संपादने
Marathi

प्रतिष्ठेचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार नंदन निलेकणी यांना जाहीर

Team YS Marathi
11th Mar 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा आधार कार्ड प्रणालीचे प्रणेते नंदन निलेकणी यांना जाहीर झाला आहे. रविवार दिनांक, १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते निलेकणी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ५ लाख रुपये, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दरवर्षी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तीस 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानपत्राने' गौरविण्यात येते. सुयोग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ही समिती विविध क्षेत्रांत होणाऱ्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन पुरस्कारासाठी मानकरी व्यक्तीची निवड करते. पुरस्काराचे यंदाचे २२ वे वर्ष असून याआधी रतन टाटा, नारायण मूर्ती व सुधा मूर्ती, जयंत नारळीकर, महाश्वेतादेवी, मधु दंडवते, सॅम पित्रोदा आदि विविध क्षेत्रांतील मान्यवर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.


image


नंदन निलेकणी यांचा परिचय :

नंदन निलेकणी यांचा जन्म २ जून १९५५ रोजी कर्नाटक राज्यातील बंगळूरू येथे झाला. बालवयातच आपल्या वडिलांच्या फॅबियन समाजवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. निलेकणी यांनी विशप कॉटन बॉइज आणि सेंट जोसेफ हायस्कूल य़ा शाळांमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि आयआयटी मुंबई मधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली. मुंबईतील पटनी कॉम्प्युटर सिस्टिम या संस्थेतून आपल्या यशस्वी कारकिर्दीची सुरूवात करताना श्री नारायण मूर्ती यांनीच त्यांची मुलाखत घेतली होती. नंतर १९८१ साली मूर्ती यांनी निलेकणी व पटनी संस्थेतील इतर पाच सहकाऱ्यांसोबत इन्फोसिसची स्थापना केली.

आपल्या 'इमॅजिनिंग इंडीया' या पुस्तकात निलेकणी यांनी अपघाताने बनलेला उद्योजक असा स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मित्र व परिवाराच्या मते इन्फोसिसचा घटक बनणे ही वेडेपणाची गोष्ट होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर इन्फोसिस संस्था लौकिक प्राप्त करेल, अशी कल्पना त्यांच्या आप्तेष्टांनी कधीही केली नव्हती. पण आपल्या जिद्दीने व विश्वासाने इतरांचे हे दावे निलेकणी यांनी खोटे ठरविले. इन्फोसिसमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली . २००२ साली ते सिईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) बनले. त्यांच्या पाच वर्षांच्या सीईओपदाच्या कार्यकाळात संस्थेच्या नफ्यात सहापटीने वाढ झाली.

२००९ साली युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. युआयडीएआयचे प्रमुख म्हणून त्यांच्या देखरेखीखाली आधार कार्ड प्रणाली भारतात अस्तित्वात आली. देशात आधारकार्ड आज ओळख प्रमाणपत्र म्हणून सर्वत्र वापरले जाते. १३२ कोटी लोकसंख्या असेलल्या आणि भाषा व प्रांतिक वैविधता असणाऱ्या देशात जात, धर्म, भाषा, स्थळ यांच्या पलिकडे जाऊन आधार ही सर्व देशवासियांसाठी त्यांच्या अस्तित्वाची एक ओळख ठरली आहे. आतापर्यंत १०० कोटी जनतेला आधारकार्डांमुळे ओळख प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. दारिद्रयरेषेखालील तसेच दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना अर्थ०यवस्थेत औपचारिकरीत्या समाविष्ट करून घेण्यात आधार कार्डांचे महत्त्वाचे योगदान भविष्यात असेल. याचे श्रेय प्रामुख्याने नंदन निलकेणी यांना जाते. भारतातील विविधेतेतील एकात्मतेचा संदेश आधारकार्डाच्या रूपात प्रत्यक्षात आला आहे.

निलेकणी यांच्या प्रदीर्घ अनुभवाची व व्यासंगाची दखल नामांकीत संस्थांकडून घेतली गेली नसती तरच नवल... अनेक मोठ्या संस्थांमध्ये महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. इंडियन काऊन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स संस्थेच्या ग०हर्नर मंडळाचे सदस्य तसेच नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकोनॉमिक रिसर्चचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. जागतिक स्तरावरही त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. ग्लोबल वर्ल्ड इकॉनॉमिक फाउंडेशन संस्थेच्या सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत तसेच एकस्टेप या साक्षरता व कौशल्य विकासासाठी काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

त्यांनी भूषवलेल्या पदांप्रमाणेच त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे. २०११ साली टोरोंटो विद्यापीठातर्फे रोटमन स्कूल ऑफ मॅनेजमेंटची मानद कायदेतज्ज्ञ ही पदवी, आर्थिक, २००५ साली राजकीय क्षेत्रातील अभिनव कार्याबद्दल जोसेफ शुंपिटर पारितोषिक, येल विद्यापीठाचा लिजण्ड इन लिडरशीप पुरस्कार ही यातील काही ठळक उदाहरणे... लिजण्ड इन लिडरशीप हा किताब प्राप्त करणारे ते पहिले भारतीय आहेत. भारत सरकारनेही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत २००६ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

देशाच्या आर्थिक विकासासाठी नंदन निलकेणी यांनी दिलेले योगदान अनमोल आहे. त्यांच्या कर्तृत्वाने देशाच्या आर्थिक उन्नतीत महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई करत असून २०१६ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार नंदन निलकेणी यांना प्रदान करताना प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना आनंद होत आहे.         

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags