संपादने
Marathi

लहानपणी थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करणारे करुणाकर रेड्डी आज ७५ लाख लोकांना उपलब्ध करून देत आहे शुद्ध पिण्याचे पाणी

पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी लहानपणी खूप घाम गाळावा लागायचा... घरात पाणी आणण्याकरिता दररोज तीन तास लागायचे.... शेतात काम करून अभ्यास करायचो.... गरीब परिस्थितीमुळे डॉक्टर बनण्याचे स्वप्न मातीत मिळाले.....डिग्री करत असताना आईचे दागिने विकून सुरु केली होती एक कंपनी.....काहीतरी करण्याची जिद्द शांत बसू देत नव्हती म्हणून एमबीए करूनच शांत झालो आणि पेप्सी कंपनीत नोकरी करून मोठे यश संपादन केले....लाखो रुपयांची नोकरी सोडली आणि लोकांना सुरक्षित पाणी देण्यासाठी व्यवसाय करण्याचे ठरवले.... आज स्माट इंडियाच्या माध्यमातून ७५ लाख लोकांना उपलब्ध करून देत आहे शुद्ध पिण्याचे पाणी...

ARVIND YADAV
8th Jun 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे होणारा त्रास करुणाकर रेड्डी यांनी अनुभवला होता. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी त्यांनी खूप पायपीट केली होती. दररोजचे अनेक तास खर्ची घातले होते. लोकांच्या विहिरीचे आणि तलावातले खराब झालेले पाणी पिऊन आजारी पडलेले आणि नंतर रुग्णालयात मृत्त्यूमुखी पडलेले लोकं त्यांनी स्वतः डोळ्याने पाहिलेले होते. असह्य लोकांचे हाल पाहून आपण डॉक्टर व्हावे आणि त्यांची सेवा करावी असे त्यांना मनापासून वाटायचे. मात्र गरीब परिस्थितीमुळे त्यांची स्वप्न मातीत मिळाली होती. जेव्हा नोकरी मिळाली तेव्हा त्यांना समजले होते की, एकीकडे काही कंपन्या पाणी विकून करोडो रुपये कमावत आहे तर दुसरीकडे काही लोक थेंबथेंब पाणी मिळवण्यासाठी फरफटत आहे. करुणाकर रेड्डी यांच्या लक्षात आलं की काही पाणी विकणाऱ्या कंपन्या लोकांचा गैरफायदा घेत आहे. या कारणामुळे संधी मिळताच त्यांनी आपले आयुष्य लोकांची तहान भागवण्यासाठी समर्पित केले.

image


करुणाकर रेड्डी यांना पाण्याचं महत्व आणि त्याची खरी किंमत माहित होती, म्हणून त्यांनी 'स्माट इंडिया’ नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे जल शुद्धिकरण यंत्र बनवले. या शुद्धिकरण यंत्रांमुळे गावातल्या लोकांना शुद्ध पाणी मिळू लागले. 'स्माट इंडिया' ने असेही काही यंत्र बनवले जे नाल्याचे खराब पाणी सुद्धा पिण्यायोग्य बनवते. करुणाकर रेड्डी यांच्या कंपनीने देशात आणि परदेशात सोळा हजार पेक्षा जास्त यंत्र लावले आहे. ३५ देशात त्यांनी तयार केलेल्या यंत्राचा वापर केला जात आहे. करुणाकर रेड्डी यांच्या प्रयत्नामुळे ६५०० पेक्षा जास्त गावांमध्ये लोकांना सहजपणे शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे. तसे म्हटले तर करुणाकर रेड्डी देश परदेशातील ७५ लाख लोकांची पाण्याची तहान भागवत आहे. ते एक यशस्वी उद्योजक तर आहेतच त्यांची संघर्षगाथा निश्चितच प्रेरणादायी आहे. प्रयत्न प्रामाणिक असतील तर सारे काही शक्य होते, हेच त्यांच्या कहाणीतून स्पष्ट होते.

त्यांच्या या कहाणीची सुरवात महबुबनगर जिल्ह्यातल्या रंगापुरम गावात ( आत्ताचे तेलंगाना राज्य) झाली. या गावातच करुणाकर रेड्डी यांचा जन्म झाला. त्यांच्या या छोट्याश्या गावात कायम पाणी टंचाई असायची. गावात लोकांना पिण्यासाठी देखील पाणी मिळायचे नाही. गावाजवळच चार किलोमीटर दूर अंतरावर कृष्णा नदी वाहायची, तरीसुद्धा गाववाल्यांना पाण्याच्या एका एका थेंबासाठी संघर्ष करावा लागायचा. माणसालाच पाणी मिळत नव्हते तर गाय, म्हैस, बकरी यांसारख्या जनावरांची काय दशा होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी.

image


लहानपणी सकाळी उठल्यावर करुणाकर रेड्डी यांचे पहिले काम असायचे ते म्हणजे घरात पाणी आणणे. उठल्यावर ते घागरी घेऊन पाणी आणायला निघत असत. घरापासून जवळजवळ दीड किलोमीटरवर एक विहीर होती तिथून ते पाणी आणत आणि आपल्या घराची पाण्याची गरज भागवत. पाणी आणण्यासाठी प्रत्येक खेपेला त्यांना १५ ते २० मिनिट लागायचे. दर खेपेला ४० लिटर पाणी घरात आणले जायचे. अशाप्रकारे दोन ते तीन तास ते पाणी भरण्यात घालवत असत.

पाण्यासाठी सभोवतालच्या गावातही सारखीच परिस्थिती होती. विहीरी आणि तलावच पाण्याचे मुख्य स्त्रोत होते. अनेक कारणांमुळे विहिरी आणि तलावाचे पाणी दुषित होत होते. पाणी उकळून आणि गाळून पिण्यासाठी अनेक लोकांकडे वेळच नसायचा. दुषित पाण्यामुळे बरेचजण आजारी पडायचे. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखीनच गंभीर स्वरूप धारण करायची. जवळजवळ सर्वच विहिरीचे आणि तलावांचे पाणी दुषित व्हायचे. त्यामुळे पावसाळ्यात काॅलरा आणि अतिसार हे दोन आजार ठरलेलेच असायचे.

करुणाकर रेड्डी यांनी सांगितले की, “लहानपणी शाळेत जाणे म्हणजे माझ्याकरिता शेवटचे प्राधान्य असायचे. घरात पाणी आणणे माझा प्रथम प्राधान्यक्रम होता. दुसरा प्राधान्यक्रम होता दुषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या रुग्णांची सेवा करणे. यामध्ये जर वेळ मिळाला तरच शाळेत जायला मिळायचे”.

करुणाकर रेड्डी यांचे वडील शेतीकाम करायचे. शेतकामातूनच त्यांचे घर चालायचे. त्यांच्या वडिलांना वाटायचे की जर करुणाकर यांनी दररोज शेतात काम केले तर एका मजुराला द्यायची मजुरी वाचेल. त्या काळात मजुराला दररोज चाळीस ते पन्नास रुपये मजुरी द्यावी लागायची. ४० ते ५० रुपयांची बचत करण्यासाठी वडिलांच्या सांगण्यावरून करुणाकर शेतात काम करू लागले. शेतीसंबंधित सर्व कामे त्यांनी शिकून घेतली. कमी वयातच त्यांनी नांगरणी, पेरणी यासारखी कामे शिकून घेतली होती. त्यांचे वडील त्यांना म्हणायचे की अभ्यास करून काही मिळत नाही. मात्र करुणाकर यांचे सर्व लक्ष अभ्यासात होते. त्यांना खूप शिकायचे होते. त्यामुळे त्यांना जेव्हा केव्हा वेळ मिळेल ते शाळेत जायचे. त्यांना वाचनाची खूप आवड होती लहानपणी जिथे कुठे त्यांना जुने वर्तमानपत्र वाचयला मिळायचे ते वाचून काढत असत. शाळेतील शिक्षकही करुणाकर रेड्डी यांची अभ्यासप्रती असलेली ओढ पाहून कौतुक करायचे. आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते संध्याकाळी आपल्या शाळेच्या शिक्षकाच्या घरी जायचे. याचे त्यांना दोन फायदे व्हायचे एक म्हणजे त्यांचा अभ्यास व्हायचा आणि दुसरा म्हणजे त्यांना मास्तरांच्या विहिरीवरचे पाणी मिळायचे.

image


कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी दहावीची परीक्षा पास केली, जे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. गावासाठी तर ही एक ऐतिहासिक घटना होती. कारण गावातल्या ३८ मुलामुलींनी ही परीक्षा दिली होती त्यातून फक्त एकटे करुणाकरच पास झाले होते. ते नुसतेच पास झाले नव्हते तर प्रथम श्रेणीमध्ये त्यांचा क्रमांक होता. केवळ त्यांच्या गावातूनच नव्हे तर आजूबाजूच्या सर्वच गावातून ते एकटेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्यांचे नाव वर्तमानपत्रात छापून आले होते. त्यादिवसाची आठवण सांगत करुणाकर यांनी सांगितले की, “ त्यावेळी माझ्या शाळेत दोन वर्षांपासून कोणीही दहावीची परीक्षा पास झाले नव्हते. सर्व शिक्षकांना माझ्याकडून अपेक्षा होत्या. त्यामुळे ते माझ्याकडे विशेष लक्ष द्यायचे. त्या काळात फक्त वर्तमानपत्रातच रिझल्ट छापून यायचे. रिझल्टच्या दिवशी मीही वर्तमानपत्र खरेदी केले. सर्वप्रथम मी थर्डक्लासच्या यादीमध्ये माझा क्रमांक शोधला, क्रमांक दिसत नव्हता. मग सेकंडक्लास मध्ये शोधला तिथेही क्रमांक दिसेना. तेव्हा वाटले कदाचित मीही नापास झालो असेल. तेव्हा मात्र माझ्या एका शिक्षकाचे म्हणणे मला आठवले. परीक्षा झाल्यानंतर मी माझ्या शिक्षकाला पेपर मध्ये काय सोडवले याबद्दल सांगितले होते. मी सांगितल्याप्रमाणे ते म्हणाले होते की मला ६०० मधून ३६६ मार्क्स नक्की मिळतील, म्हणजे मी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणार. शिक्षकांनी सांगितलेली ही गोष्ट आठवून मी फर्स्टक्लासच्या यादी मध्ये माझा क्रमांक शोधू लागलो. त्या यादीमध्ये माझा क्रमांक होता आणि विशेष म्हणजे शिक्षकांनी सांगितले त्यापेक्षा दोन टक्के मला जास्त मिळाले होते.” आपल्या आयुष्यातील आठवणी सांगताना करुणाकर पुढे म्हणाले की, “मला आठवते की, रिझल्टच्या दिवशी माझी आई खूप खुश होती. सर्व गावात माझ्याविषयी चर्चा सुरु होती, माझे कौतुक केले जात होते. माझे वडीलही खूप खुश होते मात्र तसे त्यांनी बोलून दाखवले नाही. तेव्हाही त्यांचे म्हणणे होते की मी शेतीच करावी”.

मात्र करुणाकर यांचे विचार वेगळे होते. त्यांनी मनापासून ठरवले होते की डॉक्टर बनायचे. शिक्षणाचे महत्व त्यांना कळले होते. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी ते काहीही करायला तयार होते. मात्र त्यांच्या घरची परिस्थिती नाजूक होती. बारावीपर्यंतचे शिक्षण घेण्यास त्यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते. त्यांच्या वडिलांनी पुढील शिक्षणासाठी ते खर्च करू शकणार नसल्याचे सांगितले होते, मात्र करुणाकर यांनी त्यांच्या शिक्षकांकडून वडिलांची मनधरणी केली. वडिलांना सांगितले की बारावी पर्यंतच्या परीक्षेला जास्त खर्च होणार नाही. तसेच अभ्यास करून ते शेतीचे कामं सुद्धा करतील. कसेही करून त्यांनी वडिलांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी राजी केले. त्यांच्या गावापासून दूर वीस किलोमीटर अंतरावर वनपर्ति टाउनच्या सरकारी कॉलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांना डॉक्टर बनायचे होते म्हणून त्यांनी बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय निवडले. अभ्यास जोरदार सुरु झाला. आणि मग मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश पात्रतेसाठी एमसेटची परीक्षा देण्याची वेळ आली. मात्र त्या दिवसांत त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती. प्रवेशपरीक्षेसाठी भरावे लागणारे पाचशे रुपये सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे ते परीक्षा देऊ शकले नाही आणि डॉक्टर बनण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले.

image


याच दरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती आणखीनच खराब झाली. आईने मात्र खूप धीराने घेतले. खंबीरपणे शेती करण्यास सज्ज झाली आणि करुणाकर यांनी शिक्षण सुरु ठेवण्यास सांगितले. इंटर नंतर करुणाकर यांनी बीएससीचा अभ्यासक्रम सुरु केला. शिक्षण सुरु असतानाच त्यांच्या एका मित्राने त्यांना एक रोजगार उपलब्ध करून दिला. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास थोडीफार मदत झाली. करुणाकर यांच्या या मित्राचे वडील टीव्ही संबंधित व्यवसाय करायचे. त्या काळात टीव्हीसाठी घराच्या गच्चीवर एंटीना लावावा लागायचा. करुणाकर घरोघरी जाऊन एंटीना लावायचे काम करू लागले. एक एंटीना लावल्यावर मित्राचे वडील ७५ रुपये द्यायचे, त्यातले २५ रुपये त्यांचा मित्र घेऊन टाकायचा आणि फक्त पन्नासच रुपये त्यांना मिळायचे. मात्र या कामामुळे करुणाकर यांना मोठी मदत झाली. हे काम खूप वाढत चालले होते. भरपूर ऑर्डर मिळायला लागल्या त्यामुळे करुणाकर यांनी स्वतःची कंपनी सुरु करण्याचा विचार केला. आईचे दागिने विकून करुणाकर यांनी 'सिंधुजा इंटरप्राइजेज' नावाने कंपनी सुरु केली. कंपनीचे काम चांगले चालू लागले त्यामुळे आर्थिक समस्या दूर झाली. काम करता करताच करुणाकर यांनी डिग्री परीक्षा उत्तीर्ण झाले. बीएससी झाल्यानंतर त्यांनी पोलीस सेवेत जायचे ठरवले. मात्र शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरल्याने ते पोलीस सेवेत जाऊ शकले नाही. करुणाकर यांनी पुढील शिक्षण सुरूच ठेवले. पुण्याच्या सिंबायोसिस महाविद्यालयातून त्यांनी दूरस्थ अभ्यासक्रमाद्वारे एमबीएचा अभ्यासक्रम सुरु केला. एमबीएचा अभ्यासक्रम सुरु केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप वेगाने बदल झाले. त्यांनी खूप मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण केले. या आधीचे शिक्षण तेलगु मधून झाले असल्याकारणाने त्यांना इंग्रजी भाषेत शिक्षण घेणे कठीण जात होते मात्र करुणाकार यांनी या समस्येवर मात करत जिद्दीने आणि मेहनतीने अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांचे कॅम्पस सिलेक्शन झाले. पेप्सी सारख्या मोठ्या कंपनीत त्यांना नोकरी मिळाली.

आपल्या त्या दिवसाच्या आठवणी सांगताना करुणाकर भावूक झाले ते म्हणाले, “जेव्हा मला नोकरी मिळाली आणि मी घरी आईला येऊन सांगितले की मला बारा हजार रुपये पगार मिळणार आहे, तेव्हा आईला खरे वाटले नाही. तिला वाटले मी तिची मस्करी करतो आहे. मात्र मी जेव्हा सत्य समजावून सांगितले तेव्हा मात्र तिला खूप आनंद झाला. तिला झालेला आनंद मी शब्दात सांगू शकत नाही”.

image


त्यानंतरच्या दिवसात मी खूप प्रगती केली पेप्सीमधले माझे काम पाहून सहा महिन्यातच मला वरच्या पदावर नेण्यात आले. पगारही दुप्पटीने वाढला. भरपूर इंसेंटिव मिळायचे. लवकरच त्यांचा पगार एका लाखापेक्षा जास्त झाला. स्वभाविकच त्यांच्या आईचा यावर विश्वास बसेना. करुणाकर सांगत होते, “ त्या दिवसांत लखपती होणे खूप मोठी गोष्ट होती. जेव्हा गाववाल्यांना कळले की मी लखपती झालो आहे तेव्हा त्या सर्वांना खूप आनंद झाला. तेव्हा आमचे गाव म्हणजे एका कुटुंबाप्रमाणे होते. प्रत्येक जण एकमेकांच्या घरी यायचे-जायचे. एखाद्याच्या घरी लग्न असले की सर्वजण त्यांच्याच घरात लग्न असल्याप्रमाणे वागायचे. सारे काही सुरळीत सुरु होते मात्र पेप्सी कंपनीच्या नोकरीत करुणाकर जास्त दिवस समाधानी राहू शकले नाही. त्यांनी सांगितले की, सचिन तेंदुलकर, अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गजांचे चेहरे दाखवून साखर घालून पाणी मोठ्या प्रमाणावर विकले जात आहे. मला अशा पद्धतीने केलेले काम पसंत नव्हते. या व्यतिरिक्त आणखी एक कारण होते. पेप्सी बरोबर काम करत असताना मला देशभर प्रवास करावा लागायचा. मी अनेक राज्यांमध्ये फिरलो. त्यावेळी मला जाणवले की भारतातील प्रत्येक गावातील परिस्थती जवळपास एकसारखीच आहे. प्रत्येक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. गावकरी शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. प्रत्येक गाव त्यांच्या गावाप्रमाणेच आहे. सर्व ग्रामीण भारत एक सारखाच आहे. मी निर्णय घेतला की नोकरी सोडून इतर कुठले तरी काम करावे ज्यामुळे लोकांचे भले होईल.”

करुणाकर रेड्डी यांनी जेव्हा आपण नोकरी सोडत असल्याचे त्यांच्या वरिष्ठांना सांगितले तेव्हा त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना मूर्ख म्हटले. आणि म्हणाले की नोकरी सोडणे म्हणजे आत्महत्या करण्याप्रमाणे आहे. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना सांगितले की, पेप्सी लवकरच पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय सुरु करणार आहे. करुणाकर यांना पेप्सी ऐवजी एक्वाफिना या कंपनीत काम करण्यास सांगितले. करुणाकर यांनीही वरिष्ठांचा सल्ला मान्य केला आणि एक्वाफिनामध्ये काम करण्यास सुरवात केली. काही महिने काम केल्यानंतर त्यांच्या मनात नोकरी सोडून गरिबांसाठी काम करण्याचे विचार येऊ लागले. यावेळी मात्र त्यांनी निश्चय पक्का केला आणि लाखो रुपयाची नोकरी सोडून दिली.

एक्वाफिना बरोबर काम करत असताना करुणाकर यांनी अनेक नव्या गोष्टी आत्मसात केल्या होत्या. त्यांना हे कळून चुकले होते की, भविष्यात भारतात पाण्याचा व्यवसाय जोरात चालेल. पाण्याची समस्याही वाढेल आणि व्यवसायही मजबूत चालेल. इतकेच नाही तर परदेशी कंपन्याही या संधीचा लाभ उठवण्यास सज्ज होत्या. अशा परिस्थितीत करुणाकर यांनी एक मोठा निर्णय घेतला. निर्णय होता पाण्याची बचत करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि पिण्याचे पाणी लोकांना कमीत कमी किंमतीमध्ये उपलब्ध करवणे. त्यांनी आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. याच दरम्यान करुणाकर यांना राष्ट्रपतीभवनात काम करण्याची संधी मिळाली. मुगल गार्डनमध्ये पाण्यासंबंधित काम होते. त्यांना मिळालेले काम त्यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने केले. त्यांचे काम पाहून तत्कालीन राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम खूप प्रभावित झाले. त्यांनी करुणाकर यांना आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले की, “ तुमचे काम खूप चांगले आहे, मात्र हैदराबादपासून काही किलोमीटर दूर अंतरावर नलगोंडा या ठिकाणी लोकं विषारी पाणी पित आहे, तुम्ही त्यांच्यासाठी का नाही काम करत.”

करुणाकर रेड्डी यांनी डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगितलेल्या या वाक्यालाच आपले ध्येय बनवले. त्यांनी आँध्रप्रदेशच्या अविभाजित गावांमध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यास सुरवात केली. करुणाकर रेड्डी यांनी गावागावात जाऊन समुदाय आधारित पाणी शुद्धीकरण यंत्र बसवले. यामुळे कित्येक गावांना सहजपणे पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यास सुरवात झाली. करुणाकर रेड्डी यांनी सांगितले की, "डॉ. अब्दुल कलाम यांनी त्यांना खूप मदत केली. वेळोवेळी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ३५ ते ४० वेळा मी त्यांना भेटलो. प्रत्येक वेळेला मी त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकलो. अनेक ठिकाणी त्यांनी माझे कौतुक केले. माझ्यासाठी शब्द टाकला आणि मला अनेक कामं मिळत गेली आणि गावागावात स्वच्छ पाणी पोहचवण्यास मला यश मिळत गेले.

image


करुणाकर रेड्डी हे सध्या त्यांच्या "स्माट इंडिया" या कंपनीच्या माध्यमातून ३५ देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करत आहे. पश्चिम देशांच्या व्यतिरिक्त चीन आणि खाडी देशांमध्येही करुणाकर लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहे. त्यांनी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी सोळा हजारपेक्षा जास्त पाणी शुद्धीकरण यंत्र लावले आहे. आपल्या या यंत्राच्या माध्यमातून ते ७५ लाख लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देत आहे.

आमच्याशी गप्पा मारताना त्यांनी या यंत्राविषयीची माहिती, आर्थिक बाजू आणि त्यांची काम करण्याची पद्धत यावर सविस्तरपणे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार एका यंत्राची किंमत आठ लाख रुपये आहे. पाच वेगवेगळ्या मॉडेलच्या साहायाने या यंत्रांना गावांमध्ये पोहोचवले जात आहे.

पहिले मॉडेल – अनेक ठिकाणी राज्य सरकारद्वारे यंत्राचा पूर्ण खर्च केला जातो. तर काही गावात केंद्र सरकार खर्च करते आहे.

दुसरे मॉडेल – राज्य किवा केंद्र सरकार कॉर्पोरेटच्या सहाय्याने अर्धा अर्धा खर्च उचलत आहे.

तिसरे मॉडेल – खासदार किवा आमदार निधीतून अनेक गावांत यंत्र बसवण्यात आले आहे.

चौथे मॉडेल - अप्रवासी भारतीय किवा कॉर्पोरेट क्षेत्र यंत्राचा सर्व खर्च करत आहे

पाचवे मॉडेल – गावचे लोकं स्वतः वर्गणी करून खर्च करत आहे.

करुणाकर रेड्डी यांनी सांगितले की, “ एक यंत्र लावल्यानंतर तीन प्रकारचे खर्च होतात. प्रथम म्हणजे ऑपरेटरचा पगार ( दहा हजार रुपये महिना) दुसरा विजेचं बिल ( दहा हजार रुपये महिना) आणि तिसरं यंत्राच्या मेंटेनन्ससाठी लागणाऱ्या वस्तू जसे की फिल्टर वैगरे ( पंधरा हजार रुपये महिना) म्हणजे ३५ हजार रुपये महिन्याचा खर्च होतो. या यंत्रामुळे दररोज २० ते ५० लिटर शुद्ध पाणी मिळते. संपूर्ण खर्च करून गाववाल्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फक्त बारा पैसे प्रती लिटर मागे द्यावे लागतात. यामध्ये विशेष बाब म्हणजे हे यंत्र जमिनीतील पाण्याला देखील शुद्ध करते. जमिनीतील पाणी कितीही अशुद्ध असू द्यात हे यंत्र पाणी शुद्ध करून पिण्यालायक बनवते.

image


करुणाकर रेड्डी यांची कंपनी "स्माट इंडिया" पाणी शुद्धिकरण करण्यासाठी विविध प्रकारचे यंत्र तयार करून विकत आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामासाठी त्यांना आतापर्यंत १६३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. सलग तीन वर्षांपासून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते बेस्ट नॅशनल एमएसएमई अवार्ड मिळाले आहे. राष्ट्रीय ग्रामीण विकास बँकने सुद्धा त्यांना त्यांच्या संशोधनासाठी पुरस्कार दिला आहे, त्यांच्या सेवेसाठी त्यांना इंग्लंडमध्ये सुद्धा "क्वालिटी क्राउन" हा सन्मान प्रदान करण्यात आला.

एका प्रश्नाचे उत्तर देताना करुणाकर रेड्डी यांनी सांगितले की, “माझं स्वप्न आहे की भारतातल्या प्रत्येक गावात आणि घरात सुरक्षित, शुद्ध पाणी मिळावं, तेही अगदी सहजपणे. मी पाणी आणण्यासाठी जो त्रास लहानपणी सहन केला तो कोणालाही होता कामा नये”.

मात्र हे स्वप्न कसं आणि केव्हापर्यंत साकार होणार असे विचारले असता ते म्हणाले की, “हे काही एका माणसाने करावयाचे काम नाही. प्रत्येकाला पाण्याचे महत्व समजले पाहिजे. पाण्याची बचत केली पाहिजे. जेव्हा प्रत्येक नागरिक पाण्याचे मूल्य जाणून घेईल तेव्हा पाण्याची समस्या नक्कीच दूर होऊल.”

सध्या करुणाकर रेड्डी पाण्याची बचत करण्यासाठी जनजागृती अभियान राबवत आहे. या अभियानाद्वारे ते लोकांना महत्वाची माहिती देतात. ते सांगतात की टॉयलेट मध्ये एक वेळा फ्लश केल्यानंतर २० ते २५ लिटर पाणी वाया जाते. एका घरात चार जण असतील तर १०० लिटर पेक्षा जास्त पाणी फक्त टॉयलेटमध्ये निघून जाते. त्यामुळे टॉयलेटमध्ये फ्लश न करण्याचा सल्ला ते देतात किवा घरातले खराब पाणी टॉयलेटमध्ये टाकायला सांगतात. असे अनेक सल्ले ते आपल्या या अभियानामार्फत देऊन जनजागृती करत आहेत.

त्यांच्या कंपनीचं नाव 'स्माट इंडिया' ठेवण्यामागचं कारण त्यांना विचारलं असता करुणाकर रेड्डी यांनी सांगितलं, “ संस्कृत मध्ये ‘स’ म्हणजे शुद्ध आणि पवित्र. ‘म’ म्हणजे मल्हार, मल्हार एक राग आहे, ज्यामुळे मनाला शांती मिळते, मल्हारचा अर्थ पाऊस देखील होतो. त्यातलाच ‘ए’ म्हणजे एक्वा अर्थात पाणी तसेच ए चा अर्थ एयर म्हणजेच हवा आहे. आणि ‘टी’ म्हणजेच टेक्नॉलॉजी या सगळ्यांचे मिळून मी माझ्या कंपनीचे नाव 'स्माट इंडिया’ ठेवले आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

अमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” !

 ‘वेटर’च्या कामापासून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारे तुषार मुनोत उभारणार सेवन स्टार हॉटेल

ऑपरेशन थिएटरच्या प्रकाशात मेंदूची शस्त्रक्रिया करणारे डॉ. रंगनाथम कंदिलाच्या प्रकाशात करत होते अभ्यास

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

    Latest Stories

    आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा