मुळे सरथची झोप उडवून टाकली. त्यांना त्यांच्या पहिल्याच सेमिस्टरसाठी ४२००० रूपयांची गरज होती. ही रक्कम सपूर्ण कुटुंबासाठी खूपच मोठी रक्कम होती. सरथ यांना आर्थिक मदत करू शकेल असे कुणीच नव्हते. सरथच्या लग्न झालेल्या बहिणीने आपले दागिने गहाण ठेऊन पैशांची व्यवस्था केली. अशा प्रकारे पहिल्या सेमिस्टरची फी जमा झाली.

दुसरी सेमिस्टर येईपर्यंत आईने सरथना सरकारी स्कॉलरशीपबाबत सांगितले. सरथनी ताबडतोब अर्ज केला आणि त्यांना स्कॉलरशीप मिळाली सुद्धा.

स्कॉलरशीपच्या पहिल्या हफ्त्याच्या रकमेने सरथनी आपल्या बहिणीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवले. परंतु स्कॉलरशीपच्या पैशाने सरथ केवळ ट्युशन फीच भरू शकत होते. खाणे-पिणे, कपडे, दररोजच्या वापरातल्या वस्तू अशा इतर आवश्यक गरजा भागवण्यासाठी त्यांना कर्ज घ्यावेच लागले.

बिट्स-पिलानीमध्ये सुरूवातीचे दिवस सोपे नव्हते. इथे आलेले बहुतेक विद्यार्थी हे एकतर श्रीमंत घरातील होते किंवा मग मध्यम वर्गीय कुटुंबातील तरी होते. झोपडपट्टीतून आलेले सरथ हे कदाचित एकमेव विद्यार्थी होते. इतर मित्रांचे राहणीमान खूपच वेगळे होते. त्यांची जीवनशैली सुद्धा वेगळी होती. ते लोक पैसे सुद्धा मोकळेपणाने खर्च करत होते. इंग्रजी भाषा सुद्धा अगदी सहजपणे आणि चांगली बोलत होते.

सरथना ना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत होते ना ते आपल्या इतर मित्रांप्रमाणे पैसे खर्च करण्याच्या स्थितीत होते.

परंतु सरथनी लोकांना पाहून, त्यांचे निरिक्षण करून खूप काही शिकून घेतले. बिट्स-पिलानीमधील प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक पाठ होता. ते इथे खूप काही शिकले. पुस्तकातील गोष्टींव्यतिरिक्त सरथनी वेगवेगळ्या लोकांचे निरिक्षण करून त्याचे विचार, त्यांच्या कामकाजाच्या पद्धती जाणून घेतल्या.

बिट्स-पिलानीतून पदवी मिळवल्यानंतर सरथना आपल्याच चेन्नई शहरात पोलारिस सॉफ्टवेअर लॅब्समध्ये नोकरी मिळाली.

पुढे, बिट्स-पिलानीत अभ्यास करत असताना त्यांच्या काही मित्रांनी त्यांना आयआयएममध्ये प्रवेश घेऊन मॅनेजमेंटची पदवी घेण्यास आणि मॅनेजमेंटची कला आत्मसात करण्याचा सल्ला दिला. त्यांचे अनेक मित्र त्यांच्या मॅनेजमेंट कौशल्याने प्रभावित झाले होते.

नोकरी करता करताच सरथनी आयआयएममध्ये प्रवेश घेता यावा म्हणून कॅट परिक्षेची तयारी सुरू केली.

दोन वेळा नापास झाल्यानंतर मग तिस-या प्रयत्नात सरथनी प्रवेशासाठी आवश्यक रँक मिळवली. आयएमआय ही एक अशी शिक्षण संस्था आहे, जिथे मॅनेजमेंटचे सर्वोत्कृष्ट शिक्षण दिले जाते.

सरथना आयएमआय अहमदाबाद येथे प्रवेश मिळाला.

आयएमआय, अहमदाबादमध्ये सरथनी मॅनेजमेंटचे बारकावे आणि मोठी मोठी सूत्रं शिकून घेतली. सरथना खान-पानाच्या विक्रीचा अनुभव असल्याने त्यांना भोजनगृह समितीत(मेस कमिटी) जागा मिळाली. त्यांच्या योग्यतेमुळे ते समितीचे सचिव सुद्धा बनले.

आयएमआय, अहमदाबादमध्ये शिकत असतानाच त्यांना नोक-यांचे अनेक प्रस्ताव मिळाले. लाखोंमध्ये पगार सुद्धा होते. परंतु, त्यावेळी सरथनी नोकरी न करण्याचा मोठा निर्णय घेतला.

सरथना धीरूभाई अंबानी आणि नारायण मुर्तींनी खूपच प्रभावित केले. त्यांना आपल्या आयुष्यात काही तरी भव्य असे करायचे होते. आपल्या आईकडून प्रेरणा घेणा-या सरथनी भोजन पुरवठा करणारा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. लाखो रूपयांची नोकरी सोडून आपला स्वत:चा उद्योग सुरू करण्यामागे अनेक कारणे आणि हेतू होते.

ज्यांच्यासोबत सरथ लहानाचे मोठे झाले अशा लोकांची मदत करणे हा सुद्धा सरथचा एक हेतू होता. झोपडपट्टीत राहणा-या लोकांच्या समस्या काय आणि कशा स्वरूपाच्या असतात हे सरथना चांगलेच माहित होते. या समस्या दूर करण्याचा त्यांना प्रयत्न करायचा होता.

जर आपण उद्योग सुरू केला तर त्यांना इतरांना नोक-या देण्याची संधी देखील मिळेल असे ही सरथ यांना वाटत होते. जर त्यांनी नोकरी केली तर त्यांना असे काम करणे शक्यच नव्हते.

लाखोंची नोकरी सोडून उद्योग करण्याचा निर्णय एक धाडसी पाऊल होते. यात काही धोके सुद्धा होते. परंतु, आपली स्वप्ने आणि हेतू साध्य करण्यासाठी आपण व्यवसायच करावा असा दृढ निश्चय त्यांनी केला होता.

सरथनी आपल्या फूड किंग कॅटरींग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची २००६ मध्ये नोंदणी केली. एक लाख रूपयांनी या कंपनीची सुरूवात झाली. सुरूवातीला या कंपनीने इतर कंपन्यांसाठी चहा, कॉफी आणि अल्पोपहारचा पुरवठा करणे सुरू केले. हळू हळू हा व्यवसाय मग वाढत गेला. सरथना नवनव्या आणि मोठमोठ्या कंपन्याकंडून ऑर्डर्स मिळत गेल्या. सरथनी ज्या बिट्स-पिलानी आणि आयआयएम, अहमदाबाद या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतले त्या संस्थाकडून सुद्धा त्यांना अल्पोपहार पुरवठा करण्याचे काम मिळाले.

यानंतर सरथनी भारतात अनेक ठिकाणी ‘फूड किंग कॅटरींग’ नावाने आपले रेस्टॉरंट्स उघडले. आपल्या या रेस्टॉरंट्समध्ये वाजवी किंमतीवर चवदार पक्वान्ने पुरवून सरथनी चांगले नाव कमावले. एक लाख रूपयांपासून सुरू झालेल्या या भोजन आणि अल्पोपहाराच्या व्यवसायात प्रगती होत तो कोटींचा झाला होता.

यशस्वी व्यावसायीक वनल्यानंतर सरथनी समाजसेवा सुरू केली. त्यांनी २०१० मध्ये हंगर फ्री इंडिया फाऊंडेशनची स्थापना केली. पुढील वीस वर्षांच्या कालावधीत भारताला ‘कुपोषण मुक्त’ करणे हा या संस्थेचा उद्देश आहे. सरथ गरीब आणि गरजूंना जी शक्य होईल ती मदत देखील करतात.

अधिकाधिक लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने सरथनी राजकारणात उडी घेतली. आत्तापर्यंत त्यांनी तीन निवडणूका लढवल्या आहेत, पण ते जिंकू शकले नाहीत. परंतु ते निराश नाहीत. आता ते तामिळनाडूत २०१६ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार करत आहेत. त्यांचा उद्योग आणि त्यांची समाजसेवा अखंडपणे सुरू आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरथ आजही आपल्या आईकडूनच प्रेरणा घेतात. आपल्या बालपणापासूनच ते आपल्या आईकडून प्रेरणा, उत्साह आणि विश्वास हे गुण घेत आले आहेत आणि आजही घेत आहेत. जेव्हा केव्हा सरथ अस्वस्थ होतात किंवा त्यांना समस्या सतावतात तेव्हा ते आपल्या आईचेच स्मरण करतात. आपल्या आईने केलेला संघर्ष आणि त्याग आठवून ते आपली निराशा आणि हताशपणा घालवून टाकतात.

आपल्या मुलांना पोटभर जेवता यावे म्हणून आपली आई पाणी पिऊन झोपत होती ते दिवस आजही सरथना आठवतात. आईने आपल्या मुलांसाठी अशा कितीतरी रात्री फक्त पाणी पिऊन काढल्या आहेत. लहाणपणीच सरथच्या हे लक्षात आले होते की त्यांची आई पाणी भरपूर पिते. सूरूवातीला सरथना वाटायचे की त्यांच्या आईला पाणी पिणे खूप आवडते म्हणून ती खूप पाणी पिते. परंतु पुढे सरथना कळाले की आपल्या मुलांना पोटभर जेवण मिळावे आणि त्यांच्या इतर आवश्यक गरजा भागवल्या जाव्यात म्हणून तिने पाणी पिऊन दिवस काढले. सरथ नेहमी आपल्या आईकडून प्रेरणा घेतात याचे हेच कारण आहे.

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close