मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाने बनवले शेती प्रक्रिया उद्योगातून डाळींबाचे 'एनर्जी ड्रिंक'

मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाने बनवले शेती प्रक्रिया उद्योगातून डाळींबाचे 'एनर्जी ड्रिंक'

Sunday May 07, 2017,

5 min Read

राज्यातील शेतीला आणि शेतक-यांना प्रक्रिया उद्योगाने जर हातभार लावला तर ते स्वयंपूर्ण होवू शकतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिला आहे एका इंजिनिअर तरूणाने! सोलापूर जिल्ह्यातील आंबेचिंचोली येथील श्रीपाद पाटील या मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाने डाळिंबापासून ज्यूस, तयार पेय (ड्रिंक) बनवण्याचा प्रक्रिया उद्योग सुरू केला. आज "पोमेगा' या ब्रॅंड उत्पादनांचे मार्केटिंग सुरू आहे. डाळिंबात प्रक्रिया उद्योग आपल्या राज्यात फारसे पाहायला मिळत नसताना या तरुणाने धाडसाने शेतकऱ्यांना नव्या संधीचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या या आगळ्या प्रवासाचा वेध आम्ही घेतला. युवर स्टोरी मराठीच्या वाचकांना या पूर्वी आम्ही अशाच अनेक यशकथा सांगितल्या आहेत. त्यातील अनोख्या प्रकारची ही आणखी एक कहाणी.

भिमा साखर कारखान्यातून निवृत्त लिपीक असलेल्या सिध्देश्वर पाटील यांची वीस एकर शेती आहे, निवृत्तीनंतर त्यांनी शेतीमध्ये पूर्णवेळ लक्ष घातले आहे. त्यांचे धाकले पुत्र श्रीपाद यांनी अभियांत्रिकी अभियंता म्हणजे मेकॅनिकल इंजिनीअरची पदवी मिळवली आणि लोणावळ्यात त्यांना चांगल्या नामवंत कंपनीत नोकरी देखील मिऴाली होती. पण श्रीपाद यांचे मन या नोकरीत रमेना, मग त्यांनी ती सोडली. आणि घरी परत आल्यावर त्यांनी पुन्हा नोकरी करावी म्हणून घरच्यांनी त्यांची समजूत काढली. घरच्यांच्या आग्रहामुळे गावानजीकच टाकळी सिंकदर येथील भीमा कारखान्यात "असिस्टंट ट्रेनी इंजिनिअर' श्रीपाद यांनी पुन्हा नोकरी सुरू केली. मात्र श्रीपाद यांच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. त्यांच्या मनात काहीतरी वेगळा व्यवसायाचे खूळ काही कमी होत नव्हते. घरची पार्श्‍वभूमी शेतीची होती. त्यात काही करता येईल का याचाही त्यानी विचार करून पाहिला.


image


घरच्यांचे पाठबळ आणि शास्त्रीय मांडणी

त्याचवेळी त्यांच्या भोवताली शेतक-यांच्या डाळींबाच्या शेतीला हवा तसा भाव मिळत नाही हे त्यांना दिसत होते, यावर काहीतरी काम करता येईल असा विचार करून सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने येथेच डाळिंबावरील प्रक्रिया उद्योगाची कल्पना त्यांना सुचली आणि ते कामाला लागले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्याने कोणतीही गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या पडताळून आणि अभ्यासाने करूनच पूर्ण शक्तीनिशी उतरायचे, हा श्रीपाद यांचा स्वभाव असल्याने त्यांनी डाळिंबाचे सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय क्षेत्र, उत्पादन, त्यातील प्रक्रिया उद्योग, या उत्पादनांना असणारी मागणी, या बाबींचे त्याने सर्वेक्षण केले. त्यासाठी तालुका कृषी कार्यालयापासून जिल्हा कार्यालयापर्यंत हेलपाटे मारले. काही अनुभवी व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या.

सन २०१३ मध्ये पाच-सात महिने सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला. त्यावेळी त्यांना समजले की, एकट्या सोलापूर जिल्ह्यात ८० हजार हेक्‍टरहून अधिक डाळिंब क्षेत्र असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी डाळिंबांची उपलब्धता सहजगत्या होईल. ही खात्री पटली आणि त्यानी याबाबतचा विचार घरात बोलून दाखवला, धडपड पाहून घरच्यांनी अखेर पाठिंबा दिला. श्रीपाद यांचा मोठा भाऊ मनोज एमएस्सी ऍग्री आहे. या व्यवसायाचे महत्त्व त्यांच्याही लक्षात आले. वहिनी प्रिया या भूमिअभिलेख अधिकारी आहेत. त्यांनीही श्रीपादच्या प्रयत्नाला पाठिंबा दिला, त्यामुळे त्याचे बळ आणखीच वाढले आणि त्यांनी या व्यवसायात स्वतःला झोकून दिले. याबद्दल सांगताना ते म्हणाले की, “घरच्यांना देखील माझ्या कल्पना पटल्या आणि त्यांनी पाठिंबा दिला त्यामुळे मग मी मागे वळून पाहिले नाही”.


image


डाळिंब संशोधन केंद्र, केव्हीकेचे मार्गदर्शन

सुरवातीला सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रातून डाळिंब प्रक्रियेबाबत माहिती संकलित केली. तिथल्या शास्त्रांज्ञाच्या गाठीभेटी वाढवल्या. डाळिंबापासून कोणते उत्पादन होऊ शकते, त्याच्या मशिनरी कोठे मिळतात, त्याचा एकूण खर्च या बाबींचा अभ्यास केला. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातही धडक मारत तेथील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेतले.

डाळिंबामध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्याचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. बियांचे तेलही हृदयविकारावरील रुग्णांसाठी उपयुक्त आहे हे त्याने जाणले. त्यानुसार डाळिंबाचा ज्यूस व त्यापासून पुढे "रेडी टू सर्व्ह' ड्रिंक ही उत्पादने बनवण्यास सुरवात केली. सोलापूर, सांगोला, पंढरपूर या बाजारांतून डाळिंबाची खरेदी करायची, त्यानंतर प्रतवारी आणि मजुरांकरवी डाळिंबाचे दाणे सोलून घ्यायचे. हे दाणे पल्परमध्ये टाकून त्याचा ज्यूस तयार करायचा. त्यानंतर जॅकेटेड केटलमध्ये तो ८० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम केला जातो. थंड झाल्यानंतर २५० मिलि पॅकिंगच्या बाटलीमध्ये ज्यूस पॅकबंद केला जातो. याच ज्यूसपासून शीतपेय तयार करण्यात येते. प्रति दिन दोन टन डाळिंबावर प्रक्रिया करण्याची क्षमता या मशिनरीची आहे. दोन टन डाळिंबापासून सुमारे सातशे लिटर ज्यूस निघू शकतो. ज्यूसमध्ये साखर, प्रिझरव्हेटर वगैरे घालून त्याचे ड्रिंक म्हणजे तयार पेय केले जाते. दोनशे किलो डाळिंब दाण्यांपासून १८ ते २० लिटर तेल मिळते.


image


बाजारपेठेचा शोध

डाळिंबांची उपलब्धता आणि प्रक्रिया उत्पादनांच्या मागणीनुसार सध्या निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. सध्या सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर आदी स्थानिक ठिकाणी विक्रेत्यांना उत्पादने दिली जात आहेत. त्यांच्याकडून मागणी पुन्हा येत आहे. मुंबईतही माल पाठवला आहे. याशिवाय प्रदर्शनाद्वाराही विक्री होत आहे. सोलापुरात सुरू असलेल्या सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनात तयार पेयांच्या सुमारे दोनशे बॉटलची विक्री झाली आहे. त्यासाठी त्यांचे दरअसे आहेत. डाळिंबाचा ज्यूस- १२० रुपये प्रति लिटर, तयार पेय- २० रुपये प्रति २५० मिलि बॉटल

ब्रांडचे नाव- पोमेगा, फूड सेप्टी अँड स्टॅंडर्ड ऍथोरिटी ऑफ इंडिया संस्थेचे प्रमाणपत्र

डाळिंबाच्या सालींपासून ते डाळिंबाच्या बियांपर्यंत सगळ्याचाच उपयोग प्रक्रिया उत्पादनात होऊ शकतो. डाळिंबाच्या सालीपासून दंतमंजनासाठी पावडर होऊ शकते. “तेलाचे उत्पादन अद्याप प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. त्याच्या विक्रीचे अद्याप नियोजन झालेले नाही. जागतिक बाजारात तेलाला प्रति लिटर दर २० हजार रुपये आहे” असे श्रीपाद यांनी सांगितले.

श्रीपाद यांनी व्यवसाय शेतातील वस्तीवरच सुरू केला आहे, त्यामुळे जागेचा खर्च वाचला. आठ लाख रुपये या प्रकल्पाचे बजेट असल्याचे लक्षात आल्यानंतर टाकळीसिकंदर आणि पंढरपूर येथील राष्ट्रीय बॅंकेच्या शाखेकडे कर्जाची मागणी केली. मात्र बॅंकांनी व्यवसायाची जागा बिगरशेतीमध्ये येत नाही, त्यामुळे कर्ज देता येत नाही असे कारण देऊन टोलवले, त्यामुळे वेळापूर येथील सुरभी पतसंस्थेकडून दीड लाखाचे कर्ज घेतले आणि उर्वरित रक्कम स्वतः आणि नातेवाइकांकडून जमवली. प्रक्रियेसाठी पल्पर, जॅकेटेड केटल आणि बॉयलर या तीन मशिनरी पुण्यातील भोसरी येथून खरेदी केल्या.

एका जिद्दी तरुणाने आपल्यातील सर्जनशीलतेच्या माध्यमातून वेगळ्या वाटा चोखळल्या आणि शेतीच्या पलिकडे तिला उद्योगाची जोड देवून स्वयंभूपणाचे उदाहरण घालून दिले आहे.  (श्रीपाद पाटील--8275025677 आंबेचिंचोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर)